Tuesday, June 23, 2015

हे धरा पंधराश्लोकी, लाभली शोभली बरी....

हे धरा पंधराश्लोकी, लाभली शोभली बरी ।
दृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्रकळागुणें ।। १६।।

या पंधरा श्लोकात समर्थांनी हनुमंताची स्तुती केली आहे. हे हनुमंता या पंधराश्लोकी स्तुती सुमनांच्या हाराचा तू स्वीकार कर. हे पंधरा श्लोक म्हणजे चंद्राच्या प्रतिपदा ते पौर्णिमा अशा पंधरा कला आहेत. या श्लोकाच्या नित्य पठणाने साधकाचे शरीर सुदृढ बनते तर मन संदेह शून्य म्हणजेच नि:शंक बनते.

मानवी मन हे चंचल आहे. सतत विषयांच्या मागे धावणारे आहे. भौतिक जगात प्रवेश केल्यानंतर त्याला आत्मस्वरूपाचे विस्मरण झाले आहे. त्यामुळे सततची काळजी, चिंता याने त्याचे मन अस्थिर झालेले दिसते. मनाची अस्वस्थता, विकारांचा अतिरेक या सर्वाचा परिणाम अर्थातच मानवी शरीरावर होतो. त्यामुळे त्याला अनेक रोगांना, आजारांना सामोरे जावे लागते. प्रापंचिक अडचणी आणि त्यातील सुबत्तेसाठी सतत मागण्या करत रहाणे अशी सामान्य जीवाची भक्ती असते. हनुमंताची उपासना साधकाला आत्मस्वरूपाचे वरदान प्राप्त करून देते. अर्थात त्यासाठी भजन, साधना आणि निदिध्यास याची आवश्यकता आहे. पण  यामध्ये देखील सातत्य हवे. जर नियमितपणे या स्तोत्राचे पठण केले तर साधकाला उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त होते.....

हनुमंत हा आत्मारामाची भेट घडवून आणतो. परंतु ही वाट इतकी सहज सोप्पी नाही. त्यासाठी सातत्याने भजन, साधना आणि निदिध्यास आवश्यक आहे. यासाठी आपला देह सुदृढ असणे महत्वाचे आहे. समर्थ वज्रदेही हनुमंताचे वर्णन करून त्याच्या सारखे होण्याचा साधकांनी प्रयत्न करावा असे सांगितले आहे. तसेच मनाशी संबंधीत योगाचा भाग सांगून मनाची दृढता स्पष्ट करतात. शरीर आणि मन दोन्ही बळकट असेल, आपले ध्येय प्राप्त करून घेण्याचा निश्चय दृढ असेल तर या मार्गावरची वाटचाल सुकर होईल. यासार्वातून जे अंतिम सत्य आहे त्यामध्ये एकरूप होणे म्हणजे नि:संदेह अवस्था. मनापासून भक्ती केली तर मन नि:शंक होईल, संदेह विरहित ज्ञान प्राप्त होईल. अज्ञानाचा अध:कार नाहीसा होऊन ज्ञानाचा पूर्णप्रकाश साधकाला प्राप्त होईल. सातत्याने साधना केली तर या सोळा कलांचा विकास होत जाऊन साधक पूर्णत्वाला पोहोचतो. चंद्राच्या या कला पौर्णिमेपर्यंत वाढत जातात तसाच विकास साधकाचा होतो. परंतु मायेत गुरफटून जगणाऱ्या जीवाला मात्र अमावस्येच्या कला प्राप्त होतात.....

याठिकाणी संख्या चंद्रकला गुणे असा उल्लेख आलेला आहे. अनेक ठिकाणी या सोळा कलांचा उल्लेख आढळतो भागवतातील पहिल्या स्कंधातील तिसऱ्या अध्यायात असा उल्लेख आहे की, सृष्टीच्या प्रारंभी भगवंताना लोकनिर्मितीची इच्छा उत्पन्न झाली. तेव्हा त्यांनी महत्तत्त्व आदीपासून दहा इंद्रिये, पंचमहाभूते आणि एक मन अशा सोळा कलांनी युक्त पुरुषरूप ग्रहण केले. १६ कलांनी युक्त म्हणजेच परिपूर्ण असे म्हंटले आहे. ही तुर्यावस्था होय. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे भय नाही, कोणतेही रोग, वृद्धत्व यांचा अधिकार चालत नाही, कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही, काळाला देखील ज्याठिकाणी अधिकार गाजवता येत नाही असे स्थान आहे. पण या अवस्थेतील धोका हा की साधक कधीही पुन्हा मायेत ओढला जाऊ शकतो. कारण या अवस्थेमध्ये संपुर्ण विषय तदात्म गेले आहे पण स्वरूप तादात्म्य झालेले नाही अशी ही अवस्था तुर्यावस्था. आत्मवस्तू जाणून घेतली तरी ती आत्मसात करण्यासाठी याहीपुढे जावे लागते. समर्थ संतस्तवनामध्ये म्हणतात,

सोळा काळी पूर्ण शशी | दाखवू शकेना वस्तूसी | तीव्र आदित्य कळारासी |तोही दाखवीना ||१|५|६||

सोळाकलानी पूर्ण असा पौर्णिमेचा चंद्रप्रकाश देखील आत्मवस्तू दाखवू शकत नाही. इतकेच नव्हे तर सगळ्या कळा ज्याच्यापाशी आहेत असा तेजोमय सूर्य देखील ती वस्तू दाखवू शकत नाही.
सोळा कलांच्याही पलीकडे असलेली तसेच कोणत्याही वृत्तीने युक्त नसलेली अशी “अमृत” नावाची चंद्राची सतरावी कला आहे. अमृतकला ही स्थिर अवस्था आहे. म्हणजे उन्मनी अवस्था. ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर साधकाच्या वासनांच संपतात. भौतिक जगात कार्य करतात परंतु त्यामध्ये ते लिप्त होत नाहीत. तो परमात्मस्वरूप असल्याने गुणरहित असतो. त्रिगुणांना लक्षणे असतात. पण सतरावी कला प्राप्त झालेला गुणरहित असतो.......क्रमशः

Friday, June 19, 2015

भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही.....

भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही ।
नासती तूटती चिंता, आनंदें भीमदर्शनें ।। १५।।

हनुमंताच्या उपासनेने काय घडते तर नकारात्मक शक्तींचा नाश होतो, नकारात्मक विचारांचा नाश होतो. हनुमंताच्या दर्शनाने भूतप्रेत, समंध इत्यादी अघोरी शक्तींकडून होणारा त्रास, अनेक व्याधी नष्ट होतात, सर्व चिंता समूळ नष्ट होतात. खरे तर सर्व सामान्य माणूस आपल्या चिंतामध्ये, आपल्या दु:खामध्ये इतका ग्रस्त असतो की पूजापाठ करत असताना देखील त्यामध्ये त्यांना आनंद मिळत नाही. हनुमंताचे दर्शन घ्यायचे म्हणजे केवळ मूर्तीचे दर्शन आणि केवळ मूर्तीची उपासना नाही. तर या सगुणाच्या पलिकडे जाऊन जे निर्गुण तत्व आहे ते जाणून घेऊन त्याचाशी एकरूप व्हायचे आहे तो आनंद अनुभवायचा आहे. समर्थांची उपासना इतकी व्यापक आहे. या उपासनेने हनुमंत केवळ आपल्या चिंता दूर करत नाहीत तर त्याचा समूळ नाश करतात.
पण ही उपासना करताना भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवणे अपेक्षित आहे. आपण सामन्य जीव शेकडो चिंतांचे ओझे घेऊन वावरत असतो. जेव्हा आपण चिंताग्रस्त असतो तेव्हा आपली उपासना ही यांत्रिक पद्धतीने घडत आहे असे समजावे. भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवून जेव्हा आपण ‘अचूक प्रयत्न’ करत राहतो तेव्हा आपल्याला चिंता करण्याचे कारण नसते. परंतु आपला आपल्यावर तसेच भगवंतावर देखील विश्वास नसल्याने सतत चिंता, काळज्या यांनी आपले जीवन ग्रस्तच राहते. यामुळेच सतत दु:खला आपल्याला सामोरे जावे लागते.

या सर्वातून मुक्त करणारी अशी ही उपासना आहे. समर्थांनी स्वता ही उपासना केली आणि आपल्याला देखील या उपासनेचा आनंद घेण्यास प्रवृत्त करतात..... 


भगवती सीता अशोक वनात असताना त्याठिकाणी ती राक्षसांच्या घेराव्यात आहे. भूतप्रेत इ. अधोरी शक्ती तसेच राक्षस तिला नानाप्रकारे त्रास देउन घाबरवत आहेत. साक्षात रावण तिला धमक्या देत आहे. मायावी शक्तीचा वापर करून भगवतीच्या मनात भीती निर्माण करत आहे. अशा या परिस्थितीत भगवती अतिशय चिंतीत आहे. या सगळ्या भयावह परिस्थितीत  आपले लांब केस अशोक वृक्षाला बांधून स्वत:ला टांगून प्राणत्याग करावा असे तिला वाटू लागते. परंतु तिच्या हृदयात एक प्रकारचा आनंद भरलेला आहे. आणि तो आनंद तिला या विचारा पासून परावृत् केले आहे. अत्यंत शोकग्रस्त असलेल्या भगवतीला जेव्हा हनुमंताने म्हंटलेले श्रीराम नाम तिच्या कानावर पडले तेव्हा ती अत्यंत हर्षित झाली. हनुमंताला पाहून प्रथम जरी भगवतीला भीती वाटली असली तरी हनुमंताच्या दर्शनाने तिच्या हृदयात जो आनंद उसळला त्यावरून तिची खात्री पटली कि हा रामाचा दूत आहे आपला हितचिंतक आहे.

रामायणातील या भागाचे चिंतन करताना समर्थ नामस्मरणाचे जे महत्व स्पष्ट करतात त्याचे महत्व लक्षात येते. हनुमंत काय भगवती सीता काय श्रीराममय झाले आहेत. भगवती सीतेच्या मनात या राक्षसांच्या त्रासाने क्षणिक कं होईना नकारात्मक विचार आला पण तिचे हृदय भगवत चिंतनाने इतके भरून गेले आहे कि जरी नाकारात्क विचारांचा तरंग मनामध्ये आला तरी तो फार काळ टिकला नाही. इतके सामर्थ्य या नामामध्ये आहे. कोणतीही उपासना करताना ती केवळ यांत्रिक पद्धतीने न होता सहज घडली पाहिजे. ज्या प्रमाणे आपण श्वास सहज घेतो आणि सोडतो, त्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. किंवा अशी क्रिया आपण करत आहोत याची आपल्याला जाणीवही नसते इतकी सहजता त्यामध्ये येते. त्याच पद्धतीने आपले नाम सहज पद्धतीने आपल्या जीवनाचा भाग झाला पाहिजे.....क्रमशः

Thursday, June 18, 2015

धनधान्यपशुवृद्धी, पुत्रपौत्र समग्रही ....

धनधान्यपशुवृद्धीपुत्रपौत्र समग्रही ।
पावती रूपविद्यादीस्तोत्र पाठें करूनियां ।।१४।।

समर्थ आता फलश्रुतीकडे वळतात. सामान्य माणसाची ही प्रवृत्ती असते कि एखादी गोष्ट केल्यानंतर मला काय मिळेल. म्हणून समर्थ म्हणतात मारुतीची उपासना केली तर तुला सर्व वैभव प्राप्त होईल. कोणते वैभव तर ते या श्लोकात स्पष्ट केले आहे.
खरे तर हा श्लोक अनेक पाठामध्ये नाही. काहींच्या मते हा श्लोक समर्थांचा नाही. तो नंतर कोणीतरी यामध्ये समाविष्ट केला आहे. पण तरी आपण या श्लोकाचा आदर राखून चिंतन करू.
या श्लोकातील फलप्राप्ती वाचून प्रापंचिक खुश होणार यात शंका नाही. पण कालपर्यंत आपण जे चिंतन केले त्यामध्ये समर्थ आपल्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. मग ही उंची गाठल्यावर पुन्हा आपले मन यामध्ये रमेल का? असा प्रश्न पडला. शून्याचा भेद केल्यानंतर आपली वृत्ती बदलते हे नक्की. भौतिक जगात जगत असताना धनधान्य, पुत्रपौत्र या सगळ्या गोष्टी असणारच आहेत. पण या उपासनेत समर्थ इतक्या उंचीवर नेऊन ठेवतात कि भौतिक जगातील ही संपन्नता असली नसली तरी तो कायम आनंदी रहातो. कारण त्याला खरे वैभव प्राप्त झाले आहे. शून्याचा भेद झाला कि मन सर्वातून अलिप्त होते. भौतिक जगात व्यवहार चालू असले तरी मन मात्र सतत भगवंत समीप त्याच्या चिंतनात रमलेले असते. आता तो पूर्ण समाधानी आहे.
या स्तोत्र पठणाने रूप, विद्या प्राप्त होते. योग्य उच्चार करून हे स्तोत्र म्हंटले तर खरेच एक प्रकारचे बळ आपल्याला प्राप्त होते. आत्मविश्वास निर्माण होतो, चेहेऱ्यावर प्रसन्नता येऊन तेज निर्माण होते. आत्मविश्वास प्राप्त झाल्याने बुद्धीला देखील तेज येते. हा विषय केवळ चर्चा करण्यापुरता मर्यादित नसून अनुभूती घेण्याचा आहे. मनापासून उपासना करून याची प्रचीती प्रत्येकाने घ्यावयाची आहे.
......क्रमशः

Monday, June 15, 2015

आरक्त देखिलें डोळां, ग्रासिले सूर्यमंडळा ...

