लोकनाथा
जगन्नाथा, प्राणनाथा
पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला, पावना परतोषका ।। ४।।
पुण्यवंता पुण्यशीला, पावना परतोषका ।। ४।।
हनुमंत लोकांना आश्रय देणारा, लोकाभिमुख असे लोकनाथ आहेत.
जगाला आश्रय देणारे असे जगन्नाथ आहेत. हनुमंत जो शरीरातील वायूवर अधिकार गाजवतो
असा प्राणनाथ आहे. जो चिरंजीव आहे. त्याचे आयुष्य म्हणजे एक कल्प आहे, एक युग आहे.
म्हणून त्याला पुरातन म्हंटले आहे. श्रीरामाचा हा सेवक पुण्यवंत, पुण्यशील आहे.
इतरांना संतोष देणारा म्हणून पारितोषक असा हा हनुमंत.. पवित्र, शुद्ध, निर्मल,
तसेच इतरांना पवित्र शुद्ध करणारा असा आहे.
या श्लोकात समर्थ हनुमंताचे अनेक गुण दर्शवून देत आहेत.
अत्यंत उच्च कोटीतील हे व्यक्तिमत्व सर्वसामान्य जीवांना आपलेसे करणारे.
श्रीरामांचा हा परमभक्त अतिशय कनवाळू आहे. अनाथांचा नाथ
आहे. लोकाना आश्रय देणारा आहे. दुखित आणि पीडितांना तारून नेणारा असा हा हनुमानाचा
उल्लेख समर्थ लोकनाथ जगन्नाथा असा करतात. हनुमंत हा प्राणदाता पण आहे. इंद्राने
जेव्हा मारुतीवर प्रहार केला आणि मारुतीला बेशुद्ध केले तेव्हा संतप्त वायुदेवाने
आपल्या पुत्रावरील उत्कट प्रेमामुळे सर्व प्राणीमात्रातीलआपला संचार थांबवला होता.
तेव्हा देवतांनी वायुदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी हनुमंताला अनेक वर दिले.
तेव्हा वायुदेवाने प्रसन्न होऊन सर्वामधील आपला संचार पूर्ववत चालू केला. म्हणून
हनुमंताला प्राणनाथ म्हंटले आहे.
वायुपुत्र हनुमानाचा सर्व प्राणीमात्रातील शरीरातील वायूवर
अधिकार आहे. समर्थ वायू हा शब्द शक्ती या अर्थाने वापरतात. विश्वाच्या आरंभापासून
अखेर पर्यंत सर्व प्रवास वायुच घडवून असतो असे ते सांगतात.
ऐसा वायोचा विकार | येवचे कळेना विस्तार | सकाळ काही चराचर |
वायोमुळे |९|८|२३|
वायो स्तब्धरूपे सृष्टीधर्ता | वायो चंचळरूपे सृष्टीकर्ता |
न काळे तरी विचारी प्रवार्ता | म्हणिजे काळे || ९|८|२४|
मुळापासुनी सेवटवरी | वायोची सकळ काही करी | वायोवेगळे
कर्तुत्व चतुरी | मज निरोपावे ||९|८|२५||
या जगातील सर्व व्यवहार शक्तीने चालतो. ही शक्ती दृश्य जगात
वाऱ्याच्या रुपात तर देहात प्राणाच्या रुपात आढळते.
वायोकरिता श्वासोश्वास | नाना विद्याचा अभ्यास | वायोकरिता
शरीरास | चळण घडे || १६|६| २||
असा हा हनुमंत प्राणनाथ आहे.
हनुमंत बोलिजे प्राणनाथ | येणे गुणे हा समर्थ | प्राणेवीन
सकळ वेर्थ| होत जाते || १६|६|२६||याठिकाणी समर्थांनी हनुमंताच पुरातन असा उल्लेख केला आहे. पुरातन
या शब्दामुळे हनुमांताचे कालातीत स्वरूप स्पष्ट होते. त्रेतायुगात हनुमंतांनी
अंजनी मातेच्या उदरी जन्म घेतला म्हणजे त्यापूर्वी हनुमंताचे अस्तित्व नव्हते असे
एक मत आहे. पण चैतन्यरूपी हनुमंत हे चिरंजीव आहेत. जगात वावरणारी प्राणशक्ती
म्हणजे हनुमंत आहेत. जगदाच्या उत्पत्तीच्या आधीपासून हनुमंत आहेत. उपनिषदात पुरातन
म्हणजे चिरंतर असे म्हंटले आहे.
दासबोधामध्ये समर्थ ब्रम्हनिरुपणामध्ये
परमात्मा ज्ञानघन | एकरूप पुरातन | चिद्रूप चिन्मात्र जाण |
नामे अनाम्याची || ७ | २ | ५१ || ब्रह्म स्वरूप स्पष्ट करताना त्याची ही अनेक नावे
आली आहेत यामध्ये पुरातन हा उल्लेख आला आहे. याठिकाणी हनुमंताला समर्थ पुरातन
म्हणत आहेत. त्याचे आयुष्य म्हणजे एक युग आहे म्हणून त्याला पुरातन म्हंटले आहे.
