Monday, January 30, 2023

आगामी प्रकाशन  

' समर्थ वाङ्मयाचा परामर्श '


 
समर्थ चरित्र सुगंध  (समर्थांच्या आधुनिक चरित्रांचा अभ्यास या माझ्या प्रबंधावर आधारित ) 

स्मरण समर्थांचे   लेखसंग्रह 

चिरंजीवी  हनुमान चरित्र आणि उपासना याविषयी


या नंतर लवकरच अजून एक लेख संग्रह प्रकाशित होत आहे 


आगामी प्रकाशन 


समर्थ वाङ्मयाचा परामर्श 

९ फेब्रुवारी २०२३ 


स्वामी गोविंददेव गिरि यांचा आशीर्वाद 
डॉ. आरती दातार यांची प्रस्तावना 


संपर्क :  9881477080 माधवी 
             9822734555 संजय 

Sunday, October 9, 2022

श्री समर्थांचे महंत

                          || श्रीराम ||

श्री समर्थांचे महंत 


डॉ. सौ. माधवी संजय महाजन 

madhavimahajan17@gmil.com




समर्थ रामदासस्वामी यांची शिकवण जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करणारी होती. त्यांचा प्रत्येक विचार हा व्यक्ती हितासाठी तसेच समाज हितासाठी उपयुक्त असाच होता. त्यांच्या चरित्राचा विचार करता त्यांनी जे कार्य केले ते अलौकिक होते. समर्थ रामदासस्वामींच्या काळाचा सर्वांगीण विचार केला असता त्यांनी त्या परिस्थितीत जे समाजकार्य केले ते गौरवास्पद होते. त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून त्या काळात धार्मिक, राजकीय, आणि सामाजिक क्रांतीच घडवून आणली होती. भारतभ्रमण काळात त्यांनी जे समाज अवलोकन केले त्यावरून समाज भयमुक्त होऊन संघटीत होणे आवश्यक आहे हे त्यांनी जाणले. त्यानुसार त्यांनी आपल्या कार्याची आखणी करून समाज संघटीत करताना ज्ञानसत्ता, राजसत्ता, धर्मसत्ता, आणि आत्मसत्ता या चार सत्ता दृढ केल्या. 


मध्ययुगापूर्वी राजसत्तेपेक्षा ज्ञानसत्तेला अधिक प्राधान्य होते. राजा ऋषींची आज्ञा घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नसे. परंतु खिलजीच्या हल्ल्यामुळे ही सत्ता ढासळली गेली. ही ज्ञानसत्ता दृढ झाल्याशिवाय समाजाला नवा दृष्टीकोण देणार कोण ? ही समस्या ओळखून समर्थांनी ब्राम्हणांना अत्यंत प्रखर शब्दात आपल्या धर्माची जाणीव करून दिली. ज्ञानसत्ता प्रबळ करण्यासाठी समर्थांनी आपल्या उपदेशामधून ब्राम्हणांचे मनोबल दृढ केले. तसेच राजसत्ता दृढ करण्यासाठी ‘मराठा तितुका मेळवावा | महाराष्ट्र धर्म वाढवावा | ’ असा उपदेश करून क्षत्रियांना मोगलाई विरुद्ध लढा देण्यास प्रवृत्त केले. स्वधर्माची स्थापना करणे हे त्यांचे प्रमुख ध्येय होते. त्यासाठी त्यांनी कृष्णाखोऱ्याची निवड केली. कृष्णाखोरे ही शहाजीराजाची जहागिरी होती. तसेच या ठिकाणी त्यांचे पुत्र शिवाजीराजे स्वराज्य स्थापनेची स्वप्ने उराशी बाळगून त्या दृष्टीने आपली पावले टाकत होते. स्वराज्य स्थापण्याच्या दृष्टीने शहाजीराजांनी एकदा प्रयत्न केला होता पण त्यांचे हे बंड मोडून काढण्यात आले होते. शहाजीराजाची स्वराज्य स्थापन करण्याची उर्मी आणि शिवाजीराजांचे स्वराज्याचे स्वप्न लक्षात घेऊन समर्थांनी आपल्या कार्यासाठी कृष्णाखो-याची निवड केली. त्यांनी आपल्या उपदेशातून समाज संघटीत करून एकीचे महत्व लोकांना पटवून दिले. तरुणांची मने स्वराज्य आणि स्वधर्म स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित होतील अशा पद्धतीने त्यांना प्रबोधन करण्यास सुरवात केली. अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ देऊन, परकीय आणि मोगल यांच्या विरोधात सर्वांनी एक होऊन त्यांचा अंत करणे ही प्रेरणा राजसत्ता दृढ करणारीच होती.

     

        ज्ञानसत्ता आणि राजसत्ता दृढ करताना त्यांनी धर्मसत्ता देखील प्रबळ केली. समर्थांच्या काळामध्ये धर्माला ग्लानी आलेली होती. हिंदूची देवळे पडली जात होती, मूर्तीची विटंबना केली जात होती, लोकांच्या धार्मिक भावना अत्यंत हीन पद्धतीने दुखावल्या जात असून देखील अत्यंत निर्विकारपणे जनता ते सहन करीत होती. समाजाची ही तटस्थवृत्ती, त्यांचे दुबळेपण आणि यवनांचा अनाचार हे सर्व समर्थांना उघड्या डोळ्यांनी पाहणे अशक्य होते. त्यांनी भारतभ्रमण करीत असताना तसेच नंतर देखील मंदिरांचा जीर्णोद्धार करून, ठिकठिकाणी मारुतीच्या मंदिराची स्थापना करून धार्मिक क्रांतीच घडवून आणली. श्रीरामाच्या मंदिराची उभारणी करून त्याचा दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्सव चालू केला. अनेक वीर मारुती, प्रताप मारुतींची स्थापना करून समाजासमोर निर्भय आणि बलवान मारुतीचा आदर्श ठेवला. ह्या सर्वांमधून जो तत्कालीन धार्मिक अनाचार माजला होता त्याला आळा घालण्याचे काम समर्थांनी केले. त्या काळात अंधश्रद्धेचा जो सुकाळ झाला होता त्यावर प्रहार करणे आवश्यक होते. समाजाला शुद्ध परमार्थदृष्टी आणि खरा धर्म समाजासमोर मांडणे हे अत्यावश्यक होते. यासाठी समर्थांनी देवाचा उत्सव, मंदिरांचा जीर्णोद्धार अशा स्वरुपाची ‘चाळणा’ करून समाजाला नवी दृष्टी प्राप्त करून देऊन स्वत्व जागृत ठेवून जगण्याचा नवा मार्ग दाखविला .

      

      समर्थांनी केवळ मंदिरांची स्थापना आणि देवांचा उत्सव एवढेच केले नाही तर संपूर्ण भारतभर त्यांनी आपले मठ स्थापना करून आणि त्याठिकाणी योग्य त्या शिष्याची महंत म्हणून नेमणूक करून सर्वत्र समर्थ संप्रदायाचे जाळे पसरवले. समर्थांच्या या कार्यात त्यांच्या शिष्याचे योगदान तितकेच महत्वाचे ठरते. पूर्वी समाजाशी संपर्क साधण्याच्या दृष्टीने आजच्या सारखी कोणतीच साधने उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत आपला उपदेश घराघरामध्ये पोचवण्यासाठी समर्थांनी अनेक महंत आणि शिष्य तयार केले. समर्थांचे हे शिष्य समर्थांचा उपदेश समाजापर्यंत पोहोचवीत असत. समर्थांनी ब्राम्हणांना जसे भिक्षेचे महत्व सांगितले तसेच त्यांनी आपल्या शिष्यांना देखील भिक्षेची दीक्षा दिली. कारण भिक्षा हे समाजाशी जवळीक साधणारे, लोकाभिमुखतेचे अत्यंत प्रभावी साधन आहे हे त्यांनी जाणले. भिक्षेच्या निमित्ताने लोकस्थितीचे जवळून अवलोकन करणे हा महत्वाचा उद्देश होता. मठस्थापना, शिष्य, महंत, यामध्यमातून आपल्या संप्रदायाचे जाळे समर्थांनी देशभर पसरवले होते. 


     समर्थकालीन देशस्थिती पाहता त्या पार्श्वभूमीवर समर्थांचे मठ, त्यांचा शिष्य समुदाय आणि विशेष करून त्यांचे महंत ही समर्थांची संकल्पना विशेष उल्लेखनीय वाटते. त्यातून त्यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय आपल्याला येतो. अनेक शिष्य असताना समर्थांनी महंतांची उपाधी कशासाठी नव्याने निर्माण केली ? तर समर्थांचे व्यापक कार्य, त्यांचे प्रखर विचार, त्याचा प्रचार तसाच त्याच पद्धतीने होणे अपेक्षित होते. म्हणूनच त्यांनी गाव तिथे मारुतीची स्थापना केली तसेच अनेक ठिकाणी मठ स्थापन करून त्याजागी महंतांची नेमणूक केली. ठिकठिकाणी मठ आणि महंतांची नेमणूक करून समर्थांनी आपल्या संप्रदायाचा विस्तार केला. समर्थ संप्रदायामध्ये अनेक शिष्य होऊन गेले पण महंत हे निवडक होते समर्थांच्या परीक्षेत तावून सुलाखून निघून या पदाला ते पोहोचले होते. संप्रदायातील शिष्य आणि महंत यामध्ये काय फरक होता तर यात फरक असा की, शिष्यांना दुसर्‍याला मंत्रोपदेश देण्याचा अधिकार नसे. शिष्य मठ चालवू शकत नसत. महंतांनी दिलेली कामे शिष्यांना करावी लागत. तर महंतांवर अधिक जोखमीची जबाबदारी होती. महंतांना मंत्रोपदेश देण्याचा व शिष्य करण्याचा अधिकार होता. महंतांना दुसरे महंत नेमून संप्रदाय वाढवण्याचा अधिकार असे. 


     महंतांची नेमणूक करताना समर्थ त्याला उपदेश करीत. त्याला दासबोध ग्रंथ देऊन स्वहस्ते श्रीकंठमेखला देऊन पाठवत असत. महंताला यावेळी केलेला उपदेश गिरीधरस्वामींच्या समर्थप्रताप या ग्रंथात पहावयास मिळतो. 


निरोपिती कोठे वाद घालू नको | भक्ति सोडू नको राघवाची | 

राघवाची भक्ति ग्रंथाचे पूजन | स्वजन शोधन समुदाई | 

नको सोडू नित्य साधन आपुले | पाठांतर केले पाहिजे तां | 

वार्तावे तां सुखस्वरसे असावे | चंचळाच्या नावे शून्यकार |

महंतांना आपल्या कार्याची नेमकी दिशा समर्थ आपल्या उपदेशातून देत असत. महंताने उगाच कोणाशी वाद न घालता आपला संप्रदाय वाढवावा, स्वजनांचा शोध घ्यावा. आपल्या कार्याला अनुकूल असणार्‍या लोकांची निवड करावी. त्यावेळचा काळ मोठा कठीण होता. 


कित्येक म्लेंच होऊन गेले | कित्येक फिरंगणांत आटले | 

देशभाषाने रुधिले | कितीयेक || १५ | २ | ३ || 


समाजात माजलेला स्वैराचार, परकीयांचे आक्रमण, धर्माविषयीची अनास्था, अशी बिकट परिस्थिति असताना महंतांचे कार्य किती कठीण असेल हे लक्षात येते. अशा कठीण परिस्थितीमध्ये समर्थांचे महंत अत्यंत चतुरपणे या परिस्थितीचा भेद करून आपले कार्य अत्यंत सावधपणे करत. स्वतः गुप्त राहून ते आपले कार्य करत असत. लोकांची सदैव काळजी वाहणारा हा निस्पृह महंत लोकांतात न राहता "खनाळामध्ये जाऊन राहे"  सर्वांपासून दूर रहात असे. सर्वांपासून दूर राहून देखील उदंड समुदाय निर्माण करण्याचे सामर्थ्य समर्थांच्या महंतांमध्ये होते. समर्थांच्या महंताचे वैशिष्ट्य हे होते की हा विरक्त एकांतप्रिय असूनही त्याचा लोकसंग्रह दांडगा होता.