आरक्त देखिलें डोळां, ग्रासिले सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढे, भेदिलें शून्यमंडळा ।।१३।।
हनुमंतांनी अत्यंत आरक्त असे सूर्यमंडळ पहिले आणि त्याने ते गिळून टाकले. ग्रासिलेचा उल्लेख काही पाठामध्ये ‘गिळिले’ असा पण केला आहे. त्याचा ग्रास केल्यानंतर हनुमंत इतके वाढले कि त्यांनी शून्यमंडलाचा भेद केला. हनुमंताचा जन्म झाल्यानंतर त्यांनी पूर्वेला उगवणारा सूर्य पाहून त्याला ते पिकलेले फळ वाटले आणि ते खाण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण जाहली. आणि बालसुलभ चेष्टा म्हणून पाचशे योजने अंतरावर असलेल्या सूर्याला त्याने ग्रासून टाकले असा उल्लेख अध्यात्म रामायणात आहे. तर वाल्मिकींच्या मते हे अंतर तीनशे योजने आहे.
इतका साधा अन सरळ अर्थ या श्लोकाचा नाही. हनुमंतांनी आरक्त बघितले म्हणजे नेमके काय? सूर्यमंडळाला ग्रासले म्हणजे नेमके काय केले? शून्यमंडळाला भेदले म्हणजे समर्थ नेमके काय सांगतायत? या श्लोकाचा अन्वयार्थ लावताना थोडे कठीण जाते आहे हे नक्की. याठिकाणी उगवत्या सूर्याला पिकले फळ समजल्याचा उल्लेख नाही. तर याठिकाणी समर्थ म्हणतात कि हनुमंताने डोळ्यांनी आरक्त पहिले. रक्त म्हणजे सर्वसामान्यपणे लाल. आणि आरक्त म्हणजे जास्त प्रमाणात लाल. याठिकाणी आरक्त म्हणजे पूर्णपणे रंगलेला, अनुरक्त झालेला असा आहे. हनुमंताचे मन प्रभूंच्या चिंतनात सदैव रंगलेले असते त्यांचे मन सदैव भगवद स्वरूपात, आत्मस्वरूपात अनुरक्त असते. सर्वत्र त्यांना प्रभू रामचंद्राचेच दर्शन घडते. याच चिंतनात त्यांनी जे आरक्त बघितले त्यामध्ये देखील त्यांना प्रभुंचेच दर्शन घडले आहे. सूर्यमंडळ म्हणजे त्याठिकाणी त्यांना प्रभूरामचंद्रांचेच दर्शन घडले आहे......
हनुमंत सदैव श्रीरामांच्या अनुसंधानात रंगलेले आहेत. उगवत्या सुर्यनारायणामध्ये देखील त्यांना प्रभू श्रीरामांचे दर्शन घडले आहे. हनुमंत हे दास्यभक्तीचे उत्तम उदाहरण मानले जाते. समर्थ आपल्याला जो भक्तीमार्ग आचरण्यास सांगतात त्याठिकाणी मनावर विजय मिळवायला सांगतात, वासना इच्छावर संयम ठेवण्यास सांगतात. हनुमंत हे मन, इच्छा, वासनांच्या पलीकडे गेलेला अतींद्रिय शून्याकार असे आहेत. त्यांचे मन केवळ आपल्या स्वरूपाशी एकरूप झालेले आहे. सूर्य नारायणाच्या रूपातील आपल्या आराध्याला त्यांनी ग्रासले म्हणजे गिळून टाकले. म्हणजेच त्यांना पूर्णपणे आत्मसात केले.
सूर्यमंडळ आणि शून्यमंडळ खरच खूप चिंतनाचा विषय आहे. या अनंत आकाशाला सूर्यनारायणाने व्यापलेले आहे. वाढत वाढत जाऊन हनुमंतानी आकाशाच्या शुन्यतेला भेदले आहे. शून्यमंडळ भेदणे याचे निरुपण दासबोधात आढळते. ब्रह्माचे वर्णन करताना समर्थ सातव्या दशकातील दुसऱ्या समासात म्हणतात,
सुन्य आणि सनातन | सर्वेश्वर आणि सर्वज्ञ | सर्वात्मा जगजीवन | ऐसी नामे || ४८ ||
ब्रह्म शून्य आहे, सनातन आहे, सर्वेश्वर आहे, सर्वज्ञ आहे, सर्वात्मा आहे, जगाचे जीवन आहे. हनुमंतांनी हे ब्रह्म जाणले आहे. केवळ जाणलेच नाही तर ते पूर्ण आत्मसात केले आहे.
भगवंत दृश्य गोष्टींच्या पलीकडे आहे. दृश्य म्हणजे माया जी आहे पण आणि नाही पण. समर्थ म्हणतात,
सुन्यत्वातीत शुद्धज्ञान | तेणे झाले समाधान | ऐक्यरूपे अभिन्न | सहजस्थिती|| ६|१०|३९||
आहे व नाही यांत गोवलेले सारे दृश्य विश्व लय पावले कि शून्य उरते, त्या शुन्यापलीकडे शुद्ध आत्मज्ञान असते. त्या ज्ञानाने समाधान होते. आपण व आत्मा एकरूप आहोत या अभिन्नपणाच्या अनुभवाने सहजस्थिती प्राप्त होते. या अवस्थेमध्ये देहाचे सर्व व्यवहार होतात. तरी स्वरूपाशी झालेले ऐक्य जसेच्या तसेच राहते. म्हणून ही सहजस्थिती ......
दासबोधामधील दशक आठ, समास दहा हा शून्यत्वनिरसन याविषयीचा आहे. हा समास जाणून घेतला तर ‘भेदिले शून्यमंडळा’ असे समर्थ म्हणतात त्याचा उलगडा होतो. समर्थ याठिकाणी सांगतात जेवढे दृश्य आहे ते सगळे बाजूला सारल्यावर केवळ अदृश्य शिल्लक रहाते. हे अदृश्य म्हणजे ब्रह्म असा काहींचा समज होतो. सगळे बाजूला सारले कि केवळ शून्य उरते. पण हे शून्य म्हणजे ब्रह्म नव्हे. यासाठी समर्थ सुंदर दृष्टांत देतात. समजा एक माणूस राजाला भेटावयास गेला आणि त्याला राजाचा नोकर भेटला. तोच राजा असा त्याने समाज करून घेतला. पण नंतर खरा राजा भेटल्यानंतर त्याला आपली समजूत चुकीची आहे हे जाणवले. तसेच समर्थ पुढे म्हणतात,
‘तैसे सुन्यत्व कल्पिले ब्रह्म | पुढे देखतां परब्रह्म | सुन्यत्वाचा अवघा भ्रम | तुटोन गेला || ८/१०/६८||    
त्याचप्रमाणे दृश्य ओलांडल्यानंतर आढळलेले शून्य ब्रह्म मानले खरे. परंतु नंतर खरे परब्रह्म दर्शन झाले तेव्हा शून्यपणाचा सगळा भ्रम आपोआपच नाहीसा झाला. समर्थ म्हणतात कि आपण वस्तुरूप होऊन जाणे ही परमात्मवस्तू पाहण्याची रीत आहे. वेगळेपणाने पाहिले तर केवळ शुन्याचेच दर्शन घडते.
याकारणे सुन्य काही | परब्रह्म होणार नाही | वस्तुरूप होऊन पाही | स्वानुभवे ||

