|| श्रीराम ||
|| श्रीराम ||
रामायणातील आदर्श पुरुष व्यक्तिरेखा
डॉ. सौ माधवी महाजन
प्राचीन साहित्यामधील रामायण आणि महाभारत ही दोन महाकाव्ये जनमानसावर खोलवर परिणाम करणारी ठरली. या महाकाव्यांमधून यशस्वी मानवी जीवनासाठी अनेक आदर्श समोर ठेवले गेले. महर्षि वाल्मिकी लिखित रामायण या महाकाव्यातील सकारात्मक व्यक्तिरेखा आपल्याला अनेक जीवनमूल्ये शिकवून जातात. प्रेम, संयम, सदाचार, सत्य, आदर, शौर्य, पराक्रम, त्याग, निरपेक्ष भक्ती, अन्यायाला प्रतिकार, नातेसंबंध, आज्ञाधारकता, अशा अनेक गुणांचे दर्शन या महाकाव्यात आपल्याला घडते. असत्यावर सत्याचा विजय, सकारात्मक विचारांचा विजय याचे दर्शन घडवणारी ही गाथा आहे. आजही नायकाने खलनायकाचा केलेला पराभव पहायला आपल्याला नक्कीच आवडते. खल वृत्तीचा झालेला नाश पाहून एका आनंदाचा अनुभव आपण घेतो. हाच आनंद या महाकाव्यातून आपल्याला मिळतो.
वाल्मिकी रामायणाचे विशेष म्हणजे व्यक्तीचे आयुष्य नियंत्रित राहण्यासाठी, कौटुंबिक स्वास्थ्य स्थिर राहण्यासाठी, समाजाचे स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी, समृद्ध जीवनासाठी रामकथा आदर्श ठरते. रामायणातील व्यक्तिरेखा उदात्त आणि समाजासमोर आजही आदर्श निर्माण करणार्या आहेत. राम आदर्श पुत्र त्याचबरोबर आदर्श राजा देखील आहे, सीता आदर्श पत्नी, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आदर्श बंधु, हनुमान आदर्श भक्त. अशी या व्यक्तिरेखांची यादी बरीच मोठी आहे. या सर्व व्यक्तिरेखा इतका उच्च कोटीतला आदर्श समोर ठेवतात की सामान्य माणसे त्यांना देवत्व बहाल करतात. असे होऊ नये यासाठीच महर्षींनी या सर्वांच्या मानवी गुणांचे वर्णन केले आहे. आपण त्याचे अनुकरण करून आपले जीवन उज्ज्वल करावे यासाठी महर्षींनी हे आदर्श आपल्या समोर ठेवले आहेत. त्या गुणांचे चिंतन आणि आचरण केले तर मानवी जीवन नक्कीच समृद्ध आणि यशस्वी होईल याची खात्री वाटते.
रामायणातील आदर्श पुरुष कोण तर ईश्वकू कुळात जन्माला आलेले मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम याविषयी सर्वांचे एकमत आहे. याशिवाय श्रीरामांच्या अनुषंगाने अनेक आदर्श व्यक्तींचे दर्शन या महाकाव्यातून घडते. श्रीरामांच्या रघुवंशाचा विचार केला तर या वंशातील राजे पराक्रमी आहेत. गड्गंज संपत्तीचे अधिकारी असले तरीही उपभोग शून्य आहेत. कालिदास म्हणतो त्याप्रमाणे अयोध्यानगरीमध्ये राज्य करणारा अत्यंत श्रेष्ठ असा हा सूर्यवंश आहे. जो स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबापेक्षा प्रामुख्याने प्रजेचा अधिक विचार करणारा आहे. कुटुंबाचा विचार न करता प्रजेला महत्व देऊन त्यांचे हीत, त्यांचे सुख बघणार्या राजांनी त्या त्या वेळी योग्य निर्णय घेतलेले पहाला मिळतात. यामध्ये राजा हरिश्चंद्र, दिलीप, रघु, अज, दशरथ, श्रीराम आणि त्यांचे बंधु या सर्वांनी आपल्या वर्तनातून समजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
सत्यवचनी राजा हरिश्चंद्र स्वप्नामध्ये दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी आपले राज्य, सर्व संपत्ति विश्वामित्राना अर्पण करतो. तसेच त्यांना अधिक दक्षिणा देण्यासाठी पैशांची तरतूद व्हावी म्हणून चांडाळाकडे देखील काम करतो. त्याच्या या संघर्षामध्ये राणी तारामती आणि त्याचा छोटा मुलगा रोहित हे देखील सहभागी होतात. सत्यवचन म्हणजे नेमके काय याची प्रचिती या कथेतून येते. दिलेला शब्द पाळणे मग तो जागेपणी दिलेला असो वा स्वप्नातील असो, त्याची पूर्तता करण्यासाठी राजा हरिश्चंद्राने केलेला संघर्ष आणि त्याच्या कुटुंबाने या काळात त्याला दिलेली साथ यागोष्टी खूप काही शिकवून जातात. मी राजा आहे किंवा राणी आहे म्हणून कोणी राजमहालात आराम केला नाही किंवा त्याचा उपभोग घेतला नाही. आठ वर्षाच्या रोहितला देखील या सर्व संघर्षाला सामोरे जावे लागले आहे. राजा म्हणून उपलब्ध असलेल्या सुविधांचा वापर कसा आणि किती करायचा हा विवेक रघुवंशातील राजांकडे होता.
