आगामी प्रकाशन
' समर्थ वाङ्मयाचा परामर्श '
चिरंजीवी हनुमान चरित्र आणि उपासना याविषयी
या नंतर लवकरच अजून एक लेख संग्रह प्रकाशित होत आहे
आगामी प्रकाशन
आगामी प्रकाशन
' समर्थ वाङ्मयाचा परामर्श '
चिरंजीवी हनुमान चरित्र आणि उपासना याविषयी
या नंतर लवकरच अजून एक लेख संग्रह प्रकाशित होत आहे
आगामी प्रकाशन
|| श्रीराम ||
श्री समर्थांचे महंत
डॉ. सौ. माधवी संजय महाजन
समर्थ रामदासस्वामी यांची शिकवण जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करणारी होती. त्यांचा प्रत्येक विचार हा व्यक्ती हितासाठी तसेच समाज हितासाठी उपयुक्त असाच होता. त्यांच्या चरित्राचा विचार करता त्यांनी जे कार्य केले ते अलौकिक होते. समर्थ रामदासस्वामींच्या काळाचा सर्वांगीण विचार केला असता त्यांनी त्या परिस्थितीत जे समाजकार्य केले ते गौरवास्पद होते. त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून त्या काळात धार्मिक, राजकीय, आणि सामाजिक क्रांतीच घडवून आणली होती. भारतभ्रमण काळात त्यांनी जे समाज अवलोकन केले त्यावरून समाज भयमुक्त होऊन संघटीत होणे आवश्यक आहे हे त्यांनी जाणले. त्यानुसार त्यांनी आपल्या कार्याची आखणी करून समाज संघटीत करताना ज्ञानसत्ता, राजसत्ता, धर्मसत्ता, आणि आत्मसत्ता या चार सत्ता दृढ केल्या.
मध्ययुगापूर्वी राजसत्तेपेक्षा ज्ञानसत्तेला अधिक प्राधान्य होते. राजा ऋषींची आज्ञा घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नसे. परंतु खिलजीच्या हल्ल्यामुळे ही सत्ता ढासळली गेली. ही ज्ञानसत्ता दृढ झाल्याशिवाय समाजाला नवा दृष्टीकोण देणार कोण ? ही समस्या ओळखून समर्थांनी ब्राम्हणांना अत्यंत प्रखर शब्दात आपल्या धर्माची जाणीव करून दिली. ज्ञानसत्ता प्रबळ करण्यासाठी समर्थांनी आपल्या उपदेशामधून ब्राम्हणांचे मनोबल दृढ केले. तसेच राजसत्ता दृढ करण्यासाठी ‘मराठा तितुका मेळवावा | महाराष्ट्र धर्म वाढवावा | ’ असा उपदेश करून क्षत्रियांना मोगलाई विरुद्ध लढा देण्यास प्रवृत्त केले. स्वधर्माची स्थापना करणे हे त्यांचे प्रमुख ध्येय होते. त्यासाठी त्यांनी कृष्णाखोऱ्याची निवड केली. कृष्णाखोरे ही शहाजीराजाची जहागिरी होती. तसेच या ठिकाणी त्यांचे पुत्र शिवाजीराजे स्वराज्य स्थापनेची स्वप्ने उराशी बाळगून त्या दृष्टीने आपली पावले टाकत होते. स्वराज्य स्थापण्याच्या दृष्टीने शहाजीराजांनी एकदा प्रयत्न केला होता पण त्यांचे हे बंड मोडून काढण्यात आले होते. शहाजीराजाची स्वराज्य स्थापन करण्याची उर्मी आणि शिवाजीराजांचे स्वराज्याचे स्वप्न लक्षात घेऊन समर्थांनी आपल्या कार्यासाठी कृष्णाखो-याची निवड केली. त्यांनी आपल्या उपदेशातून समाज संघटीत करून एकीचे महत्व लोकांना पटवून दिले. तरुणांची मने स्वराज्य आणि स्वधर्म स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित होतील अशा पद्धतीने त्यांना प्रबोधन करण्यास सुरवात केली. अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ देऊन, परकीय आणि मोगल यांच्या विरोधात सर्वांनी एक होऊन त्यांचा अंत करणे ही प्रेरणा राजसत्ता दृढ करणारीच होती.
ज्ञानसत्ता आणि राजसत्ता दृढ करताना त्यांनी धर्मसत्ता देखील प्रबळ केली. समर्थांच्या काळामध्ये धर्माला ग्लानी आलेली होती. हिंदूची देवळे पडली जात होती, मूर्तीची विटंबना केली जात होती, लोकांच्या धार्मिक भावना अत्यंत हीन पद्धतीने दुखावल्या जात असून देखील अत्यंत निर्विकारपणे जनता ते सहन करीत होती. समाजाची ही तटस्थवृत्ती, त्यांचे दुबळेपण आणि यवनांचा अनाचार हे सर्व समर्थांना उघड्या डोळ्यांनी पाहणे अशक्य होते. त्यांनी भारतभ्रमण करीत असताना तसेच नंतर देखील मंदिरांचा जीर्णोद्धार करून, ठिकठिकाणी मारुतीच्या मंदिराची स्थापना करून धार्मिक क्रांतीच घडवून आणली. श्रीरामाच्या मंदिराची उभारणी करून त्याचा दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्सव चालू केला. अनेक वीर मारुती, प्रताप मारुतींची स्थापना करून समाजासमोर निर्भय आणि बलवान मारुतीचा आदर्श ठेवला. ह्या सर्वांमधून जो तत्कालीन धार्मिक अनाचार माजला होता त्याला आळा घालण्याचे काम समर्थांनी केले. त्या काळात अंधश्रद्धेचा जो सुकाळ झाला होता त्यावर प्रहार करणे आवश्यक होते. समाजाला शुद्ध परमार्थदृष्टी आणि खरा धर्म समाजासमोर मांडणे हे अत्यावश्यक होते. यासाठी समर्थांनी देवाचा उत्सव, मंदिरांचा जीर्णोद्धार अशा स्वरुपाची ‘चाळणा’ करून समाजाला नवी दृष्टी प्राप्त करून देऊन स्वत्व जागृत ठेवून जगण्याचा नवा मार्ग दाखविला .
