Monday, June 15, 2015

आरक्त देखिलें डोळां, ग्रासिले सूर्यमंडळा ...

आरक्त देखिलें डोळां, ग्रासिले सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढे, भेदिलें शून्यमंडळा ।।१३।।
हनुमंतांनी अत्यंत आरक्त असे सूर्यमंडळ पहिले आणि त्याने ते गिळून टाकले. ग्रासिलेचा उल्लेख काही पाठामध्ये ‘गिळिले’ असा पण केला आहे. त्याचा ग्रास केल्यानंतर हनुमंत इतके वाढले कि त्यांनी शून्यमंडलाचा भेद केला. हनुमंताचा जन्म झाल्यानंतर त्यांनी पूर्वेला उगवणारा सूर्य पाहून त्याला ते पिकलेले फळ वाटले आणि ते खाण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण जाहली. आणि बालसुलभ चेष्टा म्हणून पाचशे योजने अंतरावर असलेल्या सूर्याला त्याने ग्रासून टाकले असा उल्लेख अध्यात्म रामायणात आहे. तर वाल्मिकींच्या मते हे अंतर तीनशे योजने आहे.
इतका साधा अन सरळ अर्थ या श्लोकाचा नाही. हनुमंतांनी आरक्त बघितले म्हणजे नेमके काय? सूर्यमंडळाला ग्रासले म्हणजे नेमके काय केले? शून्यमंडळाला भेदले म्हणजे समर्थ नेमके काय सांगतायत? या श्लोकाचा अन्वयार्थ लावताना थोडे कठीण जाते आहे हे नक्की. याठिकाणी उगवत्या सूर्याला पिकले फळ समजल्याचा उल्लेख नाही. तर याठिकाणी समर्थ म्हणतात कि हनुमंताने डोळ्यांनी आरक्त पहिले. रक्त म्हणजे सर्वसामान्यपणे लाल. आणि आरक्त म्हणजे जास्त प्रमाणात लाल. याठिकाणी आरक्त म्हणजे पूर्णपणे रंगलेला, अनुरक्त झालेला असा आहे. हनुमंताचे मन प्रभूंच्या चिंतनात सदैव रंगलेले असते त्यांचे मन सदैव भगवद स्वरूपात, आत्मस्वरूपात अनुरक्त असते. सर्वत्र त्यांना प्रभू रामचंद्राचेच दर्शन घडते. याच चिंतनात त्यांनी जे आरक्त बघितले त्यामध्ये देखील त्यांना प्रभुंचेच दर्शन घडले आहे. सूर्यमंडळ म्हणजे त्याठिकाणी त्यांना प्रभूरामचंद्रांचेच दर्शन घडले आहे......
हनुमंत सदैव श्रीरामांच्या अनुसंधानात रंगलेले आहेत. उगवत्या सुर्यनारायणामध्ये देखील त्यांना प्रभू श्रीरामांचे दर्शन घडले आहे. हनुमंत हे दास्यभक्तीचे उत्तम उदाहरण मानले जाते. समर्थ आपल्याला जो भक्तीमार्ग आचरण्यास सांगतात त्याठिकाणी मनावर विजय मिळवायला सांगतात, वासना इच्छावर संयम ठेवण्यास सांगतात. हनुमंत हे मन, इच्छा, वासनांच्या पलीकडे गेलेला अतींद्रिय शून्याकार असे आहेत. त्यांचे मन केवळ आपल्या स्वरूपाशी एकरूप झालेले आहे. सूर्य नारायणाच्या रूपातील आपल्या आराध्याला त्यांनी ग्रासले म्हणजे गिळून टाकले. म्हणजेच त्यांना पूर्णपणे आत्मसात केले.