        समर्थ हे उत्तम संघटक तसेच उत्तम व्यवस्थापक होते. संघटनेच्या दृष्टीने त्यांनी मठ, महंतांची केलेली बांधणी हे एक प्रकारचे व्यवस्थापनच होते. समुदाव पाहिजे मोठा | तरी तनावा असाव्या बळकट | यानुसार संप्रदाय मोठा होण्यासाठी, केवळ मोठा होण्यासाठीच नव्हे तर बळकट होण्यासाठी, उत्तम संघटन, एकमेकांशी असणारा संपर्क, त्याचबरोबर जनसंपर्क, उत्तम विचार, उत्तम ध्येय घेऊन समाजाला त्याबरोबर घेऊन जाणे अशा अनेक गोष्टी समर्थांनी या बांधणीतून साध्य केल्या. समर्थांनी आपल्या या मठांचे जाळे केवळ महाराष्ट्रामध्येच पसरवले असे नाही तर कर्नाटक, दक्षिणप्रांत, वर्‍हाड, सूरत, गोमंतक, बेदर,मथुरा, काशी, रामेश्वर, श्रीशैल्य अशा अनेक ठिकाणी अत्यंत नियोजन पूर्वक मठांची स्थापना केली. महाराष्ट्र सारस्वतकार वि. ल. भावे म्हणतात " हे रामदासी मठ म्हणजे रामदासी विद्यापीठे होती. तेथे संप्रदायतल्या विद्येचे पाठ अष्टप्रहर चालत". त सर्वांचे मुख्य ठाणे चाफळ हे होते. सर्वांची सूत्रे समर्थांच्या हातात होती. विशिष्ट कालावधीमध्ये हे सर्व मठपती आपल्या कार्याचा आढावा समर्थांपर्यंत पोहचवत असत. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने समर्थांनी याची आखणी केल्याचे लक्षात येते. 


         समर्थांनी महंत ही अत्यंत विचारपूर्वक निर्माण केलेली उपाधी होती. महंत कसा असावा याविषयी समर्थांनी अत्यंत बारकाईने विचार करून तसे महंत घडवले होते. सर्व प्रथम महंत कसा नसावा याविषयी समर्थांचे विचार पाहणे आवश्यक आहे. महंत कसा नसावा याविषयी यत्न निरूपण (द.१४ स. १) या समासामध्ये स्पष्ट केले आहे. ८० ओव्यांच्या या समासामध्ये निस्पृह महंताने लोकसंग्रह करताना कसे युक्तीने, संयमाने वागावे याचे विस्ताराने वर्णन केले आहे. महंतांना त्यांचे हे सांगणे आहे की एकदा निस्पृहता धरली तर ती सोडू नये आणि सोडली तर ओळखीच्या लोकांमध्ये वावरू नये. निस्पृह महंताने कसे वर्तन ठेवावे याबाबत समर्थांनी आपले रोखठोक विचार यामध्ये मांडले आहेत. महंताने पैसा आणि स्त्रियांकडे आशाळभूतपणे पाहू नये. त्याच्या अंगी मिंधेपणा नसावा कारण मिंधेपणाने कधीही परमार्थ साधता येत नाही. कोणी द्रव्य दिले तर ते घेऊ नये. भिक्षा मागताना लाजू नये. पण भिक्षा मागताना देखील नियमांचे पालन करावे. भिक्षा थोडीच घ्यावी. कोणी भरपूर भिक्षा आणली तर त्यातील मूठभरच घ्यावी. एकाच घरी जाऊन भिक्षा मागू नये. दुर्जनांशी भांडू नये. नीतीबाह्य वर्तन करू नये. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल असे विधान करू नये. कठोर शब्द बोलू नये. प्रखर वैरागी असावे. अभ्यासाचा संग धरावा. कशामध्ये मनाने गुंतून राहू नये. अखंड उपासना करावी. परमर्थाचा अधिकारी असणार्‍या महंताने 

अती सर्वत्र वर्जावे हेच समर्थांचे सांगणे आहे. संयमाने वागावे. कोणामध्ये न अडकता निस्पृह महंताला त्याचे स्वतंत्रपण जपता आले पाहिजे. त्याचे वर्तन विवेकनिष्ठ असावे. लोकाचार सोडायचा नसला तरी लोकांच्या अधीन होऊन त्याने राहू नये. अशा अनेक कठोर नियमांचे पालन महंत करत असत. महंती ही सुखाची नाही. या सर्वांवरून समर्थ संप्र्दायामध्ये प्रवेश ही कठीण गोष्ट होती हे लक्षात येते. त्यात महंत या पदाला पोहोचणे अत्यंत कठीण काम होते. आध्यात्मिक बैठक कायम ठेवून समाजोपयोगी कार्य करणे, धर्माचे रक्षण करणे आणि या व्यापक कार्यात स्वतः कशात न गुंतणे अशी या महंताची महत्वपूर्ण भूमिका होती. आपल्या सारखाच दूसरा महंत तयार करून त्याला कार्याला लावण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती. 


महंते महंत करावे।

युक्तिबुद्धीने भरावें।

जाणते करून विखरावे।

नाना देशीं॥ (दा.११/१०/२५ )


महंतांची नेमणूक करणे केवळ स्वतः पुरते मर्यादित न ठेवता ही साखळी पुढे तशीच चालू रहावी आणि कार्यात खंड पडू नये यासाठी समर्थांनी महंते महंत करावे अशी सूचना आपल्या महंतांना केली.


समर्थांनी महंतांच्या माध्यमातून निस्पृह नेतृत्व निर्माण केले. समाजकल्याणासाठी आपले आयुष्य वेचणारा महंत निरपेक्षपणे आपले हे कार्य पार पडत असे. कोणाकडून कशाची आपेक्षा न करता आनंदाने हे कार्य पार पडताना त्यांची समाजाकडून उपेक्षा देखील होत असे. परंतु सुखी, समृद्ध आनंदी समाज हेच महंतांचे प्रमुख ध्येय होते. त्यामुळे समाज निंदेला महत्व न देता बहुत लोक मिळवावे। एक विचारे भरावे। कष्ट करूनी घसरावे। म्लेंछावरी। हे समर्थांचे संघटनेचे सूत्र महंत प्रामाणिकपणे राबवत असत. 


महंत कसा असावा याविषयी श्रीमद दासबोध ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी वर्णन आले आहे. महंत हा परमार्थिक अधिकारी असणे अत्यावश्यक होते. पण त्याने केवळ आत्मचिंतांनात, ईश्वर भजनात न रमता त्याच्या बरोबरीने समाजकल्याणाचे व्रत स्वीकारणे तितकेच महत्वाचे होते. आपल्या परमार्थिक जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून समर्थांच्या महंतांनी लोककल्याणाचे व्रत स्वीकारले होते. लोकसेवा म्हणजे ईश्वरसेवाच राम उपासना ऐसी | ब्रह्मांड व्यापिनी पहा असे मानपंचक या प्रकरणामध्ये समर्थ सांगतात त्याचे रहस्य श्रीमद दासबोध ग्रंथामध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे. नारायेण असे विश्वी | त्याची पूजा करीत जावी | याकारणे तोषवावी | कोणीतरी काया || १५/९/२५ || समाजसेवा ही ईश्वरचीच सेवा आहे. समाजाची ही सेवा करताना मात्र यामध्ये समाजाकडून कोणतीच अपेक्षा न ठेवता आपले कार्य पार पाडण्याची महंतांची जबाबदारी होती. आणि ही जबाबदारी या सर्व महंतांनी आनंदाने आणि समर्थपणे पार पडलेली आपल्याला दिसते. डॉ.शं.रा.तळघट्टी म्हणतात त्याप्रमाणे समर्थांचा महंत समजाच्या नि:श्रेयसाची काळजी वाहणारा खराखुरा समाजनेता होता. समाज हितच्या दृष्टीने सातत्याने विचार करणारा हा महंत 'स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे' या समर्थांच्या आदेशाचे पालन करणारा होता. सर्वांशी प्रेमाचे आणि आदराचे असे त्याचे वर्तन असे. समाज हितासाठी कटिबद्ध असणार्‍या या महंतांना आळसाचा वारा देखील शिवत नसे. लोकांसमोर व्यक्त होताना आपल्याला नेमके काय करायचे आहे, काय सांगायचे आहे, आणि ग्रंथ वाचल्या नंतर त्याचा अर्थ बरोबर कसा काढायचा याचे अचूक ज्ञान या महंतांना होते. 


समर्थांच्या मते उत्तम महंत कोण तर ज्याचे आकलन उत्तम आहे, पुढे काय घडणार याचा अंदाज  ज्याला आधीच येतो, जो सर्व गोष्टी जाणतो तोच खरा बुद्धिमान महंत होय. महंताला काळवेळ, तानमान, प्रबंध, कविता, महत्वाची वचने, सभाधीटपणा या गोष्टी वेळेवर सुचतात. एखादी गोष्ट आधी स्वतः शिकतो आणि मग इतरांना शिकवतो, अडचणीतील लोकांना विवेकाने बाहेर काढतो, प्रपंचातील लोकांना आत्मानात्म विवेक शिकवून महंत त्यांना निरासक्त बनवतो. समाज कार्यातील व्यापामध्ये समरस होणे त्याला जमते तसेच त्यातून पटकन अलिप्त होणे देखील त्याला सहज जमते. समर्थांच्या महंताचा विशेष हा की 


आहे तरी सर्वां ठाई | पाहों जातां कोठेचि नाही |

जैसा अंतरात्मा ठाईचा ठाई | गुप्त जाला || ११/६/१४ ||


अंतरात्म्या प्रमाणे महंताची अलिप्तता असते. सर्वांच्या ठिकाणी असणारा अंतरात्मा शोधू पाहता कोठेच सापडत नाही. तसेच महंत सर्वांमध्ये मिसळतो पण शोधायला गेले तर कुठेच सापडत नाही. तो लोकांतातून एकांतात जातो. तो जरी दिसत नसला तरी समाजातील अनेक चळवळींना महंत प्रेरणा देतो. हीच त्याची खरी अलिप्तता होय. महंत नीती, न्यायाचे रक्षण करतो, स्वतः कधी अनीति व अन्याय करीत नाही. कठीण प्रसंगात डगमगून न जाता त्यातून तो सहज मार्ग काढतो. समर्थांनी महंत लक्षण या समासामध्ये महंतांच्या या गुणांचा जणू गौरवच केला आहे. 


        समर्थांच्या कार्याचा विशेष हा की समर्थांचा प्रत्येक महंत हा सद्गुरूंच्या तोडीचा होता. समर्थांप्रमाणेच सर्व महंत निस्पृह तर होतेच पण परमार्थी आणि विवेकी होते. लोकसंग्रह करून लोकांना हरिभजना बरोबर स्वधर्म आणि स्वराज्य प्रेम निर्माण व्हावे यासाठी कार्यरत होते. बोलल्याप्रमाणे त्यांचे वर्तन असल्यामुळे त्यांच्या विचारांची छाप जनमानसावर प्रभावीपणे पडत होती. या महंतांची नेमणूक करताना समर्थांनी स्त्री पुरुष असा भेदभाव केलेला दिसत नाही. महंत होण्यासाठी जे गुण अपेक्षित होते ते गुण असणार्‍या  स्त्रियांची देखील महंत म्हणून नेमणूक केलेली दिसते. अक्कास्वामी, वेणास्वामी या त्यातील प्रमुख स्त्रिया होत. याशिवाय त्यांनी विशिष्ठ वर्णातील लोकांनाच केवळ मठाधीपती बनवले असे नाही. तर ब्राह्मण तसेच ब्राम्हणेतर देखील मठपती संप्रदायामध्ये आढळतात. पुणे जिल्ह्यातील शिवथर मठाचे महंत बाजी गोसावी हे क्षत्रिय मराठा होते. पारगाव मठाचे शंकर गोसावी हे मराठा महंत होते. मराठवाड्यातील लातूरजवळील भालकी मठाची परंपरा देखील मराठ्यांची. 