रघुवंशाचे वैशिष्ठ्य हे की दान देण्यासाठी आणि प्रजेच्या सुखासाठी ते धन गोळा करतात, स्वतःच्या सुखासाठी धनाचा उपयोग करत नाहीत. सत्यवचनी, मितभाषी असे हे राजे कीर्तिसाठी विजयाची इच्छा बाळगतात. विवाह करतात पण संततीसाठी, योग्य वयात शिक्षण घेतात, तारुण्यात प्रमाणात ऐहिक सुखाचा उपभोग घेतात आणि म्हातारपणात ऋषितुल्य जीवन जगतात. शरीराचा त्याग करताना कोणतेही क्लेश त्यांना होत नाहीत.
राजा दिलीप आणि सुदक्षिणा यांनी पुत्रप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न, त्यातून घडलेली नंदिनीची सेवा, त्याचे गुरुप्रेम आणि निष्ठा या सर्व गुणांचे दर्शन घडते. याच दांपत्याला प्राप्त झालेला पुत्र म्हणजे रघु. ज्याच्या नावाने श्रीरामाचा वंश ओळखला जाऊ लागला. अत्यंत पराक्रमी असणार्या रघुचे वैशिष्ठ्य हे की तो दर पाच वर्षानी विश्वजित यज्ञ करून आपली सारी संपत्ति दान करून टाकत असे. या यज्ञात स्वतःच्या वैयक्तिक संपतीचे दान केले जात होते. रघुवंशात पैशांचा घोटाळा होत नसे किंवा घरामध्ये संपत्ति दडवून ठेवली आहे असे प्रकार घडत नसत. सर्वाचे दान केले जात असे. उपभोगशून्य म्हणजे काय ते रघुराजाचे चरित्र बघितले की समजते. दारी आलेल्या याचकला विन्मुख न पाठवणार्या या राजाकडे जेव्हा विश्वजित यज्ञ झाल्यावर कौत्स्य काही अपेक्षा घेऊन येतो तेव्हा रघु त्याला निराश करत नाही. आपल्या गुरूंच्या आश्रमाला चौदा करोड सुवर्णमुद्रा देण्यासाठी कौत्स्यला रघुची मदत हवी असते. यासाठी रघु कुबेरावर चाल करून जाण्याचे ठरवतो. पण रघुचा पराक्रम माहिती असलेला कुबेर रघु चालून येण्याच्या आधीच त्याच्या महालावर मोहोरांची बरसात करतो. याशिवाय अजून धन हवे असेल तर पाठवतो असा निरोपही सेवका करवी पाठवतो. चौदा करोडपेक्षा अधिक धन रघुला प्राप्त झाले होते पण त्याने ते सर्व धन कौत्स्याला घेऊन जाण्यास सांगितले. परंतु कौत्स्याने त्याला हवे तेव्हढेच धन घेतले. रघुने उरलेले सर्व धन स्वतःच्या तिजोरीत न भरता त्याचा विनियोग प्रजेच्या हितासाठी केला. रघुवंशातील राजांची चरित्रे बघितली तर अनेक उत्तम गुणांनी मंडित असे हे राजे आहेत. राजा हरिश्चद्राची सत्यनिष्ठा बघितली, दिलीप राजाची गुरुनिष्ठा वाखणण्याजोगी होती त्याचबरोबर गोमातेविषयीच्या प्रेमाचे दर्शन घडते. रघुराजाचा पराक्रम आणि त्याची दानशीलता याचा प्रत्यय त्याच्या चरित्रातून येतो. या सर्वांच्या चरित्रातील कथा काल्पनिक आहेत असाच दावा आजकाल करण्यात येतो. कारण इतक्या उच्च प्रतीचे आदर्श आज पहाला मिळत नाहीत.
राजा रघुचा मुलगा अज अत्यंत पराक्रमी होता. अज आणि त्याची पत्नी इंदुमती यांच्या पोटी महाराज दशरथांचा जन्म झाला. ज्याने पुढे जाऊन पुत्र प्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला ज्याचे फळ म्हणजे त्यांना चार पुत्रांची प्राप्ती झाली. श्रीराम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न अशा दिव्य पुत्रांचा जन्म या रघुवंशात झाला. कौशल्येच्या श्रीरामाचे चरित्र अनुकरणीय आहे ते त्याच्या वर्तनामुळे म्हणजे त्यांच्यामध्ये असणार्या अनेक गुणांमुळे. श्रीराम जे बोलले तसेच वागले आणि ते मानव धर्मात करता येते हे त्यांनी दाखवून दिले. म्हणून त्यांचे अनुसरण करणे मानवी जीवनात शक्य आहे. सत्यवचन हा रघुवंशाचा गुणविशेष श्रीरामचंद्रांमध्ये उतरला आहे. स्वप्नात दिलेले वचन पूर्ण करणाऱ्या हरिश्चंद्राच्या वंशातील श्रीरामचंद्र आपल्या वडिलांचे शब्द खोटे ठरू नयेत यासाठी प्रयत्नवादी आहेत. ज्यादिवशी श्रीरामांना राज्याभिषेक होणार त्याच दिवशी त्यांना वल्कले नेसून चौदा वर्षाचा वनवास स्वीकारावा लागला. परस्पर विरोधी अशा दोन घटना आहेत पण श्रीरामचंद्रांनी राज्याभिषेक जेवढा सहज स्वीकारला तेवढ्याच सहजतेने वनवास देखील स्वीकारला. वडिलांनी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी त्यांच्या चरित्राला असत्याचा कलंक लागू नये म्हणून श्रीरामांनी एक तप म्हणून वनवास स्वीकारला. स्थितप्रज्ञ हा त्यांच्यातील गुण वाखाणण्या जोगा आहे. श्रीराम आनंदाने बेभान होत नाहीत का दु:ख झाले म्हणून खचून जात नाहीत.कोणत्याही प्रसंगात शांत राहण्याची त्याची वृत्ती आहे. स्वतःच्या बळावर राज्य हिसकावून घेण्याची त्यांची वृत्ती नाही. त्यांना कशाचाच लोभ नाही. अधाशीपणा, वखवख या दुर्गुणांना त्यांच्या ठिकाणी थारा नाही. अत्यंत समाधानी, पूर्ण संयमी असे हे व्यक्तिमत्व सर्वांच्या मनाला भुरळ घालणारे आहे.