समर्थांनी केवळ मंदिरांची स्थापना आणि देवांचा उत्सव एवढेच केले नाही तर संपूर्ण भारतभर त्यांनी आपले मठ स्थापना करून आणि त्याठिकाणी योग्य त्या शिष्याची महंत म्हणून नेमणूक करून सर्वत्र समर्थ संप्रदायाचे जाळे पसरवले. समर्थांच्या या कार्यात त्यांच्या शिष्याचे योगदान तितकेच महत्वाचे ठरते. पूर्वी समाजाशी संपर्क साधण्याच्या दृष्टीने आजच्या सारखी कोणतीच साधने उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत आपला उपदेश घराघरामध्ये पोचवण्यासाठी समर्थांनी अनेक महंत आणि शिष्य तयार केले. समर्थांचे हे शिष्य समर्थांचा उपदेश समाजापर्यंत पोहोचवीत असत. समर्थांनी ब्राम्हणांना जसे भिक्षेचे महत्व सांगितले तसेच त्यांनी आपल्या शिष्यांना देखील भिक्षेची दीक्षा दिली. कारण भिक्षा हे समाजाशी जवळीक साधणारे, लोकाभिमुखतेचे अत्यंत प्रभावी साधन आहे हे त्यांनी जाणले. भिक्षेच्या निमित्ताने लोकस्थितीचे जवळून अवलोकन करणे हा महत्वाचा उद्देश होता. मठस्थापना, शिष्य, महंत, यामध्यमातून आपल्या संप्रदायाचे जाळे समर्थांनी देशभर पसरवले होते.
समर्थकालीन देशस्थिती पाहता त्या पार्श्वभूमीवर समर्थांचे मठ, त्यांचा शिष्य समुदाय आणि विशेष करून त्यांचे महंत ही समर्थांची संकल्पना विशेष उल्लेखनीय वाटते. त्यातून त्यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय आपल्याला येतो. अनेक शिष्य असताना समर्थांनी महंतांची उपाधी कशासाठी नव्याने निर्माण केली ? तर समर्थांचे व्यापक कार्य, त्यांचे प्रखर विचार, त्याचा प्रचार तसाच त्याच पद्धतीने होणे अपेक्षित होते. म्हणूनच त्यांनी गाव तिथे मारुतीची स्थापना केली तसेच अनेक ठिकाणी मठ स्थापन करून त्याजागी महंतांची नेमणूक केली. ठिकठिकाणी मठ आणि महंतांची नेमणूक करून समर्थांनी आपल्या संप्रदायाचा विस्तार केला. समर्थ संप्रदायामध्ये अनेक शिष्य होऊन गेले पण महंत हे निवडक होते समर्थांच्या परीक्षेत तावून सुलाखून निघून या पदाला ते पोहोचले होते. संप्रदायातील शिष्य आणि महंत यामध्ये काय फरक होता तर यात फरक असा की, शिष्यांना दुसर्याला मंत्रोपदेश देण्याचा अधिकार नसे. शिष्य मठ चालवू शकत नसत. महंतांनी दिलेली कामे शिष्यांना करावी लागत. तर महंतांवर अधिक जोखमीची जबाबदारी होती. महंतांना मंत्रोपदेश देण्याचा व शिष्य करण्याचा अधिकार होता. महंतांना दुसरे महंत नेमून संप्रदाय वाढवण्याचा अधिकार असे.
महंतांची नेमणूक करताना समर्थ त्याला उपदेश करीत. त्याला दासबोध ग्रंथ देऊन स्वहस्ते श्रीकंठमेखला देऊन पाठवत असत. महंताला यावेळी केलेला उपदेश गिरीधरस्वामींच्या समर्थप्रताप या ग्रंथात पहावयास मिळतो.
निरोपिती कोठे वाद घालू नको | भक्ति सोडू नको राघवाची |
राघवाची भक्ति ग्रंथाचे पूजन | स्वजन शोधन समुदाई |
नको सोडू नित्य साधन आपुले | पाठांतर केले पाहिजे तां |
वार्तावे तां सुखस्वरसे असावे | चंचळाच्या नावे शून्यकार |
महंतांना आपल्या कार्याची नेमकी दिशा समर्थ आपल्या उपदेशातून देत असत. महंताने उगाच कोणाशी वाद न घालता आपला संप्रदाय वाढवावा, स्वजनांचा शोध घ्यावा. आपल्या कार्याला अनुकूल असणार्या लोकांची निवड करावी. त्यावेळचा काळ मोठा कठीण होता.