      महंताचे चालणे, बोलणे, लेखन, या छोट्या गोष्टीपासून ते त्याच्या परमार्थिक बैठकी पर्यंत महंत कसा असावा याविषयी समर्थांनी आपले महंत घडवले. समाजासमोर अत्यंत निर्भीड, निस्पृह ,परमार्थिक आदर्श लोकनेते उभे केले. समर्थांनी घडवलेले हे महंत आदर्श नेतृत्व कसे असावे, आदर्श व्यक्तिमत्व कसे असावे, आदर्श लोकनेता, या सर्व दृष्टीने समर्थांचा महंत दीपस्तंभच ठरतो. त्यांची श्रीमद दासबोध ग्रंथामध्ये जी महंत लक्षणे वर्णन केली आहेत ती प्रभूरामचंद्रांमध्ये, श्रीराम भक्त हनुमंतामध्ये आणि खुद्द श्रीसमर्थांमध्ये देखील आढळतात. या समासाचा समारोप करताना समर्थ म्हणतात 


ऐसा पुरुष धारणेचा | तोचि आधार बहुतांचा | 

दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा || 


श्रीरामांमध्ये असणाऱ्या या गुणांचे चिंतन करून आपल्यामध्ये हे गुण बाणावेत असे रघुनाथाचा गुण  घ्यावा यामधून समर्थ सुचवत आहेत. समर्थांचा महंत श्रीरामांप्रमाणेच समर्थ मनोबलाचा आणि अनेक लोकांचा आधार आहे. समर्थांच्या काळात धर्मरक्षणासाठी, दुर्जनांपासून सामान्यांचे रक्षण करण्यासाठी श्रीरामाच्या आदर्शाची गरज होती.  समाजाची गरज ओळखून समर्थानी रामांचा पराक्रम त्याच बरोबर त्याच्यामध्ये असणाऱ्या अनेक सद्गुणांचे दर्शन आपल्या प्रबोधनातून घडवले आहे. आजच्या काळात देखील अन्यायाला विरोध करणाऱ्या या आवेशाची गरज आहे. भ्रष्टाचार, लाचलुचपत, स्त्रियांवर होणारे अत्याचार, यासर्वाला आळा घालण्यासाठी अशा रणकर्कश्य आवेशाची आणि सद्गुणांचा आदर्श तरुण पिढीसमोर असणे आवश्यक आहे. आपल्याला प्राप्त झालेल्या बळाचा वापर रावणासारखा दीनदुबळ्यांवर न करता अन्याया विरोधात त्याचा वापर करणे गरजेचे आहेत हे तरुणांच्या मनात रुजणे आवश्यक आहे. रामनामाचा जप करताना त्याच्या या गुणांचे चिंतन करून ते आत्मसात करणे हे समाजहिताच्या दृष्टीने उपयुक्त आहे. त्यांच्या गुणांचा गौरव करून त्या गुणांचे अनुकरण  करणे, त्याच्या वागण्या-सवरण्याचा आदर्श आपल्या आचरणातून व्यक्त करणे म्हणजेच त्याची खरी उपासना होय! जी समर्थांच्या महंताला सहज साध्य झाली. 



|| जय जय रघुवीर समर्थ ||



Wednesday, April 8, 2020

।। श्रीराम ।।

कार्यकर्ता हनुमंत   
डॉ सौ. माधवी महाजन 

 प्रभूरामचंद्र यांच्या चरित्रामध्ये हनुमंताचे स्थान अनन्य आहे. हनुमंताच्या अद्भुत चरित्राचे सर्वाना कायम आकर्षण वाटत आले आहे. शक्ती आणि भक्तीची ही देवता केवळ भारतातच नाही तर भारताबाहेर देखील लोकप्रिय आहे. त्याच्या चरित्रांतील अद्भुत प्रसंगाप्रमाणेच त्याचा भक्तिभाव उपासकांना अधिक मोहून टाकतो. अनेक गुणांची खाण असलेला हनुमंत रामायणाचा प्राण आहे. त्याच्या उपासनेने उपासकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो. शारीरिक तसेच मानसिक सामर्थ्य वाढवणारी हनुमंताची उपासना आज तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. खरें तर त्याच्याप्रमाणे बलवान, निर्भय, निष्ठावान होणे ही खरी त्याची उपासना आहे. अन्याया विरोधात दंड थोपटून उभे राहणारा, स्त्रियांविषयी आदर असणारा, सज्जनांसमोर नम्र तर दुर्जनांसाठी काळ ठरलेला हनुमंत उपासकासमोर अशा सामर्थ्याचा आदर्श ठेवतो. 

प्रभू रामचंद्रांनी धर्मस्थापनेसाठी वानरांच्या साहाय्याने जो पराक्रम गाजवला त्यामध्ये हनुमंताचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. रामायणामध्ये भगवती सीताच्या शोधकार्यात हनुमंताची सर्वात महत्वाची भूमिका आहे. समाजामध्ये काही सकारात्मक कार्य करावयाचे असेल तर ध्येयनिष्ठ, आपल्या ध्येयाशी अत्यंत प्रामाणिक, कार्यात सातत्य राखणारे, निष्ठावान, अशा अनेक गुणांनी युक्त कार्यकर्त्यांची आवश्यकता असते. सर्वगुण संपन्न अशा हनुमंताच्या चरित्रातून आदर्श कार्यकर्ता कसा असावा, त्याच्यामध्ये कोणते गुण असावेत याचे दर्शन घडते. रामायणातील किष्किंधाकांड जेव्हा चालू होते तेव्हा हनुमानाचे प्रथम दर्शन घडते. 

बुद्धिमान आणि अत्यंत मुत्सद्दी : : हनुमंत अत्यंत बुद्धिमान होता. सतत सुग्रीवाचे यश चिंतणारा हनुमंत अत्यंत चाणाक्ष आणि मुत्सद्दी होता. सुग्रीवाचा शोध घेत आलेले प्रभुरामचंद्र आणि लक्ष्मण यांना पाहून प्रथम सुग्रीव आणि सर्व वानर भयभीत झाले होते. कारण हे दोघे वालीचे हेर असावेत असा त्यांचा समज झाला होता. याठिकाणी आलेले हे दोघे नेमके कोण आहेत? त्यांचा याठिकाणी येण्यामागचा नेमका हेतू कोणता आहे? त्यांच्याकडून आपल्याला काही धोका नाही ना? हे त्या दोघांच्या न कळत जाणून घ्यायचे असेल तर अत्यंत विचारी आणि बुध्दीमान अशा व्यक्तीला पाठवणे गरजेचे होते. सुग्रीवाचा मारुतीवर सर्वात जास्त विश्वास होता. या कामासाठी त्याच्याशिवाय योग्य व्यक्ती कोणीही नाही हे सुग्रीव जाणून होता. त्यामुळे या कार्यासाठी मारुतीरायांची नेमणूक करण्यात आली. सुग्रीवाच्या सांगण्यावरून हनुमान श्रीरामांची भेट घेतात. आपल्या परिसरात आलेल्या या दोन व्यक्ती कोण याचा शोध घेताना ते एकदम त्या दोघां समोर उभे न राहता ते ज्या वृक्षाखाली बसले होते त्या वृक्षाच्या फांदीवर जाऊन बसले. जेणेकरून त्या जागेवरून त्यांचे नीट निरीक्षण करता येईल. हे दोघेही वालीचे हेर नाहीत हे जेव्हा हनुमंताच्या लक्षात आले तेव्हा एका ब्राम्हणाचा वेष धारण करून त्यांच्या समोर गेले. हनुमंत उत्तम वेषांतर करता येत होते तसेच  ब्रह्मदेवांच्या वराने त्याला कोणतेही रूप धारण करता येत होते. आपल्या गोड वाणीने आणि अत्यंत सावधपणाने त्याने त्यांची सर्व चौकशी केली. त्यांचा हेतू जाणून घेतला आणि नंतरच मूळ रुपात येऊन आपण सुग्रीवाचा दूत असल्याचे सांगितले. रामचंद्र आणि हनुमंत यांच्या प्रथम भेटीतच हनुमंताच्या बोलण्याचा प्रभूरामचंद्र यांच्या मनावर विलक्षण प्रभाव पडला . ते लक्ष्मणाला म्हणतात,
नानृग्वेदविनितस्य नायजुर्वेदधारिण: ।
नासामवेदविदुष: शक्यमेवं विभाषितुम ।। २८।।
नूनं व्याकरणं कृत्स्नमनेन बहुधा श्रुतम् ।।
बहु व्याहरताऽनेन न किंचिदपशब्दितम् ।। २९ ।। (वा.रा. किष्किंधा कांड सर्ग ३)
लक्ष्मणा अरे मी माझ्या जीवनात अनेक विद्वान पहिले पण असा विद्वान मी आजतागायत पहिला नाही. हा चार वेदांचा ज्ञाता आहे. व्याकरणाची त्याची बैठक एकदम पक्की आहे. नऊ व्याकरणांचा हा पंडित आहे. त्यामुळे इतके बोलला तरी व्याकरणाची एकही चूक त्याच्याकडून झालेली नाही प्रभुरामचंद्र हनुमंताला न मागता हे प्रमाणपत्र देतात. हनुमंत एक कुशल वक्ता असून त्यांची वाणी अत्यंत मधुर आहे. वक्तृत्वाचे सर्व गुण त्याच्यामध्ये भरले आहेत. बोलताना प्रत्येक मुद्दा त्याच्याकडून सविस्तर मांडला जातो. त्याच्याकडे बोलताना कोठेही पाल्हाळीकतेचा दोष नाही. तसेच मोजके बोलले तरी पुढच्याला कळणार नाही इतकेही कमी बोलत नाही. मुद्देसूद बोलताना सहजता आहे, काही आठवण्याचा प्रयत्न करावा लागत नाही. बोलताना सर्व हालचाली प्रमाणात करतो, हावभावांचा अतिरेक त्याच्याकडून होत नाही. आपल्या मधुर वाणीने शत्रूला देखील संमोहित करेल असे साक्षात भगवंतच त्याचे वर्णन करतात.  
   
प्रियमित्र : वानर श्रेष्ठामध्ये असामान्य स्थान असणारे हनुमंत आणि सुग्रीव यांची मैत्री अग्नी आणि वायू सारखी होती. 
सुग्रीवेण समं त्वस्य अद्वैधं छिद्रवर्जितम् ।
आबाल्यं सख्यमभवदनिलस्याग्निना यथा ।। ४० ।। (वा.रा. उत्तरकांड सारंग ३६)
“सुग्रीवा बरोबर त्याचे लहानपणापासूनच वायूचे अग्नीशी असावे असे सख्य असून त्यात दुजाभाव अथवा अंतर कधीही पडले नाही.” हनुमंत सतत सुग्रीवाच्या पाठीशी उभा राहून त्याला सर्व ठिकाणी सहकार्य करीत असे. वाली आणि सुग्रीव यांच्यातील वैरभावामध्ये सुग्रीवावर झालेला अन्याय लक्षात घेऊनच हनुमंताने सुग्रीवाच्या पाठीशी उभे राहिले आहेत. परंतु अत्यंत पराक्रमी असून देखील, स्वत:च्या सामर्थ्याचे विस्मरण झाल्याने वालीकडून होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करावा अशा प्रकारचा सल्लादेखील हनुमंत सुग्रीवाला देत नव्हता.

हनुमंतांची मुत्सद्दीगीरी अनेक प्रसंगातून पहावयास मिळते. श्रीराम आणि सुग्रीव या दोघांचे दु:ख एकच आहे हे लक्षात घेऊन दोघांमध्ये सख्य घडवून आणण्याचे काम मारुतीरायांनी केले. यामध्ये देखील त्यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो. त्यांना दोघांमध्ये मैत्रीचा करार करावयाचा नव्हता तर संस्कार करावयाचा होता. कारण करार मोडला जातो पण संस्कार कायम राहतो मोडला जात नाही. या मैत्रीच्या संस्कारातून त्याने सुग्रीवाचे परम कल्याण साधले. आपण ज्या संघटनेत आहोत त्यांच्याशी प्रामाणिक राहणे आणि त्यांच्या हिताचा विचार करणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. हनुमंताने सुग्रीवाच्या हिताचा विचार करून पर्यायी आपल्या संघटनेचे देखील कल्याणच साधले आहे.