शबरीचे प्रेम बघून, प्रेम भावनेने तिची उष्टी बोरे खाणारा, अहिल्येचा उद्धार करणारा, कैकयीचे अपराध पोटात घालून तिच्यातील चांगले गुण पहा, असे भरताला सांगणारा श्रीराम. हे त्याचे प्रेम करणे, दुसर्याचे अपराध पोटात घालणे म्हणजे क्षमाशील असणे हे आपण आपल्या आचरणात आणू शकतो. जो परित्राणाय साधूनां हा विचार करून यज्ञ कार्यात येणारी विघ्ने आपल्या शक्ती बुद्धीच्या बलाने दूर करतो. पण त्याचबरोबर लोकांच्या मनातील वैर भाव दूर करतो मग ती वाली पत्नी असो, बिभीषण असो. अगदी रावणाबद्दल क्रोध बाळगणारा लक्ष्मण असो. म्हणजे वैरभाव कायम मनात न बाळगता कुठे थांबायच हे ज्याला कळलं असे श्रीराम अशा श्रीरामाचे गुण आचरणीय आहेत. एकपत्नी, एकवचनी, एकबाणी अशा श्रीरामचंद्रांनी आपल्या वागण्या, बोलण्यातून, एक आदर्श निर्माण केला. नरदेहप्राप्ती नंतर आपल्यामधील दैवी गुणांच्या साहाय्याने मनुष्य कसे उच्च कोटीतील आदर्श जीवन जगू शकतो हे रामचंद्रांच्या चरित्रातून पाहायला मिळते.
श्रीरामचंद्र एक आदर्श पुत्र, आदर्श बंधू, राज्यधर्माचे पालन करणारा, आदर्श राजा असे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. श्रीरामाने आईवडिलांच्या आज्ञांचे सदैव पालन केले. रामराज्यामध्ये जनहितार्थ या शब्दाला तेव्हाचे राजे प्रामाणिक होते. कुटुंबाला, स्वहिताला दुय्यम स्थान देऊन जनतेचे कल्याण हे महत्वाचे मानले जात होते. प्रजेने जेव्हा सीतेविषयी संशय व्यक्त केला तेव्हा स्वतःच्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता प्रजेसाठी, राजधर्माचे पालन करण्यासाठी आपल्या धर्मपत्नीचा त्यांनी त्याग केला. श्रीरामांनी धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या आहेत म्हणूनच मर्यादापुरुषोत्तम असा त्यांचा गौरव केला जातो.
