Monday, June 15, 2015

महाबळी प्राणदाता सकळा उठावी बळे ....

महाबळी प्राणदाता सकळा उठावी बळे |
सौख्यकारी दुःखहारी ( शोकहर्ता ) धूर्त वैष्णव गायका || २ ||
हनुमंत अतिशय बलवान आहे, सर्वांचा प्राणदाता आहे, सर्वाना बळ देऊन कार्याला प्रवृत्त करणारा आहे, सर्वांना सुख देणारा दु:खाचे हरण करणारा आहे, हुशार, चाणाक्ष, कुशाग्र बुद्धीचा आहे, विष्णूभक्त आहे ज्याला गायनी कला अवगत आहे. 
महाबळी : हनुमंताच्या बळाचे वर्णन करणारा असा महाबळी हा शब्द आहे. जो बळ निर्माण करतो त्याला बळी असे म्हणण्याचा प्रघात आहे. अतिशय बलवान अशा मारुतीने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला आणि लक्ष्मण तसेच अनेक वानर वीरांचे प्राण वाचविले म्हणून तो प्राणदाता आहे. प्रत्येकासाठी प्राणदाता ठरलेला हा हनुमंताने युद्धामध्ये प्रत्येकाला प्रेरणा देऊन त्यांच्यात लढण्याचे बळ निर्माण केले.  म्हणून सकाळ उठवी बळे ही प्रार्थना केली आहे. हनुमंत निष्प्राण झालेल्या, बलहीन झालेल्या जीवांना बलपूर्वक उठवतो. म्हणून सकाळ उठावी बळे.
बलाढ्य असा हा मारुती जो आपल्या भक्तांचे सतत रक्षण करतो, भक्तांना कार्य करण्यास प्रवृत्त करतो, ज्याच्या प्रेरणेने सर्वांना स्फुरण चढते , त्याच्या स्फूर्तीने अनेकांना शारिरीक मानसिक बळ प्राप्त होते. ‘बजरंग बली की जय’ या गर्जनेने अनेकांच्या अंगी बळ संचारते. असा हा प्रेरणादायी हनुमंत.
सौख्यकारी दुःखहारी ( शोकहर्ता ): सौख्य म्हणजे सुख. हनुमंत सुखकारी आहेत. तसेच शोकहर्ता म्हणजेच दु:ख दूर करणारे पण आहेत. .आता खरे सुख म्हणजे नेमके काय हा प्रश्नच आहे. प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगळी आहे. मग हनुमंताच्या उपासनेने मी माझ्या मनात ज्या गोष्टीना सुख मानते ते सुख मला प्राप्त होते असे आहे का? खरे सुख म्हणजे नेमके काय तर जे प्राप्त झाल्यानंतरचे समाधान चिरकाल टिकते. वैषयिक सुखाची अभिलाषा ठेवून आपण जर उपासना केली तर चिरकाल टिकणाऱ्या सुखाची कधीच प्राप्ती होऊ शकत नाही. पण हनुमंत हे शोक दूर करणारे आहेत. विषय वासनेत आकंठ बुडलेल्या जीवाचे हनुमंताच्या उपासनेने सर्व शोक दूर होतात आणि त्याला खरे सुख प्राप्त होते. भौतिक जगात जगताना माझ्या आयुष्यात माझी सुखा विषयीची जी संकल्पना आहे तशा पद्धतीचे सुख मला बरेचदा मिळत असते. परंतु दुखाची लाट त्याही पेक्षा वेगाने माझा आयुष्यात येत असते. त्यामुळे सर्व मिळूनही मी कायम असमाधानी, अस्थिर आणि अस्वस्थच राहते. यासर्वांतून हनुमंत आमची मुक्तता करतात. म्हणून त्यांची उपासना समर्थ आपल्याला सांगतात. आईच्या गर्भात सोहंची जाणिव असणारा जीव भौतिक जगात आल्यावर मात्र सगळे विसरतो न भौतिक जगात रमून जातो त्याला आपल्या मूळ रूपाचे विस्मरण होते. हनुमंत आपल्याला स्व-रुपाची जाणिव करून देतो. स्व-रुपाची जाण म्हणजे सुख आणि त्याचे विस्मरण म्हणजे दु:ख....