    बुद्धिमंतां वरिष्ठम : हनुमंत ‘बुद्धिमंतां वरिष्ठम’ आहेत. वालीवधानंतर सुग्रीवाला आपल्या कर्तव्याचा विसर पडला होता. तेव्हा त्याने सचिव या नात्याने सुग्रीवाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देऊन सावध केले. भगवती सीतेच्या शोधकार्याला गती देण्याची सूचना यावेळी त्याने केली. हनुमंतांनी आपल्या गुणांनी हा अधिकार सहज प्राप्त करून घेतला होता. सचिव या नात्याने हनुमंताने सुग्रीवाला योग्य तोच सल्ला दिला. सुग्रीवाला अशा प्रकारे सूचना करण्याचा अधिकार केवळ हनुमंताचाच होता. त्याच्या गुणांनी त्याने तो प्राप्त करून घेतला होता. सुग्रीवाने देखील त्याच्या सल्ल्याचा आदर राखून कार्याची आखणी केली, सैन्याची जमवाजमव केली. परंतु हनुमंतांनी यापूर्वीच या कामाला प्रारंभ केला होता. वाली वधानंतर सुग्रीव राज्याचा उपभोग घेण्यात मग्न असताना हनुमंतांनी इतर लोकांशी संपर्क साधून सुग्रीवाच्या भगवती सीतेच्या शोधकार्यात मदत करण्याविषयी इतरांशी बोलणी करून ठेवली होती. प्रत्येक गोष्टीत सावधगिरी बाळगण्याची हनुमंताची ही वृत्ती प्रत्येक कार्यकर्त्याने लक्षात घेण्यासारखी आहे.

    समयसूचकता : सुग्रीवाने दिलेला शब्द न पाळता भगवती सीतेच्या शोधकार्यामध्ये केलेली दिरंगाई प्रभुरामचंद्रांना आणि लक्ष्मणांना आवडली नव्हती. जेव्हा त्याचा जाब विचारायला लक्ष्मण अत्यंत क्रोधीत होऊन सुग्रीवाला भेटायला येतात तेव्हाची कठीण परिस्थिती हनुमंत अत्यंत हुशारीने सावरून घेतात. लक्ष्मणाच्या क्रोधाने भयभीत झालेल्या सुग्रीवाची हनुमंत समजूत घालतात. तसेच लक्ष्मणाचा राग शांत होईपर्यंत वालीच्या पत्नीने त्याचे स्वागत आणि विचारपूस करावी आणि त्याचा राग शांत झाल्यानंतर सुग्रीवाने त्यांना सामोरे जावे असा चतुर सल्ला हनुमंत सुग्रीवाला देतात. कारण इतर कोणापुढे कितीही पराक्रमी असणारे लक्ष्मण कोणत्याही परस्त्रीकडे कधीही नजर वर करून बघत नसें हे हनुमंत जाणून होते. समोर सुग्रीवाची पत्नी बघून अर्थातच लक्ष्मणाच्या क्रोधाची तीव्रता कमी झाली आणि मग सुग्रीव लक्ष्मणाच्या समोर आल्यावर पुढील बोलणी शांतपणे पार पडली. कोणता निर्णय कधी, कसा घ्यायचा याचे उत्तम ज्ञान हनुमंतांना आहे. याठिकाणी शक्तीपेक्षा युक्तीने वालीच्या पत्नीचा एखाद्या ढालीसारखा उपयोग करून घेतला आहे. कोणत्या परिस्थितीत कसे वागावे याचे उत्तम धोरण हनुमंताना होते. कोणतेही कार्य निर्विघ्न पार पाडण्यासाठी हे धोरण अत्यावश्यक आहे.  

    उत्तम संघटक : सीताशोधानाच्या कार्याला जेव्हा प्रारंभ झाला तेव्हा कामाचे नियोजन ठरले. त्यावेळी सुग्रीवाने सर्वांना प्रयत्नांसाठी एक महिन्याचा अवधी दिला होता. वाली पुत्र अंगद ज्या गटाचे नेतृत्व करीत होता त्यांच्या हातून  या कालावधीमध्ये हे कार्य पार पडले नाही. तेव्हा सुग्रीवाला घाबरून अंगद आणि त्याच्या गटातील सर्व वानरांनी प्राणत्याग करण्याचे ठरवले. कारण राजा सुग्रीव काम पूर्ण झाले नाही म्हणून आपल्या सर्वांचा वध करेल याचे त्यांना भय वाटत होते. या सर्व परिस्थितीत हनुमंत अत्यंत सावध होते. अशा परिस्थितीत फूट पडली तर सुग्रीवाला सोडून अनेक वानर अंगदाला सामील होतील हा धोका हनुमंताच्या लक्षात आला. अंगद एक असामान्य शक्ती असलेली व्यक्ती असल्याने त्याने सुग्रीवाच्याच सेनेत असणे महत्वाचे आहे हे ओळखून हनुमंताने अंगदाची समजूत घातली. प्रत्येकाचे सामर्थ्य जाणून घेण्याची तसेच त्याचा योग्य तो उपयोग करून घेण्याचे उत्तम कौशल्य हनुमंतांकडे होते. कोणती परिस्थिती कशी हाताळावी हे कसब हनुमंतांकडे असल्यामुळे अंगदाचे विचार बदलण्यास त्याला यश मिळाले. अंगदाचे मतपरिवर्तन करून सुग्रीवाच्या गटामध्ये त्याचा समावेश करून घेण्यात हनुमंताचे उत्तम संघटन कौशल्य दिसून येते.

माणसांची उत्तम पारख : हनुमंताच्या विद्वत्तेवर प्रभूरामचंन्द्रांचा गाढ विश्वास होता. रावणाचा भाऊ बिभीषण जेव्हा रामचंद्रांना शरण आला तेव्हा त्याला आपल्या गटात समावेश करून घ्यावा का नाही हा प्रश्न निर्माण झाला. सुग्रीवापासून सर्वांनी त्याचा स्वीकार करण्यास नकार दिला. परंतु हनुमंताना विचारल्यावर त्याने
एतावत् तु पुरस्कृत्य युज्यते तस्य संग्रह: ।। ६७ ।। (वा.रा. युद्धकांड सर्ग १७ )
‘त्याचा संग्रह करावा’ असे तत्काळ उत्तर दिले. बिभीषण जरी रावणाचा भाऊ असला तरी त्याच्यापेक्षा वेगळा आहे हे हनुमंत जाणून होते. कोणाचा संग्रह करायचा आणि कोणाचा नाही याविषयीची हनुमंताची पारख अचूक होती. अंगदाचा सुग्रीवाच्या गटामध्ये संग्रह केला तेव्हा देखील हनुमंताचे हेच कौशल्य दिसून येते. 

    लोकप्रिय : हनुमंताचे मन स्थिर आणि निष्पाप आहे. कोणत्याही विकारांना त्यांच्या मनात स्थान नाही. अत्यंत पराक्रमी असूनही अत्यंत नम्र, अत्यंत विद्वान असूनही निरहंकारी, सर्वांमध्ये मिळून मिसळून राहण्याची त्यांची वृत्ती यामुळेच हनुमंत सर्वांमध्ये प्रिय होते. त्याच्याकडे असणाऱ्या गुणांमुळेच, शौर्यामुळेच सुग्रीवाला तसेच प्रभुरामचंद्राना, सर्व वानरसेनेला भगवती सीतेच्या शोधकार्यात हनुमंतच महत्वाचे वाटतात.  त्याच्यावरील विश्वासामुळे श्रीरामांच्या मनात देखील कार्यसिद्धीविषयी शंका उरली नाही. या मोहिमेवर निघताना हनुमंतांनी जेव्हा ‘मी तुमचा दूत आहे हे आईला कळावे म्हणून एखादी वस्तू द्या’ सांगितल्या नंतर रामचंद्रांनी आपल्या कडील मुद्रिका त्याला काढून दिली. तसेच दोघांमध्ये घडलेला एक प्रसंग देखील सांगितला ज्यामुळे भगवतीला हनुमंत श्रीरामाकडूनच आल्याची खात्री पटली. भगवती सीतेचा आणि आपला परिचय नाही तेव्हा प्रथम भेटीत त्यांचा आपल्यावर विश्वास बसावा यासाठी हनुमंतांनी करायला निघण्यापूर्वीच घेतलेली दक्षता वाखाणण्याजोगी आहे. केवळ शोध घ्यायचा आणि परत यायचे ही भूमिका नाही तर कार्यास निघण्यापूर्वी अनेक शक्यतांचा विचार करून मग कार्याचा श्रीगणेशा करणारा हा हाडाचा कार्यकर्ता त्याच्या या गुणांमुळे सर्वाना प्रिय आहे.

    निर्भयता : भगवती सीतेचा शोध हे रामायणातील महान पर्व आहे. हे पर्व संपूर्णपणे हनुमंताशी निगडीत आहे. याठिकाणी त्याच्या सर्व गुणांची कसोटी लागते. त्यापैकी महत्वाचा अभयम्‌  म्हणजे भयाचा संपूर्ण अभाव हा दैवी संपत्ती मधील एक गुण हनुमंतांमध्ये पहावयास मिळतो. सीतामाईच्या शोधकार्यासाठी हनुमंताना लंकेत जावे लागले. रावणाच्या लंकेत पोहोचेपर्यंत वाटेत हनुमंताना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. या प्रत्येक अडचणींच्यावेळी प्रसंगावधान राखून हनुमंतांनी आपली सुटका करून घेतली. मगरीच्या रूपाने ‘सुरसा' हनुमंताला आपले भक्ष बनवू पाहत होती. तेव्हा ती जसा जबडा मोठा करत जाईल तसे हनुमंतांनी विशाल रूप धारण केले, पण आपल्या मुख्य ध्येय गाठण्याच्या दृष्टीने होणार अपव्यय टाळण्यासाठी अत्यंत चातुर्याने त्याने आंगठ्या एवढे रूप धरण करून तिच्या मुखातून स्व:ताची सुटका करून घेतली. जेव्हा बळ दाखवायचे तेव्हा विशाल रूप धारण केले परंतु जेव्हा बुद्धीचा वापर करावयाचा तेव्हा सूक्ष्म रूप धारण करून आपली संकटातून सुटका करून घेतली. आपल्याला त्रास देणाऱ्या सुरसेचा त्यांनी जसा आदर राखला तसाच मैनाक पर्वताचा देखील आदर राखला. समुद्रातून वर आलेल्या मैनाक पर्वताने त्याला विश्रांती घेण्यास सांगितले असता त्या विनंतीला नम्रतापूर्वक नकार देऊन हनुमंताने आपला पुढचा मार्ग आक्रमिला. सीतेचा शोध हेच ध्येय हनुमंताच्या डोळ्यासमोर होते. कोणतेही ध्येय प्राप्त करण्यासाठी त्यामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करून मारुतीराय पुढे गेले आहेत. कोणतेही ध्येय गाठायचे असेल तर त्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यावर अत्यंत हुषारीने तसेच संयमाने मात करून पुढे जावे हाच संदेश मारुतीरायांनी आपल्या कृतीतून दिला आहे.

रामायणातील सुंदरकांड हे हनुमंताच्या लीलांनी भरलेले आहे. त्याच्या लीला, बुद्धिमत्ता, या सर्व गोष्टी वाल्मिकींना सुंदर वाटल्यामुळे याकांडाचे नाव सुंदरकांड ठेवले असावे . लंकेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हनुमंतानी  सुक्ष्म रूप धरण केले तरीही लंकेच्या नगरदेवतेने म्हणजेच लंकीनीने त्याला पकडले. यावरून लंकेची सुरक्षाव्यवस्था किती विचारपूर्वक केली होती याचा प्रत्यय येतो. मुंगीने जरी लंकेत प्रवेश केला तरी त्याची लगेच नोंद होते होती. लंकीनीने हनुमंताना जरी पकडले तरी त्यांनी तीचा वध करून निर्भयपणे लंकेत प्रवेश केला. अभयम या गुणाच्या जोरावरच हनुमंतांनी एकट्याने लंकेत प्रवेश करून त्याठिकाणी अतुलनीय पराक्रम गाजवला.