श्रीरामप्रमाणेच त्यांचे सर्व बंधूंचा आदर्श घ्यावा असेच त्यांचे आचरण दिसते. श्रीरामा पाठोपाठ येते ते भरताचे चरित्र. रामावर उत्कट प्रेम असणारा भरत तत्वनिष्ठ आहे. गोस्वामी तुलसीदासांनी भरताचे वर्णन करताना एक सुंदर उपमा दिली आहे. यानुसार भरतामध्ये हंसत्व आणि चातकत्व हे दोन्ही एकत्र पहायला मिळते. हंस हे विवेकाचे तर चातक प्रेमाचे प्रतीक आहे. या दोन्हीचा मिलाफ भरताच्या चरित्रामध्ये पहायला मिळतो. श्रीरामाला राज्याभिषेक करण्याचे ठरले आणि लगेच दुसर्या दिवशी त्याला वनात जावे लागले. मंथरेच्या संगतीमुळे बिघडलेल्या कैकयीने रचलेल्या षडयंत्राविषयी भरत पूर्णपणे अनभिज्ञ होता. आयोध्येमध्ये आल्यानंतर त्याला जेव्हा रामाला बाबांनी वनात धाडले आहे हे समजले तेव्हा त्याची प्रतिक्रिया फार वेगळी होती. वडिलांच्या मृत्युची बातमी ऐकल्यावर कोसळून पडणारा भरत दादाच्या वनवास गमनाची वार्ता ऐकून एकदम गंभीर झाला आहे. त्याचे त्याच्या दादावर अतोनात प्रेम आहे पण त्याच वेळी त्याचा विवेक देखील जागा आहे. दादाला शिक्षा झाली म्हणजे दादा कडून काही अपराध घडला असावा असे वाटून तो काही प्रश्न विचारतो ज्यातून त्यावेळी कोणत्या अपराधला असे कठोर शासन होते हे लक्षात येते. भरताने विचारले , “दादा वनात गेला म्हणजे त्याने काही अपराध केला का? दादाने एखाद्या ब्राह्मणाचा वध केला का? त्याने एखाद्या गरिबाचे धन लुबाडले का? एखाद्या स्त्रीवर अत्याचार केला आहे का? त्याच्या हातून गोहत्या घडली का? “ दादा यातील कोणताच गुन्हा करणार नाही याची त्याला खात्री आहे. पण आयोध्येचा राजा ज्याअर्थी भावी युवराजाला वनात पाठवतो याचा अर्थ त्याच्या हातून असाच काही गंभीर अपराध घडला असावा असा त्याचा समज झाला. रघुवंशाची कीर्तिपताका असणारा दादा हे असे काही करणार नाही याची पण त्याला खात्री होती. श्रीरामाचे चारित्र्य असे आहे की कैकयी देखील भरताला ओरडून म्हणते की तू रामावर असे आरोप कसे करू शकतोस. श्रीरामकडून असे काही घडणार नाही याची सर्वांनाच खात्री आहे. प्रत्यक्षात आपल्या आईमुळे आयोध्येवर हे संकट आले आहे आणि आपण रामाला वनात पाठवण्याचे कारण ठरलो आहोत हे त्याला समजल्यावर भरताला अतोनात दु:ख झाले आहे. त्यानंतर त्याने कैकयी मातेच्या महालात प्रवेश केलेला नाही. पण भरताचा विशेष हा की तो मर्यादा सोडून देखील वागला नाही. मंथरा या सर्वाच्या मागे आहे हे समजल्यावर देखील भरताने अत्यंत संयमाने सर्व परिस्थिति हाताळली आहे. कारण असे संयम सोडून वागलेले दादाला आवडणार नाही याची त्याला जाणीव आहे.
कोणत्याही कारणाने का होईना आयोध्येचे राज्य भरताला मिळाले होते पण रघुवंशातील भरताला राज्याचा मोह नाही. श्रीरामाला वनातून घेऊन यायचे आणि त्याला पुन्हा राज्यावर बसवायचे हे ठरवून तो रामाला आणायला वनात गेला. तिथे मोठे चर्चासत्र घडले आहे. भरताची तीव्र बुद्धिमत्ता याप्रसंगातून दिसून येते. श्रीरामला आयोध्येला घेऊन जायचेच हा निश्चय करून आलेल्या भरताला श्रीरामसमोर माघार घ्यावी लागली. श्रीरामांच्या पादुका घेऊन भरताला आयोध्येत परतावे लागले. भरताचा विशेष हा की त्याने हे चौदा वर्षाचे राज्य स्वामी म्हणून स्वीकारलेले नाही तर सेवक म्हणून स्वीकारले. चौदा वर्षे भरताने श्रीरामाप्रमाणे कुटीमध्ये आपले वास्तव्य ठेवले. श्रीरामांप्रमाणे त्याने वल्कले धारण केली. केवळ चौदा वर्षासाठी त्याने दादाचे राज्य सांभाळण्याची तयारी दर्शवली. नंदिग्राममध्ये चौदावर्षे जटाभार, वल्कले धारण करून कंदमुळे खाऊन त्याने आपले जीवन व्यतीत केले. धन्य तो भरत, धन्य त्याचे बंधुप्रेम आणि धन्य त्याची तत्वनिष्ठा. साक्षात वासिष्ठांनी भरताचे कौतुक केले. ते म्हणतात, “अरे भरता तुझ्या आचरणा वरुन यापुढे शास्त्राची रचना होईल. लोक शास्त्रानुकूल वर्तन करतात पण काही लोकांचे जीवन बघून शास्त्राची रचना होते. भरता एकवेळ शास्त्राची चूक होईल पण तुझ्याकडून होणार नाही” या शब्दात त्यांनी भरताचा गौरव केला आहे. चौदावर्ष राजलक्ष्मीच्या सहवासात राहून भरताने त्याचा उपभोग घेतला नाही. श्रीरामबरोबर आयोध्येत राहून त्याने वनवासी जीवन जगले. भरताचे चरित्र म्हणजे एक अनुपम आदर्श आपल्यापुढे महर्षींनी ठेवला आहे.
