“ समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी ”
डॉ. माधवी संजय महाजन
madhavimahajan17@gmail.com
प्रस्थानत्रयी :
समर्थ संप्रदायाची
प्रस्थानत्रयी पाहण्यापूर्वी मुळात प्रस्थानत्रयी म्हणजे काय हे पाहणे गरजेचे आहे.
प्रस्थान म्हणजे मार्गाला निघणे. भारतीय तत्वज्ञानात ‘ब्रह्म हेच अंतिम सत्य’
सांगितले आहे. मानवी जीवनाचे मुख्य उद्दिष्ट परमेश्वर प्राप्ती हेच आहे. हे
उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपनिषदे, भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे हे वेदान्ताचे तीन
प्रमुख ग्रंथ आपल्या उपयोगी पडतात. या तीन ग्रंथाना प्रस्थानत्रयी असे म्हणतात. संपूर्ण
जगतामध्ये परमेश्वर भरून राहिला आहे परंतु मायेमुळे आपल्याला त्याची जाणीव होत
नाही. त्यामुळे नाशवंत असा हो प्रपंच तोच आपल्याला सत्य वाटू लागतो. या अज्ञानातून
जीव मुक्त व्हावा त्याला परमात्म्याचे समग्र ज्ञान व्हावे याचे नेमके मार्गदर्शन
या ग्रंथामधून मिळते.
वेदान्त दर्शनाच्या
प्रस्थानत्रयीपैकी एक उपनिषद हे होय. उपनिषदामधील तत्वचिंतन मुक्त स्वरूपाचे आहे.
तर ब्रह्मसूत्रांमध्ये वेदांताची सुसूत्र, न्यायसंमत मांडणी केली गेली आहे. उपनिषदांमधील
तत्वचिंतन सामान्यजनांना समजेल अशा भाषेत मांडणी केलेली तसेच या तत्वज्ञानाचा
आपल्या जीवनाशी असणारा संबध स्पष्ट करणारी भगवद्गीता हे वेदान्ताचे तिसरे प्रस्थान
मानले जाते. उपनिषदे ही श्रुती प्रस्थान, भगवद्गीता स्मृती प्रस्थान तर
ब्रह्मसूत्रे ही न्याय प्रस्थान आहेत.
या ग्रंथावरील भाष्य,
भाष्यटिका इत्यादि ग्रंथातून वेदांत दर्शनाची सविस्तर चर्चा केली गेली आहे. जीवनाचे
निश्चित ध्येय गाठण्यासाठी कोणत्या मार्गाने कसे जावे याचे अचूक मार्गदर्शन केले
आहे. परंतु यामधील तात्विक चिंतन व क्लिष्ट मांडणी यांमुळे हे ग्रंथ समजायला कठीण
जाऊ लागले. सुत्र्रुपात मांडलेला हा विषय अत्यंत गहन असल्यामुळे सामान्य माणूस
वेदान्तापासून दूरच राहिला.
खरे तर वेदांतामध्ये मानवी जीवनाचे तत्वज्ञान सांगितले गेले
आहे . आनंदी जीवन कसे जगावे याचा मूलमंत्र वेदांताने
दिला आहे. अव्दैताला महत्व देऊन विश्वावर आपलेपणाने प्रेम करा अशी व्यापक
विचारांची शिकवण यामधून दिली गेली. भौतिक जगात जगताना शाश्वत सुखाच्या उगमापर्यत
पोहोचवणारी विचारधारा या संस्कृतीने दिली. ॠषीमुनींनी शाश्वत सुखाची प्रचिती घेतली
आणि हा आनंद सर्वांपर्यत पोहोचवण्यासाठी कार्यरत राहीले. ते केवळ अव्दैतात रमले
नाहीत तर सर्व जगाशी एकरुप झाले. यामध्ये सांगितलेल्या तत्वाप्रमाणे आचरण
केल्याने मनुष्याचे कल्याण साधले जाते. हे नेमके ज्याला कळते तो प्रपंचात आणि
व्यवहारात यशस्वी होतो. त्यालाच खरी शांती व समाधान प्राप्त होते. हे जीवन रहस्य
शिकविणारी ही प्रस्थानत्रयी आहे.