यासाऱ्या विवेचनावरून हे लक्षात येत कि काही केल्या शून्य परब्रह्म होऊ शकणार नाही. परब्रह्माचे दर्शन हवे असल्यास ब्रह्माशी तदाकार होऊनच ते घ्यावे लागते. ब्रह्मरूप होऊनच ब्रह्माचा अनुभव येतो. हनुमंत ब्रह्म स्वरूपात असेच एकरूप होऊन गेले आहेत. हनुमंताने इतके विशाल रूप धारण केले कि या शून्याचा देखील त्यांनी भेद केला.... 

हनुमंत कुंडलिनी शक्तीचे प्रतीक मानले जाते. हनुमंताच्या सहस्त्रनामातही त्याला ‘योगिने नम: | कुंडलिने नम:‘ ( बृहज्ज्योतिषार्णव धर्मस्कंध प्रकरण २७.४४९,८२७ ) म्हंटले जाते.  समर्थांची सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी या आरतीतील प्रत्येक शब्द यौगिक अर्थाने परिपूर्ण आहे. सत्राणे शब्दाचा आध्यात्मिक अर्थ सतरावी कला असलेले देहातील ब्रह्मरंध्र होय. तेथे कुंडलिनीने उड्डाण केले. मूलाधार चक्रात साडेतीन वेढे घालून बसलेली आदिशक्ती जगदंबा असून सद्गुरुकृपेने अधिकारी शिष्याची कुंडलिनी जागृत होऊ शकते. नागिणी प्रमाणे असलेली ही ज्ञानशक्ती जागृत होताच सुषुम्नेतून ब्रह्मरंध्राकडे झेप घेते. (ज्ञानेश्वरी अ. ६) योगशास्त्रानुसार ब्रह्मरंध्राजवळ आत्मसुर्याचे स्थान असून कुंडलिनी त्याचा ग्रास करू पहाते. त्या शक्तीच्या मुखातून प्रणवाचा अखंड ध्वनी चालू आहे, तोच हुंकार वदनीने प्रकट केला आहे. ती जागृत होऊन उड्डाण करताच देहभाव डळमळू लागतो. म्हणूनच समर्थांनी करि डळमळ म्हंटले आहे. कुंडलिनीच्या जागृती नंतर तिच्या तेजामुळे वासना शुष्क होतात.  देहभाव नाहीसा झाल्यमुळे वासनेचा क्षारसमुद्र राहत नाही. प्रणवध्वनीने स्थूल,सूक्ष्म, आणि कारण अशा त्रिविध देहांची त्रिभुवने घाबरून गेली ( कडाडीले ब्रह्माड ) देहातील पातळ म्हणजे कमरेखालचा भाग. यातही हा ध्वनी उमटला ( दुमदुमले पातळ ) पृथ्वीरुप शरीराचा तोल सांभाळणारी कुंडलिनीशक्ती जागृत होऊन उड्डाण करू लागताच देहभाव निमाला, वासनांचा उच्छेद झाला हे रामदासांना जाणवले आणि तोच बोध त्यांनी या आरतीद्वारे केला आणि या स्तोत्रात हनुमंताच्या या सामर्थ्याचा उल्लेख केला आहे.....

**( संदर्भ : श्रीरामकोश खंड २ ) साधकांनी या ग्रंथाचे नक्की वाचन करावे अतिशय माहितीपूर्ण असा हा कोश आहे श्री अमरेंद्र गाडगीळ यांनी संपादित केलेला आहे......


शून्यावस्था म्हणजे अशी अवस्था कि याठिकाणी साधकाचा पूर्ण विषयत्याग झालेला असतो पण आत्मतादात्म्य पूर्ण साधलेले नसते. साधकांसाठी अत्यंत धोकादायक अशी ही अवस्था असते. कारण या अवस्थेत साधकाला आपल्याला सर्व काही प्राप्त झाले असे वाटायला लागते. ही माया आहे याचे त्याला विस्मरण होते. त्यामुळे तो या पातळीवरून देखील पुन्हा खाली येऊ शकतो. ही अवस्था पार करून जाणे महत्वाचे असते. समर्थांनी यासाठी ‘भेदणे’ हा अत्यंत समर्पक शब्द योजला आहे.
शून्य अवस्थेला आल्यानंतर जो आनंद भोगतो आहोत तोच खरा असे साधकाला वाटते. पण अशी अवस्था मला प्राप्त झाली असे त्याला जे वाटते त्यात देखील सूक्ष्म अहंकार आहे. समर्थांनी आपल्या आत्माराम ग्रंथात याचे विवरण केले आहे. आत्माराम मधील साधननिरुपण समासात शिष्याला समर्थ बोध करत आहेत पण तरीही त्याच्यातील सूक्ष्म अहंकार गेलेला नाही. जे नाशिवंत आहे ते देखील तुम्हाला दिले असे शिष्य म्हणतो तेव्हा समर्थ त्याला ‘फट रे पढतमूर्खा’ असे म्हणून फटकारतात. समर्थ म्हणतात, तुझातला हा सूक्ष्म अहंकार देखील मला देऊन टाक. याला भेदणे म्हणतात.  