स्व-रुपाची जाणिव करून देतो जीवाच्या जीवनात सुखप्राप्त करून देतो असा हा सौख्यकारी. स्वरूपाविषयीचे अज्ञान दूर करतो असा हा शोकहर्ता. ऐहिक सुखाबद्दल भगवंताकडे काही मागणे हा करंटेपणा आहे.  पण माझी उपासना ही भगवद प्राप्ती करता नसून केवळ ऐहिक मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी भगवंताशी केलेला एक व्यवहार असतो. माफ करा पण थोडं आत्मपरीक्षण केलत तर याची सत्यता पटेल. देवाला हात जोडताना आपण काय मागतो याचा विचार करा. मग ती गोष्ट प्राप्त झाल्यानंतर मी तुला काय देईन असे म्हणतो ते पण आठवा. आपल्या उपासनेला इतके व्यावहारिक स्वरूप देऊन सुध्दा कृपाळू भगवंत आमच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. पण आम्ही करंटे मागण्या संपवतच नाही आणि भगवंताच्या समीप जाण्याचा प्रयत्नच करत नाही.
विषयांतर झाले असे वाटेल पण आपण जे स्तोत्र अभ्यासतो आहोत त्या दैवताची त्या स्तोत्राची उपासना समर्थ आपल्याला याठिकाणी सांगत आहेत. ज्याची उपासना करावयाची आहे तो कसा आहे हे समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत. मनापासून त्याची उपासना केली तर त्याची प्रचिती निश्चित येईल असे समर्थाचे सांगणे आहे.
हनुमंत धूर्त आहेत असे समर्थ याठिकाणी वर्णन करतात. खर तर धूर्त हा शब्द आपण लबाड या अर्थाने वापरतो. मग याठिकाणी हनुमंताला समर्थ असे का म्हणत आहेत. संस्कृत व हिंदी मध्ये धूर्त शब्द कपटी ढोंगी, कावेबाज या अर्थाने वापरला आहे. तर मराठी भाषेमध्ये धूर्त हा शब्द कुशल, दक्ष, विचक्षण, चतुर या आशयाने योजला आहे. हे स्तोत्र मराठीत आहे. त्यामुळे समर्थ या ठिकाणी हनुमंताला धूर्त कशा अर्थाने संबोधतात हे लक्षात आले असेल. समर्थांनी आपल्या दासबोधामध्ये धुर्ताची लक्षणे सांगितली आहेत ती सर्व हनुमंतामध्ये आहेत.
भूत वेगळाली दिसती | पाहता एकचि भासती |बहुत धूर्तपणे प्रचिती | वोळखावी || ९\६\२५ ||
देखोन ऐकोन जाणती | शाहाणे अंतर परीक्षिती |धूर्त  ते  अवघेंच  समजती  |  गुप्तरूपें ||१५\७\२९||
जो  बहुतांचें  पाळण  करी | तो  बहुतांचें अंतर विवरी | धूर्तपणें ठाउकें करी | सकळ कांहीं ||१५\७\३०||
धूर्त म्हणजे चतुर या अर्थाने समर्थ म्हणत आहेत. सर्व गोष्टी चतुरपणे जाणून घेऊन सगळे समजून घेतो. सर्वत्र भगवंत आहे चराचरात तो व्यापून आहे. शुद्ध ज्ञान प्राप्त करून घेऊन त्याप्रमाणे या जगतात आपला व्यवहार ठेवतो असा हा धूर्त हनुमंत.
कोणत्या प्रसंगात कसे वागावे, सुग्रीवाचे बळ वाढावे म्हणून उत्तम लोकांचा संग्रह करून ठेवावा, शत्रूच्या गोटात गेल्यानंतर घाबरून न जाता अत्यंत चाणाक्षपणे आपली वर्तणूक ठेवून त्यांच्या मनात आपल्या विषयी भय निर्माण करून आपल्या गटाचे सामर्थ्य कसे वाढवावे अशा अनेक गोष्टीतून हनुमंताची धूर्तता आपल्याला पहावयास मिळते........
धूर्त हा शब्द अनेक ठिकाणी दुर्गुण दाखविण्यासाठी केला आहे. परंतु याठिकाणी ‘रामविजय’ मध्ये श्रीरामाने हनुमंताना चातुर्यसमुद्र, चतुरमुकुटरत्न असा उल्लेख केला आहे त्यानुसार हनुमंत चतुर या अर्थानेच धूर्त आहेत. 