कित्येक म्लेंच होऊन गेले | कित्येक फिरंगणांत आटले |
देशभाषाने रुधिले | कितीयेक || १५ | २ | ३ ||
समाजात माजलेला स्वैराचार, परकीयांचे आक्रमण, धर्माविषयीची अनास्था, अशी बिकट परिस्थिति असताना महंतांचे कार्य किती कठीण असेल हे लक्षात येते. अशा कठीण परिस्थितीमध्ये समर्थांचे महंत अत्यंत चतुरपणे या परिस्थितीचा भेद करून आपले कार्य अत्यंत सावधपणे करत. स्वतः गुप्त राहून ते आपले कार्य करत असत. लोकांची सदैव काळजी वाहणारा हा निस्पृह महंत लोकांतात न राहता "खनाळामध्ये जाऊन राहे" सर्वांपासून दूर रहात असे. सर्वांपासून दूर राहून देखील उदंड समुदाय निर्माण करण्याचे सामर्थ्य समर्थांच्या महंतांमध्ये होते. समर्थांच्या महंताचे वैशिष्ट्य हे होते की हा विरक्त एकांतप्रिय असूनही त्याचा लोकसंग्रह दांडगा होता.
समर्थ हे उत्तम संघटक तसेच उत्तम व्यवस्थापक होते. संघटनेच्या दृष्टीने त्यांनी मठ, महंतांची केलेली बांधणी हे एक प्रकारचे व्यवस्थापनच होते. समुदाव पाहिजे मोठा | तरी तनावा असाव्या बळकट | यानुसार संप्रदाय मोठा होण्यासाठी, केवळ मोठा होण्यासाठीच नव्हे तर बळकट होण्यासाठी, उत्तम संघटन, एकमेकांशी असणारा संपर्क, त्याचबरोबर जनसंपर्क, उत्तम विचार, उत्तम ध्येय घेऊन समाजाला त्याबरोबर घेऊन जाणे अशा अनेक गोष्टी समर्थांनी या बांधणीतून साध्य केल्या. समर्थांनी आपल्या या मठांचे जाळे केवळ महाराष्ट्रामध्येच पसरवले असे नाही तर कर्नाटक, दक्षिणप्रांत, वर्हाड, सूरत, गोमंतक, बेदर,मथुरा, काशी, रामेश्वर, श्रीशैल्य अशा अनेक ठिकाणी अत्यंत नियोजन पूर्वक मठांची स्थापना केली. महाराष्ट्र सारस्वतकार वि. ल. भावे म्हणतात " हे रामदासी मठ म्हणजे रामदासी विद्यापीठे होती. तेथे संप्रदायतल्या विद्येचे पाठ अष्टप्रहर चालत". त सर्वांचे मुख्य ठाणे चाफळ हे होते. सर्वांची सूत्रे समर्थांच्या हातात होती. विशिष्ट कालावधीमध्ये हे सर्व मठपती आपल्या कार्याचा आढावा समर्थांपर्यंत पोहचवत असत. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने समर्थांनी याची आखणी केल्याचे लक्षात येते.
समर्थांनी महंत ही अत्यंत विचारपूर्वक निर्माण केलेली उपाधी होती. महंत कसा असावा याविषयी समर्थांनी अत्यंत बारकाईने विचार करून तसे महंत घडवले होते. सर्व प्रथम महंत कसा नसावा याविषयी समर्थांचे विचार पाहणे आवश्यक आहे. महंत कसा नसावा याविषयी यत्न निरूपण (द.१४ स. १) या समासामध्ये स्पष्ट केले आहे. ८० ओव्यांच्या या समासामध्ये निस्पृह महंताने लोकसंग्रह करताना कसे युक्तीने, संयमाने वागावे याचे विस्ताराने वर्णन केले आहे. महंतांना त्यांचे हे सांगणे आहे की एकदा निस्पृहता धरली तर ती सोडू नये आणि सोडली तर ओळखीच्या लोकांमध्ये वावरू नये. निस्पृह महंताने कसे वर्तन ठेवावे याबाबत समर्थांनी आपले रोखठोक विचार यामध्ये मांडले आहेत. महंताने पैसा आणि स्त्रियांकडे आशाळभूतपणे पाहू नये. त्याच्या अंगी मिंधेपणा नसावा कारण मिंधेपणाने कधीही परमार्थ साधता येत नाही. कोणी द्रव्य दिले तर ते घेऊ नये. भिक्षा मागताना लाजू नये. पण भिक्षा मागताना देखील नियमांचे पालन करावे. भिक्षा थोडीच घ्यावी. कोणी भरपूर भिक्षा आणली तर त्यातील मूठभरच घ्यावी. एकाच घरी जाऊन भिक्षा मागू नये. दुर्जनांशी भांडू नये. नीतीबाह्य वर्तन करू नये. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल असे विधान करू नये. कठोर शब्द बोलू नये. प्रखर वैरागी असावे. अभ्यासाचा संग धरावा. कशामध्ये मनाने गुंतून राहू नये. अखंड उपासना करावी. परमर्थाचा अधिकारी असणार्या महंताने
अती सर्वत्र वर्जावे हेच समर्थांचे सांगणे आहे. संयमाने वागावे. कोणामध्ये न अडकता निस्पृह महंताला त्याचे स्वतंत्रपण जपता आले पाहिजे. त्याचे वर्तन विवेकनिष्ठ असावे. लोकाचार सोडायचा नसला तरी लोकांच्या अधीन होऊन त्याने राहू नये. अशा अनेक कठोर नियमांचे पालन महंत करत असत. महंती ही सुखाची नाही. या सर्वांवरून समर्थ संप्र्दायामध्ये प्रवेश ही कठीण गोष्ट होती हे लक्षात येते. त्यात महंत या पदाला पोहोचणे अत्यंत कठीण काम होते. आध्यात्मिक बैठक कायम ठेवून समाजोपयोगी कार्य करणे, धर्माचे रक्षण करणे आणि या व्यापक कार्यात स्वतः कशात न गुंतणे अशी या महंताची महत्वपूर्ण भूमिका होती. आपल्या सारखाच दूसरा महंत तयार करून त्याला कार्याला लावण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती.