यासाठी समर्थ आम्हाला वायूची उपासना सांगतात. म्हणजेच श्वासावर नियंत्रण ठेवण्याची उपासना शिकवतात. हनुमंत हा भगवंताच्या समीप नेण्यासाठी एक माध्यम आहे. जर प्रभूरामचंद्रांना प्राप्त करून घ्यायचे असेल तर आधी हनुमंताची उपासना करा असे सांगतले जाते. ती ही उपासना आहे. यापूर्वी आपण कुंडलिनी जागृती हा विषय बघितला. यामध्ये या वायूचा प्रवास बघता ही उपासना समर्थ का सांगतात आणि हनुमंत भगवंताच्या जवळ घेऊन जाणारा एक मध्यस्त कसा आहे याचा उलगडा होतो.......क्रमशः

ब्रह्मांडाभोंवते वेढे, वज्रपुच्छ करु शके ...

ब्रह्मांडाभोंवते वेढे, वज्रपुच्छ करु शके ।
तयासि तूळणा कैचीं, ब्रह्मांडीं पाहतां नसे ।।१२।।
हनुमंताला वज्रदेही म्हंटले आहे. त्याचे अवयव शक्तिमान होते आणि शत्रूला नामोहरम करण्यासाठी त्याचा त्याने अनेकदा उपयोग केला आहे. त्याचे शरीर अत्यंत बलवान आणि सुदृढ होते त्याचप्रमाणे ध्वजाप्रमाणे शोभणारी वरच्या बाजूस वळलेली शेपूट अतिशय बलवान होती. त्याच्या शेपटीचे वर्णन करताना निरनिराळ्या उपमा दिल्या गेल्या आहेत. ‘महाकालाची लांब जीभ’, ’आकाशातील शेषनाग’, ’यमराजाने पसरलेला कालपाश’, ’शिवाच्या तिसऱ्या डोळ्यातील अग्निशिखा’, ‘भगवान विष्णूच्या शाड:र्ग धनुष्याची कमान’ अशा अनेक उपामा दिल्या गेल्या आहेत. त्याच्या शेपटीचे सामर्थ्य इतके आहे कि ती पेटवून देखील जळाली नाही. भीमाचे गर्वहरण त्याच्या शेपटीनेच केले. त्याची शेपटी ही त्याच्या पराक्रमाचे प्रतिक आहे. श्रीरामकार्याचे प्रतिक आहे. भक्तांसाठी ती प्राणदायी आहे.
अशा या वज्रपुच्छाच्या सामर्थ्याचे वर्णन समर्थ याठिकाणी करत आहेत. या वज्रपुच्छामध्ये इतके सामर्थ्य आहे कि ते साऱ्या ब्रह्मांडाभोवती वेढले जाऊ शकते. त्याच्याशी तुलना करण्यायोग्य असे साऱ्या ब्रह्मांडात शोधून सापडणार नाही.  हनुमंताने आपल्या प्राणरूपाने साऱ्या विश्वाला नेहमीच वेढून ठेवले आहे, जो काळाचाही काळ आहे......
हनुमंताने आपल्या वज्रपुच्छाने ब्रह्मांडाला वेढले आहे. उपनिषदात सांगितले आहे कि या गहन भवसागरात अनादी, अनंत अनेक रुपात भासमान होणारा, विश्वाला वेढून घेणारा असा जो एकमात्र देव आहे त्याला जाणून घेतल्यास सर्व पाशातून मुक्त होता येते. ज्या देवाने हे सारे विश्व व्यापलेले, वेढलेले आहे त्या देवाचे चिंतन करणे हेच मनुष्य जन्माचे ध्येय आहे. समर्थ याठिकाणी हनुमंताचे वर्णन करताना हेच सुचवत आहेत. त्याची उपासना करण्यामागे त्यांचा हाच भाव दिसतो.
एखादा कोळी जसा स्वत:मधून निघणाऱ्या तंतुमध्ये स्वत:ला वेढून टाकतो. त्याप्रमाणे हनुमंताने या विश्वाला वेढून टाकले आहे. सर्व संकटातून मुक्त व्हायचे असेल, केवळ आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल, या ब्रह्मांडात विलीन व्हायचे असेल तर हनुमंताला शरण गेले पाहिजे. त्याची नित्य उपासना करायला समर्थ याठिकाणी आपल्याला सांगत आहेत.

हनुमंताच्या या स्तोत्राचे गेले काही दिवस आपण चिंतन करत आहोत. तेव्हा लक्षात येते कि केवळ पाठांतरापुरतेच या श्लोकाचे महत्व नाही. यामधील प्रत्येक शब्द सामर्थ्यवान आहे. मंत्राचे सामर्थ्य या स्तोत्राला प्राप्त झाले आहे. योग्य आणि स्पष्ट उच्चार करून अत्यंत मनापासून या स्तोत्राचे पठण केले आणि त्याच बरोबर आपले आचार, विचार देखील शुद्ध ठेवले तर या स्तोत्राची प्रचीती आल्याशिवाय रहाणार नाही. शेवटी आत्मप्रचीती घेणे महत्वाचे हे समर्थ देखील सांगतात......क्रमशः  

अणूपासोनि ब्रह्मांडा, येवढा होत जातसे.....

