Monday, June 15, 2015

सार्थ भीमरूपी स्तोत्र - प्रस्तावना

||श्रीराम||

आज पासून आपण सर्वजण श्री समर्थ रामदासस्वामी लिखित भीमरूपी स्तोत्राचे चिंतन करणार आहोत.
श्रीराम भक्त हनुमान याची उपासना भारतामध्ये फार पूर्वी पासून सुरू आहे. शारीरिक व मानसिक सामर्थ्य वाढवणारी अशी या शक्ती देवतेची उपासना अतिशय लोकप्रिय आहे. हनुमंताच्या उपासनेने उपासकाच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो. साक्षात मृत्यूला ज्याचे भय वाटते असा हा हनुमंत.
पवनपुत्र हनुमान याचा लीलांचे वर्णन वाल्मिकी रामायणात तसेच इतर ललित साहित्यात पहायला मिळते. या सर्वामध्ये त्याच्या पराक्रमाचे त्याच बरोबर त्याच्या भक्तीचे दर्शन घडते.
सर्व संकटात रक्षण करणारा भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा हनुमंत समर्थांचे उपास्य दैवत. समर्थांनी त्याचा गावोगावी प्रचार केला, मंदिराची स्थापना केली. त्याचा पराक्रमाचे तसेच भक्तीचे वर्णन करणारे वाङमय लिहिले. 
समर्थांनी हनुमंताचा पराक्रम वर्णन करणारी रामायणातील दोनच काण्डे लिहिली. याशिवाय त्याच्या स्तुतीपर 13 मारुती स्तोत्राची रचना केली जी भीमरूपी स्तोत्रे म्हणुन प्रचलित आहेत. या स्तोत्राचे पठण केले असता सर्व प्रकारची संकटे व्याधी दूर होतात असे मानले जाते नव्हे असा विश्वास आहे. या स्तोत्रा मधील सर्वात प्रसिद्ध असणार्‍या भीमरूपी स्तोत्राचे चिंतन आपण आजपासून करणार आहोत.
समर्थ आणि मारुतीराया यांना वंदन करून आपण या उपक्रमाला प्रारंभ करू.......
मारुती स्तोत्र पाहण्यापूर्वी त्याच्या चरित्राविषयी थोडे जाणून घेऊ...
मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम |
वातांत्मजं वानरयूथ मुख्यं श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये |
वाल्मिकी रामायणामध्ये अनेक व्यक्तिचित्र पहावयास मिळतात. त्यापैकी पवनपुत्र हनुमानाला या सर्वामध्ये विशिष्ट स्थान प्राप्त झाले आहे. तीक्ष्ण बुद्धी, अफाट शक्ती, आणि अपार भक्ती अशा गुणांची खाण असलेला हनुमंत रामायणाचा प्राण आहे. श्रीरामाचा हा अनन्य भक्त केसरी आणि अंजनीचा पुत्र. अंजना ही एक शापित अप्सरा होती. एकदा एका ऋषींचा अवमान केल्यामुळे पुंजिकस्य या अप्सरेला ऋषींनी “ तू वानरी होशील” असा शाप दिला. तीच ही अंजना होय. या अंजनाचा विवाह वानरराज केसरीशी झाला. केसरी आणि अंजनाचा प्रथम पुत्र तो मारुती. मारुती अंजनीचा एकमेव पुत्र नसून त्याला पाच भाऊ असल्याचा उल्लेख ब्रह्मपुराणात सापडतो. त्या उल्लेखावरून मारुतीला मतिमान, श्रुतीमान, केतुमान, गतिमान आणि धृतिमान असे पाच बंधू होते. मारुतीचे हे सर्व बंधू विवाहित व पुत्रपौत्रांनी युक्त होते.
      मारुतीने बालपणी सूर्याला फळ समजून ते खाण्यासाठी उड्डाण केले त्यावेळी सूर्याला वाचवण्यासाठी इंद्राने त्याला वज्र फेकून मारले या आघातामुळे मारुती मूर्च्छित झाला. मारुती हा वायुदेवाचा मानसपुत्र असल्याने आपल्या पुत्राला इंद्राने इजा केली पाहून तो अत्यंत क्रोधित झाला. त्याने सर्व प्राणिमात्रातील आपला संचार थांबवला. त्याचा क्रोध प्रजाजनासाठी अहितकारक ठरला. आपल्या देहातील वायुतत्वाचा संचार थांबला तर प्राणीमात्राची कशी अवस्था होते याचे वर्णन वाल्मिकी रामायणात विस्ताराने पाहायला मिळते.