समर्थांची प्रस्थानत्रयी :
शाश्वत सुखाचा मार्ग मनुष्याला वेदांनी दाखविला. भगवद्गीतेत
श्रीकृष्णाने तो उलगडून दाखविला आणि भारताला लाभलेल्या संत परंपरेने तो मार्ग सामान्य
माणसाला सोपा करुन दाखविला. समर्थ रामदासस्वामींनी देखील आपल्या ग्रंथामधून
वेदांताच्या याच विचारांचा पाठपुरावा केला. सहज, सोप्या भाषेत त्यांनी हे
तत्वज्ञान आपल्या समोर मांडले. समर्थांची वाड्मय संपदा विपुल आहे. यापैकी
समर्थांचा श्रीमद दासबोध, मनाचे श्लोक आणि आत्माराम हे तीन ग्रंथ समर्थ
संप्रदायाची प्रस्थानत्रयी मानली जाते. श्रीमद दासबोध हा श्रुती प्रस्थान, मनाचे
श्लोक स्मृती प्रस्थान तर आत्माराम न्यायप्रस्थान आहे.
श्रीमद दासबोध :
श्रीमद दासबोध, २० दशक आणि २०० समास असे स्वरुप असणा-या या
ग्रंथात ७७५१ ओव्या आहेत. प्रत्येक दशकातील १० समासांमध्ये एक सूत्र पकडून
समर्थांनी तो विषय विस्ताराने मांडला आहे. स्तवनाने प्रारंभ करुन समर्थ आत्मज्ञानाच्या
खोल गाभ्यापर्यंत आपल्याला घेऊन जातात. प्रपंचापासून ब्रह्मऎक्य साधण्यापर्यंतचे
सर्व विषय समर्थ याग्रंथात हाताळतात. अध्यात्मशास्त्राच्या या ग्रंथामध्ये मानवी
जीवाचा उध्दार हा प्रधान हेतू दिसून येतो.
समर्थांचा श्रीमद दासबोध या ग्रंथामध्ये व्यवहाराच्या
पहिल्या पायरीपासून परमार्थाच्या शेवटच्या स्थितीपर्यंत सर्व काही समाविष्ट झाले
आहे. मानवी जीवनातील अज्ञान दूर होऊन त्याच्या जीवनात त्याला पूर्णत्व कसे प्राप्त
करुन घेता येईल याचा पाठपुरावा या ग्रंथात केला गेला आहे. जगण्यावर भरभरुन प्रेम
करायला शिकविणारा हा ग्रंथ सृष्टीचा मनापासून आस्वाद घ्या पण आसक्त होऊ नका हा
संदेश देतो. कारण ही आसक्ती दु:खाचे मूळ कारण आहे. विवेकाच्या आधारे मन ताब्यात
ठेवून जीवनमार्ग आक्रमण केला तर निश्चितच सुखी, आनंदी जीवन जगता येऊ शकते.
सर्वसामान्य मनुष्य विषयलोलुप असतो. या भौतिक
जगात जगताना सर्व सुखसोयी मिळाव्यात यासाठी झगडत असतो. या सुखांच्या मागे धावता
धावता सुखाचा शोध कधीच संपून जातो. केवळ धावणे आणि सुखसुविधा उपलब्ध करुन घेणॆ या
गोंधळात सतत कष्ट करत राहुनही तो असंतुष्टच राहतो. सर्व सुखे त्याच्या दारात आली
तरी वाढत्या गरजांमुळे फ़क्त असमाधानीच जीवन जगतो. सुखांच्या शोधात धावता धावता
मन:शांती गमावून बसतो.
समर्थांनी १२ व्या दशकात सुखी, समाधानी
जीवनाचे, मन:शांती
प्राप्त करुन घेण्याचे अत्यंत सोपे सूत्र समजावून सांगितले आहे. समर्थांचा प्रपंच
करण्याला विरोध नाही. उलट ते म्हणतात,
प्रपंच करावा नेमक ।
पहावा परमार्थ विवेक ।
जेणे करिता उभय लोक ।
संतुष्ट होती ॥
प्रपंचातील योग्य कर्म करुन परमार्थ साधण्याची
कला समर्थ शिकवितात. हा प्रपंच नेटका करताना नकारात्मक विचारांना मनात स्थान न
देता सकारत्मक विचारांवर भर देण्यास समर्थ सांगतात.
