Monday, January 28, 2013

श्री समर्थ रामदासस्वामी चरित्र


श्री समर्थ रामदासस्वामी
डॉ. माधवी महाजन
      
      संत ही महाराष्ट्राला मिळालेली देणगी आहे. या सर्व संतानी अमूल्य अशी कामगिरी केलेली आहे. त्यांनी काही निश्चित उद्दिष्ट आपले जीवनकार्य मानून समाजाची मशागत करण्याचे महत्वपूर्ण कार्य केलेले आहे. अस्थिर समाजात स्थैर्य आणण्याचे, तसेच भरकटलेल्या समाजाला योग्य मार्ग दर्शवण्याचे, त्यांना परमार्थाला लावून या सर्वामधून धर्माची शिकवण देण्याचे मौलिक कार्य या संतानी केले. या संत प्रभावळीत समर्थ रामदास आपल्या वैशिष्ट्यासह उठून दिसतात.
      
      समर्थ रामदासस्वामी यांचा जन्म स.१६०८/ श.१५३० चैत्र शुद्ध ९ या दिवशी झाला. सूर्याजीपंत आणि राणूबाई यांच्या या पुत्राचे मूळ नाव ‘नारायण’ असे होते. बालपणापासून त्यांची तीक्ष्णबुद्धी आणि त्यांचा विचारांची व्यापकता दिसून येते. ‘विश्वाची चिंता’ करणाऱ्या समर्थांनी वयाच्या बाराव्या वर्षी स्व:ताच्या प्रपंचाकडे पाठ फिरवली. सर्वस्वाचा त्याग करून टाकळी येथे त्यांनी बारा वर्षे वास्तव्य केले. बारा वर्षाचा या कालावधीत त्यांनी स्व:ताचा शारीरिक, मानसिक, आणि बौद्धिक असा सर्वागीण विकास करून घेतला. गायत्री मंत्राचे आणि त्रयोदशाक्षरी मंत्राचे नित्य पुरश्चरण चालू असताना ते सतत सावध होते. त्यांनी आपली चौकस बुद्धी जागृत ठेवून सभोवताली घडणा-या घटनांचे सूक्ष्म निरीक्षण चालू ठेवले होते. समाजावर पसरलेले भीतीचे साम्राज्य, प्रतीकाराशून्य बनलेला समाज यासर्वांची त्यांना जेव्हा जाणीव झाली तेव्हा त्यांनी अखंड भारतखंड पालथा घालण्याचा निर्णय घेतला. या भारत भ्रमणामध्ये त्यांनी समाजाचे जवळून अवलोकन केले. भयग्रस्त आणि पीडित जनतेच्या समस्यांचे तसेच देव, देश, आणि धर्म यांचे  वास्तवभान येण्यासाठी त्यांनी ही देशयात्रा केली.
      
      तीर्थाटन काळात देशात माजलेला अनाचार त्यांनी स्व:तच्या डोळ्यांनी पहिला. त्यांना देशाचे जे विदारक दर्शन घडले त्याचे वर्णन त्यांच्या ‘अस्मानी - सुलतानी’ तसेच ‘परचक्र निरुपण’ आणि त्यांच्या वाड्मयामधून इतरत्र आढळते. याशिवाय काही प्रवाशांनी लिहिलेल्या प्रवासवर्णनातून तेव्हाच्या देशास्थितीवर प्रकाश पडतो.

समर्थकालीन देशस्थिती :
      
