Monday, June 15, 2015

ब्रम्हांडे माईली नेणों, आवळें दंतपंगती.....

ब्रम्हांडे माईली नेणों, आवळें दंतपंगती ।
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा,
भ्रुकुटी त्राटील्या बळे ।।६।।
या स्तोत्रामध्ये समर्थ मारुतीच्या रौद्र स्वरूपाचे वर्णन करत आहेत. हनुमंताच्या भव्य मुखाचे वर्णन समर्थ याठिकाणी करतात. हनुमंताच्या दंतपंक्ती आवळलेल्या आहेत. जणू त्याच्या या भीममुखात त्याने ज्या दंतपंगती आवळून धरल्या आहेत त्यामध्ये सारे ब्रह्मांड सामावले आहे. हनुमंताच्या दंतपंगतीना महाकवी कंबनाने विजेची उपमा दिली आहे.
त्याच्या क्रोधाचे वर्णन त्याच्या चेहऱ्यावरून तसेच त्याच्या डोळ्यातून देखील घडते. त्याचा क्रोध काळाचा देखील थरकाप उडविणारा आहे. आत्यंतिक क्रोधामुळे त्याच्या डोळ्यातून अग्नीच्या ठिणग्याच बरसत आहेत. त्याच्या डोळ्यात अंगार फुलला आहे. आत्यंतिक क्रोधाने त्याच्या भुवया ताणल्या गेल्या आहेत.
हनुमंतावरील एका आरतीत त्याच्या या रौद्र रुपाचे वर्णन आढळते.
सामर्थ्याचा गाभा | तो हा भीम भयानक उभा | पाहता सुंदर शोभा | लाचावले मन लोभा ||धृ || हुंकारे भूभू:त्कारे | काल म्हणे रे बा रे विघ्न तगेना थारे | धन्य हनुमंता रे | दास म्हणे वीर गाढा | रगडीत घनसर दाढा  अभिनव हाचि पवाडा | पाहतां न दिसे जोडा ||
हनुमंतावर २९ आरत्यांचा उल्लेख आणि सर्व आरत्या श्रीरामकोश खंड २ यामध्ये उपलब्ध आहेत यातील १८ वी आरती पृ. क्र २८६..........
भगवती सीतेचा शोध हे रामायणातील महान पर्व आहे. आणि हे पर्व हनुमंताशी निगडित आहे. भगवती सीतला रावणाने पळवून नेल्यानंतर वानरसेनेच्या मदतीने प्रभु रामचंद्रानी सेतु बांधून लंकेत प्रवेश केला. त्याठिकाणी श्रीराम रावण यांच्यात जे युद्ध झाले त्यावेळी हनुमंताने जो रुद्रावतार धारण केला होता त्याचे वर्णन या श्लोकात समर्थ करत आहेत. युद्ध प्रसंगात त्याचा आवेश, अन्यायाविरुधाची चिड याचा प्रत्यय या छोट्या श्लोकातुन येतो.
समर्थानी मारुतीची स्थापना गावोगावी केली. त्यामध्ये प्रताप मारुती, वीर मारुती, आणि दास मारुतीची स्थापना केली. प्रताप मारुतीचे भव्य स्वरूप आहे. त्याच्या एका हातात द्रोणागिरी असून दुस-या हातात गदा असते. याशिवाय उजवा हात डोक्यावर उभारलेला आणि डावा हात डाव्या मांडीवर ठेवलेला असून डावा पाय राक्षसाच्या डोक्यावर असतो . वीर मारुती बैठ्या व् उभय दोन्ही रुपात आढळतो. वीरासन घातलेल्या बैठ्या मूर्तीच्या डाव्या हातात खांद्यावर टेकवलेली गदा असते तर उभ्या मूर्तीचा एक हात उगारल्या सारखा डोक्यावर ताठ उभा धरलेला असतो. सतत आक्रमक पवित्र्यात असलेले आसे हे प्रताप व वीर मारुतीचे रूप आहे. दास मारुती बरोबर या दोन्ही पराक्रमी तसेच आवेशपूर्ण रुपाचा आदर्श समर्थानी समजासमोर ठेवला.....क्रमशः


No comments:

Post a Comment