शुद्ध आणि निष्पाप मन  : हनुमंताचे मन स्थिर आणि निष्पाप आहे. कोणत्याही विकारांना यामध्ये स्थान नाही. भगवती सीतेचा शोध घेताना हा शोध हनुमंताना स्त्रीयांमध्येच घ्यावा लागणार होता. याविषयीचे हनुमंताचे चिंतन मुळातून पाहण्यासारखे आहे. मद्यधुंद होऊन अस्ताव्यस्त पडलेल्या स्त्रीयांमधून हनुमंत भगवतीचा शोध घेत होते. या शोधकार्यात धर्मभयाने क्षणभर त्यांचे मन शंकित झाले. परस्त्रियांकडे पाहणे योग्य नाही हा विचार त्यांच्या मनात आला तरी त्यांनी आपले चित्त आपल्या ध्येयावर केंद्रित केले. “या स्त्रियांना मी पहिले तरीही माझ्या मनात कोणताही विकार उत्पन्न झालेला नाही. सर्व इंद्रियांना शुभ आणि अशुभ अवस्थांना जाण्याची प्रेरणा देण्यास मनच कारणीभूत आहे. मात्र माझे मन किंचितही विचलित झालेले नाही”. मानवी मन चंचल आहे. एखादी गोष्ट मी करत नाही हे दुसर्यांना दाखवून देणे आणि मनानी मात्र सतत त्याच गोष्टीत रममाण असणे हे खरे पाप आहे हेच हनुमंत याठिकाणी स्पष्ट करतात. भगवंताच्या कामासाठी वाटेल त्याठिकाणी जावे लागले तरी माझे मन विकारहीनच असणार असा हनुमंताचा विश्वास होता. याप्रसंगी हनुमंताचे चिंतन आणि कृती यातून त्यांचे मन किती शुद्ध आणि निष्पाप आहे याचा प्रत्यय येतो.
श्रेष्ठ मानसशास्त्रज्ञ : बुद्धी, शक्ती, भक्ती, याबरोबर उत्तम वक्तृत्व, चातुर्य, सेवाभाव, नम्रता, ब्रह्मचर्य अशा अनेक गुणांनी युक्त असलेला हनुमंत बुद्धीमंतांमध्ये अग्रणी आहे. त्याच्या मधील समय सूचकता वाखाणण्याजोगी आहे. कोणत्या परिस्थितीत कसे वागावे याचे त्याला उत्तम ज्ञान आहे. हनुमंत श्रेष्ठ मानसतज्ञ आहेत.

भगवतीचा शोध घेत असताना जेव्हा सीतामाई राक्षसीणींच्या गराड्यात बसलेली त्यांना दिसते तेव्हा कोणताही उतावळेपणा न करता शांतपणाचे धोरण त्यांनी स्वीकारले. तिच्यासमोर लगेच न जाता झाडावर सूक्ष्मरूपाने बसून त्यांनी बरेच चिंतन केले. भगवतीची मानसिकता लक्षात घेऊन हनुमंत याठिकाणी प्रत्येक कृती विचारपूर्वक तसेच सावधपणे करीत होते. नुकताच रावण सीतेला धमक्या देऊन गेल्यानंतर तिचा विलाप हनुमंतांनी प्रत्यक्ष पाहिला. तिच्या घाबरलेल्या मनस्थितीत पटकन तिच्यासमोर जाणे हनुमंतांनी टाळले. कारण रावणच मायावी रूप धरण करून आपल्या समोर आला आहे असा तिचा समाज होऊन तिचा आपल्यावर विश्वास बसणार नाही आणि स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करायला निघालेल्या भगवतीला या विचारांपासून परावृत्त करण्यासाठी तसेच आपण रामाचे दूत आहोत यावर तिचा विश्वास बसण्यासाठी हनुमंतांनी विचारपूर्वक युक्तीचा वापर केला. कार्यसिद्धीसाठी कार्यकर्त्यामध्ये आवश्यक असणारा संयम याप्रसंगी हनुमंताच्या ठिकाणी पाहावयास मिळतो. 

प्रभुरामचंद्रांनी दिलेली मुद्रिका स्वत:जवळ असून देखील एकंदर परिस्थितीचा विचार करून हनुमंतांनी झाडावर बसून श्रीरामांचा इतिहास सांगायला सुरवात केली. प्रभूंच्या जन्मापासून काय काय घडले हे गायला सुरवात केली. उत्तम वक्तृत्व लाभलेल्या हनुमंतांना भगवती सीतेची उत्सुकता वाढवण्यात यश आले. हे गीत गाणारा तसेच श्रीरामांच्या परिवाराला जवळून जाणणारा हा कोण आहे ही उस्तुकता भगवतीच्या मनात निर्माण झाल्यावर हनुमंत तिच्यासमोर उभे ठाकले आणि प्रभूनी दिलेली अंगठी दाखवून आपली ओळख पटवून दिली. भगवतीचे सांत्वन करून तिला धीर दिला. भगवती सीतेची आणि आपली भेट झाली यावर प्रभूंचा विश्वास बसावा यासाठी त्यांनी खूण म्हणून चूडामणी घेऊन एकांतातील एक प्रसंग जाणून घेतला आहे. हनुमंताचा विशेष हा की स्वतःचा परिचय देताना मी रामाचा दूत असा परिचय करून देतात. स्वतःच्या पराक्रमाचा उल्लेख कोठेही केलेला नाही. मी एकटा लंका पार करून आलो, अनेक संकटे एकट्याने कशी पार पडली अशा प्रकारच्या बढाया त्याने मारलेल्या नाहीत ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. मी या वानरसेनेतील सर्वात लहान वानर आहे असे त्याने सांगितल्या वर या वानरांना घेऊन श्रीराम या संकटाला कसे तोंड देणार अशी भगवतीच्या मनात शंका राहू नये म्हणून सूक्ष्म रूपात तिच्यासमोर आलेले हनुमंत विशाल रूप धारण करतात. यामागे आपले बळ दाखवणे किंवा तिला घाबरवणे हा उद्देश नसून आईच्या मनातील भीती जावी हा शुद्ध हेतू त्यामागे होता.  

स्वयंप्रज्ञ हनुमंत : हनुमंत सामर्थ्यसंपन्न व तेजस्वी आहेत. अत्यंत महापराक्रमी हनुमंताना आपल्या बळाच्या जोरावर आपण कोणतेही कार्य पार पडू शकतो हा आत्मविश्वास आहे.  सर्वात महत्वाचे म्हणजे जे कार्य आपल्यावर सोपवले आहे तेवढेच करणाऱ्यांपैकी हनुमंत नाहीत तर ते स्वयंप्रज्ञ आहेत. शंभर योजने दूर आल्यानंतर न थकता, कोणत्याही प्रकारचा आळस न करता, शत्रूचे बळ किती आहे याचा अंदाज घेण्यास हनुमंतांनी सुरवात केली. एकाच कार्यात जमतील तितकी अधिक कार्ये पार पाडावीत या विचाराने त्याने वनाचा विध्वंस करण्यास सुरवात केली. त्याला प्रतिकार करण्यास आलेल्या सर्व बलवान राक्षसांचा त्याने नाश केला. शेवटी रावणपुत्र इंद्रजीतने सोडलेल्या ब्रह्मास्त्राच्या पाशात हनुमंत स्वत:हून बद्ध झाले आहेत. कारण याठिकाणी रावणाची भेट होणे महत्वाचे होते. रावणाच्या दरबारात जाऊन अत्यंत निर्भीडपणे त्याने त्याला त्याची चूक दर्शवून दिली आहे. श्रीरामांच्या न कळत त्यांच्या पत्नीला चोरून आणणाऱ्या रावणाला त्याने हितकारक अशी वचने सांगितली आहेत. याशिवाय रावणाने आपली चूक सुधारावी आणि सीतेला सन्मानपूर्वक श्रीरामांकडे सुपूर्द करावे असा सल्ला देखील दिला. हनुमंत निती निपूण आहेत. त्याच कौशल्याच्या आधारे त्यांनी रावणाशी संभाषण केले आहे. रावणाला भर सभेमध्ये त्याच्या चुकीची जाणीव करून देताना प्रभू रामचन्द्रांच्या पराक्रमाचे वर्णन करायला हनुमंत विसरले नाहीत. त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्या विषयीचे भय सर्वांच्या मनामध्ये निर्माण झाले. त्याच्या वक्तव्याने रावणाने क्रोधित होऊन त्याचा वध करण्याची आज्ञा सेवकांना दिली. परंतु याठिकाणी रावणाचा भाऊ बिभीषण याने मध्यस्ती केली. राजदूताला मारणे राजनीतीला धरून नाही हे त्याने रावणाला समजावून सांगितले. शेवटी रावणाने हनुमंतांची शेपटी पेटवून देण्याचा आदेश दिला.

राक्षसांनी हनुमंताला बांधल्यानंतर ते बंधन त्याने निमुटपणे सहन केले. या परिस्थितीत भांबावून न जाता हनुमंत विचार करीत होते. त्याने जेव्हा लंकेत प्रवेश केला तेव्हा रात्र असल्यामुळे अनेक गोष्टी त्यांच्या नजरेस पडल्या नव्हत्या. परंतु राक्षसांनी त्याला बंदी बनवून त्याची धिंड काढली तेव्हा दिवस असल्यामुळे सर्व नगरीचे निरीक्षण करणे त्याला सहज शक्य झाले. त्याठिकाणी हनुमंतांनी विचित्र विमाने पहिली, तटबंदी, कितीतरी भूभाग पहिले, चबुतरे, घरे, सडका, छोट्या गल्ल्या, घरांचे मध्यभाग हे सर्व त्यांनी अतिशय बारकाईने बघून ठेवले. सर्व नगरीचे नीट निरीक्षण झाल्यानंतरच हनुमंतांनी लंकावासियांना आपल्या शेपटीचा प्रताप दाखविला. ज्या शेपटीला राक्षसांनी आग लावली त्याच आगीने हनुमंतांनी लंकेतील घरे पेटवून दिली, राक्षसांना मारले. सर्व लंकापुरी आगीने वेढुन टाकली. हनुमंताच्या या पराक्रमामुळे त्याच्या विषयी सर्वांच्या मनात भय निर्माण झाले. लंकेमध्ये रावणाच्या सेनेचे पूर्ण खच्चीकरण करून भगवती सीतेच्या मनात विश्वास निर्माण करून लंकेतून हनुमंत परतले. सितामाईंची व्याकुळता वर्णन करून सर्व वानरसेनेस त्यांनी युद्धाला प्रवृत्त केले. हनुमंताचे लंकादहन हा केवळ विनोद निर्माण करणारा प्रसंग नसून चिंतनशील तसेच पराक्रमी हनुमंताचे दर्शन घडवणारा आहे.

अनुपम दूत :         प्रगल्भ: स्मृतिमान वाग्मी शस्त्रे शास्त्रेच निष्ठित: |
            अभ्यस्तकर्मा नृपतेर्दूतो भवितुमर्हति || अग्नि पु. अ. २४१.७ ||
   
“ निर्भीड वक्तृत्व, शुद्ध स्मरणशक्ती, वाक् चातुर्य, युद्धकौशल्य, शास्त्रांमध्ये पारंगतता आणि अनुभव संपन्नता हे गुण ज्या व्यक्तीच्या अंगी आहेत ती व्यक्ती राजदूत होण्यास योग्य होय.” असे श्रीरामांनी लक्ष्मणाला राजनीतीचा उपदेश करताना सांगितले आहे. श्रीराम हा नीतिमान राजा होता ज्याच्याकडे वरील सर्व गुणांनी युक्त असा हनुमंतासारखा दूत होता. लंकेमध्ये हनुमंत रामदूत म्हणून गेले होते. हनुमंताकडे निर्भीड वक्तृत्व होते. रावणाच्या दरबारात उभे राहून त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देण्याचे धाडस हनुमंतामध्ये होते. सदाचार प्रेमी हनुमंताने रावणाच्या दरबारामध्ये रावणाशी जे संभाषण केले त्यातून या रामदूताची प्रतिभा आणि निर्भीड वृत्ती याचे दर्शन घडते.