     समर्थांच्या जीवनवृतामध्ये त्यांनी जे कार्य केले, जी समाजजागृती घडवून आणली, त्यासाठी त्यांनी कोणत्या परिस्थितीला तोंड दिले ती पार्श्वभूमी समजावून घेणे अत्यावश्यक आहे.
समर्थांच्या वेळचा काळ अत्यंत धामधुमीचा होता. त्याची पाळमुळ आपल्याला समर्थपूर्वकालीन परिस्थितीमध्ये आढळतात. सुरुवातीला आपला धर्म आणि समाज अत्यंत सुखरूप असा होता. आपापसांतील हेवेदावे आणि वैरभाव सोडले तर समाजात भय आणि परकीय हस्तक्षेप या दोन्हीमुळे समाज पोखरलेला नव्हता. इ.स. ७१२ चा सुमारास बगदाद्चा खलीफ वालीद आणि इराणचा सुभेदार यांच्या मदतीने महमद कासीमने सिंधप्रांतात पाउल टाकले आणि आपल्या अवनतीला खरी सुरवात झाली. त्याच्या क्रूर वर्तणुकीमधून त्याच्या स्वभावाचे दर्शन घडल्यावर जनता एकदम घाबरून गेली. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे केवळ धर्माचाच प्रसार करण्यासाठी आलेला हा शत्रू हिंदूची प्रतीकाराशून्य प्रवृत्ती लक्षात आल्यानंतर मात्र शिरजोर बनला. त्यांच्यामधील दुबळेपणा, आपापसांतील वैर, हेवेदावे, स्वार्थीपणा, यासर्वामुळे शत्रूला आपली पथारी आपल्या देशात पसरणे अतिशय सोपे गेले. त्यांच्या अत्याचाराने देश पोखरून निघाला. समाज नि:सत्व बनला. हिंदूवर चालून आलेल्या शत्रूने लुटालूट, जाळपोळ, स्त्रियांची विटंबना, देवालायाम्चा विध्वंस, मूर्तीभंजन, धर्मांतर, बेईमानपणा अशा प्रकारे छळ करून आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
      
      हिंदूच्या भावना दुखावण्यासाठी मूर्तीची विटंबना केली जात असे. या देवतांच्या धातूच्या मूर्तीचा वापर माशिदिच्या बांधकामासाठी, त्यांच्या पाया-यांसाठी केला जात असे. अनेक देवळांचा, तीर्थक्षेत्रांचा विध्वंस यावनी सत्ताधिका-यांनी मुक्तपणे चालवला होता. समर्थ दासबोधात म्हणतात,

देव हारपला घरीं येक देव नेला चोरीं |
येक देव दुराचारीं फोडिला  बळें ||६.६.३४||
येक देव जापाणिला एक देव उदकीं टाकिला |
येक देव नेऊन घातला  |  पायातळीं  ||६.६.३५||

याशिवाय धर्माला आलेली ग्लानी समर्थांच्या पुढील शब्दातून व्यक्त होते,

देव  जाले  उदंड देवांचें मांडलें भंड |
भूतादेवतांचें थोतांड येकचि जालें ||११.२.२०||
      
      देवदेवतांविषयीचा हा गलबला होता तर चातुर्वर्ण्यव्यवस्था पार कोलमडून गेली होती. धर्मातील अनाचार, कोलमडलेली चातुर्वर्ण्यव्यवस्था याविषयीची व्यथा समर्थांनी शिवरायांना पाठविलेल्या पत्रांमध्ये व्यक्त केली आहे.  ते म्हणतात,

तीर्थक्षेत्रे मोडली | ब्राम्हण स्थाने भ्रष्ट झाली |
सकाळ पृथ्वी आंदोळली | धर्म गेला |
      
     तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य नष्ट झाले होते. ब्राम्हण आणि क्षत्रिय हे तेव्हाच्या काळात उच्चवर्णीय मानले जात होते. परंतु ब्राम्हणांनी आपले ब्राम्ह्णत्व सोडले होते. तर क्षत्रियांना आपल्या धर्माचा विसर पडला होता. ब्राम्हण काय किंवा क्षत्रिय काय दोघांनाही परकियांकडे चाकरी करण्यात धन्यता वाटत होती. ज्यांचा आदर्श समोर ठेवून आपल्या धर्माचे पालन करावे असा वर्गच धर्मभ्रष्ट झाला होता. अशा भरकटलेल्या समाजाला मार्ग दाखविण्याचे, सावरण्याचे कार्य समर्थ रामदासस्वामींनी केले.