      वायुदेवाचा कोप झाल्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला. तेव्हा त्याला प्रसन्न करण्यासाठी सर्व देवदेवतांनी मारुतीला शुद्धीवर आणून त्याला अनेक उत्तम आशीर्वाद दिले. वायुदेवाची सर्व देवांनी समजूत घालून मारुतीला अनेक शक्ती प्रदान केल्या. अभय, तेज, बुद्धी, नीतिमानता असे अनेक दैवी गुण त्याला प्राप्त झाले....
शारीरिक, मानसिक, बौद्धिक सर्व सामर्थ्य प्राप्त झालेला हनुमंत कोणाला ही न घाबरता सर्वत्र संचार करू लागला ऋषींना त्रास देऊ लागला. या त्रासाला कंटाळून ऋषींनी त्याला शाप दिला, “ज्या बळाच्या जोरावर तू आम्हाला त्रास देतो आहेस त्या बळाचेच तुला विस्मरण होईल. पण जेव्हा तुला तुझ्या सामर्थ्याची कोणी जाणिव करून देईल तेव्हाच तुझे बळ परत वाढेल”. हा शाप हनुमंतावर अंकुश ठेवण्याकरता दिला गेला. या शापामुळे हनुमंत एकदम नम्र झाला. ऋषीची सेवा करून हनुमंताने सर्व विद्याचे अध्ययन केले. सूर्याच्या वरामुळे त्याला शास्त्रांचे ज्ञान प्राप्त झाले. सर्व वेदांचे त्याला उत्तम ज्ञान होते. अतिशय उत्तम वक्तृत्वशैली त्याला लाभली होती. ऋष्यमूक पर्वतावर श्रीरामांची आणि हनुमंताची जेव्हा प्रथम भेट झाली तेव्हा श्रीरामचंद्रांनी लक्ष्मणाजवळ त्याच्या गुणांचे वर्णन केले आहे. “अरे लक्ष्मणा मी माझ्या जीवनात अनेक विद्वान पहिले आहेत पण असा विद्वान मी आजतागायत पहिला नाही. हा चार वेदांचा ज्ञाता आहे. व्याकरणाची त्याची बैठक इतकी पक्की आहे कि व्याकरणाच्या सर्व शाखांमध्ये हा विद्वान आहे”. साक्षात प्रभू रामचंद्रांनी पहिल्याच भेटीत हनुमंतातील गुण ओळखून त्याला प्रमाणपत्र दिले.
अशा या गुणवान हनुमंताला अनेक नावाने संबोधले जाते. हनुमंत हे सर्वात लोकप्रिय नाव इंद्राच्या वज्राने त्याची हनुवटी भंगल्याने त्याला हे नाव प्राप्त झाले ( वा. रा. ४.६६.२४ ) अंजनीचा पुत्र म्हणून त्याला अंजनेय म्हणतात. वायूचा औरस पुत्र म्हणून त्याला पवनपुत्र, वातात्मज, वायुनंदन, वायुपुत्र, मरुतात्मज, वायुतनय, मारुती इत्यादी नावे आहेत. केसरीचा तो क्षेत्रज पुत्र असल्याने त्याला केसरीनंदन  म्हणतात. काही पुराणांनी त्याला रुद्रावतार मानल्याने त्याला शंकरसुवनही म्हणतात. ( संदर्भ : श्रीराम कोश भाग दुसरा : १ )
हनुमंताला रामायणात किंवा उपासनेतही श्रेष्ठ स्थान मिळाले ते केवळ ही शक्तीची देवात म्हणून का? असे कोणते गुण हनुमंतामध्ये होते की प्रभू रामचंद्राचा देखील तो सर्वात प्रिय भक्त होता ? प्रभू रामचंद्राप्रमाणे सर्व भक्ताच्या मनात देखील विशेष स्थान निर्माण करणाऱ्या हनुमंतामध्ये असे विशेष काय आहे? हनुमंताच्या गुणांची ओळख वाल्मिकी रामायणामधून आपल्याला होते. अनेक गुणांनी युक्त असे हे व्यक्तिमत्व आहे.