वैष्णव: म्हणजे विष्णूभक्त . हनुमंत हा ११ वा रुद्र मानले जाते. परंतु हनुमंताला विष्णूचा अवतारही मानला जातो. कारण दशरथ राजाच्या राण्यांना मिळालेले पायस, त्यातील कैकयीचा प्रसाद घारीने पळविला व तो अंजनीला मिळाला. तो तिने भक्षण केल्यावर हनुमंताच जन्म झाला, अशी कथा देखील सांगितली जाते. म्हणून अंजनीच्या पोटी विष्णूचा अंशावतार हनुमानाचा जन्म झाला असे देखील मानले जाते. वैष्णव संप्रदायात हनुमानाचे ‘ दास्यभक्तीचा आदर्श ’ म्हणून पूजन केले जाते.
वैष्णव याचा अजून एक अर्थ वाचनात आला. वैष्णव म्हणजे ज्याच्यापाशी गेल्यावर आपल्याला स्वत:चे जीवन , स्वत:चे वर्तन खुजे वाटू लागते, पण तरीही आपल्या जीवनातून क्षुद्रता निघून जाते, वृत्तीची मलीनता धुतली जाते, ते खरे वैष्णव.ज्यांच्या संगतीत आल्यावर ते आपल्याला चांगला करतात, शुद्ध करतात, त्यांना वैष्णव म्हणायचे. ( संदर्भ : तत्वज्ञान वर्ष ३५ मराठी पुष्प ११ श्रीमद भगवद्गीता अ.३.श्लो. २१ पांडुरंगशास्त्री आठवले  ) .....  
गायक :युद्धशास्त्रात ज्याप्रमाणे हनुमंत पारंगत आहेत त्याचप्रमाणे अत्यंत उत्तम प्रतिभाशक्ती त्याला लाभली आहे. हनुमंताला उत्तम गायनीकला अवगत आहे. समर्थांनी हनुमंताला “संगीतज्ञान महंत” म्हणून गौरवले आहे. संगीततज्ञ हनुमंताने हनुमत्मत ( हनुमत् मत हा शब्द एकत्र करून वाचवा मला योग्य शब्द टाइप करता येत नाहीये _/\_ ) ही स्वतंत्र गायनाची पद्धत निर्माण केली. सर्वगुण संपन्न हनुमंताला बुधकौशिक ऋषींनी देखील ज्ञानवंत म्हणून संबोधले आहे. संगीतकले बरोबर त्याचे ग्रंथ कर्तुत्व देखील वाखाणण्याजोगे आहे.
हनुमंताने संगीतशास्त्राविषयी ज्या ग्रंथांची निर्मिती केली ते ग्रंथ आजही या क्षेत्रात प्रमाण मानले जातात. यामध्ये ‘अंजनेयभारत्’ ‘अंजनानंदनसंहिता’ ‘हनुमत् संहिता’ ‘संगीतपारीजात’ या ग्रंथाचा समावेश होतो. ‘संगीतपारीजात’ या हनुमत् मताच्या ग्रंथावर टीका करणारे कालीन्धानुमानाला उद्देशून म्हणतात, ‘ हा हनुमान आपल्या संगीताने वरदायक सीतापती राघवाला वश करून घेतो. हा स्वत: वेगवेगळे ताल आणि त्याचे उच्चार यात निपुण आहे. तो स्वत: कुशल व प्रशंसनीय गायन करून रसिकांना आनंदित करतो. असा हा कपिलश्रेष्ठ हनुमान माझ्यावर कृपा करो’.  ( संदर्भ : श्रीराम कोश खंड २ ) हनुमंत नृत्य गायन कलांमध्ये निपुण आहे. प्रभू रामचंद्रांना रामविण्यासाठी तो स्वत: गायन करतो. त्याच्या भावपूर्ण संगीताने प्रभू रामचंद्रा बरोबर सर्वच मंत्रमुग्ध होतात. हनुमंताची उत्कट रामभक्ती हा भक्तगणांनां आदर्शच ठरलेला आहे.  
.......क्रमशः

No comments:

Post a Comment