समर्थांचे कार्य :
       
      समर्थ रामदासस्वामीं यांच्या काळाचा सर्वांगीण विचार केला असता त्यांनी त्या परिस्थितीत जे समाजकार्य केले ते गौरवास्पद होते. त्यांनी त्या काळात धार्मिक, राजकीय, आणि सामाजिक क्रांतीच घडवून आणली होती. भारतभ्रमणाच्या काळात त्यांनी समाजाचे जवळून अवलोकन करून समाज मन जाणून घेतले. याकाळात समाज भयमुक्त होऊन संघटीत होणे आवश्यक आहे हे त्यांनी जाणले. समर्थांनी समाज संघटीत करताना समाजामध्ये ज्ञानसत्ता, राजसत्ता, धर्मसत्ता, आणि आत्मसत्ता या चार सत्ता दृढ केल्या. मध्यायुगापूर्वी राजसत्तेपेक्षा ऋषीसत्ता अधिक प्रबळ होती. राजा ऋषींची आज्ञा घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नसे. म्हणजेच तेव्हा राजसत्तेपेक्षा ज्ञानसत्तेला अधिक प्राधान्य होते. परंतु खिलजीच्या हल्ल्यामुळे ही सत्ता ढासळली गेली. ही ज्ञानसत्ता दृढ झाल्याशिवाय समाजाला नवा दृष्टीकोण देणार कोण ? ही समस्या समर्थांनी ओळखली. म्हणूनच त्यांनी ब्राम्हणांना अत्यंत प्रखर शब्दात आपल्या धर्माची जाणीव करून दिली.
      
      त्याकाळात ब्राम्हणांना आपल्या धर्माचा विसर पडला होता. ब्राम्हणवर्ग आपले कर्म विसरून धनसंचयाचा मागे लागला होता. स्वधर्माचे विस्मरण झालेल्या व समाजाचे शोषण करणाऱ्या ब्राम्हणांवर समर्थांनी कोरडे ओढले आहेत. ब्राम्हणांची मुख्य दीक्षा भिक्षा मागणे ही आहे याची जाणीव समर्थांनी त्यांना करून दिली आहे. ज्ञानसत्ता प्रबळ करण्यासाठी समर्थांनी आपल्या उपदेशामधून ब्राम्हणांचे मनोबल दृढ केले. तसेच राजसत्ता दृढ करण्यासाठी ‘मराठा तितुका मेळवावा | महाराष्ट्र धर्म वाढवावा | ’ असा उपदेश करून क्षत्रियांना मोगलाई विरुद्ध लढा देण्यास प्रवृत्त केले. स्वधर्माची स्थापना करणे हे त्यांचे प्रमुख ध्येय होते. पण त्यासाठी योग्य त्या राजाची गरज आहे हे त्यांना प्रकर्षाने जाणवले. त्यासाठी त्यांनी कृष्णाखोऱ्याची निवड केली. कृष्णाखोरे ही शहजीराजाची जहागिरी होती. तसेच या ठिकाणी त्यांचे पुत्र शिवाजीराजे स्वराज्य स्थापनेची स्वप्ने उराशी बाळगून त्या दृष्टीने आपली पावले टाकत होते. स्वराज्य स्थापण्याच्या दृष्टीने शहाजीराजांनी एकदा प्रयत्न केला होता पण त्यांचे हे बंड मोडून काढण्यात आले होते. शहजीराजाची स्वराज्य स्थापन करण्याची उर्मी आणि शिवाजीराजांचे स्वराज्याचे स्वप्न लक्षात घेऊन समर्थांनी आपल्या कार्यासाठी कृष्णाखो-याची निवड केली. त्यांनी आपल्या उपदेशातून समाज संघटीत करून एकीचे महत्व लोकांना पटवून दिले. तरुणांची मने शिवाजीराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यास पोषक ठरतील अशापद्धतीने घडविण्यास सुरवात केली. अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांनी समाजाला दिली. परकीय आणि मोगल यांच्या विरोधात सर्वांनी एक होऊन त्यांचा अंत करणे हि प्रेरणा राजसत्ता दृढ करणारीच होती.
      ज्ञानसत्ता आणि राजसत्ता दृढ करताना त्यांनी धर्मसत्ता देखील प्रबळ केली. समर्थांच्या काळामध्ये धर्माला ग्लानी आलेली होती. हिंदूची देवळे पडली जात होती, मूर्तीची विटंबना केली जात होती, या सर्व अनाचाराला प्रतिबंध घालण्यास एकजण पुढे येत नव्हता. लोकांच्या धार्मिक भावना अत्यंत हीन पद्धतीने दुखावल्या जात असून देखील अत्यंत निर्विकारपणे जनता ते सहन करीत होती. समाजाची ही तटस्थवृत्ती, त्यांचे दुबळेपण आणि यवनांचा अनाचार हे सर्व समर्थांना उघड्या डोळ्यांनी पाहणे अशक्य होते. त्यांनी भारतभ्रमण करीत असताना तसेच नंतर देखील मंदिरांचा जीर्णोद्धार करून, ठिकठिकाणी मारुतीच्या मंदिराची स्थापना करून धार्मिक क्रांतीच घडवून आणली. श्रीरामाच्या मंदिराची उभारणी करून त्याचा दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्सव चालू केला. अनेक वीर मारुती, प्रताप मारुतींची स्थापना करून समाजासमोर निर्भय आणि बलवान मारुतीचा आदर्श ठेवला. ह्या सर्वांमधून जो तत्कालीन धार्मिक अनाचार माजला होता त्याला आळा घालण्याचे काम समर्थांनी केले. त्या काळात अंधश्रद्धेचा जो सुकाळ झाला होता त्यावर प्रहर करणे आवश्यक होते. समाजाला शुद्ध परमार्थदृष्टी आणि खरा धर्म समाजासमोर मांडणे हे अत्यावश्यक होते. यासाठी समर्थांनी देवाचा उत्सव, मंदिरांचा जीर्णोद्धार अशा स्वरुपाची ‘चाळणा’ करून समाजाला नवी दृष्टी प्राप्त करून देऊन स्वत्व जागृत ठेवून जगण्याचा नवा मार्ग दाखविला .