महंते महंत करावे।
युक्तिबुद्धीने भरावें।
जाणते करून विखरावे।
नाना देशीं॥ (दा.११/१०/२५ )
महंतांची नेमणूक करणे केवळ स्वतः पुरते मर्यादित न ठेवता ही साखळी पुढे तशीच चालू रहावी आणि कार्यात खंड पडू नये यासाठी समर्थांनी महंते महंत करावे अशी सूचना आपल्या महंतांना केली.
समर्थांनी महंतांच्या माध्यमातून निस्पृह नेतृत्व निर्माण केले. समाजकल्याणासाठी आपले आयुष्य वेचणारा महंत निरपेक्षपणे आपले हे कार्य पार पडत असे. कोणाकडून कशाची आपेक्षा न करता आनंदाने हे कार्य पार पडताना त्यांची समाजाकडून उपेक्षा देखील होत असे. परंतु सुखी, समृद्ध आनंदी समाज हेच महंतांचे प्रमुख ध्येय होते. त्यामुळे समाज निंदेला महत्व न देता बहुत लोक मिळवावे। एक विचारे भरावे। कष्ट करूनी घसरावे। म्लेंछावरी। हे समर्थांचे संघटनेचे सूत्र महंत प्रामाणिकपणे राबवत असत.
महंत कसा असावा याविषयी श्रीमद दासबोध ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी वर्णन आले आहे. महंत हा परमार्थिक अधिकारी असणे अत्यावश्यक होते. पण त्याने केवळ आत्मचिंतांनात, ईश्वर भजनात न रमता त्याच्या बरोबरीने समाजकल्याणाचे व्रत स्वीकारणे तितकेच महत्वाचे होते. आपल्या परमार्थिक जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून समर्थांच्या महंतांनी लोककल्याणाचे व्रत स्वीकारले होते. लोकसेवा म्हणजे ईश्वरसेवाच राम उपासना ऐसी | ब्रह्मांड व्यापिनी पहा असे मानपंचक या प्रकरणामध्ये समर्थ सांगतात त्याचे रहस्य श्रीमद दासबोध ग्रंथामध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे. नारायेण असे विश्वी | त्याची पूजा करीत जावी | याकारणे तोषवावी | कोणीतरी काया || १५/९/२५ || समाजसेवा ही ईश्वरचीच सेवा आहे. समाजाची ही सेवा करताना मात्र यामध्ये समाजाकडून कोणतीच अपेक्षा न ठेवता आपले कार्य पार पाडण्याची महंतांची जबाबदारी होती. आणि ही जबाबदारी या सर्व महंतांनी आनंदाने आणि समर्थपणे पार पडलेली आपल्याला दिसते. डॉ.शं.रा.तळघट्टी म्हणतात त्याप्रमाणे समर्थांचा महंत समजाच्या नि:श्रेयसाची काळजी वाहणारा खराखुरा समाजनेता होता. समाज हितच्या दृष्टीने सातत्याने विचार करणारा हा महंत 'स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे' या समर्थांच्या आदेशाचे पालन करणारा होता. सर्वांशी प्रेमाचे आणि आदराचे असे त्याचे वर्तन असे. समाज हितासाठी कटिबद्ध असणार्या या महंतांना आळसाचा वारा देखील शिवत नसे. लोकांसमोर व्यक्त होताना आपल्याला नेमके काय करायचे आहे, काय सांगायचे आहे, आणि ग्रंथ वाचल्या नंतर त्याचा अर्थ बरोबर कसा काढायचा याचे अचूक ज्ञान या महंतांना होते.
समर्थांच्या मते उत्तम महंत कोण तर ज्याचे आकलन उत्तम आहे, पुढे काय घडणार याचा अंदाज ज्याला आधीच येतो, जो सर्व गोष्टी जाणतो तोच खरा बुद्धिमान महंत होय. महंताला काळवेळ, तानमान, प्रबंध, कविता, महत्वाची वचने, सभाधीटपणा या गोष्टी वेळेवर सुचतात. एखादी गोष्ट आधी स्वतः शिकतो आणि मग इतरांना शिकवतो, अडचणीतील लोकांना विवेकाने बाहेर काढतो, प्रपंचातील लोकांना आत्मानात्म विवेक शिकवून महंत त्यांना निरासक्त बनवतो. समाज कार्यातील व्यापामध्ये समरस होणे त्याला जमते तसेच त्यातून पटकन अलिप्त होणे देखील त्याला सहज जमते. समर्थांच्या महंताचा विशेष हा की
आहे तरी सर्वां ठाई | पाहों जातां कोठेचि नाही |
जैसा अंतरात्मा ठाईचा ठाई | गुप्त जाला || ११/६/१४ ||
अंतरात्म्या प्रमाणे महंताची अलिप्तता असते. सर्वांच्या ठिकाणी असणारा अंतरात्मा शोधू पाहता कोठेच सापडत नाही. तसेच महंत सर्वांमध्ये मिसळतो पण शोधायला गेले तर कुठेच सापडत नाही. तो लोकांतातून एकांतात जातो. तो जरी दिसत नसला तरी समाजातील अनेक चळवळींना महंत प्रेरणा देतो. हीच त्याची खरी अलिप्तता होय. महंत नीती, न्यायाचे रक्षण करतो, स्वतः कधी अनीति व अन्याय करीत नाही. कठीण प्रसंगात डगमगून न जाता त्यातून तो सहज मार्ग काढतो. समर्थांनी महंत लक्षण या समासामध्ये महंतांच्या या गुणांचा जणू गौरवच केला आहे.