सूर्यमंडळ आणि शून्यमंडळ खरच खूप चिंतनाचा विषय आहे. या अनंत आकाशाला सूर्यनारायणाने व्यापलेले आहे. वाढत वाढत जाऊन हनुमंतानी आकाशाच्या शुन्यतेला भेदले आहे. शून्यमंडळ भेदणे याचे निरुपण दासबोधात आढळते. ब्रह्माचे वर्णन करताना समर्थ सातव्या दशकातील दुसऱ्या समासात म्हणतात,
सुन्य आणि सनातन | सर्वेश्वर आणि सर्वज्ञ | सर्वात्मा जगजीवन | ऐसी नामे || ४८ ||
ब्रह्म शून्य आहे, सनातन आहे, सर्वेश्वर आहे, सर्वज्ञ आहे, सर्वात्मा आहे, जगाचे जीवन आहे. हनुमंतांनी हे ब्रह्म जाणले आहे. केवळ जाणलेच नाही तर ते पूर्ण आत्मसात केले आहे.
भगवंत दृश्य गोष्टींच्या पलीकडे आहे. दृश्य म्हणजे माया जी आहे पण आणि नाही पण. समर्थ म्हणतात,
सुन्यत्वातीत शुद्धज्ञान | तेणे झाले समाधान | ऐक्यरूपे अभिन्न | सहजस्थिती|| ६|१०|३९||
आहे व नाही यांत गोवलेले सारे दृश्य विश्व लय पावले कि शून्य उरते, त्या शुन्यापलीकडे शुद्ध आत्मज्ञान असते. त्या ज्ञानाने समाधान होते. आपण व आत्मा एकरूप आहोत या अभिन्नपणाच्या अनुभवाने सहजस्थिती प्राप्त होते. या अवस्थेमध्ये देहाचे सर्व व्यवहार होतात. तरी स्वरूपाशी झालेले ऐक्य जसेच्या तसेच राहते. म्हणून ही सहजस्थिती ......
दासबोधामधील दशक आठ, समास दहा हा शून्यत्वनिरसन याविषयीचा आहे. हा समास जाणून घेतला तर ‘भेदिले शून्यमंडळा’ असे समर्थ म्हणतात त्याचा उलगडा होतो. समर्थ याठिकाणी सांगतात जेवढे दृश्य आहे ते सगळे बाजूला सारल्यावर केवळ अदृश्य शिल्लक रहाते. हे अदृश्य म्हणजे ब्रह्म असा काहींचा समज होतो. सगळे बाजूला सारले कि केवळ शून्य उरते. पण हे शून्य म्हणजे ब्रह्म नव्हे. यासाठी समर्थ सुंदर दृष्टांत देतात. समजा एक माणूस राजाला भेटावयास गेला आणि त्याला राजाचा नोकर भेटला. तोच राजा असा त्याने समाज करून घेतला. पण नंतर खरा राजा भेटल्यानंतर त्याला आपली समजूत चुकीची आहे हे जाणवले. तसेच समर्थ पुढे म्हणतात,
‘तैसे सुन्यत्व कल्पिले ब्रह्म | पुढे देखतां परब्रह्म | सुन्यत्वाचा अवघा भ्रम | तुटोन गेला || ८/१०/६८||    
त्याचप्रमाणे दृश्य ओलांडल्यानंतर आढळलेले शून्य ब्रह्म मानले खरे. परंतु नंतर खरे परब्रह्म दर्शन झाले तेव्हा शून्यपणाचा सगळा भ्रम आपोआपच नाहीसा झाला. समर्थ म्हणतात कि आपण वस्तुरूप होऊन जाणे ही परमात्मवस्तू पाहण्याची रीत आहे. वेगळेपणाने पाहिले तर केवळ शुन्याचेच दर्शन घडते.
याकारणे सुन्य काही | परब्रह्म होणार नाही | वस्तुरूप होऊन पाही | स्वानुभवे ||