नेटका प्रपंच करत असताना परमार्थपण करणे गरजेचे
आहे या समजुतीने सकाळी पूजापाठ किंवा नामस्मरण करतो. दासबोधाचा समास वाचतो पण
त्याच बरोबर दुस-याची निंदा करणे, दुस-याचे दोष काढणे, राग, तिरस्कार
अशा नकारात्मक कृतीपण आपल्याकडून तितक्याच सहजपणे घडत असतात. त्यामुळे आपण धड ना
नेटका प्रपंच करत ना धड परमार्थ. या नकारात्मक विचारांचे उच्चाटण करुन सकारात्मक
विचारांच्या सहाय्याने ’नेटके’ आणि ’नेमके’ आनंदी जीवन कसे जगता येईल हे उलगडून दाखविणारा
श्रीमद दासबोध हा ग्रंथ आपल्याला आपल्या निश्चित ध्येयाप्रत घेऊन जातो.
सकारात्मक
नकारात्मक विचाराविषयी जसे समर्थ या ग्रंथात मार्गदर्शन करतात तसेच जीवाने खरे
ज्ञान प्राप्त करून घ्यावे यासाठी समर्थ सर्वांना सावध करतात. परमात्म्याचे खरे स्वरूप जाणून घ्यायचे असेल तर
या मायेचा पगडा दूर होणे गरजेचे आहे. या मायेचे वर्णन करताना समर्थांनी मायेला
चंचळनदीची उपमा दिली आहे (द. ११ स. ७ ). या रूपकाच्या आधारे मायेचे स्वरूप
त्यांनी उलगडून दाखवले आहे. माया म्हणजे काय ? तर जीवाला परमात्म्याचा विसर पडतो
ती माया. मातेच्या गर्भात
असताना जीवाला स्वस्वरूपाची जाणीव असते . पण गर्भामध्ये “ सोहं सोहं ” करणारा जीव
जन्माला आल्यानंतर मात्र त्याला देहबुद्धी प्राप्त होते आणि “ कोहं कोहं ” असा
आक्रोश हा जीव करायला लागतो. मायेच्या प्रभावामुळे परमात्म्यापासून हा जीव दूर
जातो. मी म्हणजे देहच याच भ्रमात तो जीवन जगतो आणि अहं मध्ये बद्ध होतो.
स्वताचा अहं कुरवाळण्यात आनंद मानणा-या जीवाला या भवसागरातून पार
होण्यासाठी मार्ग दाखवतात. मायेत गुरफटलेल्या स्वस्वरूप विसरलेल्या बद्ध जीवाला
त्याचे ध्येय गाठण्यासाठी समर्थ मार्गदर्शन करतात. या मायानदीतून पार व्हायचे असेल
तर त्याचा उगम ज्याठिकाणी आहे त्याठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करण्याविषयी समर्थ सांगतात.
सूक्ष्माकडून स्थूलाकडे जाणे हा मायेचा स्वभाव आहे . त्याच्या प्रभावापासून
वाचण्यासाठी नदीच्या प्रवाहा बरोबर वाहत न जाता त्याच्या विरुद्ध दिशेने पोहत जाऊन
ब्रह्मामध्ये विलीन होणे हे जीवाचे ध्येय आहे. जे जीव उगमस्थाना पर्यंत जाऊन
पोहोचले त्यांची स्थिती कशी होते तर,
‘उगमा पैलिकडे गेले |
तेथे परतोन पहिले |
तंव ते पाणीच आटले |
काही नाही || द.११.स.७.ओ.२१ ||
या ग्रंथात मोहरूपी मायेपासून अत्यंत सावधपणे
जीवाने स्वत:ला बाजूला नेऊन परमेश्वराचे स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करावा याविषयी
या ग्रंथात मार्गदर्शन आहे. हेच तत्व आपल्या मनाच्या श्लोकांमध्ये देखील ते
आपल्याला समजावून सांगतात.
मनाचे श्लोक :
समर्थांचे
मनाचे श्लोक ज्यांना विनोबाजींनी ‘ मनोपनिषद ’ म्हणून गौरविले आहे. उपनिषदाचे सार
सूत्ररूपाने समर्थांनी यामध्ये मांडले आहे. मानवी मन हे अत्यंत चंचल आहे पण या
मनाचा, प्रवृत्तीचा
समर्थांनी सखोल अभ्यास केला असल्याचे त्यांच्या विचार सूत्रांमधून आपल्या प्रत्ययास
येते. दासबोध ग्रंथामध्ये बद्धा पासून सिद्धा पर्यंत सर्वांसाठी मार्गदर्शन आहे.