समर्थांच्या शिष्याचे योगदान :
      
      समर्थांनी केवळ मंदिरांची स्थापना आणि देवांचा उत्सव एवढेच केले नाही तर संपूर्ण भारतभर त्यांनी आपले मठ स्थापना करून आणि त्याठिकाणी योग्य त्या शिष्याची महंत म्हणून नेमणूक करून सर्वत्र समर्थ संप्रदायाचे जाळे पसरवले. समर्थांच्या या कार्यात त्यांच्या शिष्याचे योगदान तितकेच महत्वाचे ठरते. पूर्वी समाजाशी संपर्क साधण्याच्या दृष्टीने रेडीओ, दूरदर्शन ,टेलीफोन अशी साधने उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत समर्थांना आपला उपदेश घराघरामध्ये पसरवायचा होता. यासाठी त्यांनी अनेक महंत आणि शिष्य तयार केले. समर्थांचे हे शिष्य समर्थांचा उपदेश समाजापार्यात पोहोचवीत असत. समर्थांनी ब्राम्हणांना जसे भिक्षेचे महत्व सांगितले तसेच त्यांनी आपल्या शिष्यांना देखील भिक्षेची दीक्षा दिली. कारण भिक्षा हे समाजाशी जवळीक साधणारे, लोकाभिमुखतेचे अत्यंत प्रभावी साधन आहे हे त्यांनी जाणले. भिक्षेच्या निमित्ताने लोकस्थितीचे जवळून अवलोकन करणे हा महत्वाचा उद्देश होता. समर्थांनी याविषयीचे स्वरूप स्पष्ट करताना म्हटले आहे की,

कुग्रामे अथवा नगरे | पहावी घरांची घरे |
भिक्षामिसे लहानथोर | परीक्षून सोडावी |

यावरून समर्थ संप्रदायात भिक्षेला दिलेले महत्व आणि त्याचे व्यापक स्वरूप लक्षात येते.
      समर्थांनी एका विशिष्ट वर्गातीलच शिष्य करून घेतले नाहीत. त्यांचे काही शिष्य राजकीय क्षेत्रातील देखील होते. या सर्व शिष्याचा उपयोग समर्थांना देशाच्या राजकारणामध्ये झाला. अर्थातच शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यातही त्यांचा उपयोग झाला. समर्थांनी जे जे शिष्य जमवले होते ते सर्व