यासाऱ्या विवेचनावरून हे लक्षात येत कि काही केल्या शून्य परब्रह्म होऊ शकणार नाही. परब्रह्माचे दर्शन हवे असल्यास ब्रह्माशी तदाकार होऊनच ते घ्यावे लागते. ब्रह्मरूप होऊनच ब्रह्माचा अनुभव येतो. हनुमंत ब्रह्म स्वरूपात असेच एकरूप होऊन गेले आहेत. हनुमंताने इतके विशाल रूप धारण केले कि या शून्याचा देखील त्यांनी भेद केला.... 

हनुमंत कुंडलिनी शक्तीचे प्रतीक मानले जाते. हनुमंताच्या सहस्त्रनामातही त्याला ‘योगिने नम: | कुंडलिने नम:‘ ( बृहज्ज्योतिषार्णव धर्मस्कंध प्रकरण २७.४४९,८२७ ) म्हंटले जाते.  समर्थांची सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी या आरतीतील प्रत्येक शब्द यौगिक अर्थाने परिपूर्ण आहे. सत्राणे शब्दाचा आध्यात्मिक अर्थ सतरावी कला असलेले देहातील ब्रह्मरंध्र होय. तेथे कुंडलिनीने उड्डाण केले. मूलाधार चक्रात साडेतीन वेढे घालून बसलेली आदिशक्ती जगदंबा असून सद्गुरुकृपेने अधिकारी शिष्याची कुंडलिनी जागृत होऊ शकते. नागिणी प्रमाणे असलेली ही ज्ञानशक्ती जागृत होताच सुषुम्नेतून ब्रह्मरंध्राकडे झेप घेते. (ज्ञानेश्वरी अ. ६) योगशास्त्रानुसार ब्रह्मरंध्राजवळ आत्मसुर्याचे स्थान असून कुंडलिनी त्याचा ग्रास करू पहाते. त्या शक्तीच्या मुखातून प्रणवाचा अखंड ध्वनी चालू आहे, तोच हुंकार वदनीने प्रकट केला आहे. ती जागृत होऊन उड्डाण करताच देहभाव डळमळू लागतो. म्हणूनच समर्थांनी करि डळमळ म्हंटले आहे. कुंडलिनीच्या जागृती नंतर तिच्या तेजामुळे वासना शुष्क होतात.  देहभाव नाहीसा झाल्यमुळे वासनेचा क्षारसमुद्र राहत नाही. प्रणवध्वनीने स्थूल,सूक्ष्म, आणि कारण अशा त्रिविध देहांची त्रिभुवने घाबरून गेली ( कडाडीले ब्रह्माड ) देहातील पातळ म्हणजे कमरेखालचा भाग. यातही हा ध्वनी उमटला ( दुमदुमले पातळ ) पृथ्वीरुप शरीराचा तोल सांभाळणारी कुंडलिनीशक्ती जागृत होऊन उड्डाण करू लागताच देहभाव निमाला, वासनांचा उच्छेद झाला हे रामदासांना जाणवले आणि तोच बोध त्यांनी या आरतीद्वारे केला आणि या स्तोत्रात हनुमंताच्या या सामर्थ्याचा उल्लेख केला आहे.....

**( संदर्भ : श्रीरामकोश खंड २ ) साधकांनी या ग्रंथाचे नक्की वाचन करावे अतिशय माहितीपूर्ण असा हा कोश आहे श्री अमरेंद्र गाडगीळ यांनी संपादित केलेला आहे......


शून्यावस्था म्हणजे अशी अवस्था कि याठिकाणी साधकाचा पूर्ण विषयत्याग झालेला असतो पण आत्मतादात्म्य पूर्ण साधलेले नसते. साधकांसाठी अत्यंत धोकादायक अशी ही अवस्था असते. कारण या अवस्थेत साधकाला आपल्याला सर्व काही प्राप्त झाले असे वाटायला लागते. ही माया आहे याचे त्याला विस्मरण होते. त्यामुळे तो या पातळीवरून देखील पुन्हा खाली येऊ शकतो. ही अवस्था पार करून जाणे महत्वाचे असते. समर्थांनी यासाठी ‘भेदणे’ हा अत्यंत समर्पक शब्द योजला आहे.
शून्य अवस्थेला आल्यानंतर जो आनंद भोगतो आहोत तोच खरा असे साधकाला वाटते. पण अशी अवस्था मला प्राप्त झाली असे त्याला जे वाटते त्यात देखील सूक्ष्म अहंकार आहे. समर्थांनी आपल्या आत्माराम ग्रंथात याचे विवरण केले आहे. आत्माराम मधील साधननिरुपण समासात शिष्याला समर्थ बोध करत आहेत पण तरीही त्याच्यातील सूक्ष्म अहंकार गेलेला नाही. जे नाशिवंत आहे ते देखील तुम्हाला दिले असे शिष्य म्हणतो तेव्हा समर्थ त्याला ‘फट रे पढतमूर्खा’ असे म्हणून फटकारतात. समर्थ म्हणतात, तुझातला हा सूक्ष्म अहंकार देखील मला देऊन टाक. याला भेदणे म्हणतात.  

यासाठी समर्थ आम्हाला वायूची उपासना सांगतात. म्हणजेच श्वासावर नियंत्रण ठेवण्याची उपासना शिकवतात. हनुमंत हा भगवंताच्या समीप नेण्यासाठी एक माध्यम आहे. जर प्रभूरामचंद्रांना प्राप्त करून घ्यायचे असेल तर आधी हनुमंताची उपासना करा असे सांगतले जाते. ती ही उपासना आहे. यापूर्वी आपण कुंडलिनी जागृती हा विषय बघितला. यामध्ये या वायूचा प्रवास बघता ही उपासना समर्थ का सांगतात आणि हनुमंत भगवंताच्या जवळ घेऊन जाणारा एक मध्यस्त कसा आहे याचा उलगडा होतो.......क्रमशः

No comments:

Post a Comment