अणूपासोनि ब्रह्मांडा, येवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठें, मेरुमंदार धाकुटें ।। ११।।
हनुमंत अणूपासून ब्रह्मांडा एवढे रूप धारण करू शकतात. हनुमंताच्या या विशाल रूपापुढे मेरुमंदार पर्वत देखील लहान आहेत असे समर्थ याठिकाणी वर्णन करीत आहेत. विष्णूपुराणात मंदारपर्वताची उंची चौऱ्याऐंशी योजने, इतकी सांगितली आहे. तर तो सोळा हजार योजन पृथ्वीत घुसलेला आहे. वरच्या बाजूला त्याचा विस्तार बत्तीस हजार योजन असून, खालच्या बाजूला सोळा हजार योजन आहे. एवढा विस्तृत मेरू पर्वत आहे. आणि त्याच्या शिखरांवर ध्वजासमान असणारे कदंब, जांभूळ, पिंपळ, वड, इत्यादी वृक्ष अकराशे योजने, उंच आहेत. पर्वताच्या या वर्णनावरून त्याचे विशाल रूप लक्षात येते. आणि असा हा विशाल पर्वत हनुमंतापुढे धाकुटे वाटता असे समर्थ म्हणतात.
हनुमंत कोणतेही रूप धारण करू शकत असत. लंकेत पोहोचण्यापूर्वी त्यांनी जो पराक्रम केला तेव्हा देखील त्यांनी अणु इतके रूप धारण केले तसेच विशाल रूप देखील धारण करून आपल्या वरील संकटावर मात केली. लंकेत प्रवेश करताना तसेच पाताळात प्रवेश करताना हनुमंताने अतिशय लघुरूप धारण केलेले आहे. तसेच पाताळात हनुमंताने विशाल रूप धारण केले होते. हनुमद्विजय मधील वर्णन असे आहे कि पाताळात पाच पर्वताखाली पाच भ्रमारांचा निवास होता. सहस्त्र योजने उंच व शतयोजन रुंद अशा पाचही पर्वतांना हनुमंताने एका पायाखाली दाबले आणि दुसऱ्या पायाने महिरावाणाला पायाखाली दाबण्यासाठी अती विशाल रूप धारण केले आहे. वाल्मिकी रामायणात जेव्हा अशोक वनात हनुमंत सीतामाई समोर आले तेव्हा त्यांची खात्री पटवून देण्यासाठी हनुमंतानी विशाल रूप धारण केले तेव्हा त्याच्या या विशाल रुपाला वाल्मिकींनी मेरुमंदारचीच उपमा दिली आहे.

थोडक्यात हनुमंत विराटाहून विराट आहेत आणि अणूहून अणू आहेत. ते स्थुलही नाहीत सूक्ष्मही नाहीत जेथे जसे रूप धारण करावे वाटले तसे त्यांनी ते धारण केले....क्रमशः 

आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती.....

आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती।
मनासी टाकिलें मागें, गतीसी तूळणा नसे ।।१०।।
हनुमत चरित्रात त्याचे पुच्छ हा जसा कौतुकाचा विषय आहे तसेच त्याचे उड्डाण देखील समर्थांच्या कौतुकाचा विषय आहे. हनुमंताला तरुणपणी ऋषींच्या शापामुळे स्वसामर्थ्याचे विस्मरण जाले होते. परंतु जाम्बुवंताने जेव्हा त्याची अस्मिता जागी केली तेव्हा त्याला आपल्या सामर्थ्याची जाणिव झाली. गरुडापेक्षाही हनुमंताची गती जास्त आहे नव्हे त्याही पेक्षा चपळ अशा मनापेक्षाही हनुमंताची गती अधिक आहे.
हनुमंतांनी अत्यंत वेगाने जाऊन द्रोणागिरी पर्वत उचलून लंकेत आणला होता. अत्यंत चपळाईने त्याने हे काम पूर्ण केले आहे. इतक्या मोठ्या पर्वतासह उड्डाण ही सहज गोष्ट नव्हे. स्व:ताच्या वजनाबरोबर पर्वताचे वजन त्यांनी उचलून आणले होते. यावरून त्यांच्या ताकदीची कल्पना येते. हे सर्व काम नियोजित वेळेत त्यांनी केले. यावरून हनुमंताच्या उड्डाणाच्या गतीची आपल्याला कल्पना येते. त्यांच्या उड्डाणाची गती मनाला देखील मागे टाकणारी आहे. मनाचा वेग प्रचंड आहे. आणि हनुमंताचा वेग त्याच्याहीपेक्षा आधिक आहे. परब्रम्हाचे व्यापकत्व स्पष्ट करताना आकाशाची उपमा दिली जाते. त्याप्रमाणे हनुमंताच्या गतीला त्यातल्या त्यात चपळ म्हणून मनाची उपमा दिली जाते. हनुमंत नेटके आहेत. तसेच त्यांचे वागणे देखील नेटके आहे. म्हणूनच पर्वत ज्या जागेवरून आणला त्याच जागेवर त्यांनी तो पुन्हा नेऊन ठेवला. काम झाल्यावर वस्तू जागेवर ठेवण्याची हनुमंताना सवय दिसते. J 

कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे ....

कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे ।
मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ।।९।।
हनुमंतांनी उड्डाण केल्याचे अनेक प्रसंग वाल्मिकी रामायणामध्ये येतात. यापैकी उत्तरेला उड्डाण करून मंदराचलासारखा द्रोणागिरी पर्वत त्याने उचलून आणला आणि पुन्हा नेऊन ठेवला ही घटना उल्लेखनीय आहे. इंद्रजीताच्या अस्त्र प्रयोगाने वानारसैन्य मृतप्राय झाले होते. ब्रह्मास्त्रास मान देण्यासाठी राम लक्ष्मण मूर्च्छित पडले होते. म्हणून जाम्बुवंताने हनुमानाला औषधी वनस्पती आणण्यास पाठविले. त्यावेळेस त्याने हनुमंताला सांगितले कि, “हिमालयावर  ऋषभ या सुवर्णमय पर्वताच्या व कैलास पर्वताच्या शिखरामध्ये तेजस्वी सर्वोषधी पर्वत आहे. त्या पर्वतावरील मृतसंजीवनी, विशल्यकरणी, सुवर्णकरणी व संधानी या चार महौषधी धेऊन तू ताबडतोब परत ये.”  हनुमंत जेव्हा हिमालयाकडे गेला तेव्हा त्याला बघून पर्वतावरील औषधी वनस्पती गुप्त झाल्या. त्यामुळे हनुमंताना क्रोध अनावर झाला. त्याने ते पर्वत शिखरच उपटून आणले. आपल्या पित्याचे स्मरण केले. द्रोणागिरी वरच्या औषधी वनस्पतीचा सुगंध वायुदेवामुळे सर्वत्र पसरला. त्या सुगंधाने वानरसेना मृत्यूवर मात करून उठून बसली. रामलक्ष्मण देखील शुद्धीवर आले. उपचारा नंतर हनुमंताने हे शिखर पुन्हा जागच्या जागी नेऊन ठेवले होते....
मृतसंजीवनी, विशल्यकरणी, सुवर्णकरणी व संधानी या चार महौषधीचा उल्लेख काल झाला . या चारही औषधांची नावे सुंदर आहेत तशीच सार्थ पण आहेत. त्याविषयी थोडेसे....
विशल्यकरणी : हे अॅनस्थेटिक आहे. हे औषध दिले कि मनुष्य विशल्य होतो म्हणजे त्याला होत असलेल्या वेदना त्याला जाणवत नाहीत.
संधानी : हे औषध दिल्यावर जर कुठे हाडं मोडली असतील तर ती आपोआप जोडली जातात.
सुवर्णकरणी : सुवर्ण म्हणजे चांगला रंग, त्वचेचा रंग उत्तम होण्याकरता पहिल्यांदा शरीरातील रक्त शुद्ध होणे आवश्यक असते. हे औषध तेच काम करते. लक्ष्मणाचा रंग काळा निळा झाला होता. त्यासाठी या औषधाची देखील गरज होती.
मृतसंजीवनी :  सर्व वानर आणि राम लक्ष्मण यांची जी अवस्था झाली होती त्यासाठी या औषधी हनुमंताना आणायला सांगितले होते. या तिन्ही औषधाचा वापर केल्यानंतर आता फक्त एक शॉक देण्याची गरज शिल्लक राहते. हृद्याचे पंपिंग पुन्हा सुरु होण्यासाठी संजीवनी वनस्पतीची गरज होती.
अशा या चार महौषधी..... ( संदर्भ : श्रीराम-कथामृत .. स्वामी गोविंददेव गिरी) 
हनुमंतांनी जो द्रोणागिरी पर्वत उचलून आणला तो मंदराचलासमान आहे असे समर्थ याठिकाणी म्हणतात. समुद्रमंथनाच्यावेळी घुसळण्यासाठी रवी म्हणून मंदार पर्वत उपटून समुद्रा जवळ आणावा लागला होता. स्कंदपुराण, भागवत यातील वर्णनानुसार सर्व देव व राक्षसांनी मिळून जोर लावून मंदारपर्वत उपटला खरा पण त्या सर्वांना मिळून तो समुद्रापर्यंत नेणे शक्य होईना. त्या प्रयत्नात देवांच्या आणि राक्षसांच्या अंगावर तो कोसळल्याने अनेकजण मेले, मूर्च्छित झाले. शेवटी सर्वांनी विष्णूचा धावा केला. तेव्हा गरुड वहान विष्णू त्याठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी एका हाताने लीलया पर्वत उचलून समुद्राकाठी नेऊन ठेवला. असा हा मंदाद्रीसारखा द्रोणागिरी हनुमंतांनी एकट्याने सहज उपटला आणि पुन्हा जागेवर नेऊन ठेवला आणि ते सुद्धा अगदी थोडक्या अवधीमध्ये.
रात्रीच्या रात्रीत उत्तरदिशेला पाच समुद्रांच्या पलीकडे, क्षीरसमुद्राच्या काठी, चार कोटी योजन अंतरावर असलेल्या द्रोणागिरी पर्यंत उडत जाऊन, तो समूळ उपटून, शेपटीत बांधून घेऊन येणे व पुन्हा जागेवर ठेवणे यातील समर्थ आपल्या लक्षात येते. महाबळी, महारुद्र, महावीर, महापराक्रमी अशा या हनुमंताच्या सामर्थ्याची आपल्याला यातून कल्पना येते...
हनुमंताने उड्डाण केले. याठिकाणी तुलसी रामायणामध्ये एक वेगळा प्रसंग सांगितला आहे. हनुमंत वेळेत महौषधी आणता येऊ नये म्हणून रावणाने त्याचा वेळ खाण्याकरता कालनेमिला पाठवले. साधुवेषात आलेला कालनेमी हा खरा तर राक्षस आहे. हनुमंताला चकवण्यासाठी कालनेमीने साधूचा वेष धारण केला. हनुमंताचे अंत:करण स्वच्छ आहे आणि एका महत्कार्यासाठी तो निघाले आहेत. कालनेमीने त्यांचा वेळ खाण्याकरता आणि जमल तर त्यांना ठार मारण्याकरता विषप्रयोग करण्याचे ठरवले. अशा या स्थितीमध्ये एका अप्सरेने मगरीच्या रुपामध्ये येऊन हनुमंताला सावध केले आहे. याचा अर्थच असा कि अंत:करण विशुद्ध ठेऊन भगवंताच्या कार्याकरता जो उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन चालत असतो, त्याच्या संरक्षणाची जबाबदारी भगवंताला असते. भगवंत कोणत्या रुपात येऊन सहकार्य करेल सांगता येत नाही. हनुमंताने कालनेमिचा नाश केला आणि ते पुढे निघाले आहेत.
वाल्मिकी रामायणामध्ये महर्षींनी या प्रसंगाचे अद्भुत वर्णन केले आहे. हनुमंत जेव्हा या पर्वतावर गेले तेव्हा त्यांना बघून या वनौषधीनी चमकणे बंद केले. तसेच इतक्या वनस्पती बघून नेमक्या कोणत्या वनस्पती घेऊन जायचे हे हनुमंताना समजेना. आता काय करावे? काही गोष्टी चिंतन करायला लावणाऱ्या आहेत. हनुमंताने काय कराव. हात जोडून उभे राहिले आहेत. आणि अत्यंत विनयाने त्या वनस्पतींची प्रार्थना केली आहे. “भगवान रामचंद्राच्या कार्याकरता आपली फार तीव्रतेने आवश्यकता आहे. तुमचा कधीही अजिबात दुरुपयोग केला जाणार नाही. मी तुम्हाला प्रार्थना करतो आणि तुम्हाला निमंत्रण देतो. आपण या कार्यामध्ये माझ्या समवेत चालून धन्य व्हा.” ही प्रार्थना करताच त्या वनस्पती पुन्हा चमकायला सुरवात केली आहे...
वनौषधी चमकायला लागल्या हा कथाभाग मनोरंजक कथा म्हणून बघितला जातो. पण आपल्या भारतीय संस्कृतीची धारणा यामागची खूप वेगळी आहे. भारतीय परंपरेची अत्यंत प्राचीन धारणा आहे कि, या सर्व औषधींमध्ये प्राण आहे. मनुष्यामध्ये चेतना आहे तशीच प्राण्यांमध्ये, वनस्पतीमध्ये आहे हे सर जगदीशचंद्र बोस यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. आपल्याला हे सगळे बघता येते. कलकत्यामध्ये असलेल्या बोस इन्स्टिट्यूटमध्ये अशा प्रकारची व्यवस्था आहे. प्रत्येक वस्तूमध्ये चेतनतत्व आहे म्हणून जगातील प्रत्येक वस्तूशी असलेला आपला व्यवहार फार आदरपूर्वक झाला पाहिजे हे भारतीय परंपरेचे आग्रहाचे प्रतिपादन आहे. आपला पाय चुकून एखाद्याला लागला तर आपण पटकन नमस्कार करतो. मग ती व्यक्ती असतो वा वस्तू. या वनौषधीमध्ये चेतना आहे. हे आपण देखील मान्य केलेले असते पण लक्षात येत नाही. कोणतेही औषध घेताना तोंड वाकड करून औषध घेऊ नको असा आई सांगायची त्यामागे हे तत्व आहे हे उशिरा समजल. तुम्हाला विषयांतर झाल अस वाटतय का? J पण तसं नाहीये. याठिकाणी हनुमंत ज्यापद्धतीने वनस्पतींशी व्यवहार करतात तो पाहण्यासारखा आहे. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन वनस्पती पुन्हा पूर्ववत चमकू लागतात ही गोष्ट पण लक्षात घेतली पाहिजे.