उत्तम वत्कृत्वाचे सर्व गुण त्याच्यामध्ये होते. बोलताना प्रत्येक मुद्दा सविस्तर मांडण्याची कला त्याला अवगत आहे. बोलताना कोणतेही पाल्हाळ आढळत नाही. त्याच्या बोलण्यात अत्यंत सहजता आहे. बोलताना हावभावांचा अतिरेक त्याच्याकडून होत नाही. त्याच्या मधुरवाणीचे वर्णन करताना “शत्रूला देखील आपल्या मधुरवाणीने तो संमोहित करेल” असे साक्षात भगवंतच सांगतात. केवळ गुणांचे वाचन न करता हे गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न करणे हीच खरी उपासना नाही का J
हनुमंत सुग्रीवाचा उत्तम मित्र होता. मैत्री हा विषय देखील चिंतन करण्यासारखाच आहे. रामायणामध्ये हनुमंत सावलीसारखा सुग्रीवाच्या पाठीशी उभा आहे. अनेक कठीण प्रसंगी त्याला सहकार्य करताना दिसतो. वाली आणि सुग्रीव यांच्या वादात सुग्रीवावर झालेला अन्याय बघूनच त्याने सुग्रीवाशी सख्य पत्करले आहे. सतत सुग्रीवाचे यश चिंतणारा हनुमंत अत्यंत चाणाक्ष आणि मुत्सद्दी आहे. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण याची सुग्रीवाशी भेट झाली तर त्याला योग्य ते सहकार्य मिळेल हे त्याने तत्काळ ताडले होते. दोघेही वालीचे हेर आहेत असे सुग्रीवाला वाटत होते. हे दोघे नेमके कोण आहेत इकडे येण्याचे प्रयोजन काय हे जाणून घेण्यासाठी हे कार्य त्याने हनुमंतावर सोपवले. जे कार्य हनुमंतावर सोपवू ते कार्य तो यशस्वीपणे पार पाडेल याविषयी सुग्रीवाला पूर्ण खात्री होती. अत्यंत विचारी आणि बुद्धिमान अशा हनुमंतावर सुग्रीवाचा पूर्ण विश्वास होता. आपल्या वागण्या बोलण्यातून हनुमंताने तो प्राप्त करून घेतला होता. असा हा अनंत गुणांचे निवासस्थान असणारा हनुमंत सर्वांना विशेष प्रिय आहे...
मधुरवाणी प्राप्त झालेल्या हनुमंताना कोणत्या परिस्थितीत कसे वागावे याचे उत्तम धोरण होते. हनुमंताकडे उत्तम संघटन कौशल्य होते. रामायणामधील अनेक प्रसंगातून ते पहावयास मिळते. प्रभू रामचंद्र आणि सुग्रीव यांच्यामध्ये सख्य घडवून आणण्याचे काम त्याने अत्यंत हुशारीने साधले. दोघांचे दुःख एकच आहे हे लक्षात घेऊन हनुमंताने दोघांना एकत्रित आणले. याठिकाणी हनुमंताला मैत्रीचा करार करावयाचा नव्हता. तर संस्कार करावयाचा होता. कारण करार मोडला जातो पण संस्कार मोडला जात नाही. या मैत्रीच्या संस्कारातून त्याने आपल्या परमप्रिय मित्राचे कल्याण साधले. भगवती सीतेच्या शोधाची कामगिरी पार पडताना अनेक संकटे आली पण सर्व परिस्थितीत हनुमंत सावध होते. वालीपुत्र अंगद एक असामान्य शक्ती असलेली व्यक्ती सुग्रीवाच्या सेनेत असणे महत्वाचे आहे हे हनुमंत जाणून आहेत. त्यामुळे भगवती सीतेच्या शोधकार्यात वानरसेनेत फुट पडेल असे वाटले तेव्हा हनुमंताने त्याची समजूत घालून त्याचा राग शांत केला. कोणती परिस्थिती कशी हाताळावी हे कसब त्याच्याकडे होते म्हणूनच अंगादाचे विचार बदलण्यात त्याला यश मिळाले. हनुमंतामध्ये संघटन कौशल्य होतेच पण त्याच बरोबर प्रत्येकाचे सामर्थ्य ओळखून त्याचा योग्य तो उपयोग करून घेण्याचे कौशल्य देखील त्याच्याकडे होते.