रामायणामध्ये अजून एक अलौकिक व्यक्तिमत्व पहाला मिळते जे संपूर्ण राममय आहे ते म्हणजे लक्ष्मणाचे. राम म्हंटले की लक्ष्मण हा उच्चार येतोच. लक्ष्मणाने आपल्या जीवनात श्रीरामाशिवाय इतर कशाचेच चिंतन केले नाही. एखाद्या सावली प्रमाणे तो सतत श्रीरामाबरोबर राहिला. श्रीराम वनात निघाले तेव्हा कशाची पर्वा न करता लक्ष्मण त्याच्याबरोबर वनात निघाला आहे. श्रीरामाने त्याला आईची अनुमती घेऊन ये असे सांगितल्यावर तूच माझी माता आणि तूच माझा पिता असे सांगून त्यांच्या बरोबर वल्कले नेसून निघाला आहे. त्याची पत्नी उर्मिला हिला केवळ “मी निघालो आहे” इतकेच सांगून तिचा निरोप घेतला आहे. श्रीरामापुढे त्याने आपल्या पती कर्तव्याचा देखील विचार केला नाही. स्वतः पुरता विचार करणार्या संकुचित विचारसरणीच्या लोकांना हा उदात्त भाव समजणे कठीण आहे.
दादाचा जो मित्र तो माझा मित्र, दादाचा जो शत्रू तो माझा शत्रू मग तो कोणीही असो हाच त्याचा भाव आहे. श्रीरामाला वडिलांमुळे वनात जावे लागते आहे हे लक्ष्मणाला समजल्यावर त्याने त्यांची देखील पर्वा केली नाही. उग्रप्रवृतिच्या लक्ष्मणाने बाबांना तुरुंगात टाका, वेळ पडली तर त्यांना प्राणदंड द्या पण राजसिंहासनावर श्रीरामानेच बसले पाहिजे अशी त्याची भूमिका आहे. कारण ही आज्ञा रघुकुळाला शोभणारी नाही. या निर्णयामुळे राजगादीच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार आहे म्हणून बाबांना कैद केले पाहिजे अशी त्याची धरण आहे. लक्ष्मण आक्रमक आहेत तितकेच रामचंद्रांविषयी हळवे आहेत. लक्ष्मण अतिशय बुद्धीमान आहे. त्याने श्रीरामाला बाबांना का कैद करावे हे सिद्ध करून दाखवले आहे. पण श्रीरामाने जेव्हा संगितले की असे करणे योग्य नाही तेव्हा त्याने लगेच हा विषय बंद केला आहे. लक्ष्मण आत्मसमर्पित जीवन जगाला आहे.
विश्वामित्रांनी यज्ञ संरक्षणासाठी महाराज दशरथांकडे श्रीरामाची मागणी केली तेव्हा देखील लक्ष्मण रामबरोबर आहे. श्रीरामाला बोलवले म्हणजे लक्ष्मण येणारच इतकी सहजता त्यामध्ये होती. अत्यंत पराक्रमी अशा लक्ष्मणाने श्रीरामाबरोबर अनेक राक्षसांचा संहार केला आहे. राम रावण युद्धामध्ये अजिंक्य असणार्या इंद्रजीतचा पराभव लक्ष्मणाने केला आहे. इतकेच नाही तर त्याचा वध देखील केला आहे.
लक्ष्मण कितीही तापट असला तरीही चूक असेल तर लगेच माफी मागण्याची त्याची तयारी देखील आहे. सुग्रीवाने भगवती सीतेच्या शोधासाठी सहकार्य करण्याचे वचन दिल्या नंतर चार महीने काहीच केले नाही. तेव्हा संतापून लक्ष्मण त्याला जाब विचारायला जातो. त्यावेळी शोधकार्यासाठी माणसे पाठवली आहेत हे समजल्यावर त्याने त्याची लगेच माफी मागितली आहे. स्वतःची चूक लक्षात आल्यानंतर लगेच माफी मागण्याचे औदार्य त्याच्याकडे आहे. लक्ष्मणाचे किती गुण वर्णावेत तेव्हढे कमी आहेत. चारित्र्याच्या बाबतीत लक्ष्मण अत्यंत श्रेष्ठ होता. जेव्हा भगवती सीतेचे दागिने ओळखण्याचा प्रसंग येतो तेव्हा त्यामधील अलंकार बघून त्यातील पैंजणे वहिनीची आहेत हे तो लगेच ओळखतो. कारण वहिनीला रोज वंदन करताना त्याला त्या पैंजणाचे दर्शन घडत होते. याविषयीचा त्याचा श्लोक प्रसिद्ध आहे,
नाहं जानामि केयूरे नाहं जानामि कुण्डले
नूपुरे त्वभिजानामि नित्यं पादाभिवन्दनात्।
इतर दागिन्यांकडे त्याने कधी निरखून बघितलेच नव्हते. त्यामुळे त्याविषयी तो काहीच स्पष्ट सांगू शकला नाही. अतिशय संयमित असे जीवन लक्ष्मण जगला आहे.
अत्यंत पराक्रमी, बेधडक लक्ष्मण रामामध्ये पूर्णपणे एकरूप झाला आहे. दास्यभक्तीचे उत्तम उदाहरण म्हणून लक्ष्मणाकडे पहाता येते. दादा म्हणेल ते प्रमाण मानणारा लक्ष्मण अनेक प्रसंगामध्ये त्याला दादाचा देखील एखादा निर्णय मान्य नसला तरी दादाने सांगितले त्या आज्ञेचे त्याने निमूटपणे पालन केले आहे. त्याला महाराज दशरथांचा निर्णय मान्य नव्हता तरी श्रीरामाने सांगितल्यावर लक्ष्मण शांत झाला आहे. सीता त्यागाच्या प्रसंगामध्ये देखील लक्ष्मणाला हा निर्णय मान्य नाही पण तरीही हे कठोर कार्य त्याला पार पाडावे लागले आहे. भगवती सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली त्यावेळी लागणारी काष्ठे श्रीरामाने लक्ष्मणाला आणायला सांगितली. खरंतर लक्ष्मणाला हे मान्य नाही. पण श्रीरामाचा अंतिम निर्णय जरी त्याला मान्य नसला तरी त्याचे पालन करणे हा लक्ष्मणाचा स्वभाव आहे. मला पटले तरच मी करेन हा बौद्धिक अहंकार त्याच्यामध्ये नाही. लक्ष्मणाचे जीवन रामाला समर्पित आहे.