    हनुमंतांनी जेव्हा दरबारामध्ये रावणाशी संभाषण सुरु केले तेव्हा त्याची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु एकूणच रावणाची अहंकारी वृत्ती तसेच स्वत:ची चूक मान्य न करण्याची प्रवृत्ती लक्षात आल्यावर युद्ध अटळ आहे याची जाणीव हनुमंतांना झाली. त्यानंतर मात्र त्याने लंकेतील वास्तव्यात अत्यंत चाणाक्षपणे सर्व हालचाली केल्या. रावणाच्या दरबारात स्वत:ची ओळख करून देताना हनुमंत म्हणतात, “ प्रभूरामचंद्राच्या सेनेमाधला सर्वात कमी बळ असलेला असा मी एक वानर आहे. फक्त मला वेगाने पळता येते म्हणून याठिकाणी मला पाठवले आहे. त्याने हे जे वक्तव्य केले त्यामुळे लंकावासीयांच्या मनात श्रीरामचंद्र आणि त्यांच्या सेनेविषयी भय निर्माण झाले. त्याचप्रमाणे आत्तापर्यंत आयोध्येची कुलवधू रावणाने पळवून आणली आहे याचे सोयरसुतक नसणाऱ्या लंकावासीयांना रावणाची चूक हनुमंतांनी निदर्शनास आणून दिली. हनुमंताच्या या सर्व कृतीमुळे रावणाच्या सैन्यात दुफळी निर्माण झाली.

विलक्षण स्मरणशक्ती : हनुमंताकडे विलक्षण स्मरणशक्ती होती. अत्यंत बुद्धिमान असणाऱ्या हनुमंतांनी लंका दहनाच्यावेळी अत्यंत चाणाक्षपणे लंकानगरीचे निरीक्षण केले. लंकेहून परत आल्यानंतर त्या सर्वाचे इत्यंभूत वर्णन त्याने श्रीरामांजवळ केले. त्यामुळे श्रीरामांना युद्धापूर्वीच शत्रूसैन्याची संरक्षण व्यवस्था, राज्याची रचना, संरक्षक योजना,चोरमार्ग, सैन्याचे बळ यासर्वाची हनुमंताकडून सविस्तर माहिती मिळाली. त्यामुळे पुढील कार्याला सर्वजण लगेचच प्रवृत्त झाले आहेत. सेतू बांधण्यापूर्वी हनुमंतांनी श्रीरामांना लंकेचे किती दरवाजे आणि ते कुठे कुठे आहेत याची सविस्तर माहिती दिली. त्यामुळे पुढील कार्याची आखणी करणे सोप्पे गेले.  

शौर्य दाक्ष्यं बलं धैर्य प्राज्ञता नयसाधनम् ( वा. रा. ७.३५. ३.५ ) अशी प्रभुरामचंद्रांनी ज्याची प्रशंसा केली असा हा हनुमंत एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. अत्यंत बलसंपन्न हनुमंतांचा अतुलनीय पराक्रम वाल्मिकी रामायणात पहावयास मिळतो. प्रभू रामचंद्रांनी वानरसेनेच्या सहाय्याने समुद्रावर सेतू बांधून लंकेत प्रवेश केला. त्याठिकाणी राम-रावण सेनेत घनघोर युद्ध झाले. या युद्धात हनुमंतांनी अलौकिक कामगिरी केली. आपल्या बळाने अनेक राक्षसांचा संहार केला. सर्व सेनेने लंकेत प्रवेश करण्यापूर्वी हनुमंताने यापूर्वी येऊन जो पराक्रम केला होता त्यामुळे बरेचसे काम उरकले गेले होते. लंकेतील सर्व पूल त्याने तोडले होते, तटबंदी पाडून टाकली होती, तसेच असंख्य राक्षसांपैकी एक चतुर्थांश हिस्सा त्याने नष्ट केला होता. 
युध्दकाळामध्ये हनुमंताने जे रौद्ररूप धारण केले याचे आवेशपूर्ण वर्णन समर्थ रामदास्वामींनी आपल्या एका स्तोत्रात केले आहे. “अद्भुत आवेश कोपला रणकर्कशू | धर्मसंस्थापनेसाठी दास तो उठिला बळे ||” हनुमंताचा हा रणकर्कश्य आवेश धर्मस्थापनेसाठी आहे. भगवती सीता हे धर्माचे प्रतीक आणि या धर्मस्थापनेसाठी मारुतीरायाने रौद्रावतार धारण करून हा महाप्रलय घडवला आहे. समर्थांच्या काळी स्वधर्मस्थापनेसाठी या आवेशाची गरज होती. राष्ट्रांमध्ये हा आवेश निर्माण व्हावा म्हणून समर्थानी असे आवेशपूर्ण वाड्मय निर्माण केले. जेव्हा जेव्हा नकारात्मक विचारांची वावटळ उठेल तेव्हा तेव्हा हनुमंताच्या या रणकर्कश्य आवेशाची आवश्यकता आहे. 
प्रभूरामचंद्रांवर पूर्ण निष्ठा ठेवून लंकेमध्ये येऊन त्याने आपले कार्य पूर्ण केले. काही झाले तरी प्रभू मला तारून नेतील या दृढ विश्वासामुळेच हनुमंत निर्भयपणे आपले कार्य निर्विघ्नपणे पार पाडू शकले आहेत. श्रीरामांविषयी अनन्य भाव, श्रीरामांचा अखंड जप, याच बरोबर हनुमंत अखंड कार्यरत राहिले. भक्ती शक्तीचे प्रतीक असणारा हनुमंत निरंतर कर्मयोगी आहेत. अचूक प्रयत्न, स्वयं चिंतन, मनन करून घेतलेले योग्य आणि अचूक निर्णय यातून त्याची कार्यक्षमता लक्षात येते. प्रत्यक्ष युद्धप्रसंगी अनेक अडचणींचे प्रसंग आले तेव्हा मारुतीराया धावून आले आहेत. हनुमंताचा लंकेतील पराक्रम आणि सीता शोधन या कार्यात हनुमंताच्या बुद्धिमत्तेचे तसेच सामर्थ्याचे दर्शन घडते. हनुमंत रामचंद्रांसाठी प्राणार्पण करण्यास तयार असलेला अनन्य सेवक आहे. अनेक गुणांनी संपन्न असूनही त्याला सत्तेची हाव नाही, अधिकार गाजवण्याची त्याची वृत्ती नाही. सर्व प्रभावी गुण असताना देखील नम्र सेवक होऊन राहण्याची त्याची वृत्ती आहे. अत्यंत पराक्रमी आणि सत्वशील हनुमंतामध्ये असणाऱ्या गुणांचे चिंतन करून हे गुण अंगी बाणवण्याचा प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।