      अनेक संकटावर निर्भयपणे मात करत आपले कार्य साध्य करण्यास पुढे जाणाऱ्या मारुतीरायाची पराक्रमीवृत्ती पहावयास मिळते. अनेक गुणांची खाण असणारा हनुमंत श्रेष्ठ मानसशास्त्रज्ञ आहे. अत्यंत सामर्थ्य संपन्न व तेजस्वी हनुमंताला कोणतेही कार्य आपण पार पाडू हा आत्मविश्वास आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे जे काम सांगितले तेवढे काम करणारे सांगकामे हनुमंत नाहीत. तर ते स्वयंप्रज्ञ आहेत. रावणाच्या दरबारात जाऊन त्याला त्याची चूक दाखवून दिली. हनुमंत नीतीनिपूण आहेत.याच कौशल्याचा वापर करून त्याने रावणाशी संभाषण केले. भर सभेमध्ये रावणाला त्याच्या चुकीची जाणिव करून देताना प्रभुरामचंद्राच्या पराक्रमाचे वर्णन करून त्याच्या विषयीचे भय सर्वांच्या मनात निर्माण केले.
रावणाने जेव्हा या वानराची शेपूट जाळण्याचा आदेश दिला तेव्हा या परिस्थितीत देखील हनुमंत विचार करतायत. लंकादहनाच्या कार्यात हनुमंतांनी सर्व नगरीचे बारकाईने निरीक्षण केले आहे. तटबंदी केलेले कितीतरी भूभाग पहिले, चबुतरे, घरे, सडका, छोट्या गल्या, घराचे मध्यभाग, या सर्वाचे त्याने अतिशय बारकाईने निरीक्षण केले . ज्याचा उपयोग पुढे युद्ध प्रसंगी झाला. हनुमंताच्या या पराक्रमाने त्याच्याविषयी सर्वांच्या मनात भीती निर्माण झाली. लंकेमध्ये रावणाच्या सेनेचे पूर्ण खच्चीकरण केले. तसेच भगवती सीतेच्या मनात विश्वास निर्माण करून हनुमंत परत आले आहेत. सीतामाईची व्याकुळता अस्वस्थता सर्व वानरसेनेत सांगून त्यांना युद्धाला प्रवृत्त केले. हनुमंताचे लंकादहन हा केवळ विनोद निर्माण करणारा प्रसंग नसून चिंतनशील हनुमंताचे दर्शन घडवतो.
युद्धशास्त्रात ज्याप्रमाणे हनुमंत पारंगत आहेत त्याचप्रमाणे अत्यंत उत्तम प्रतिभाशक्ती त्याला लाभली आहे. हनुमंताला उत्तम गायनीकला अवगत आहे. समर्थांनी हनुमंताला “संगीतज्ञान महंत” म्हणून गौरवले आहे. संगीततज्ञ हनुमंताने हनुमत्मत ( हनुमत् मत हा शब्द एकत्र करून वाचवा मला योग्य शब्द टाइप करता येत नाहीये _/\_ ) ही स्वतंत्र गायनाची पद्धत निर्माण केली. सर्वगुण संपन्न हनुमंताला बुधकौशिक ऋषींनी देखील ज्ञानवंत म्हणून संबोधले आहे. संगीतकले बरोबर त्याचे ग्रंथ कर्तुत्व देखील वाखाणण्याजोगे आहे.
हनुमंताने संगीतशास्त्राविषयी ज्या ग्रंथांची निर्मिती केली ते ग्रंथ आजही या क्षेत्रात प्रमाण मानले जातात. यामध्ये ‘अंजनेयभारत्’ ‘अंजनानंदनसंहिता’ ‘हनुमत् संहिता’ ‘संगीतपारीजात’ या ग्रंथाचा समावेश होतो. ‘संगीतपारीजात’ या हनुमत् मताच्या ग्रंथावर टीका करणारे कालीन्धानुमानाला उद्देशून म्हणतात, ‘ हा हनुमान आपल्या संगीताने वरदायक सीतापती राघवाला वश करून घेतो. हा स्वत: वेगवेगळे ताल आणि त्याचे उच्चार यात निपुण आहे. तो स्वत: कुशल व प्रशंसनीय गायन करून रसिकांना आनंदित करतो. असा हा कपिलश्रेष्ठ हनुमान माझ्यावर कृपा करो’.     ( संदर्भ : श्रीराम कोश खंड २ ) हनुमंत नृत्य गायन कलांमध्ये निपुण आहे. प्रभू रामचंद्रांना रामविण्यासाठी तो स्वत: गायन करतो. त्याच्या भावपूर्ण संगीताने प्रभू रामचंद्रा बरोबर सर्वच मंत्रमुग्ध होतात. हनुमंताची उत्कट रामभक्ती हा भक्तगणांनां आदर्शच ठरलेला आहे......क्रमशः                          

No comments:

Post a Comment