श्रीरामांचे देखील लक्ष्मणावर तितकेच प्रेम आहे. लक्ष्मणाला रामाचा बहिश्चर प्राण म्हंटले जाते. रामायणाच्या शेवटी याचा आपल्याला प्रत्यय येतो. श्रीरामाना विरहाचे दु:ख आहे. त्यांना आपल्या मातापित्यांचा विरह सहन करावा लागला, पत्नीचा वियोग सहन करावा लागला, भरताचा वियोग सहन करावा लागला, इतकच नाही तर भरत भेटीच्या वेळी क्षणभर का होईना त्यांच्यापासून त्यांचे प्रिय कोदंड देखील दूर झाले होते हे सगळे विरह श्रीरामाने सहन केले पण एकच विरह त्यांना सहन झाला नाही तो म्हणजे लक्ष्मणाचा. रामकथेच्या शेवटच्या सर्गामध्ये लक्ष्मणाकडून नियमभंग झाल्यामुळे धर्मानुसार कर्तव्यनिष्ठ राजा रामाला आपल्या प्राणप्रिय भावाला प्राणदंडाची शिक्षा द्यावी लागली. खरे तर जे घडले त्यामध्ये लक्ष्मणाची चूक नव्हती पण आयोध्या वाचावी म्हणून लक्ष्मणाने जाणीवपूर्वक चूक केली आहे. श्रीरामांना वंदन करून त्यांच्या शेवटच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी लक्ष्मण शरयू नदीत प्रवेश करण्यासाठी निघून गेला. चूक घडली तर स्वतः शिक्षा ग्रहण करणारे महापुरुष या वंशात आहेत. लक्ष्मणाला शिक्षा देऊन राजाचे कर्तव्य श्रीरामांनी पार पडले पण रामाशिवाय लक्ष्मण आणि लक्ष्मणाशिवाय राम कधीच राहिले नाहीत. राजा म्हणून श्रीरामांनी धर्माचे आणि कर्तव्याचे पालन केले पण आपल्या भावाशिवाय श्रीराम एक क्षण राहू शकत नाही. लक्ष्मणा पाठोपाठ श्रीरामानी शरयू नदीत प्रवेश केला. श्रीरामांना रघुवंशाची किर्तिपताका म्हंटले जाते तर लक्ष्मणाला त्या ध्वजाचा ध्वजदंड म्हंटले जाते. लक्ष्मणाने प्रेमाने श्रीरामला जिंकले होते. म्हणूनच श्रीराम लक्ष्मणाचा वियोग सहन करू शकत नाहीत. अत्यंत तेजस्वी असे हे चरित्र पुन्हा पुन्हा जाणून घ्यावे असे आहे.
रामायणातील आदर्श पुरुषांचा वेध घेताना रघुवंशातील शत्रुघ्नाला विसरून चालत नाही. सुमित्रेचे लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे दोन अलौकिक पुत्र. एकाने आपले सारे जीवन श्रीरामाला अर्पण केले तर दुसर्याने भरताची पाठ सोडली नाही. अशा जोड्या असल्या तरी त्यांचे एकमेकांवरचे प्रेम अभेद्य होते. त्यांचे नाते एकमेकांवरचे प्रेम आणि त्यागवृत्ती यामुळे अधिक दृढ होते. त्यांची एकी, एकमेकांविषयीचा आदर, त्यांचे बंधुप्रेम आजही आपल्याला आदर्श ठरते. शत्रुघ्नाचा उल्लेख रामायणात जास्त येत नसला तरी ज्यातून त्याचे दर्शन घडते ते नक्कीच आदर्श ठरणारे आहे. पराक्रमी शत्रुघ्नाने अत्यंत क्रूर अशा लवणासूरचा पराभव केला इतकेच नाही तर त्याचा वध केला आणि मथुरेत स्वतंत्र राज्य प्रस्थापित केले होते. मुळात शत्रुघ्न या नावातच त्याचा पराक्रम दडला आहे.