या शक्तीची उपासना पुरातन कालापासून चालू आहे.
आत्मदर्शन समासात समर्थ म्हणतात
देवभक्ताचे शोधन | करीता होते आत्मनिवेदन ||
देव आहे पुरातन | भक्त पाहे || ८/८/१४||
भक्तांनी त्याचे स्वरूप जाणून घेतले पाहिजे, मन:पूर्वक उपासना
करून त्याची कृपादृष्टी प्राप्त करून घेतली पाहिजे.........
हनुमंत पुण्यवंत पुण्यशील आहेत.
पुण्यवंतशरीर लाभलेला हनुमंत सत्संगात रमणारा आहे. दासबोधात समर्थ
जगद्जीवननिरुपणात ‘पुण्यवंता सत्संगती’ पुण्यवान पुरुष सत्संगती धरतो असा उल्लेख
करतात. श्रीरामांच्या सतत संन्निध्यात राहणारे हनुमंत पुण्यवंत आहेत.
हनुमंत पुण्यशील आहेत. संत
स्तवनात संतांची स्तुती करताना म्हणतात की,
‘संत धर्माचे धर्मक्षेत्र | संत
स्वस्वरूपाचे सत्पात्र | नातरी पुण्याची पवित्र | पुण्यभूमी|’
परमेश्वर भक्तीने भरलेले, आतून
बाहेरून निर्मळ, शुद्ध असणारा देह म्हणून पुण्यशील. असे शील,असे सत्पात्र कि संत
स्तवनात म्हटल्या प्रमाणे आत्मस्वरूप ठेवण्याचे उत्तम भांडेच होय. संताचा देह
म्हणजे पुण्य साठवण्याची पवित्र जागाच होय. समर्थांची ही उपमा मनापासून आवडलेली आहे.
आपला हा देह अनेक विकारांनी मलीन झाला आहे. मलीन नव्हे तर लडबडलेला आहे. या देहाला
किती घासूनपुसून पुसून स्वछ्य करावे लागणार आहे याची कल्पना येते. अत्यंत निष्पाप
असे हनुमंत आहेत. भगवंताला प्रिय असेच त्याचे वर्तन आहे. म्हणूनच दास्यभक्ती
म्हंटले कि हनुमंताची आठवण येते. असे हे हनुमंत पावना परितोषका आहेत. म्हणजेच
इतरांना संतोष देणारे आहेत.
हनुमंत सतत श्रीरामांच्या
अनुसंधानात राहतात. अखंड अनुसंधानामुळे पावन झालेले तृप्त झालेले असे रामाचे भक्त
आहेत. दासबोधात समर्थ यागोष्टीचा उल्लेख करतात, परमेश्वरी अनुसंधान | लावितां
होईजे पावन | मुख्य ज्ञानेचि विज्ञान | पाविजेते || १८| ८|२४|| असे हनुमंत जे
इतराना देखील पावन करतात. दासबोधातील १२ व्या दशकातील भक्तनिरूपण समासात समर्थ
म्हणतात,
पतितपावनाचे दास | तेहि पावन
करिती जगास | ऐसी हे प्रचित मनास | बहुतांच्या आली || १२|४|३३||
पतितांना पावन करणाऱ्या
परमात्म्याचे दास देखील जगाला पावन करतात. हनुमंत हे भगवदभक्तीत इतके एकरूप झाले
आहेत की द्वैत शिल्लक राहिलेले नाही. अशा हनुमंताचा उल्लेख समर्थ परितोषक असा
करतात.
परितोषका म्हणजे संतोष देणारा,
मन शांत करणारा आहे. श्रीरामाशी अनुबंध साधण्यासाठी प्रथम हनुमंताची मर्जी राखणे
आवश्यक आहे. त्याच्या माध्यमातून श्रीरामाचे दर्शन सहज शक्य आहे हा समर्थांचा
स्वानुभव आहे म्हणून पावना पारितोषिका. भक्तांना तृप्त करणारा पावना पारितोषिका.
पूर्णत्वाने परिपूर्ण असणारा हनुमंतांचे स्वरूपाच सर्वांना संतोष देणारे आहे. आपल्या
बोलण्याने इतरांच्या मनाची उद्विग्नता नाहीशी करणारा असा हा हनुमंत आहे. सर्व
चिंता पळवून लावून आनंद देणारा असा हा हनुमंत आहे. हनुमंत हा श्रीरामांच्या समीप
घेऊन जाणारा दूत आहे तसाच सर्व चिंताचा नाश करून मनातील आत्मविश्वास वाढवणारा असा
आहे. ज्याची नित्य उपासना केली तर मनाचा हा आनंद वाढतो असा समर्थ विश्वास देतात....क्रमशः
No comments:
Post a Comment