पण मनाचा श्लोकामध्ये मुमुक्षू पासूनच सुरवात केली आहे. सत पासून जन्माला आलेले मन
मूळात सज्जनच आहे. पण कल्पनेमध्ये रमणारे चंचल मन आपल्यामूळ प्रवृत्ती पासून दूर
जाऊन इतर गोष्टींमध्येच रमते. आणि अशाश्वत जगात रमलेले मनच जीवाला शाश्वत
सुखापासून दूर नेते. हे जाणूनच समर्थांनी या ठिकाणी मनालाच उत्तम विचार करायला
प्रवृत्त केले आहे. उत्तम विचार, उत्तम संगत, उत्तम चिंतन मननाची सवय लावून
परमेश्वर प्राप्ती कशी करून घ्यावी हे सांगणारा हा छोटेखानी ग्रंथ आहे. या
श्लोकामधून वेदांताचे सार सूत्ररूपाने समर्थ आपल्या पर्यंत पोहोचवतात.
एकुण
२०५ श्लोकांमधून कर्मपर, उपासनापर, ज्ञानपर सूत्र यामध्ये आली आहेत. ‘आधी ते
करावे कर्म | कर्ममार्गे उपासना | उपासका सापडे ज्ञान | ज्ञाने मोक्षची पावणे || हे
समर्थ शिकवणीचे वर्म आहे. मनाच्या श्लोकांमध्ये कर्मभक्तिज्ञान हा त्रेवेणी संगम
पाहायला मिळतो. या श्लोकांचा प्रारंभ नमनाने झाला आहे. स्तवनाच्या श्लोकात
समर्थांनी या श्लोकां पाठीमागील भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे ‘गमू पंथ आनंत
या राघवाचा’. राघवाच्या या मार्गावर घेऊन जाताना समर्थांनी टप्प्या टप्प्याने
मनाचे उदात्तीकरण कसे करावे याचे मार्गदर्शन केले आहे. आनंत राघवाचा हा मार्ग
आचरणे सोपे नाही तरीही कठोर परिश्रमाने तो सहज प्राप्त होऊ शकतो. शुद्धज्ञान
प्राप्त करून घेण्यासाठी मानवी मनावर जो अज्ञानाचा पडदा आहत तो दूर होईपर्यंत हे
शक्य नाही. खरे तर जीव आणि ईश्वर यामध्ये द्वैत नाही पण मायेमुळे जीवला ईश्वराचे
विस्मरण झाले आहे. ‘मी म्हणजे देह’ आणि माझ्यापेक्षा ईश्वर काही वेगळा हा भ्रम
जीवाला झाला. परंतु जीवशिव हे एकरूपच आहेत हे एकरूपत्व जाणून घेण्यासाठी जीवाने भक्तिमार्गाचा
अवलंब करावा याचे मार्गदर्शन समर्थ यामधून करतात.
समर्थ
याठिकाणी मुख्य देव जाणून घ्यायला सांगत आहेत. आत्मा किंवा ब्रह्म हा मुख्य देव
आहे आणि हा जाणून घ्यायचा असेल तर प्रथम अहंचा त्याग करणे गरजेचे आहे. देहबुद्धी
मध्ये अडकलेला जीव कनिष्ठ देवांमध्ये अडकतो अन मुख्य देवापासून दूर राहतो. समर्थ
म्हणतात,
देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना | तया ज्ञान
कल्पांतकाळी कळेना |
परब्रह्म हे मीपणे आकळेना | मनी शून्य अज्ञान
हे मावळेना || १९१ ||
देहेबुद्धि आणि अहंकार हे ज्ञानमार्गातील प्रमुख अडथळे
आहेत. मनाच्या श्लोकांमधून समर्थ वारंवार सांगतात की ,
सदा सर्वदा राम सन्निध आहे | मना सज्जना सत्य
शोधून पाहे |
अखंडीत भेटी रघुराज योगु | मना सांडी रे
मीपणाचा वियोगु || १८६ ||
भगवद्गीते मध्ये सर्वत्र भगवंत व्यापून आहे हे भगवान स्वत:
सांगतात तेच सत्य याठिकाणी समर्थ सांगत आहेत. या भगवंताला जाणण्यासाठी
देहेबुद्धिचा त्याग कर असे घडले नाही तर आत्मस्वरुपाची जाणीव तुला कधीच होणार
नाही.
