Monday, June 15, 2015

भीमरूपी महारुद्र वज्रहनुमान मारुती | वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना|| १ ||

समर्थांनी अनेक रचना केल्या. त्यापैकी मारुती स्तोत्र आणि मनाचे श्लोक या दोन रचना मुखोद्गत केल्या जातात. समर्थ रामदासस्वामी लिखित भीमरूपी स्तोत्रे मारुतीच्या पराक्रमाचे, चरित्राचे,त्याच्या गुणविशेषांचे वर्णन करणारी आहेत.  अत्यंत प्रासादिक अशी ही रचना आहे. समर्थाची ही स्तोत्रे एक उर्जेचा स्रोत आहेत. निर्भयता, आत्मविश्वास या गुणांनी युक्त असणाऱ्या हनुमंताच्या या स्तोत्राच्या नित्य पठणाने भय कमी होतेच पण आजच्या संघर्षमय जीवनाला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची उर्जां प्राप्त होते.
समर्थांनी आपले उपास्य दैवत जो हनुमंत याच्या स्तुतीपर जी मारुतीस्तोत्रे लिहिली ती त्यांना स्फुरली कशी या विषयी असे सांगितले जाते की, समर्थाची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर एकदा ते ध्यानस्त बसले असताना स्वत: हनुमंताने त्याना आपल्या आक्राळविक्राळ दिव्य भीमरूपाचे दर्शन घडविले. त्यांच्या रामभक्तीवर प्रसन्न होऊन त्यांना आनंदाने मिठी मारली तेव्हा समर्थाच्या तोंडून उस्फुर्तपणे ही स्तोत्रे बाहेर पडली. या स्तोत्र पठणाने सर्व संकटे व्याधी दूर होतात तसेच शनीचा त्रास देखील कमी होतो अशी या स्तोत्राची प्रसिद्धी आहे. या १३ मारुती स्तोत्रातील भीमरूपी महारुद्रा हे स्तोत्र विशेष लोकप्रिय झाले. एकूण १६ श्लोकांची ही रचना आहे. मारुतीच्या भव्यदिव्य रूपाचे दर्शन या स्तोत्रामधून घडते.मारुतीच्या सामर्थ्याची कल्पना येणारे हे स्तोत्र आहे.
भीमरूपी महारुद्र वज्रहनुमान मारुती | वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना|| १ ||
पहिल्या श्लोकात महाकाय असणारा मारुती शंकराचा रुद्राचा अवतार असल्याने महारुद्र असा उल्लेख आला आहे. सूर्याचा ग्रास करण्यासाठी उड्डाण केलेल्या हनुमंताला इंद्राने वज्र फेकून मारले त्या आघाताने त्याची हनुवटी तुटली म्हणून हा हनुमान. वज्राप्रमाणे कठीण किंवा बळकट असा हा वज्रहनुमान. अंजनीचा पुत्र जो श्रीरामाचा दूत आहे. प्रभंजन आहे......                           क्रमशः
....................................
आपण सर्व श्लोकांचा अर्थ सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण यापेक्षा मोठा मेसेज वाचायला कंटाळा येऊ शकतो म्हणून एका पानावर जेवढे विवेचन शक्य आहे तेवढे पाठवले आहे. वानरी याचा अर्थ वरती उल्लेख आल्याप्रमाणे वनाचा अरि म्हणजे शत्रू. अशोकवनाचा विध्वंस केला म्हणून वानरी हा अर्थ बरोबर आहे. पण वनात राहणारा वानर वनाचा शत्रू कसा असेल असा विचार मनात आला. त्यावरून जे चिंतन केले ते आपल्या समोर मांडते. पटते का पहा. हनुमंत ही शक्ती आणि भक्तीची देवता. हनुमंताच्या गुणामधून खूप काही शिकता येण्यासारखं आहे. श्रीराम आणि हनुमंत हे दुष्टाचा नाश करणारे आहेत. आमच्या मनरुपी वनात जे विकारांचे तण माजले आहे त्याचा नाश करणारा असा हा हनुमंत. मनामध्ये सतत असणारे भय हा आपला शत्रू. ज्यामुळे आत्मविश्वासाचा आभाव निर्माण होतो. अशा या भयरुपी शत्रूचा नाश करणारे निर्भय हनुमंत वनारी आहेत. केवळ शब्दाच्या जाळ्यात अडकून पडण्यातच पुरुषार्थ मानणाऱ्याचा ते शत्रू आहेत. जे विचार मला रामापासून दूर नेतात अशा विचारांचा वनाचा नाश करणारे हनुमंत आहेत. या स्तोत्रातून मारुतीराया आम्हाला निर्भय होण्यास तसेच श्रीरामावर पूर्ण विश्वास टाकून चिंतामुक्त होण्यास सांगतात.....
