ब्रह्मांडाभोंवते वेढे, वज्रपुच्छ करु शके ।
तयासि तूळणा कैचीं, ब्रह्मांडीं पाहतां नसे ।।१२।।
हनुमंताला वज्रदेही म्हंटले
आहे. त्याचे अवयव शक्तिमान होते आणि शत्रूला नामोहरम करण्यासाठी त्याचा त्याने
अनेकदा उपयोग केला आहे. त्याचे शरीर अत्यंत बलवान आणि सुदृढ होते त्याचप्रमाणे ध्वजाप्रमाणे
शोभणारी वरच्या बाजूस वळलेली शेपूट अतिशय बलवान होती. त्याच्या शेपटीचे वर्णन
करताना निरनिराळ्या उपमा दिल्या गेल्या आहेत. ‘महाकालाची लांब जीभ’, ’आकाशातील
शेषनाग’, ’यमराजाने पसरलेला कालपाश’, ’शिवाच्या तिसऱ्या डोळ्यातील अग्निशिखा’,
‘भगवान विष्णूच्या शाड:र्ग धनुष्याची कमान’ अशा अनेक उपामा दिल्या गेल्या आहेत.
त्याच्या शेपटीचे सामर्थ्य इतके आहे कि ती पेटवून देखील जळाली नाही. भीमाचे
गर्वहरण त्याच्या शेपटीनेच केले. त्याची शेपटी ही त्याच्या पराक्रमाचे प्रतिक आहे.
श्रीरामकार्याचे प्रतिक आहे. भक्तांसाठी ती प्राणदायी आहे.
अशा या वज्रपुच्छाच्या
सामर्थ्याचे वर्णन समर्थ याठिकाणी करत आहेत. या वज्रपुच्छामध्ये इतके सामर्थ्य आहे
कि ते साऱ्या ब्रह्मांडाभोवती वेढले जाऊ शकते. त्याच्याशी तुलना करण्यायोग्य असे
साऱ्या ब्रह्मांडात शोधून सापडणार नाही. हनुमंताने आपल्या प्राणरूपाने
साऱ्या विश्वाला नेहमीच वेढून ठेवले आहे, जो काळाचाही काळ आहे......
हनुमंताने आपल्या वज्रपुच्छाने
ब्रह्मांडाला वेढले आहे. उपनिषदात सांगितले आहे कि या गहन भवसागरात अनादी, अनंत
अनेक रुपात भासमान होणारा, विश्वाला वेढून घेणारा असा जो एकमात्र
देव आहे त्याला जाणून घेतल्यास सर्व पाशातून मुक्त होता येते. ज्या देवाने हे सारे
विश्व व्यापलेले, वेढलेले आहे त्या देवाचे चिंतन करणे हेच मनुष्य जन्माचे ध्येय
आहे. समर्थ याठिकाणी हनुमंताचे वर्णन करताना हेच सुचवत आहेत. त्याची उपासना
करण्यामागे त्यांचा हाच भाव दिसतो.
एखादा कोळी जसा स्वत:मधून
निघणाऱ्या तंतुमध्ये स्वत:ला वेढून टाकतो. त्याप्रमाणे हनुमंताने या विश्वाला
वेढून टाकले आहे. सर्व संकटातून मुक्त व्हायचे असेल, केवळ आनंद प्राप्त करून
घ्यायचा असेल, या ब्रह्मांडात विलीन व्हायचे असेल तर हनुमंताला शरण गेले पाहिजे.
त्याची नित्य उपासना करायला समर्थ याठिकाणी आपल्याला सांगत आहेत.
हनुमंताच्या या स्तोत्राचे गेले
काही दिवस आपण चिंतन करत आहोत. तेव्हा लक्षात येते कि केवळ पाठांतरापुरतेच या श्लोकाचे
महत्व नाही. यामधील प्रत्येक शब्द सामर्थ्यवान आहे. मंत्राचे सामर्थ्य या
स्तोत्राला प्राप्त झाले आहे. योग्य आणि स्पष्ट उच्चार करून अत्यंत मनापासून या
स्तोत्राचे पठण केले आणि त्याच बरोबर आपले आचार, विचार देखील शुद्ध ठेवले तर या
स्तोत्राची प्रचीती आल्याशिवाय रहाणार नाही. शेवटी आत्मप्रचीती घेणे महत्वाचे हे
समर्थ देखील सांगतात......क्रमशः
No comments:
Post a Comment