भ्रमे नाडळे वीत ते गुप्त जाले | जिवा
जन्मदारिद्र ठाकूनि आले |
देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना | जुने ठेवणे
मीपणे आकळेना ||१३८||
यासाठीच समर्थ मनाच्या श्लोकात वारंवार सांगतात की विवेके
देहेबुद्धि सोडोनी द्यावी, देहेबुद्धिचा आठवू नाठवावा, देहेबुद्धि ते आत्मबुद्धी
करावी, देहेबुद्धि हे ज्ञानबोधे तजावी, अशा अनेक श्लोकांमधून देहेबुद्धि सोडायला
सांगून परमात्माप्राप्ती करून घेण्याविषयी मार्गदर्शन करतात.
मनाच्या
श्लोकांचे प्रयोजन समर्थांनी स्पष्ट केले ते फलश्रुतीत म्हणतात, मनाची शते ऐकता
दोष जाती | मतीमंद ते साधना योग्य होती ||
हे या श्लोकांचे प्रयोजन आहे. या श्लोकांच्या श्रवणाने मतीमंद देखील
साधनेस पात्र होतील हा समर्थांचा विश्वास आहे. आणि हे मतीमंद कोण ? तर समर्थ
म्हणतात की मतीमंद ते खेद मनी वियोगे| अशा या मतीमंद जीवांसाठी समर्थांनी
या श्लोकातून मार्गदर्शन केले आहे. चंचल मनालाच सतत राघवाचा चिंतनात रमायला सांगून
स्व:ताचे हित करून घेण्याविषयी विनंती केली आहे. सर्व सुखाचा सागर असणा-या भगवंताला
आपले सर्वस्व मानलेस तरच हे मना तुला खरा शाश्वत आनंद प्राप्त होणार आहे हे समर्थ
वारंवार मनावर बिंबवत आहेत. मन हे सिद्धीचे कारण आहे . मनाच्या प्रसन्नतेवर अनेक
गोष्टी अवलंबून आहेत हे जाणून तसेच मनाचे सामर्थ्य ओळखूनच समर्थ मनाला विवेकाने
आवर घालून त्याला रामरूपी कसे भरावे याचे मार्गदर्शन करतात.
आत्माराम :
समर्थांचा
आत्माराम एकुण १८३ ओव्यांचा आणि केवळ ५ समासांमध्ये बांधलेला हा ग्रंथ समर्थांच्या
प्रस्थानत्रयी मधील महत्वाचा ग्रंथ आहे. "आत्माराम दासबोध । माझे
स्वरूप स्वतःसिद्ध ॥" असे श्रीसमर्थांचेच शब्द आहेत. यावरूनच परमार्थाचा अचूक उपाय सांगणाऱ्या ग्रंथाचे महत्व लक्षात येते. वेदांताचे
सार एकवटलेला, अध्यात्म विद्येचे गुह्य प्रकट करणारा असा हा ग्रंथ आहे. यामध्ये
समर्थांनी परमेश्वर प्रतीचा आनंद व्यक्त केला आहे.
या ग्रंथात समर्थांनी मायेचे यथार्थ वर्णन
केले आहे. माणसाला आपल्या
मूळ स्वरूपाचा शोध घ्यावयाचा असेल तर त्यासाठी मायेचा त्याग करावा लागेल. भगवंताचे कर्तुत्व विलक्षण आहे तसेच ही माया मोठी विचित्र
आहे. या मायेमध्ये रमल्यामुळेच माणसाचे मन अस्थिर राहते. माणसाचे मन कायम
कल्पनेमध्ये रमून जाते. यामुळे त्याचे मन कधीच एकाग्र होऊ शकत नाही. किंवा निर्विचार अवस्था त्याला
कधीच प्राप्त होत नाही.
मन इंद्रियांच्या पातळीवर विषयसुखाचा विचार करत राहते. तेव्हा
ती माया माणसाच्या बंधनास अथवा पुनर्जन्मास कारणीभूत ठरते. पण
मनातील विचार भगवंतासंबंधीचे असतील तर हळूहळू हेच मन साधकाला निविर्चार करून हीच माया साधकाला
बंधनातून मुक्त करण्यास उपयोगी ठरू शकते. त्यासाठी साधकाने एकांतात राहून सतत साधना करणे गरजेचे आहे असे समर्थ सांगतात.