वेष असावा बावळा | परी अंतरी असाव्या नाना कळा |

असे होते. त्यामुळे त्यांच्यावर पटकन कोणी संशय घेत नसे. याचाच फायदा करून घेऊन कुठे काय चालले आहे, काय खबर आहे हे या शिष्यांमार्फत समर्थांना कळत असे. मठस्थापना, शिष्य, महंत, आणि आपला संप्रदाय यांचे जाळे समर्थांनी देशभर पसरवले होते. त्यातून त्यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो.

शिव – समर्थ संबंध :
      
      समर्थांनी देवकरणातून समाजकारण आणि समाजकारणातून राजकारण साधले. त्यांचे मुख्य कार्य स्वधर्म स्थापनेचे होते. त्यांच्या या कार्याच्या पूर्तीसाठी त्यंना स्वराज्य स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या शिवाजी महाराजांसारख्या शिष्याची जोड मिळाली. शिव – समर्थ या दोन्हीही विभूती स्वतंत्र आणि स्वयंभू होत्या. धर्मस्थापना आणि स्वराज्यस्थापना यासाठी दोघांना परस्परांच्या सहकार्याची गरज होती. तेव्हाचा काळच असा होता की या दोन्हींचा समन्वय ही काळाची गरज आहे हे दोघांनी जाणले होते. शिवाजी राजे उत्तम संघटक होते. आपल्या वर्तनातून लोकांची मने त्यांनी जिंकली तसेच अन्याय करणा-या विरुद्ध कडक शिक्षांचा अवलंब करून लोकांचा मनात विश्वास उत्पन्न केला. तर समर्थांनी आपल्या उपदेशातून लोकांची मने स्वराज्य आणि स्वधर्म या ध्येयाने प्रेरित करून समाजामध्ये स्वत्व निर्माण करून समाजजागृती घडवण्यास प्रारंभ केला. केवळ समाजोद्धार करणे हीच तळमळ उभयतांना लागली होती. काळाची गरज ओळखून दोघांनी कार्य केले ही गोष्ट अधिक महत्वाची होती. आपले कार्य पार पडताना योग्य प्रकारे कार्याची आखणी करून, उत्तम संघटन करून तसेच सतत सावध राहून समाजहित नजरे समोर ठेवून दोघांनी आपापली कार्य पार पडली. प्राप्त परिस्थितीला डगमगून न जाता दोघांनी मिळून अत्यंत सावधपणे, थोडयाच समूहाच्या आधारे औरंगजेबाला हादरवून सोडणारी जोरदार धडक दिली.

समर्थाचे वेगळेपण :
      