...............................................................
मोह्पाशाच्या बंधनात अडकलेल्या जीवांनी जर मनापासून त्याचे स्मरण केले तर त्या मोह्मयेचा नाश होतो. अशा या भीमरूपी मारुतीचे वर्णन समर्थ या ठिकाणी करतात. भीमरूपी यामध्ये भीम हे हनुमंताचे नाव आहे. सुंदरकाडांमध्ये “सीताशुद्धी घेउनिया भीम आला” असे म्हटले आहे. या भीमरूपी स्तोत्राच्या शेवटी देखील ‘आनंदे भीमदर्शने’ असे म्हटले आहे. यजुर्वेदात तसेच सूर्यपुराणात रुद्र्देवाला भीम असे म्हटले आहे.
हनुमंत हा रुद्राचा अवतार आहे. यापूर्वी आपण शिवपुराणातील कथा बघितली त्यावरून त्याला रुद्रावतार म्हटले जाते. म्हणून याठिकाणी महारुद्रा असा उल्लेख आला आहे.
वज्रहनुमान मारुतीला जेव्हा इंद्राने वज्र फेकून मारले तेव्हा मारुती मूर्च्छित होऊन पडला तेव्हा वायुदेवाचा कोप शांत करण्यासाठी सर्व देवांनी हनुमंताला अनेक वर दिले. त्यावेळी इंद्राने हनुमानाला वरदान दिले कि माझे वज्र तुला कोणतीही दुखापत करू शकणार नाही , एवढेच नाही तर कोणत्याही शस्त्राचा वा अस्त्राचा तुझ्या शरीरावर परिणाम होणार नाही. म्हणून हा वज्र हनुमान
मरुताचा औरस पुत्र म्हणून मारुती. ‘मारुतस्यौरस:पुत्र:’ असा जांबुवंत ज्याचा परिचय करून देतात. मरुताच्या वेगाने जाणारा असा हा मारुती. शंभर योजने दूर समुद्रावरून उड्डाण करून ज्याने भगवती सीतेचा शोध लावला असा मारुती.
सुषेणाच्या सांगण्यावरून वायुवेगात जाऊन ठराविक वेळेत द्रोणागिरी उचलून आणून अनेकांचे प्राण वाचवून आपले मारुती नाव सार्थ केले असा हा अंजनीचा सुत म्हणजेच पुत्र.
रामदूत हनुमंत हा रामाचा अनुपम दूत आहे. “निर्भीड वक्तृत्व, शुद्ध स्मरणशक्ती, वाक्चातुर्य, युद्ध कौशल्य, शास्त्रामध्ये पारंगत आणि अनुभव संपन्नता हे गुण ज्याच्या अंगी आहते ती व्यक्ती राजदूत होण्यास योग्य आहे” असे श्रीरामांनी लक्ष्मणाला राजनीतीचा उपदेश करताना सांगितले आहे. श्रीराम नीतिमान राजा होता आणि त्याच्याकडे हनुमंतासारखा सर्वगुणसंपन्न असा हनुमंतासारखा दूत होता. लंकादहनाचा प्रसंग यापूर्वी आपण पहिला तेव्हा हनुमंताने रावणाच्या दरबारात श्रीरामा विषयी तसेच वानरसेने विषयी सर्वांचा मनात कसे भय निर्माण केले हे आपण पहिले. रावणाच्या दरबारात त्याचीच चूक त्यांनी त्याला निर्भीडपणे दाखवून दिली त्यामुळे रावणाच्या सैन्यात दुफळी निर्माण झाली. अत्यंत चाणाक्षपणे त्याने लंका दहनाच्यावेळी लंकानगरीचे सूक्ष्म निरीक्षण करून ठेवले. त्याच्या या सर्व कृतीचा युद्धाच्या वेळी उत्तम उपयोग झाला होता. असा हा अनुपम दूत भक्तासाठी पण धावून येतो. प्रभूंची भेट हवी असेल तर हनुमंताची कृपा असेल तर हनुमंत याठिकाणी भक्त आणि भगवंत यांना जोडणारा दुवा ठरतो.
प्रभंजन: वायुदेवाचे नाव प्रभंजन असे आहे. याठिकाणी हनुमंताला प्रभंजन असे संबोधले आहे. लिंगदेहाचे भंजन करणारा तो प्रभंजन. चैतन्याचा अंश जो जीव तो परब्रह्मात विलीन होतो त्यावेळी लिंगदेह भंग पावत नाही. अनेक वासना शिल्लक राहिलेल्या असतात. त्यामुळे जीवाची जन्म मृत्युच्या फेऱ्यातून सुटका होत नाही. जसा एक दृष्टांत दिला जातो की एक घडा समुद्राच्या तळाशी अगदी चार युगे बुडवून ठेवला तरी घड्यातील पाणी आणि समुद्रातील पाणी एक होत नाही. जोपर्यत घडा फुटत नाही तोपर्यत ही एकरूपता नाही. लिंगदेह हा अज्ञानाचे मूळ आहे. हा देह जोवर नष्ट होत नाही तोवर जन्म मृत्यचा फेरा संपणार नाही. या लिंगदेहाचे भंजन करणारा तो प्रभंजन.