शत्रुघ्न म्हणजे ज्याच्या नुसत्या स्मरणाने शत्रू मरतात. भक्तीच्या वाटेवरून गेले तर आपला प्रमुख शत्रू कोण तर अहंकार. मी केले असा भाव ज्याच्या मनाला स्पर्श करत नाही असा हा शत्रुघ्न. रामकथेत कुठेही व्यक्त होताना दिसत नसला तरी अव्यक्त अशी ही व्यक्तिरेखा अनेक जबाबदार्या पार पाडताना दिसते. आयोध्येवर मोठे संकट आले आहे. महाराज दशरथांचा मृत्यू झाला आहे, दोन भाऊ चौदा वर्षासाठी वनात गेले आहेत. भारताने राज्याचा त्याग करून नंदिग्राम मध्ये त्याचे वास्तव्य आहे. चौदा वर्ष आयोध्येला राजा नाही. अशा परिस्थितीत राज्यात अराजक माजू शकते, शत्रू चाल करून येऊ शकतो. मग या परिस्थितीत या सर्वांवर नियंत्रण कोणी ठेवले? घरातील सर्व स्त्रिया आपआपल्या परीने दु:खी आहेत त्यांना कोणी सावरले? असे अनेक प्रश्न उभे राहतात. या चौदा वर्षात या सर्व जबाबदर्या शत्रुघ्नाने पार पडल्या आहेत. या कालावधीत राज्य बळकवण्याचे क्षुद्र विचार त्याच्या मनात आलेले नाहीत. चारी भावांनी हा वनवास एक व्रत म्हणून स्वीकारले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी चौघेही वनवासातच आहेत. राजवैभवात राहून संन्यस्त जीवन जगणारा हा योगी ‘मी केले म्हणून झाले’ असे कुठेही मिरवताना दिसत नाही. छोट्या छोट्या गोष्टींचा व्यर्थ अहंकार बाळगणार्यांनी शत्रुघ्नाच्या चरित्राचे जरूर चिंतन करावे.
रामायणकाळामध्ये राजसत्तेपेक्षा ऋषिसत्ता अधिक प्रबळ होती. ऋषींच्या आज्ञेशिवाय राजा कोणतेही निर्णय घेत नसे. ईश्वकू वंशाचे गुरु महर्षि वसिष्ठ, श्रीरामांना ज्यांनी घडवले ते महर्षि विश्वामित्र, यांची भव्यदिव्य चरित्र रामकथेत पहायला मिळतात. या ऋषितुल्य तपस्वींचे जीवन देखील आपल्या समोर एक आदर्श ठेवून जातात. महर्षि वसिष्ठ आणि विश्वामित्र यांनी महाराज दशरथांच्या युवराजांना घडवले आहे. श्रीरामच्या वनवासपर्वामध्ये अनेक ऋषींचे सहकार्य त्यांना लाभले. महर्षि अगस्तीनी श्रीरामाला रावण वधासाठी ब्रह्मशर बाण देऊन सहकार्य केले होते. या ऋषींप्रमाणेच श्रीरामाने जे संघटन केले त्यामध्ये नर, वानर, अस्वल याशिवाय जटायु, सांपाती या पक्षांनी देखील श्रीरामाला सहकार्य केलेले दिसते.
प्रभू रामचंद्रांनी धर्मस्थापनेसाठी या सर्वांच्या सहाय्याने जो पराक्रम गाजवला त्यामध्ये हनुमंताचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. भगवती सीताच्या शोधकार्यात हनुमंताची सर्वात महत्वाची भूमिका आहे. समाजामध्ये काही सकारात्मक कार्य करावयाचे असेल तर ध्येयनिष्ठ, आपल्या ध्येयाशी अत्यंत प्रामाणिक, कार्यात सातत्य राखणारे, निष्ठावान, अशा अनेक गुणांनी युक्त कार्यकर्त्यांची आवश्यकता असते. सर्वगुण संपन्न अशा हनुमंताच्या चरित्रातून आदर्श कार्यकर्ता कसा असावा, त्याच्यामध्ये कोणते गुण असावेत याचे दर्शन घडते.
हनुमंत अत्यंत बुद्धिमान होता. सतत सुग्रीवाचे यश चिंतणारा हनुमंत अत्यंत चाणाक्ष आणि मुत्सद्दी होता. समयसूचकता, उत्तम संघटक, निर्भयता, अशा अनेक गुणांनी मंडित असे हनुमंताचे चरित्र विलक्षण प्रभावी आहे. विलक्षण स्मरणशक्ती लाभलेला हनुमंत स्वयंप्रज्ञ आहे. अत्यंत पराक्रमी हनुमंताचे युध्दकाळामधील रौद्ररूपाचे आवेशपूर्ण वर्णन समर्थ रामदास्वामींनी आपल्या एका स्तोत्रात केले आहे. “अद्भुत आवेश कोपला रणकर्कशू | धर्मसंस्थापनेसाठी दास तो उठिला बळे ||” हनुमंताचा हा रणकर्कश्य आवेश धर्मस्थापनेसाठी आहे. भगवती सीता हे धर्माचे प्रतीक आणि या धर्मस्थापनेसाठी मारुतीरायाने रौद्रावतार धारण करून हा महाप्रलय घडवला. कोणत्याही काळात जेव्हा जेव्हा नकारात्मक विचारांची वावटळ उठेल तेव्हा तेव्हा हनुमंताच्या या रणकर्कश्य आवेशाची आवश्यकता आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.