Thursday, April 2, 2020

।। श्रीराम ।।

~~~ रघुनाथाचा गुण घ्यावा ~~~  

डाॅ. सौ. माधवी महाजन



ऐसा पुरुष धारणेचा । तोचि आधार बहुतांचा । 
दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा ।। 

“दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा” या शब्दात समर्थानी अनेक गुणांनी मंडित असणाऱ्या श्रीरामांचा गौरव केला आहे. श्रीसमर्थ रामदासस्वामी हे श्रीरामाचे अनन्यभक्त होते. त्यांनी पराक्रमी रामाचा आदर्श समाजासमोर ठेवला. महर्षी वाल्मिकी लिखित रामायणामध्ये मर्यादापुरुषोत्तम प्रभूरामचंद्राचा अपार महिमा वर्णन केला आहे. धर्मरक्षणासाठी तसेच लोकहितार्थ आपले आयुष्य ज्यांनी व्यतीत केले त्या दशरथनंदन श्रीरामांच्या चरित्राविषयी आजही लोकांना विलक्षण ओढ आहे. नरदेहप्राप्ती नंतर आपल्यामधील दैवी गुणांच्या साहाय्याने मनुष्य कसे उच्च कोटीतील आदर्श जीवन जगू शकतो हे रामचंद्रांच्या चरित्रातून पाहायला मिळते. वाल्मिकी रामायणामध्ये बालकांड आणि  अयोध्याकांड या दोन्ही ठिकाणी श्रीरामचंद्राच्या गुणांचे वर्णन आले आहे. 

महर्षी वाल्मिकींनी रचलेल्या महाकाव्याचा श्रीराम हे नायक आहेत. अत्यंत नम्र तसेच नित्यशांत असे हे आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांची वाणी अत्यंत मधुर आणि गोड आहे. “ गोड सदा बोलावे । नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे । हाचि निरोप गुरूंचा । मन कोणाचे न दुखवावे ।। असे गोंदवलेकर महाराज म्हणत असत. श्रीराम कधी कोणाला दुखावत नाहीत. लोकाभिराम हे विशेषण त्यांना सार्थ आहे. त्यांच्या नम्र वाणीमुळे त्याना ही लोकप्रियता प्राप्त झाली. निंदा, द्वेष, मत्सर, छल कपट करण्याची त्यांची वृत्ती नाही. “स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसी रे नीववावे ।।” या श्लोकामध्ये समर्थ श्रीरामांच्याच गुणाचे वर्णन करत आहेत. लोकांची मने जपणारे श्रीराम लोकांमध्ये मिसळून त्यांची दुःख जाणून घेतात. त्यांच्या समस्या सोडवून त्यांची दुःख दूर करण्यासाठी सतत कार्यरत राहतात. सर्वात महत्वाचा गुण म्हणजे ते वृद्धांमध्ये मिसळतात. त्यांचा आदर करतात. त्यांचे विचार जाणून घेतात. 

अत्यंत मीतभाषी असणारे श्रीरामचंद्र मोजकेच बोलतात. आपले म्हणणे मुद्देसूदपणे मांडून दुसऱ्याला पटवून देतात. जसे मीतभाषी आहेत तसेच पूर्वभाषी आहेत. पूर्वभाषी म्हणजे कोणी ओळखीचे भेटले की स्वतःहून त्यांच्याशी बोलायला जातात. त्यांना मी युवराज आहे हा अहंकार नाही. त्यांच्या बोलणे अत्यंत लाघवी आहे त्यामुळे प्रत्येकाला त्यांचा सहवास हवाहवासा वाटतो. 

सत्यवचन हा रघुवंशाचा गुणविशेष श्रीरामचंद्रांमध्ये उतरला आहे. स्वप्नात दिलेले वचन पूर्ण करणाऱ्या हरिश्चंद्राच्या वंशातील श्रीरामचंद्र आपल्या वडिलांचे शब्द खोटे ठरू नयेत यासाठी प्रयत्नवादी आहेत. कोणत्याही प्रसंगात शांत राहण्याची त्याची वृत्ती आहे. महाराज दशरथ यांनी श्रीरामांच्या राज्याभिषेकाचा मोठा घाट घातला. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. परंतु कैकयीच्या दोन वरांमुळे सर्व चित्र क्षणात पालटले. ज्यादिवशी श्रीरामांना राज्याभिषेक होणार त्याच दिवशी त्यांना वल्कले नेसून चौदा वर्षाचा वनवास स्वीकारावा लागला. परस्पर विरोधी अशा दोन घटना आहेत पण श्रीरामचंद्रांनी राज्याभिषेक जेवढा सहज स्वीकारला तेवढ्याच सहजतेने वनवास देखील स्वीकारला. वडिलांनी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी त्यांच्या चरित्राला असत्याचा कलंक लागू नये म्हणून श्रीरामांनी एक तप म्हणून वनवास स्वीकारला. स्थितप्रज्ञ हा त्यांच्यातील गुण वाखाणण्या जोगा आहे. राज्याभिषेक होणार म्हणून खुश नाहीत तसेच वनवास मिळाला म्हणून दुःखी देखील नाहीत. स्वतःच्या बळावर राज्य हिसकावून घेण्याची त्यांची वृत्ती नाही. त्यांना कशाचाच लोभ नाही. अधाशीपणा, वखवख या दुर्गुणांना त्यांच्या ठिकाणी थारा नाही. अत्यंत समाधानी, पूर्ण संयमी असे हे व्यक्तिमत्व सर्वांच्या मनाला भुरळ घालणारे आहे. 

तार्किक चर्चेमध्ये त्यांना कोणी हरवू शकत नाही. आपल्या आईमुळे दादाला वनवासात जावे लागले हे जेव्हा भरताला कळते तेव्हा भरत श्रीरामांना आयोध्येत घेऊन जाण्यासाठी श्रीरामांच्या भेटीसाठी वनात जातात. श्रीरामांनी पुन्हा राज्याचा स्वीकार करावा आणि वनाचा त्याग करावा यासाठी मोठे चर्चासत्र याठिकाणी घडले. या चर्चासत्रात अनेक युक्तिवाद केले जातात परंतु या सर्वाला रामचंद्रांनी अत्यंत मुद्देसूद आणि शास्त्राला धरून असे खंडन केले. या प्रसंगातून श्रीरामचंद्रांचे उत्तम वाकपटूत्वाचे दर्शन घडते. 

श्रीरामांवर कोणी उपकार केले तर ते कायम त्याच्या ऋणात राहतात. भगवती सीतेच्या शोधकार्यात हनुमंताने जो पराक्रम केला, आपल्या जीवाची देखील पर्वा केली नाही त्या हनुमंताच्या गुणाचे भरभरून कौतुक करतात. पण स्वतः कोणाकरता काही केले तर त्याचा उल्लेख ते कधीच करत नाहीत. 

श्रीरामचंद्र अत्यंत दयाळू आहेत. कोणाविषयी त्यांच्या मनात राग नाही. सर्वाना क्षमा करण्याची त्यांची वृत्ती आहे. अनाक्रोशे क्षमा असे माउलींनी क्षमेचे वर्णन केले आहे. म्हणजे कोणाबद्दल कुठलाही राग नाही चरफड नाही सहजपणे आणि शांतपणे केलेली क्षमा. अयोध्येत परत आल्यानंतर श्रीराम प्रथम कैकयी मातेला भेटले आहेत. तसेच वनात भरत भेटीला आल्यानंतर त्याला श्रीरामांनी कैकयी ही  माझी माता आहे समजून काळजी घेण्याची आज्ञा दिली आहे. रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला बिभीषणाने नकार दिल्या नंतर श्रीरामाने त्याला सांगितले की, ‘‘मरणाबरोबर माणसाचे वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास, तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे.” शत्रू विषयी देखील असे उदात्त विचार असणारे असे प्रभू रामचंद्रांचे व्यक्तिमत्व होते.  

कोदंडधारी श्रीराम पराक्रम संपन्न, बलसंपन्न आहेत. अत्यंत बलवान असून देखील त्याचा त्यांना अहंकार नाही. शत्रूला कधीच क्षुद्र लेखत नाहीत. धर्मरक्षणासाठी, प्रजेवर होणारा अन्यायाविरुद्ध, साधुसंतांच्या रक्षणासाठी त्यांनी कोदंड हाती धरले आहे. पराक्रमी आहेत पण दुर्बलांवर कधी शास्त्र उगारत नाहीत. पराक्रम गाजवला तरी शत्रूवर अन्याय करत नाहीत. लुटालूट, जाळपोळ असे विध्वंसक प्रकार त्यांच्याकडून कधीच घडत नाहीत. क्रूरता हा दुर्गुण त्यांच्यामध्ये नाही.  

श्रीराम हे आदर्श शत्रू आहेत. रावणाच्या वधानंतर बिभीषणाला राज्य दिले. रावणाचा सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केला आहे. वाली वधानंतर देखील सुग्रीवाला राज्य दिले आणि वालीपुत्र अंगद याचा युवराज पदावर राज्याभिषेक केला. यामध्ये काका पुतण्यामध्ये सख्य राहील हा योग साधला आहे. 

पतितपावन श्रीराम पश्चाताप झालेल्या भक्तांना अभय देतात. महर्षी वाल्मिकी, अहल्या ही रामकथेतील पश्चाताप दग्ध व्यक्तिमत्व आहेत. ज्यांना आपण केलेल्या कृत्याचा मनापासून पश्चाताप झाला आणि असे पाप पुन्हा घडणार नाही असे वचन त्यांनी श्रीरामांना दिले. अशा शरणागतांना प्रभू रामचंद्रांनी मनापासून स्वीकारले. 

त्यांचा विशेष म्हणजे ते शरणागतांना अभय देतात. रावणाने अन्यायाने दुसऱ्याच्या पत्नीचे हरण केले आहे, धर्माला धरून त्याचे वर्तन नाही ही गोष्ट त्याचा भाऊ बिभीषण याला मान्य नाही. म्हणून श्रीरामांना तो शरण गेला आहे. शत्रूच्या गटातील शरणागताचा स्वीकार श्रीरामचंद्रांनी केला आहे. 

श्रीरामचंद्रामध्ये उत्तम नेतृत्व गुण आहे. पुढच्या माणसांमधील गुणांचा विकास करतात. सुग्रीव अत्यंत भयभीत झाल्यामुळे त्याला स्वतःच्या सामर्थ्याचा विसर पडला. तेव्हा त्याच्यामधील गुण जागे करून त्याचा आत्मविश्वास श्रीरामांनी वाढवला आहे.  त्याचबरोबर ते उत्तम संघटक देखील आहेत. रावणावर चाल करून जाताना खूप मोठी सेना त्यांच्या बरोबर आहे. वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी युद्धासाठी जे सैन्य जमवले त्यामध्ये कोणी मोठे राजे नाहीत तर चौदा वर्षात जे आदिवासी, वंचित समाजातील सर्व सामान्य भेटले त्यांचे संघटन त्यांनी केले. गुह, सुग्रीव अशा अनेकांना घेऊन आपले सैन्य त्यांनी तयार केले.

भगवंताचा वनवास धर्मरक्षणार्थ, कर्तव्य पालनासाठी, वडिलांना दिलेले वाचन पूर्ण करण्यासाठी आहे. भगवंतांनी सुग्रीवाची बाजू घेतली कारण त्याच्यावर अन्याय झाला आहे. ज्याच्या पत्नीचे हरण झाले आहे, त्याची बाजू समजून न घेता बलपूर्वक ज्याला राज्यातून हाकलून दिले आहे अशा सुग्रीवाची बाजू त्यांनी घेतली आहे 

श्रीरामचंद्र एक आदर्श पुत्र, आदर्श बंधू, राज्यधर्माचे पालन करणारा, आदर्श राजा असे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. श्रीरामाने आईवडिलांच्या आज्ञांचे सदैव पालन केले. रामराज्यामध्ये जनहितार्थ या शब्दाला तेव्हाचे राजे प्रामाणिक होते. कुटुंबाला, स्वहिताला दुय्यम स्थान देऊन जनतेचे कल्याण हे महत्वाचे मानले जात होते. प्रजेने जेव्हा सीतेविषयी संशय व्यक्त केला तेव्हा स्वतःच्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता प्रजेसाठी, राजधर्माचे पालन करण्यासाठी आपल्या धर्मपत्नीचा त्यांनी त्याग केला. श्रीरामांनी धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या आहेत म्हणूनच मर्यादापुरुषोत्तम असा त्यांचा गौरव केला जातो. 

एकपत्नी, एकवचनी, एकबाणी अशा श्रीरामचंद्रांनी आपल्या वागण्या, बोलण्यातून, एक आदर्श निर्माण केला. नरदेहप्राप्ती नंतर आपल्यामधील दैवी गुणांच्या साहाय्याने मनुष्य कसे उच्च कोटीतील आदर्श जीवन जगू शकतो हे रामचंद्रांच्या चरित्रातून पाहायला मिळते. श्रीरामांमध्ये असणाऱ्या या गुणांचे चिंतन करून आपल्यामध्ये हे गुण बाणावेत असे रघुनाथाचा गुण  घ्यावा यामधून समर्थ सुचवत आहेत. समर्थानी दासबॊधामध्ये महंत लक्षणे स्पष्ट करताना श्रीरामांच्या गुणांचा आदर्श समोर ठेवला आहे. समर्थांचा महंत श्रीरामांप्रमाणेच समर्थ मनोबलाचा आणि अनेक लोकांचा आधार आहे. समर्थांच्या काळात धर्मरक्षणासाठी, दुर्जनांपासून सामान्यांचे रक्षण करण्यासाठी श्रीरामाच्या आदर्शाची गरज होती. समाजाची गरज ओळखून समर्थानी रामांचा पराक्रम त्याच बरोबर त्याच्यामध्ये असणाऱ्या अनेक सद्गुणांचे दर्शन आपल्या प्रबोधनातून घडवले आहे. आजच्या काळात देखील अन्यायाला विरोध करणाऱ्या या आवेशाची गरज आहे. भ्रष्टाचार, लाचलुचपत, स्त्रियांवर होणारे अत्याचार, यासर्वाला आळा घालण्यासाठी अशा रणकर्कश्य आवेशाची आणि सद्गुणांचा आदर्श तरुण पिढीसमोर असणे आवश्यक आहे. आपल्याला प्राप्त झालेल्या बळाचा वापर रावणासारखा दीनदुबळ्यांवर न करता अन्याया विरोधात त्याचा वापर करणे गरजेचे आहेत हे तरुणांच्या मनात रुजणे आवश्यक आहे. रामनामाचा जप करताना त्याच्या या गुणांचे चिंतन करून ते आत्मसात करणे हे समाजहिताच्या दृष्टीने उपयुक्त आहे. त्यांच्या गुणांचा गौरव करून त्या गुणांचे अनुकरण  करणे, त्याच्या वागण्या-सवरण्याचा आदर्श आपल्या आचरणातून व्यक्त करणे म्हणजेच त्याची खरी उपासना होय!

जय जय रघुवीर समर्थ 

Saturday, March 28, 2020



।। श्रीराम ।।


दैनंदिन जीवनात अध्यात्म

डॉ माधवी महाजन
madhavimahajan17@gmail.com