समर्थांच्या कार्याचा विशेष हा की समर्थांचा प्रत्येक महंत हा सद्गुरूंच्या तोडीचा होता. समर्थांप्रमाणेच सर्व महंत निस्पृह तर होतेच पण परमार्थी आणि विवेकी होते. लोकसंग्रह करून लोकांना हरिभजना बरोबर स्वधर्म आणि स्वराज्य प्रेम निर्माण व्हावे यासाठी कार्यरत होते. बोलल्याप्रमाणे त्यांचे वर्तन असल्यामुळे त्यांच्या विचारांची छाप जनमानसावर प्रभावीपणे पडत होती. या महंतांची नेमणूक करताना समर्थांनी स्त्री पुरुष असा भेदभाव केलेला दिसत नाही. महंत होण्यासाठी जे गुण अपेक्षित होते ते गुण असणार्या स्त्रियांची देखील महंत म्हणून नेमणूक केलेली दिसते. अक्कास्वामी, वेणास्वामी या त्यातील प्रमुख स्त्रिया होत. याशिवाय त्यांनी विशिष्ठ वर्णातील लोकांनाच केवळ मठाधीपती बनवले असे नाही. तर ब्राह्मण तसेच ब्राम्हणेतर देखील मठपती संप्रदायामध्ये आढळतात. पुणे जिल्ह्यातील शिवथर मठाचे महंत बाजी गोसावी हे क्षत्रिय मराठा होते. पारगाव मठाचे शंकर गोसावी हे मराठा महंत होते. मराठवाड्यातील लातूरजवळील भालकी मठाची परंपरा देखील मराठ्यांची.
महंताचे चालणे, बोलणे, लेखन, या छोट्या गोष्टीपासून ते त्याच्या परमार्थिक बैठकी पर्यंत महंत कसा असावा याविषयी समर्थांनी आपले महंत घडवले. समाजासमोर अत्यंत निर्भीड, निस्पृह ,परमार्थिक आदर्श लोकनेते उभे केले. समर्थांनी घडवलेले हे महंत आदर्श नेतृत्व कसे असावे, आदर्श व्यक्तिमत्व कसे असावे, आदर्श लोकनेता, या सर्व दृष्टीने समर्थांचा महंत दीपस्तंभच ठरतो. त्यांची श्रीमद दासबोध ग्रंथामध्ये जी महंत लक्षणे वर्णन केली आहेत ती प्रभूरामचंद्रांमध्ये, श्रीराम भक्त हनुमंतामध्ये आणि खुद्द श्रीसमर्थांमध्ये देखील आढळतात. या समासाचा समारोप करताना समर्थ म्हणतात
ऐसा पुरुष धारणेचा | तोचि आधार बहुतांचा |
दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा ||
श्रीरामांमध्ये असणाऱ्या या गुणांचे चिंतन करून आपल्यामध्ये हे गुण बाणावेत असे रघुनाथाचा गुण घ्यावा यामधून समर्थ सुचवत आहेत. समर्थांचा महंत श्रीरामांप्रमाणेच समर्थ मनोबलाचा आणि अनेक लोकांचा आधार आहे. समर्थांच्या काळात धर्मरक्षणासाठी, दुर्जनांपासून सामान्यांचे रक्षण करण्यासाठी श्रीरामाच्या आदर्शाची गरज होती. समाजाची गरज ओळखून समर्थानी रामांचा पराक्रम त्याच बरोबर त्याच्यामध्ये असणाऱ्या अनेक सद्गुणांचे दर्शन आपल्या प्रबोधनातून घडवले आहे. आजच्या काळात देखील अन्यायाला विरोध करणाऱ्या या आवेशाची गरज आहे. भ्रष्टाचार, लाचलुचपत, स्त्रियांवर होणारे अत्याचार, यासर्वाला आळा घालण्यासाठी अशा रणकर्कश्य आवेशाची आणि सद्गुणांचा आदर्श तरुण पिढीसमोर असणे आवश्यक आहे. आपल्याला प्राप्त झालेल्या बळाचा वापर रावणासारखा दीनदुबळ्यांवर न करता अन्याया विरोधात त्याचा वापर करणे गरजेचे आहेत हे तरुणांच्या मनात रुजणे आवश्यक आहे. रामनामाचा जप करताना त्याच्या या गुणांचे चिंतन करून ते आत्मसात करणे हे समाजहिताच्या दृष्टीने उपयुक्त आहे. त्यांच्या गुणांचा गौरव करून त्या गुणांचे अनुकरण करणे, त्याच्या वागण्या-सवरण्याचा आदर्श आपल्या आचरणातून व्यक्त करणे म्हणजेच त्याची खरी उपासना होय! जी समर्थांच्या महंताला सहज साध्य झाली.