      समर्थ रामदासस्वामीं त्यांच्या समोर मागील संतांचा आदर्श होता. परंतु त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीनुसार त्यांनी केवळ दैववादाचा पुरस्कार न करता प्रयत्नवादाचा पुरस्कार केला. ‘यत्न तो देव जाणावा’, ‘केल्याने होत आहे रे’, असे विचारधन लोकांना देऊन त्यांना प्रयत्नवादी बनवले. तसेच त्यांनी ‘अचूक’ प्रयत्नांवर अधिक भर दिला. ‘आधी केले मग सांगितले’ असा त्यांचा बाणा होता. तसेच या वचनाप्रमाणे त्यांचे वर्तन होते. ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ असे सांगून कृतीला अधिक महत्व दिले. ज्या काळामध्ये धार्मिक स्वातंत्र्य उरले नव्हते त्या काळामध्ये त्यांनी ‘ सामर्थ्य आहे चळवळीचे | जो जो करील तयांचे’ असे सांगून सतत ‘चाळणा’ करण्यास प्रवृत्त केले. ‘ मराठा तितुका मेळवावा | महाराष्ट्र धर्म वाढवावा ’ असा मोलाचा उपदेश करून मराठ्यांमध्ये लढण्याचे स्फुरण निर्माण केले. समर्थांनी राजकारण करत असताना हातात तलवार घेतली नसली तरी त्यांनी केलेला उपदेशच अतिशय प्रखर होता. त्यांच्या शब्दाला विलक्षण अशी धार होती. आपल्या तेजस्वी आणि प्रखर वाणीप्रमाणेच त्यांनी आपले शिष्य तयार केले. ‘धटासी व्हावे धट | उद्धटासी उद्धट |’ अशा सारख्या वचनामधून जशास तसे वागण्याची शिकवण त्यांनी समाजाला दिली. अन्याया विरुद्ध प्रतिकार करताना सत्ताधीकार्याची भीती वाटू नये ‘ समर्थाचिया सेवका वक्र पाहे | असा सर्व भूमंडळी कोण आहे |’ असा रोकडा सवाल टाकून धीर देण्याचेही काम केले. एकीकडे सतत चळवळ करण्यास प्रवृत्त करणारा आणि भयग्रस्त समाजाला ‘धिर्धरा धिर्धरा तकवा | हडबडू गडबडू नका |’ असा उपदेश करून धीर देणारा हा समर्थ पुरुष लोकांना निश्चितच वेगळा वाटला. म्हणूनच त्यांचा प्रखर आणि निर्भय उपदेश समाजावर खोलवर परिणाम करू शकला. त्यांच्या उपदेशाने मृतवत झालेल्या समाजामध्ये चेतना निर्माण झाली. त्यावेळची परिस्थिती अशी होती की स्वराज्य स्वधर्म यासाठी जरी काही करावेसे वाटले तरीही मनानी कमकुवत झालेली तसेच मनावर सतत भीतीचे साम्राज्य असलेली जनता काहीही करू शकत नव्हती. त्यांच्या मनातील सुप्त इच्छेला समर्थांनी योग्य मार्ग दाखविण्याचे मोलाचे कार्य केले.
      
      समर्थांचा विशेष म्हणजे स्वत: ब्रह्मचारी राहून त्यांनी सामान्यजनांना ‘आधी प्रपंच करावा नेटका|’ असा उपदेश केला. त्यांनी स्वत: प्रपंच थाटला नसला तरी त्यांच्या प्रपंचाचे स्वरूप फार व्यापक होते. त्यांनी राष्ट्राचा प्रपंच मांडला होता. हा प्रपंच त्यांनी सावधपणे आणि नेटकेपणाने केला. परंतु सामान्य माणसाला प्रपंचाचा त्याग करून परमार्थ साधता येणार नाही हे ते जाणून होते. त्यामुळे प्रपंच नेटका करून मगच परमार्थ करण्याचा उपदेश त्यांनी सामान्यजनांना केला.  असे असले तरी प्रपंच नासका कसा आहे हे देखील त्यांनी दाखवून दिले. प्रपंचामध्ये गुंतून मनुष्य प्राणी कसा दुखी होतो हे सांगून प्रपंच करताना कसा अलिप्तपणे करावा याविषयी समर्थांनी मार्गदर्शन केले आहे. प्रपंचामध्ये आळस करू नका तो नेटका करा असे सांगताना प्रपंचाच्या आहारी जाऊ नका असे सांगून समर्थ प्रापंचिकांना सावध करतात.

समर्थ संप्रदायातील स्त्रियांचे स्थान :
      
      समर्थ संप्रदायातील स्त्रियांचे स्थान हे त्यांचे एक वेगळे वैशिष्ठ्य दिसून येते. ज्ञानेश्वर – मुक्ताई, नामदेव – जनाबाई, तुकाराम – बहिणाबाई या स्त्रीशिष्यांचा उल्लेख आढळतो. समर्थ संप्रदायामध्ये देखील अनेक शिष्या होत्या. आक्काबाई, वेणाबाई, द्वारकाबाई, गंगाबाई, अन्नपूर्णाबाई अशा वीस स्त्री शिष्यांचा उल्लेख ‘समर्थ प्रताप’ मध्ये आढळतो. या स्त्रीशिष्यांनी ग्रंथरचना केलेल्या दिसून येतात. तसेच समर्थ त्यांचावर जबाबदारीची कामे टाकत असत. आक्काबाई, वेणास्वामी यांना तर मठाधिपती केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांना गुरुत्वाचा अधिकार प्राप्त करून दिला तसेच सर्वांना कीर्तनाचा अधिकार नसला तरीही वेणास्वामींनी कीर्तन केल्याचा उल्लेख आढळतो. त्याकाळचा विचार करता स्त्रियांना त्यांनी आपल्या संप्रदायात दिलेले स्थान, त्यांना प्राप्त करून दिलेले अधिकार हे धाडसाचेच पाऊल ठरते. त्यातून देखील त्यांचे वेगळेपण सिद्ध होते.