        भारतीय संस्कृतीने आनंदी जीवन कसे जगावे याचा मूलमंत्र दिला आहे. या संस्कृतीमध्ये मानवी मनाचा, शाररिक आरोग्याचा, विश्वाचा, निसर्गाचा तसेच जगण्यासंबंधीच्या नियमांचा सर्वांगीण अभ्यास झाला आहे. अद्वैतला महत्व देऊन विश्वावर आपलेपणाने प्रेम करा अशी व्यापक विचारांची शिकवण भारतीय संस्कृतीने दिली. ऋषीमुनींनी शाश्वत सुखाची प्रचिती घेऊन तो आनंद सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी ते सतत कार्यरत राहिले. शाश्वत सुखाचा मार्ग वेदांनी मानवाला दाखवला. २१ व्या शतकात संत विभूतींनी हा मार्ग अधिक सोप्पा करून दाखविला. संतांचे विचार, त्यांचे साहित्य, एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरतात. विचारांना दिशा देणारे, मनाला वळण लावणारे, हे विचार उत्तम व्यक्तिमत्व साकारण्यास तसेच आनंदी जीवन जगण्यास निश्चितच प्रेरणादायी ठरतात.

     अध्यात्म म्हंटले की हा विचार आपल्यासाठी नाही असाच आपण समज करून घेतो. या गैरसमजातून अत्यंत मौलिक विचार सकारात्मक विचार देणाऱ्या या ग्रंथांपासून आपण दूर राहतो. आपल्या सोयी नुसार प्रत्येकजण आपल्या आयुष्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असला तरी त्यामध्ये स्वतःची सोय अधिक महत्वाची असते. आपणच आखलेल्या आपल्या दिनचर्येत आपण रममाण असतो. आपल्या या व्यस्त जीवनात कोणी ढवळाढवळ केलेली चालत नाही. या व्यस्त जीवनात अध्यात्म याविषयी कोणी बोलले तर ‘माझा यावर विश्वास नाही’ अशी पटकन प्रतिक्रिया दिली जाते. कारण अध्यात्म म्हणजे भोंदूगिरी, देव देव करायला लावणारे असा समज बहुतेक जणांचा झालेला असतो. परंतु केवळ परमेश्वर चिंतन म्हणजे अध्यात्म नव्हे. अध्यात्म म्हणजे विचारांमध्ये, वृत्तीमध्ये बदल. मनातील सकारात्मक विचार नकारात्मक विचारांवर मात करतो असे हे अध्यात्म. या विचारांच्या साहाय्याने स्वतःमध्ये बदल घडवून आपल्या आसपास असणाऱ्या व्यक्तीशी अधिक सख्य जोडून आनंद निर्माण करणे म्हणजे अध्यात्म. विचारांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारे अध्यात्म दैनंदिन जीवनात उपयोगी आहे.

      जीवनामध्ये सतत सुखी राहण्यासाठी मनुष्य कार्यरत असतो. २१ व्या शतकात मानवाने आपले जीवन सुखी होण्यासाठी अनेक क्षेत्रात प्रगती केलेली दिसते. आपल्या देहाला कमीत कमी कष्ट देऊन जास्तीत जास्त सुख कसे प्राप्त करून घेता येईल या दृष्टीने तो सतत प्रयत्नशील असतो. या बाह्य सजावटीकडे लक्ष देताना आपले मन देखील सुदृढ असावे याकडे मात्र त्याचे दुर्लक्ष झालेले दिसते. भोगवादीवृत्ती आणि मानसिक विकासाकडे दुर्लक्ष यामुळेच परस्परांविषयी राग,द्वेष, हेवेदावे, मत्सर या असुरी संपत्तीचा अधिकाधिक विकास होताना आपण पाहतो. माणसाचे माणूसपण हरवणारे असे हे विकार आहेत. म्हणूनच काम, क्रोध, लोभ, मत्सर आणि मोह यापासून कोसो दूर राहण्यास सांगितले गेले आहे. जेथे काम आहे तेथे क्रोध हा स्वाभाविकपणे येतोच. व्यक्तीच्या मनामध्ये विषय तृप्तीच्या गोष्टीकडे धावणारे जे विचार येतात ते म्हणजे इच्छा, कामना. मग ही कामना शरीर भोगाविषयी असो अथवा कोणत्याही इंद्रियांची तृप्ती करण्याविषयीची असो. काम हा विकार आहे. जेव्हा शृंगारातील पावित्र्याची भावना संपुष्टात येते, एकात्म भाव जीवनाचा व्यापक विचार नष्ट होतो तेव्हा या विकारात विकृती निर्माण होते. या विकृतीतूनच लहान मुलींपासून वृद्ध स्त्रीयांपर्यंत अनेक जणींवर अत्याचार झाल्याचे वृत्त रोज आपल्या कानावर येते. तरुण पिढीवर याचा एव्हढा प्रभाव दिसतो की उघड्यावर होणारे मिलन यामध्ये त्यांना काहीच गैर वाटत नाही. लोकांना ना भय ना लज्जा यामुळे अनाथालयांची होणारी वाढ, अनेक रोग उदभवतात. या लोकांना जर कोणी विरोध केला तर यांच्या मधील क्रोध उफाळून येतो. यातूनच खुनाचे वाढते प्रमाण, एकतर्फी प्रेमाची अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात. विषय सेवनाने तृप्ती होते असा समज असणाऱ्यांसाठी महाभारतातील ययातीने उदाहरण पुरेसे आहे. ययातीला असे वाटते की आपले वृद्धपण कोणी घेतले तर आणखी काही काळ विषयांचे सेवन करता येईल. विषयांचे अधिक काळ सेवन केले तर आपोआपच तृप्ती प्राप्त होईल असे त्याला वाटते. त्याची ही इच्छा त्याच्या मुलाने पूर्ण केली. मुलाने त्याचे वार्धक्य घेणे परंतु मुलाचे तारुण्य घेऊनही त्याला तृप्ती मिळाली नाही. शेवटी तो जे म्हणाला ते अत्यंत महत्वाचे आहे, “कामनांचा उपभोग घेतल्याने कधीही तृप्ती होत नाही. उलट अग्नीत तूप टाकल्यावर अग्नी शांत न होता तो अधिकच भडकतो तसेच उपभोगाने कामनांची तृप्ती न होता त्या अधिकच प्रज्वलित होतात”.


      संत वाड्मय किंवा अध्यात्मशास्त्र विषयांपासून सतत दूर नेतात ते विषय खरंच एव्हढे वाईट आहेत का? खरेतर शब्द,स्पर्श,रूप,गंध आणि रस या पंचज्ञानेंद्रियांचे विषय आपण नित्य भोगत असतो म्हणजे विषयसेवन घडणारच आहे. पण संत याठिकाणी विषय त्याग सांगत नाहीत तर विषयासक्तीचा त्याग करायला सांगत आहेत. क्रोधाच्या आहारी न जाता मनानी त्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. कारण नसताना पुढच्या व्यक्ती कडून आपल्याला क्रोध यावा असे वर्तन घडले तरी माझी वैचारिक पात्रता, विचारांची स्थिरता मी गमावणार नाही हा विवेक जागृत ठेवून क्रोधावर विजय मिळवता येणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वाहन चालवताना या आणि अशा अनेक प्रसंगी क्रोधावर नियंत्रण ठेवता येणे आवश्यक आहे. या विकारांवर विजय मिळवणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील हिताचे आहे. कारण या सतत येणाऱ्या अनावश्यक रागामुळेच रक्तदाब, मधुमेह अशा अनेक आजारांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये मन अत्यंत अस्थिर आणि अस्वस्थ झालेले आहे.

       काम, क्रोधापेक्षा देखील विखारी आहे तो लोभ. सतत एखाद्या विषयाचा आनंद घेऊनही माणसाच्या मनातील लालसा कमी होत नाही. लोभ हा गरजेपोटी नसून वासनेपोटी जन्माला येतो. तृप्ती न होणे हाच लोभाचा स्वभाव आहे. माणसाला धनाची तीव्र वासना असते. कितीही धनप्राप्ती झाली तरीही यांच्या गरजा त्यामध्ये भागात नाहीत. म्हणून तो अधिक धनप्राप्ती करून घेण्याच्या मागे लागतो. धनप्राप्तीसाठी कुटुंबापासून दूर राहणे देखील तो स्वीकारतो. स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या सुखासाठी धनप्राप्तीला अधिक प्राधान्य दिले जाते. त्यामुळे सतत वाढणाऱ्या गरजा आणि त्याच्या पूर्ततेसाठी धनप्राप्तीच्या मागे धावणे या वर्तुळातून त्याची कधीच सुटका होत नाही. पुरेसे अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख गरजा भागल्या तरीही भोगवादाच्या पूर्ततेसाठी नवीन वस्तू घरात येतंच राहतात पण त्याचबरोबर जुन्या वस्तूंचा मोह काही सुटत नाही. सर्वकाही प्राप्त करून देखील माणसाला सतत अपुरेपणाची जाणीव होत राहते. त्यामुळे तो सतत अशांत आणि असमाधानीच राहतो. सतत स्वतःच्या प्रपंचाचे तसेच मी, माझे याचेच चिंतन लोभ वाढवतो. हा लोभ सतत क्षोभ वाढवतो, अतृप्तता वाढवतो आणि माणसाच्या दुःखाला कारण ठरतो. माणसाची प्रवृत्ती अशी असते की स्वतःच्या प्रपंचासाठी साठवता साठवता आपली मुले, नातवंडे यांच्यासाठी साठवून ठेवण्याची त्याची वृत्ती बळावत जाते. त्यामुळे आयुष्य संपत आले तरी देहाचे कष्ट सुटत नाहीत. नेमके कुठे थांबायचे हा विवेक अध्यात्म ग्रंथातुन उमगतो. धनाचा लोभ महाभयंकर आहे. परद्रव्याची अभिलाषा धरू नको हे सूत्र अध्यात्मिक ग्रंथात पहावयास मिळते. “ नको रे मन द्रव्य ते पुढिलांचे ” याठिकाणी परद्रव्याची अभिलाषा नकोच पण वडिलांच्या पैशाची देखील अपेक्षा नको हे अभिप्रेत आहे. या अपेक्षेतूनच निर्माण होणारे संघर्ष, नात्यांमध्ये निर्माण होणारी घुसमट यातून नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. सर्व गोष्टी विपुल प्रमाणात असून देखील मनःशांती नाही अशी अस्वस्था निर्माण होते. अशा परिस्थितीत अध्यात्माचे नेमके सूत्र समजलेल्याना मात्र मनःशांती प्राप्त होते. कारण या सर्वांवर मात करण्यासाठी चंचल मनावर विजय मिळवणे क्रमप्राप्त आहे याची त्यांना जाणीव असते आणि तशी त्यांची कृती देखील असते. आत्मपरीक्षण करून या सकारात्मक विचारांच्या आधारे स्वतःमध्ये जाणीवपूर्वक बदल घडवून आणाणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःमध्ये असणारे अवगुण हे गुणच वाटत असतात. पण त्याचवेळी इतरांमधील दोष मात्र पटकन लक्षात येतात. पण इतर माणसे कशी वागतात किंवा अशी का वागतात हा अध्यात्माचा विषय नसून मी कसा वागतो आणि मी कसा वागेन हा अध्यात्माचा विषय आहे नेमके हेच समजून घेणे आवश्यक आहे.

       अध्यात्म शास्त्र म्हणजे निर्भेळ आनंद आहे. आनंदी जीवन जगण्याचे तंत्र या शास्त्रांच्या आधारे जाणून घेतले तर जीवनात निर्माण होणारे ताण तणाव याला आपण सहज तोंड देऊ शकतो. आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्या मनात तसेच आपल्या भोवती आनंदी वातावरण राहण्यासाठी काही गोष्टी आत्मसात करणे गरजेचे आहे. दुसऱ्याला दुखावणे, दुसऱ्याचा अपमान करणे, सतत कलह निर्माण होईल असे शब्द बोलणे, दुसऱ्याची चेष्टा करणे हे करंटे पणाची लक्षणे आहेत ज्याचा त्याग करणे हे आनंदी जीवनाचे सूत्रच आहे. आपल्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द इतरांना प्रसन्न करणारा असावा. याचा अर्थ फक्त इतरांची स्तुती किंवा मुह मे राम बगल मे छुरी असा नसून समोरच्या व्यक्तीचे अंतःकरण शांत करणारी वाणी असावी. समोर असताना वरवर गोड बोलून त्या व्यक्तीच्या पाठीमागे मते त्याची निंदा नालस्ती करणे हे करंटेपणाचे लक्षण आहे. तोंडावर चांगले बोलावे पण पाठीमागे देखील चांगले बोलण्याचा विवेक जागा ठेवते ते अध्यात्म.

      वेगाने बदलणारे शहरीकरण, जीवनशैली, कुटुंब पद्धती, प्रसार माध्यमांचा वाढता प्रभाव या सर्वांमुळे निर्माण होणारे ताणतणाव याला देखील सामोरे जावे लागत आहे. या सर्व परिस्थितीत अध्यात्म शास्त्राच्या आधारे मनःशांती प्राप्त करून घेता येते फक्त त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. या शास्त्रामध्ये उपासनेवर भर दिला आहे. परंतु उपासना म्हणजे देवपूजा, मंदिरात जाऊन देवदर्शन, पोथ्या वाचन, उपासतापास असाच अनेकांचा ग्रह झालेला दिसतो. अनेक उपवास करून नित्य कर्म करताना मात्र इतरांचा उपहास करताना अनेक जण दृष्टीस पडतात. अखंड सावध राहून जीवन जगणे ही देखील एक उपासनाच आहे. सकाळी पूजा पाठ करून, जपाची माळ ओढून दिवसभर अहंकाराने बरबटलेले आणि लोकनिंदे मध्ये रमलेले खरे अध्यात्म शास्त्र जाणत नाहीत असेच म्हणावे लागेल. नाकारात्मक गोष्टींचा त्याग याचा अर्थ अध्यात्म शास्त्र आपल्याला दुबळे बनवते असा नाही तर कोणत्या परिस्थितीत नेमके कसे वागावे हे धोरण यातून शिकता येते.

       आज काळ बदलला, मनुष्याचे राहणीमान बदलले, विज्ञान प्रगत झाले परंतु माणसांची वृत्ती मात्र तशीच राहिली. त्यामुळे प्रगतीच्या अत्युच्च शिखरावर असून देखील मनुष्य असमाधानीच राहिला. हे माझे आणि तुझे तेही माझेच अशी वृत्ती इतकी बळावली की हिंसाचार वाढला. प्राप्त झालेल्या बुद्धीच्या सामर्थ्याचा उपयोग दुसऱ्याच्या नाशासाठी करताना दिसू लागला. जगात घडणारे अतिरेकी हल्ले, बॉम्बस्फोट या घटनांतून या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. राग,द्वेष, मत्सर कोणत्या प्रकारची टोकाची हानी करू शकतो याचे आपल्याला प्रत्यंतर येते. आजच्या परिस्थितीत जर काही चांगले घडवायचे असेल तर सकारात्मक विचारानां दिशा देणारे तसेच मनःशांती प्राप्त करून देणारे अध्यात्म शास्त्र नेमकेपणाने समजून घेऊन आपल्या जीवनात उतरवणे ही काळाची गरज ठरत आहे.
जय जय रघुवीर समर्थ