अहंकार आणि वासना यामुळे माणूस दृश्य जगातील
सगळ्यांना माझे माझे म्हणत
राहतो. इतरांकडून
अपेक्षा करीत राहतो आणि इतरांच्या अपेक्षापूर्ती करू शकत नाही .
अशा या विचित्र चक्रात तो सापडतो आणि या अपेक्षापूर्तीच्या
खेळात मनुष्य अधिकाधिक मायेत गुरफटत जातो.
या चक्रातून सुटण्यासाठी समर्थ अहंकाराचा आणि वासनेचा त्याग
करायला सांगतात. देहबुद्धी ते
आत्मबुद्धी करावी असे सांगून साधना उपासना याच्या माध्यमातून शाश्वत आनंद
प्राप्त करून घेण्यास सांगतात.
ऐक ज्ञानाचे लक्षण | ज्ञान म्हणिजे
आत्मज्ञान |
पाहावे आपणासी आपण | या नाव ज्ञान ||
हेच महत्वाचे सूत्र समर्थ आपल्या प्रस्थानत्रयी मधून
सांगतात. चंचल मनाला सारासार विचार, नित्य अनित्य विवेकाच्या आधारे सावरून शाश्वत
आनंदाची प्राप्ती करून घ्यावी हेच त्यांचे सांगणे आहे.
समर्थ म्हणतात संसार हा मायेचाच खेळ आहे. या मायेचा निरास मायेनीच करायचा
आहे. यासाठी नित्य उपासना यावर समर्थ भर देतात. या मायारूपी जगात वावरताना भक्ती
हे साधन समर्थ आपल्याला सांगतात. दासबोधामध्ये समर्थांनी नवविधाभक्ती सांगितली
आहे. आत्मारामामध्ये समर्थ म्हणतात,
हेचि जाण भक्तीचे बळ | जेणे तुटे
संसारमूळ |
नि:संग आणि निर्मळ | आत्मा होईजे
स्वये ||
सगुणाची उपासना करीत नि:संग आणि निर्मळ असे
आत्मस्वरूप आपणच आहोत हा अनुभव घेणे हेच भक्तीचे फळ आहे. जेथे मी आणि तू उरतच नाही
अशी अवस्था जी नेमक्या शब्दात मांडता येत नाही पण ज्याची अनुभूती घ्यावी अशी ही
अवस्था. सर्वोच्च्य आनंद प्राप्त करून देणारी ही अवस्था ज्या आनंदाची प्राप्ती
करून घेणे हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे. हेच ध्येय वेदांमध्ये सांगितले गेले.
आपल्या या
प्रस्थानत्रयीमध्ये समर्थांनी वेदाचे जे गुह्य शास्त्रांचे जे सार ते अत्यंत
सोप्या शब्दात आपल्या समोर मांडले आहे. त्याचे चिंतन मनन श्रवण करून व निदिध्यास
घेऊन साधकांनी शाश्वत आनंद प्राप्त करून घ्यावा .
जय जय रघुवीर समर्थ
ReplyDelete|| श्रीराम समर्थ॥
नमस्कार ,
लेख अतिशय उत्तम आहे. या लेखाचा पुढील भाग म्हणून प्रत्येक प्रस्थान त्रयीचा विस्तृत परिचय करता आला तर पहावे.
सुरुवात आत्माराम पासून करता येईल का ?
धन्यवाद / जय जय रघुवीर समर्थ !
जय श्रीराम
ReplyDeleteमाधवीताई “ समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी ” खूप छान माहिती दिलीत...धन्यवाद !
-गौरी शेटे
जय जय रघुवीर समर्थ
!! जय सदगुरु !!
ReplyDeleteसौ. मधवीताई तुम्ही"श्रीसमर्थ वाङमयातील प्रस्थानत्रयी" छानच माहिती दिली. धन्यवाद. तप साधना व अध्यात्मिक ग्रंथाचा अभ्यास यावर सविस्तर माहिती हवी आहे ती मिळेल का?
ReplyDeleteधन्यवाद. ई-मेल द्वारा संपर्क साधावा _/\_
Deleteखूपच छान लेख लिहिला आहे.धन्यवाद
ReplyDelete-----ल.दा.गुंटूरकर,नांदेड
धन्यवाद
ReplyDeleteजय जय रघुवीर समर्थ