हनुमंताचे चित्त शुद्ध आहे. जर चित्त शुद्ध असेल तर सगळ्या गोष्टी अनुकूल होतात. प्राणीमात्र, अवघी प्रकृती अनुकूल होते. लो.टिळक मंडेलाच्या तुरुंगात लिहित असताना त्यांच्या खांद्यावर चिमण्या येऊन बसत. तुरुंगातल्या जेलरने लिहून ठेवले आहे, आम्हाला कोणाला कधी चिमण्यांनी स्पर्श केला नाही. कारण आमच्यातील क्रौर्य त्यांच्या लक्षात येते. तुकाराम महाराज जात असताना चिमण्या उडून गेल्या. अजून माझे चित्त शुद्ध झाले नाही याचे त्यांना वाईट वाटले. अंतरंगातून हो शुद्ध झाल त्याला जग अनुकूल झाले. हनुमंताचे अंत:करण किती शुद्ध होते याचा हा प्रत्यय आहे. आणि ही चित्तशुद्धी केवळ नामानेच साध्य होते. आता तुमचा लक्षात आले असेल नाम किती खोलवर घ्यायचे आहे ते....   क्रमशः
( संदर्भ : श्रीराम-कथामृत .. स्वामी गोविंददेव गिरी)  

ठकारे पर्वताऐसा, नेटका सडपातळू .....

ठकारे पर्वताऐसा, नेटका सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठें, महाविद्युल्लतेपरी ।। ८।।
हनुमंत पर्वताप्रमाणे उंच, विशाल आणि धिप्पाड आहेत. त्याचे हे भव्य रूप सर्वांना आश्चर्यचकित करणारे आहे. हनुमंताच विशेष हा कि हनुमंत धिप्पाड आहेत त्याचे शरीर सौष्ठवपूर्ण आहे. प्रमाणबद्ध नेटके आहे. हनुमंत स्थूल नसून सडपातळ आहेत. त्याचे शरीर एखाद्या विद्युल्लते प्रमाणे चपळ आहे. समर्थांनी समाजासमोर, तरुणासमोर बलोपासनेचा आदर्श ठेवला आहे. हनुमंत हे बलोपासनेचे उत्तम उदाहरण आहे. अन्यायाला प्रतिकार करणारा हनुमंत, शत्रूला नामोहरम करणारा हनुमंत, बलवान आहे. या बलोपासनेला समर्थांनी आपल्या जीवनामध्ये महत्वाचे स्थान दिले आहे. समर्थ स्वता उपासनेच्या काळामध्ये तसेच  
नंतरही १२०० सूर्यनमस्कार घालत होते. कोणतेही ध्येय गाठायचे असेल तर सर्व प्रथम आपले शरीर, आपले आरोग्य उत्तम असले पाहिजे. याची जाणिव हनुमंताना होती. त्यांचाच आदर्श समर्थांनी समोर ठेवला होता. मन, मनगट आणि मेंदू याचे उत्तम स्वास्थ्य दोघांनीही राखले होते. हे स्तोत्र केवळ हनुमंताची स्तुती करण्यासाठी लिहिलेले नाही तर यामध्ये त्याच्याप्रमाणे बलवान, निर्भय, होण्यास सांगतात. तसेच त्याच्या भक्तीचे वर्णन करून भगवद भक्तीचा आदर्श आपल्या समोर ठेवतात. हनुमंताच्या गुणाचे, पराक्रमाचे, वर्णन करून आपल्याला समर्थ सतत सावध करतात आणि त्याच्या सारखे आचरण करण्यास प्रवृत्त करतात.
समर्थांनी नि:सत्व झालेल्या समाजाला बलोपासनेची ताकद देऊन त्यांचे शाररीक व मानसिक बळ वाढवले. तरुणाची मने तसेच अंत:कारण पराक्रमाने, शौर्याने भारले गेले तरच दुर्जनांमधील राक्षसांचा नाश शक्य आहे हे जाणण्यातच समर्थांचे द्रष्टेपण आहे.
हनुमंताच्या पिळदार शरीराचे वर्णन वाचताना समर्थाच्या बलोपासनेचे स्मरण झाले..

हनुमंताचे वर्णन उपनिषदात ‘अस्थूलम’ असा केला आहे. अत्यंत चपळ आहेत. पवनपुत्र हनुमान वाऱ्याचे स्वरूप आहेत. समर्थ म्हणतात,
‘निश्चळावेगळा वायू | चंचला वर्तवी सदा |’
वायू नेहमी निशालाहून वेगळा म्हणजेच चंचल असतो.
देव तो हाची जाणावा | सर्व देहांतरी वसे ||
येकागे पाहतां वायो | येकागे पाहतां हरि ||
चंचलत्वे जगज्ज्योती | आत्मा त्यासीच बोलिजे ||
सर्व देहामध्ये वावरणारा वायू हा देवच समजावा. ही चंचल जगज्ज्योती म्हणजेच आत्मा होय. हनुमंत अतिशय चपळ आहेत. एखाद्या विद्युल्लते प्रमाणे त्यांचे तेज आहे. त्यांच्या तेजाने डोळे दिपून जातात.

आळस या दुर्गुणाचा लवलेश त्यांच्यामध्ये आढळत नाही त्यामुळेच हा वायू पुत्र अत्यंत चपळ आहे. समर्थ आपल्या उपदेशात आळसाचा निषेध करतात. आळस हा आपला शत्रू आहे हे वारंवार दासबोधामधून आपल्या मनावर बिंबवतात. आळस नसेल तर मनुष्य कसा सतत कार्यरत आणि उत्साही राहतो यासाठी आपल्या समोर हनुमंताचा आदर्श ठेवतात....क्रमशः