समर्थांचे वाड्मय :
      
       समर्थांच्या या संघटनात्मक कार्याइतकेच त्यांचे वाड्मयीन कर्तुत्व देखील तेव्हढेच मोलाचे आहे. त्यांनी धर्मकारण, राजकारण, आणि समाजकारण करताना विपुल प्रमाणात वाड्मयनिर्मिती केली. त्यांच्या वाड्मयामधून त्यांची सूक्ष्म निरीक्षण आणि प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करण्याची प्रवृत्ती याचे दर्शन घडते. जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करणारी अशी त्यांची शिकवण होती.
      
       समर्थ संप्रदायामध्ये ‘ग्रंथराज दासबोधाचे’ महत्व अपरंपार आहे. वीस दशक दोनशे समास आणि ७७५१ ओव्या अशी दासबोधाची रचना आहे. या ग्रंथामध्ये समर्थांनी अनेक विषय हाताळले आहेत. प्रपंच, परमार्थ, व्यवहारज्ञान, तसेच ब्रह्म म्हणजे काय ? मायेचे स्वरूप कसे आहे, विवेकाचे आपल्या जीवनात असणारे महत्व या आणि अशा अनेक विषयांचे महत्व त्यांनी या ग्रंथात विषद केले आहे. व्यवहारज्ञान, प्रपंचज्ञान याच बरोबर ब्रह्माचे गूढ देखील अत्यंत सहजपणे त्यांनी उकलून दाखवले आहे. देहबुद्धीपेक्षा परमेश्वर हेच सर्वस्व आहे हे जीवनाचे तत्त्वज्ञान त्यांनी सागितले आहे.   
      
       श्रीमत दासबोधाप्रमाणेच समर्थांचे ‘मनाचे श्लोक’ हे छोटेखानी पण अत्यंत प्रभावी विचार प्रकट करणारे पुस्तक समर्थांच्या विचारांची व्यापकता स्पष्ट करते. माणसाचे मन हे अतिशय चंचल आहे. या चंचल मनालाच समर्थांनी सज्जन उपाधी देऊन श्रेष्ठ स्थान दिले आणि कोणा व्यक्तीला उपदेश न करता मनालाच सदाचाराचा उपदेश केला आहे. चंचल मनाला आवर घालून योग्य त्या विचारांनी आचरण करावे, पण ते करीत असताना सतत भगवंताचे स्मरण ठेवावे, अशी शिकवण त्यांनी समाजाला दिली. मनाला वळण लावणारे हे मनाचे श्लोक लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच मार्गदर्शक आहेत.
      
       समर्थांची ‘करुणाष्टके’ त्यांची रामचंद्राच्या भेटीची तळमळ व्यक्त करणारी आहेत. आपल्या परम आराध्य दैवतासमोर ही करुणपर कविता म्हणताना जे अष्टसात्विक भाव निर्माण होतात, त्यामुळे या काव्याला करुणाष्टके हे नाव पडले. या अष्टकामधून त्यांचे मन उदास झालेले दिसत असले तरीही ‘दाता एक रघुनंदन’ असा त्यांना आत्मविश्वास वाटतो. अत्यंत कारुण्यपूर्ण अशी काव्य रचना समर्थांचे भावसौंदर्य प्रकट करते. समर्थांची ‘भीमरूपी स्तोत्रे’ ही अत्यंत स्फूर्तीदायी आणि मार्गदर्शनपर अशीच आहेत. समर्थांनी मारुतीरायांचे वर्णन करणारी तसेच त्याचा पराक्रम वर्णन करणारी, स्तुती करणारी अशी तेरा मारुती स्तोत्रे लिहिली. या स्तोत्रांमधून स्फूर्ती मिळतेच तसेच निर्भय आणि पराक्रमी मारुतीरायांचा आदर्श डोळ्यांसमोर उभा राहतो.
        