|| जय जय रघुवीर समर्थ ||
।। श्रीराम ।।दैनंदिन जीवनात अध्यात्मडॉ माधवी महाजनmadhavimahajan17@gmail.comभारतीय संस्कृतीने आनंदी जीवन कसे जगावे याचा मूलमंत्र दिला आहे. या संस्कृतीमध्ये मानवी मनाचा, शाररिक आरोग्याचा, विश्वाचा, निसर्गाचा तसेच जगण्यासंबंधीच्या नियमांचा सर्वांगीण अभ्यास झाला आहे. अद्वैतला महत्व देऊन विश्वावर आपलेपणाने प्रेम करा अशी व्यापक विचारांची शिकवण भारतीय संस्कृतीने दिली. ऋषीमुनींनी शाश्वत सुखाची प्रचिती घेऊन तो आनंद सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी ते सतत कार्यरत राहिले. शाश्वत सुखाचा मार्ग वेदांनी मानवाला दाखवला. २१ व्या शतकात संत विभूतींनी हा मार्ग अधिक सोप्पा करून दाखविला. संतांचे विचार, त्यांचे साहित्य, एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरतात. विचारांना दिशा देणारे, मनाला वळण लावणारे, हे विचार उत्तम व्यक्तिमत्व साकारण्यास तसेच आनंदी जीवन जगण्यास निश्चितच प्रेरणादायी ठरतात.अध्यात्म म्हंटले की हा विचार आपल्यासाठी नाही असाच आपण समज करून घेतो. या गैरसमजातून अत्यंत मौलिक विचार सकारात्मक विचार देणाऱ्या या ग्रंथांपासून आपण दूर राहतो. आपल्या सोयी नुसार प्रत्येकजण आपल्या आयुष्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असला तरी त्यामध्ये स्वतःची सोय अधिक महत्वाची असते. आपणच आखलेल्या आपल्या दिनचर्येत आपण रममाण असतो. आपल्या या व्यस्त जीवनात कोणी ढवळाढवळ केलेली चालत नाही. या व्यस्त जीवनात अध्यात्म याविषयी कोणी बोलले तर ‘माझा यावर विश्वास नाही’ अशी पटकन प्रतिक्रिया दिली जाते. कारण अध्यात्म म्हणजे भोंदूगिरी, देव देव करायला लावणारे असा समज बहुतेक जणांचा झालेला असतो. परंतु केवळ परमेश्वर चिंतन म्हणजे अध्यात्म नव्हे. अध्यात्म म्हणजे विचारांमध्ये, वृत्तीमध्ये बदल. मनातील सकारात्मक विचार नकारात्मक विचारांवर मात करतो असे हे अध्यात्म. या विचारांच्या साहाय्याने स्वतःमध्ये बदल घडवून आपल्या आसपास असणाऱ्या व्यक्तीशी अधिक सख्य जोडून आनंद निर्माण करणे म्हणजे अध्यात्म. विचारांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारे अध्यात्म दैनंदिन जीवनात उपयोगी आहे.जीवनामध्ये सतत सुखी राहण्यासाठी मनुष्य कार्यरत असतो. २१ व्या शतकात मानवाने आपले जीवन सुखी होण्यासाठी अनेक क्षेत्रात प्रगती केलेली दिसते. आपल्या देहाला कमीत कमी कष्ट देऊन जास्तीत जास्त सुख कसे प्राप्त करून घेता येईल या दृष्टीने तो सतत प्रयत्नशील असतो. या बाह्य सजावटीकडे लक्ष देताना आपले मन देखील सुदृढ असावे याकडे मात्र त्याचे दुर्लक्ष झालेले दिसते. भोगवादीवृत्ती आणि मानसिक विकासाकडे दुर्लक्ष यामुळेच परस्परांविषयी राग,द्वेष, हेवेदावे, मत्सर या असुरी संपत्तीचा अधिकाधिक विकास होताना आपण पाहतो. माणसाचे माणूसपण हरवणारे असे हे विकार आहेत. म्हणूनच काम, क्रोध, लोभ, मत्सर आणि मोह यापासून कोसो दूर राहण्यास सांगितले गेले आहे. जेथे काम आहे तेथे क्रोध हा स्वाभाविकपणे येतोच. व्यक्तीच्या मनामध्ये विषय तृप्तीच्या गोष्टीकडे धावणारे जे विचार येतात ते म्हणजे इच्छा, कामना. मग ही कामना शरीर भोगाविषयी असो अथवा कोणत्याही इंद्रियांची तृप्ती करण्याविषयीची असो. काम हा विकार आहे. जेव्हा शृंगारातील पावित्र्याची भावना संपुष्टात येते, एकात्म भाव जीवनाचा व्यापक विचार नष्ट होतो तेव्हा या विकारात विकृती निर्माण होते. या विकृतीतूनच लहान मुलींपासून वृद्ध स्त्रीयांपर्यंत अनेक जणींवर अत्याचार झाल्याचे वृत्त रोज आपल्या कानावर येते. तरुण पिढीवर याचा एव्हढा प्रभाव दिसतो की उघड्यावर होणारे मिलन यामध्ये त्यांना काहीच गैर वाटत नाही. लोकांना ना भय ना लज्जा यामुळे अनाथालयांची होणारी वाढ, अनेक रोग उदभवतात. या लोकांना जर कोणी विरोध केला तर यांच्या मधील क्रोध उफाळून येतो. यातूनच खुनाचे वाढते