लिंगदेहा विषयी थोडे........आत्माबरोबर देहाचे चार भाग होतात. स्थूलदेह जो या दृश्य स्वरुपात दिसतो. मनोदेह अर्थात मन, कारण देह म्हणजे बुद्धी, आणि महाकारण देह अर्थात अहम. या सर्वांचा मिळून स्थूलदेह बनतो.मृत्यू नंतर स्थूलदेह पंचतत्वात विलीन होतो आणि आत्म्याबरोबर मन, बुद्धी, आणि अहं मिळून बनलेला लिंगदेह. जो पाप पुण्याचे गाठोडे घेऊन पुढचा प्रवास करतो. सूक्ष्म जगतात हा देह हलका असणे गरजेचे आहे. पुढच्या प्रवासात आपली सात्विकता आणि साधना याचाच आपल्याला उपयोग होतो. पण नेमक जीवन जगताना विकारांना महत्व देऊन,नको ते मानपान, आसक्ती पूर्ण जीवन आपणा जगात राहतो . त्याचबरोबर  साधने विषयी शंका घेत आणि चिकित्सा करत आपण आपले आयुष्य व्यतीत करतो. या सर्व संस्काराचा परिणाम हा होतो कि आपला हा लिंगदेह जड होतो. त्यामुळेच त्याला पुढची गती प्राप्त होत नाही आणि जीव पुन्हा जन्म मृत्युच्या फेऱ्यात आडकतो. लिंगदेहा मध्ये विषय वासना अहंभाव याचे संस्कार जितके कमी होतील तेव्हढाच जीवाचा पुढील प्रवास सुकर होतो...क्रमशः

5 comments:

  1. खूप छान . पुढील विवरण हवे आहे .

    ReplyDelete



  2. धन्यवाद ...पुढील श्लोकांचे विवरण याच संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तसेच याविषयीचे अधिक विस्ताराने विवेचन माझ्या "चिरंजीवी" या पुस्तकामध्ये उपलब्ध आहे. भीमरूपी या स्तोत्राबरोबर हनुमंताचे चरित्र, समर्थांची हनुमान भक्ती, समर्थ लिखित रामायणावरील दोन कांडे, समर्थाना अभिप्रेत असलेली उपासना असे हनुमंता विषयी लेखन करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर पुस्तक माझ्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. पुस्तक हवे असल्यास मेल द्वारा संपर्क करावा. धन्यवाद.

    ReplyDelete
    Replies
    1. I need copy of book
      Abasaheb desai
      35 b e ward Santkrupa deshamane colony tarabai park kolhapur 416003

      Delete
  3. नमस्कार आपला मेल आयडी दिलात तर संपर्क साधता येईल
    धन्यवाद

    ReplyDelete
  4. I want to purchase the book. Also mailed you with mob no. Kindly inform me Regards

    ReplyDelete