हे धरा
पंधराश्लोकी, लाभली
शोभली बरी ।
दृढदेहो
निसंदेहो, संख्या
चंद्रकळागुणें ।। १६।।
या पंधरा श्लोकात समर्थांनी हनुमंताची स्तुती केली आहे. हे
हनुमंता या पंधराश्लोकी स्तुती सुमनांच्या हाराचा तू स्वीकार कर. हे पंधरा श्लोक
म्हणजे चंद्राच्या प्रतिपदा ते पौर्णिमा अशा पंधरा कला आहेत. या श्लोकाच्या नित्य
पठणाने साधकाचे शरीर सुदृढ बनते तर मन संदेह शून्य म्हणजेच नि:शंक बनते.
मानवी मन हे चंचल आहे. सतत विषयांच्या मागे धावणारे आहे.
भौतिक जगात प्रवेश केल्यानंतर त्याला आत्मस्वरूपाचे विस्मरण झाले आहे. त्यामुळे
सततची काळजी, चिंता याने त्याचे मन अस्थिर झालेले दिसते. मनाची अस्वस्थता,
विकारांचा अतिरेक या सर्वाचा परिणाम अर्थातच मानवी शरीरावर होतो. त्यामुळे त्याला
अनेक रोगांना, आजारांना सामोरे जावे लागते. प्रापंचिक अडचणी आणि त्यातील सुबत्तेसाठी
सतत मागण्या करत रहाणे अशी सामान्य जीवाची भक्ती असते. हनुमंताची उपासना साधकाला आत्मस्वरूपाचे
वरदान प्राप्त करून देते. अर्थात त्यासाठी भजन, साधना आणि निदिध्यास याची आवश्यकता
आहे. पण यामध्ये देखील सातत्य हवे. जर
नियमितपणे या स्तोत्राचे पठण केले तर साधकाला उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य
प्राप्त होते.....
हनुमंत हा आत्मारामाची भेट घडवून आणतो. परंतु ही वाट इतकी सहज सोप्पी नाही. त्यासाठी सातत्याने भजन, साधना आणि निदिध्यास आवश्यक आहे. यासाठी आपला देह सुदृढ असणे महत्वाचे आहे. समर्थ वज्रदेही हनुमंताचे वर्णन करून त्याच्या सारखे होण्याचा साधकांनी प्रयत्न करावा असे सांगितले आहे. तसेच मनाशी संबंधीत योगाचा भाग सांगून मनाची दृढता स्पष्ट करतात. शरीर आणि मन दोन्ही बळकट असेल, आपले ध्येय प्राप्त करून घेण्याचा निश्चय दृढ असेल तर या मार्गावरची वाटचाल सुकर होईल. यासार्वातून जे अंतिम सत्य आहे त्यामध्ये एकरूप होणे म्हणजे नि:संदेह अवस्था. मनापासून भक्ती केली तर मन नि:शंक होईल, संदेह विरहित ज्ञान प्राप्त होईल. अज्ञानाचा अध:कार नाहीसा होऊन ज्ञानाचा पूर्णप्रकाश साधकाला प्राप्त होईल. सातत्याने साधना केली तर या सोळा कलांचा विकास होत जाऊन साधक पूर्णत्वाला पोहोचतो. चंद्राच्या या कला पौर्णिमेपर्यंत वाढत जातात तसाच विकास साधकाचा होतो. परंतु मायेत गुरफटून जगणाऱ्या जीवाला मात्र अमावस्येच्या कला प्राप्त होतात.....
याठिकाणी संख्या चंद्रकला गुणे असा उल्लेख आलेला आहे. अनेक ठिकाणी या सोळा कलांचा उल्लेख आढळतो भागवतातील पहिल्या स्कंधातील तिसऱ्या अध्यायात असा उल्लेख आहे की, सृष्टीच्या प्रारंभी भगवंताना लोकनिर्मितीची इच्छा उत्पन्न झाली. तेव्हा त्यांनी महत्तत्त्व आदीपासून दहा इंद्रिये, पंचमहाभूते आणि एक मन अशा सोळा कलांनी युक्त पुरुषरूप ग्रहण केले. १६ कलांनी युक्त म्हणजेच परिपूर्ण असे म्हंटले आहे. ही तुर्यावस्था होय. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे भय नाही, कोणतेही रोग, वृद्धत्व यांचा अधिकार चालत नाही, कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही, काळाला देखील ज्याठिकाणी अधिकार गाजवता येत नाही असे स्थान आहे. पण या अवस्थेतील धोका हा की साधक कधीही पुन्हा मायेत ओढला जाऊ शकतो. कारण या अवस्थेमध्ये संपुर्ण विषय तदात्म गेले आहे पण स्वरूप तादात्म्य झालेले नाही अशी ही अवस्था तुर्यावस्था. आत्मवस्तू जाणून घेतली तरी ती आत्मसात करण्यासाठी याहीपुढे जावे लागते. समर्थ संतस्तवनामध्ये म्हणतात,
सोळा काळी पूर्ण शशी | दाखवू शकेना वस्तूसी | तीव्र आदित्य कळारासी |तोही दाखवीना ||१|५|६||
सोळाकलानी पूर्ण असा पौर्णिमेचा चंद्रप्रकाश देखील आत्मवस्तू दाखवू शकत नाही. इतकेच नव्हे तर सगळ्या कळा ज्याच्यापाशी आहेत असा तेजोमय सूर्य देखील ती वस्तू दाखवू शकत नाही.
सोळा कलांच्याही पलीकडे असलेली तसेच कोणत्याही वृत्तीने युक्त नसलेली अशी “अमृत” नावाची चंद्राची सतरावी कला आहे. अमृतकला ही स्थिर अवस्था आहे. म्हणजे उन्मनी अवस्था. ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर साधकाच्या वासनांच संपतात. भौतिक जगात कार्य करतात परंतु त्यामध्ये ते लिप्त होत नाहीत. तो परमात्मस्वरूप असल्याने गुणरहित असतो. त्रिगुणांना लक्षणे असतात. पण सतरावी कला प्राप्त झालेला गुणरहित असतो.......क्रमशः
!!श्रीराम समर्थ!!
ReplyDelete