प्रमाण, एकतर्फी प्रेमाची अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात. विषय सेवनाने तृप्ती होते असा समज असणाऱ्यांसाठी महाभारतातील ययातीने उदाहरण पुरेसे आहे. ययातीला असे वाटते की आपले वृद्धपण कोणी घेतले तर आणखी काही काळ विषयांचे सेवन करता येईल. विषयांचे अधिक काळ सेवन केले तर आपोआपच तृप्ती प्राप्त होईल असे त्याला वाटते. त्याची ही इच्छा त्याच्या मुलाने पूर्ण केली. मुलाने त्याचे वार्धक्य घेणे परंतु मुलाचे तारुण्य घेऊनही त्याला तृप्ती मिळाली नाही. शेवटी तो जे म्हणाला ते अत्यंत महत्वाचे आहे, “कामनांचा उपभोग घेतल्याने कधीही तृप्ती होत नाही. उलट अग्नीत तूप टाकल्यावर अग्नी शांत न होता तो अधिकच भडकतो तसेच उपभोगाने कामनांची तृप्ती न होता त्या अधिकच प्रज्वलित होतात”.संत वाड्मय किंवा अध्यात्मशास्त्र विषयांपासून सतत दूर नेतात ते विषय खरंच एव्हढे वाईट आहेत का? खरेतर शब्द,स्पर्श,रूप,गंध आणि रस या पंचज्ञानेंद्रियांचे विषय आपण नित्य भोगत असतो म्हणजे विषयसेवन घडणारच आहे. पण संत याठिकाणी विषय त्याग सांगत नाहीत तर विषयासक्तीचा त्याग करायला सांगत आहेत. क्रोधाच्या आहारी न जाता मनानी त्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. कारण नसताना पुढच्या व्यक्ती कडून आपल्याला क्रोध यावा असे वर्तन घडले तरी माझी वैचारिक पात्रता, विचारांची स्थिरता मी गमावणार नाही हा विवेक जागृत ठेवून क्रोधावर विजय मिळवता येणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वाहन चालवताना या आणि अशा अनेक प्रसंगी क्रोधावर नियंत्रण ठेवता येणे आवश्यक आहे. या विकारांवर विजय मिळवणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील हिताचे आहे. कारण या सतत येणाऱ्या अनावश्यक रागामुळेच रक्तदाब, मधुमेह अशा अनेक आजारांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये मन अत्यंत अस्थिर आणि अस्वस्थ झालेले आहे.काम, क्रोधापेक्षा देखील विखारी आहे तो लोभ. सतत एखाद्या विषयाचा आनंद घेऊनही माणसाच्या मनातील लालसा कमी होत नाही. लोभ हा गरजेपोटी नसून वासनेपोटी जन्माला येतो. तृप्ती न होणे हाच लोभाचा स्वभाव आहे. माणसाला धनाची तीव्र वासना असते. कितीही धनप्राप्ती झाली तरीही यांच्या गरजा त्यामध्ये भागात नाहीत. म्हणून तो अधिक धनप्राप्ती करून घेण्याच्या मागे लागतो. धनप्राप्तीसाठी कुटुंबापासून दूर राहणे देखील तो स्वीकारतो. स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या सुखासाठी धनप्राप्तीला अधिक प्राधान्य दिले जाते. त्यामुळे सतत वाढणाऱ्या गरजा आणि त्याच्या पूर्ततेसाठी धनप्राप्तीच्या मागे धावणे या वर्तुळातून त्याची कधीच सुटका होत नाही. पुरेसे अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख गरजा भागल्या तरीही भोगवादाच्या पूर्ततेसाठी नवीन वस्तू घरात येतंच राहतात पण त्याचबरोबर जुन्या वस्तूंचा मोह काही सुटत नाही. सर्वकाही प्राप्त करून देखील माणसाला सतत अपुरेपणाची जाणीव होत राहते. त्यामुळे तो सतत अशांत आणि असमाधानीच राहतो. सतत स्वतःच्या प्रपंचाचे तसेच मी, माझे याचेच चिंतन लोभ वाढवतो. हा लोभ सतत क्षोभ वाढवतो, अतृप्तता वाढवतो आणि माणसाच्या दुःखाला कारण ठरतो. माणसाची प्रवृत्ती अशी असते की स्वतःच्या प्रपंचासाठी साठवता साठवता आपली मुले, नातवंडे यांच्यासाठी साठवून ठेवण्याची त्याची वृत्ती बळावत जाते. त्यामुळे आयुष्य संपत आले तरी देहाचे कष्ट सुटत नाहीत. नेमके कुठे थांबायचे हा विवेक अध्यात्म ग्रंथातुन उमगतो. धनाचा लोभ महाभयंकर आहे. परद्रव्याची अभिलाषा धरू नको हे सूत्र अध्यात्मिक ग्रंथात पहावयास मिळते. “ नको रे मन द्रव्य ते पुढिलांचे ” याठिकाणी परद्रव्याची अभिलाषा नकोच पण वडिलांच्या पैशाची देखील अपेक्षा नको हे अभिप्रेत आहे. या अपेक्षेतूनच निर्माण होणारे संघर्ष, नात्यांमध्ये निर्माण होणारी