प्रभूरामचंद्रांवर पूर्ण निष्ठा ठेवून लंकेमध्ये येऊन त्याने आपले कार्य पूर्ण केले. काही झाले तरी प्रभू मला तारून नेतील या दृढ विश्वासामुळेच हनुमंत निर्भयपणे आपले कार्य निर्विघ्नपणे पार पाडू शकले आहेत. श्रीरामांविषयी अनन्य भाव, श्रीरामांचा अखंड जप, याच बरोबर हनुमंत अखंड कार्यरत राहिले. भक्ती शक्तीचे प्रतीक असणारा हनुमंत निरंतर कर्मयोगी आहेत. अचूक प्रयत्न, स्वयं चिंतन, मनन करून घेतलेले योग्य आणि अचूक निर्णय यातून त्याची कार्यक्षमता लक्षात येते. प्रत्यक्ष युद्धप्रसंगी अनेक अडचणींचे प्रसंग आले तेव्हा मारुतीराया धावून आले आहेत. हनुमंताचा लंकेतील पराक्रम आणि सीता शोधन या कार्यात हनुमंताच्या बुद्धिमत्तेचे तसेच सामर्थ्याचे दर्शन घडते. हनुमंत रामचंद्रांसाठी प्राणार्पण करण्यास तयार असलेला अनन्य सेवक आहे. अनेक गुणांनी संपन्न असूनही त्याला सत्तेची हाव नाही, अधिकार गाजवण्याची त्याची वृत्ती नाही. सर्व प्रभावी गुण असताना देखील नम्र सेवक होऊन राहण्याची त्याची वृत्ती आहे. अत्यंत पराक्रमी आणि सत्वशील हनुमंतामध्ये असणाऱ्या गुणांचे चिंतन करून हे गुण अंगी बाणवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
रामायण या महाकाव्यामध्ये कसे वागावे याबरोबर कसे वागू नये याचा आदर्श देखील ठेवला आहे. जसे रावण ही व्यक्तिरेखा कसे वागू नये हा आदर्श आपल्या समोर ठेवते. रावण हा या महाकाव्याचा खलनायक आहे. त्याचे चरित्र बघितले तर तो अत्यंत पराक्रमी, बलवान, रुबाबदार, बुद्धीमान आहे. श्रेष्ठ शिवभक्त आहे. त्याला संगीताचे उत्तम ज्ञान आहे. पण त्याच्या या गुणांपेक्षा त्याचे अवगुण अधिक प्रभावी ठरतात. दुसर्याच्या मालमत्तेवर नजर असणार्या रावणाने कुबेरची लंका, त्याचे पुष्पक विमान जबरदस्तीने काढून घेतले आहे. ‘माझे ते माझे आणि तुझे तेही माझेच’ ही रावणाची वृत्ती आहे. जनहितापेक्षा स्वतःचा स्वार्थ त्याच्यासाठी महत्वाचा आहे. दुसर्याच्या धनावर त्याचे लक्ष आहेच पण परस्त्री वर देखील याची वाईट नजर आहे. रावणाच्या चरित्रात त्याने अनेक स्त्रियांवर जबरदस्ती केली असल्याचे वर्णन येते. त्याने आपल्या नातसुनेवर देखील अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. सदाचार, नीतीमूल्ये या सर्व गोष्टी त्याच्यासाठी महत्वाच्या दिसत नाहीत. ‘जसा राजा तशी प्रजा’ याप्रमाणे रावणाने दुसर्याच्या स्त्रीला पळवून आणून आपल्या अंतपुरात डांबून ठेवले तरी जनतेला फारसा फरक पडलेला दिसत नाही. पण जेव्हा हनुमंताने लंका जाळली तेव्हा हे संकट आपल्यावर येत आहे बघून सर्वांना रावण चुकला याची जाणीव झाली. राजा प्रमाणेच जनता देखील स्वार्थी आहे. दुसर्याला दु:ख देणे, दुसर्याला लुबाडणे, परस्त्रीवर नजर ठेवणे, सतत भोगवादामध्ये रमणे या निकृष्ट दर्जाच्या विचारांना आपल्या संस्कृतीमध्ये स्थान नाही.
रामकथा खरी का काल्पनिक किंवा राम वाईट आणि रावण चांगला यावर वाद घालण्यापेक्षा या व्यक्तिरेखांनी जी जीवनमूल्ये आपल्याला दिली त्याचा आदर्श समोर ठेवून आपले व्यक्तिमत्व उत्तम घडवणे हे महत्वाचे आहे. रामायण ही सद्गुणांची कथा आहे. रघुवंशातील कर्मयोगी योद्ध्यांनी सर्वश्रेष्ठ आदर्श समाजासमोर ठेवला आहे. रामकथेतून आपल्या ऋषींनी आपल्या उत्तुंग कल्पनेतून आपल्यासमोर जी जीवनमूल्य ठेवली त्याची जपणूक करून ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवून सुदृढ समाज बनवणे आपल्या हाती आहे. नेमके काय टिपावे याचे ज्ञान पक्षांना असते. मातीत पडलेले दाणे ते नेमकेपणाने उचलतात, चिखल चिवडत बसत नाहीत. त्याचप्रमाणे या आदर्श ग्रंथातून नेमके काय घ्यावे हा विवेक जागा ठेवून त्याचे ग्रहण करावे. रामराज्य यावे अशी सर्वांची इच्छा आहे पण त्यासाठी राम जन्माला येणे आवश्यक आहे. यासाठी यातील उत्तम विचारांचा प्रवाह पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवून ही रामकथा सतत जीवंत ठेवणे हे आपल्या हाती आहे.
|| जय श्रीराम ||
No comments:
Post a Comment