       याशिवाय त्यांचे आनंदवनभुवनी काव्य, लघुकाव्य, पंचसमासी रामायण, अनेक आरत्या असे विविध अंगांनी लिहिलेले वाड्मय उपलब्ध आहे. या सर्व वाड्मयामधून समर्थांनी आत्मसत्ता दृढ केली. त्यांच्यातील योगी, ज्ञानीभक्त यांना वेदाच्या संस्कृतीचा विसर पडलेला नाही. त्यांच्यातील ज्ञानभक्त जागरूक असल्यामुळेच दासबोध या ग्रंथामध्ये भक्तीरसाला अधिक प्राधान्य आहे. समर्थांनी आत्मसत्ता दृढ केली यामध्ये त्यांनी अध्यात्म, भक्ती, मोक्ष याला प्राधान्य दिले. ‘देहे दुख: ते सुख मानीत जावे’ असे सांगून देहाला गौण स्थान देऊन त्यांनी आत्मारामाला महत्व दिले आहे.

समारोप :
      
      समर्थांचे एकूण ७४ वर्षाचे जीवनवृत्त पाहता त्यांचे जीवन म्हणजे एक क्रांतीच होती. त्यांनी आपले सारे आयुष्य स्वत:च्या वैयक्तिक सुखाकरिता व्यतीत न करता लोकोद्धार आणि आत्मोद्धार यासाठी समर्पित केले. त्यांनी आपल्या वाड्मयातून, विचारातून समाजाला योग्य तोच बोध केला. त्यांच्या वाड्मयात त्यांनी कर्मवादाला म्हणजेच कृतीला अधिक महत्व दिले. म्हणून त्यांना सकारात्मक विचारवंत म्हणावेसे वाटते. समर्थांनी समाजकारण, राजकारण आणि धर्मकारण असे त्रिविध कार्य केले. त्यासाठी त्यांनी आधीच्या संतांच्या विचारांना नवीन विचारांची जोड देऊन भागवत संप्रदायाच्या कळसावर आपल्या स्वतंत्र कर्तुत्वाचा ध्वज फडकवला. समाजातील चार सत्ता दृढ करून अचेतन समाजात चेतना निर्माण करण्याचे युगप्रवर्तक कार्य केले. जीवनाचा सर्वांगीण विकास करणारे समर्थांचे विचार तीनशे वर्षापूर्वी जसे उपयोगी होते, तसेच आजही तितकेच मोलाचे ठरतात. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे’ तसेच ‘यत्न तो देव जाणावा’ या समर्थांच्या उक्ती आजही मार्गदर्शक ठरतात. प्रयत्नवादाला देव मानणारे समर्थ आणि आळस झटकून सतत कार्यरत राहा सांगणा-या समर्थांची आजचा समाजाला देखील तेव्हढीच गरज आहे.
      
      लौकिक अर्थाने समर्थ जरी आपल्यात नसले तरीही समर्थ आत्माराम आणि दासबोध या दोन ग्रंथांच्या रूपाने आपल्यातच आहेत, याची ग्वाही खुद्द समर्थच देतात,

माझी काय आणि वाणी | गेली म्हणाल अंत:कारणी |
परी मी आहे जगज्जीवनी | निरंतर ||
      
      समर्थ आपल्यातच राहून आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत त्यासाठी सावधपणे, उघड्या डोळ्यांनी त्याचा शोध घेतला पाहिजे, तरच त्याचा प्रत्यय येणार आहे.

धर्मस्थापनेचे नर | थे ईश्वराचे अवतार |
झाले आहेत पुढे होणार | देणे ईश्वराचे ||

|| जय जय रघुवीर समर्थ ||