घुसमट यातून नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. सर्व गोष्टी विपुल प्रमाणात असून देखील मनःशांती नाही अशी अस्वस्था निर्माण होते. अशा परिस्थितीत अध्यात्माचे नेमके सूत्र समजलेल्याना मात्र मनःशांती प्राप्त होते. कारण या सर्वांवर मात करण्यासाठी चंचल मनावर विजय मिळवणे क्रमप्राप्त आहे याची त्यांना जाणीव असते आणि तशी त्यांची कृती देखील असते. आत्मपरीक्षण करून या सकारात्मक विचारांच्या आधारे स्वतःमध्ये जाणीवपूर्वक बदल घडवून आणाणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःमध्ये असणारे अवगुण हे गुणच वाटत असतात. पण त्याचवेळी इतरांमधील दोष मात्र पटकन लक्षात येतात. पण इतर माणसे कशी वागतात किंवा अशी का वागतात हा अध्यात्माचा विषय नसून मी कसा वागतो आणि मी कसा वागेन हा अध्यात्माचा विषय आहे नेमके हेच समजून घेणे आवश्यक आहे.अध्यात्म शास्त्र म्हणजे निर्भेळ आनंद आहे. आनंदी जीवन जगण्याचे तंत्र या शास्त्रांच्या आधारे जाणून घेतले तर जीवनात निर्माण होणारे ताण तणाव याला आपण सहज तोंड देऊ शकतो. आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्या मनात तसेच आपल्या भोवती आनंदी वातावरण राहण्यासाठी काही गोष्टी आत्मसात करणे गरजेचे आहे. दुसऱ्याला दुखावणे, दुसऱ्याचा अपमान करणे, सतत कलह निर्माण होईल असे शब्द बोलणे, दुसऱ्याची चेष्टा करणे हे करंटे पणाची लक्षणे आहेत ज्याचा त्याग करणे हे आनंदी जीवनाचे सूत्रच आहे. आपल्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द इतरांना प्रसन्न करणारा असावा. याचा अर्थ फक्त इतरांची स्तुती किंवा मुह मे राम बगल मे छुरी असा नसून समोरच्या व्यक्तीचे अंतःकरण शांत करणारी वाणी असावी. समोर असताना वरवर गोड बोलून त्या व्यक्तीच्या पाठीमागे मते त्याची निंदा नालस्ती करणे हे करंटेपणाचे लक्षण आहे. तोंडावर चांगले बोलावे पण पाठीमागे देखील चांगले बोलण्याचा विवेक जागा ठेवते ते अध्यात्म.वेगाने बदलणारे शहरीकरण, जीवनशैली, कुटुंब पद्धती, प्रसार माध्यमांचा वाढता प्रभाव या सर्वांमुळे निर्माण होणारे ताणतणाव याला देखील सामोरे जावे लागत आहे. या सर्व परिस्थितीत अध्यात्म शास्त्राच्या आधारे मनःशांती प्राप्त करून घेता येते फक्त त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. या शास्त्रामध्ये उपासनेवर भर दिला आहे. परंतु उपासना म्हणजे देवपूजा, मंदिरात जाऊन देवदर्शन, पोथ्या वाचन, उपासतापास असाच अनेकांचा ग्रह झालेला दिसतो. अनेक उपवास करून नित्य कर्म करताना मात्र इतरांचा उपहास करताना अनेक जण दृष्टीस पडतात. अखंड सावध राहून जीवन जगणे ही देखील एक उपासनाच आहे. सकाळी पूजा पाठ करून, जपाची माळ ओढून दिवसभर अहंकाराने बरबटलेले आणि लोकनिंदे मध्ये रमलेले खरे अध्यात्म शास्त्र जाणत नाहीत असेच म्हणावे लागेल. नाकारात्मक गोष्टींचा त्याग याचा अर्थ अध्यात्म शास्त्र आपल्याला दुबळे बनवते असा नाही तर कोणत्या परिस्थितीत नेमके कसे वागावे हे धोरण यातून शिकता येते.आज काळ बदलला, मनुष्याचे राहणीमान बदलले, विज्ञान प्रगत झाले परंतु माणसांची वृत्ती मात्र तशीच राहिली. त्यामुळे प्रगतीच्या अत्युच्च शिखरावर असून देखील मनुष्य असमाधानीच राहिला. हे माझे आणि तुझे तेही माझेच अशी वृत्ती इतकी बळावली की हिंसाचार वाढला. प्राप्त झालेल्या बुद्धीच्या सामर्थ्याचा उपयोग दुसऱ्याच्या नाशासाठी करताना दिसू लागला. जगात घडणारे अतिरेकी हल्ले, बॉम्बस्फोट या घटनांतून या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. राग,द्वेष, मत्सर कोणत्या प्रकारची टोकाची हानी करू शकतो याचे आपल्याला प्रत्यंतर येते. आजच्या परिस्थितीत जर काही चांगले घडवायचे असेल तर सकारात्मक विचारानां दिशा देणारे तसेच मनःशांती प्राप्त करून देणारे अध्यात्म शास्त्र नेमकेपणाने समजून घेऊन आपल्या जीवनात उतरवणे ही काळाची गरज ठरत आहे.