Thursday, April 2, 2020

।। श्रीराम ।।

~~~ रघुनाथाचा गुण घ्यावा ~~~  

डाॅ. सौ. माधवी महाजन



ऐसा पुरुष धारणेचा । तोचि आधार बहुतांचा । 
दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा ।। 

“दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा” या शब्दात समर्थानी अनेक गुणांनी मंडित असणाऱ्या श्रीरामांचा गौरव केला आहे. श्रीसमर्थ रामदासस्वामी हे श्रीरामाचे अनन्यभक्त होते. त्यांनी पराक्रमी रामाचा आदर्श समाजासमोर ठेवला. महर्षी वाल्मिकी लिखित रामायणामध्ये मर्यादापुरुषोत्तम प्रभूरामचंद्राचा अपार महिमा वर्णन केला आहे. धर्मरक्षणासाठी तसेच लोकहितार्थ आपले आयुष्य ज्यांनी व्यतीत केले त्या दशरथनंदन श्रीरामांच्या चरित्राविषयी आजही लोकांना विलक्षण ओढ आहे. नरदेहप्राप्ती नंतर आपल्यामधील दैवी गुणांच्या साहाय्याने मनुष्य कसे उच्च कोटीतील आदर्श जीवन जगू शकतो हे रामचंद्रांच्या चरित्रातून पाहायला मिळते. वाल्मिकी रामायणामध्ये बालकांड आणि  अयोध्याकांड या दोन्ही ठिकाणी श्रीरामचंद्राच्या गुणांचे वर्णन आले आहे. 

महर्षी वाल्मिकींनी रचलेल्या महाकाव्याचा श्रीराम हे नायक आहेत. अत्यंत नम्र तसेच नित्यशांत असे हे आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांची वाणी अत्यंत मधुर आणि गोड आहे. “ गोड सदा बोलावे । नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे । हाचि निरोप गुरूंचा । मन कोणाचे न दुखवावे ।। असे गोंदवलेकर महाराज म्हणत असत. श्रीराम कधी कोणाला दुखावत नाहीत. लोकाभिराम हे विशेषण त्यांना सार्थ आहे. त्यांच्या नम्र वाणीमुळे त्याना ही लोकप्रियता प्राप्त झाली. निंदा, द्वेष, मत्सर, छल कपट करण्याची त्यांची वृत्ती नाही. “स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसी रे नीववावे ।।” या श्लोकामध्ये समर्थ श्रीरामांच्याच गुणाचे वर्णन करत आहेत. लोकांची मने जपणारे श्रीराम लोकांमध्ये मिसळून त्यांची दुःख जाणून घेतात. त्यांच्या समस्या सोडवून त्यांची दुःख दूर करण्यासाठी सतत कार्यरत राहतात. सर्वात महत्वाचा गुण म्हणजे ते वृद्धांमध्ये मिसळतात. त्यांचा आदर करतात. त्यांचे विचार जाणून घेतात. 

अत्यंत मीतभाषी असणारे श्रीरामचंद्र मोजकेच बोलतात. आपले म्हणणे मुद्देसूदपणे मांडून दुसऱ्याला पटवून देतात. जसे मीतभाषी आहेत तसेच पूर्वभाषी आहेत. पूर्वभाषी म्हणजे कोणी ओळखीचे भेटले की स्वतःहून त्यांच्याशी बोलायला जातात. त्यांना मी युवराज आहे हा अहंकार नाही. त्यांच्या बोलणे अत्यंत लाघवी आहे त्यामुळे प्रत्येकाला त्यांचा सहवास हवाहवासा वाटतो. 

सत्यवचन हा रघुवंशाचा गुणविशेष श्रीरामचंद्रांमध्ये उतरला आहे. स्वप्नात दिलेले वचन पूर्ण करणाऱ्या हरिश्चंद्राच्या वंशातील श्रीरामचंद्र आपल्या वडिलांचे शब्द खोटे ठरू नयेत यासाठी प्रयत्नवादी आहेत. कोणत्याही प्रसंगात शांत राहण्याची त्याची वृत्ती आहे. महाराज दशरथ यांनी श्रीरामांच्या राज्याभिषेकाचा मोठा घाट घातला. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. परंतु कैकयीच्या दोन वरांमुळे सर्व चित्र क्षणात पालटले. ज्यादिवशी श्रीरामांना राज्याभिषेक होणार त्याच दिवशी त्यांना वल्कले नेसून चौदा वर्षाचा वनवास स्वीकारावा लागला. परस्पर विरोधी अशा दोन घटना आहेत पण श्रीरामचंद्रांनी राज्याभिषेक जेवढा सहज स्वीकारला तेवढ्याच सहजतेने वनवास देखील स्वीकारला. वडिलांनी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी त्यांच्या चरित्राला असत्याचा कलंक लागू नये म्हणून श्रीरामांनी एक तप म्हणून वनवास स्वीकारला. स्थितप्रज्ञ हा त्यांच्यातील गुण वाखाणण्या जोगा आहे. राज्याभिषेक होणार म्हणून खुश नाहीत तसेच वनवास मिळाला म्हणून दुःखी देखील नाहीत. स्वतःच्या बळावर राज्य हिसकावून घेण्याची त्यांची वृत्ती नाही. त्यांना कशाचाच लोभ नाही. अधाशीपणा, वखवख या दुर्गुणांना त्यांच्या ठिकाणी थारा नाही. अत्यंत समाधानी, पूर्ण संयमी असे हे व्यक्तिमत्व सर्वांच्या मनाला भुरळ घालणारे आहे. 

तार्किक चर्चेमध्ये त्यांना कोणी हरवू शकत नाही. आपल्या आईमुळे दादाला वनवासात जावे लागले हे जेव्हा भरताला कळते तेव्हा भरत श्रीरामांना आयोध्येत घेऊन जाण्यासाठी श्रीरामांच्या भेटीसाठी वनात जातात. श्रीरामांनी पुन्हा राज्याचा स्वीकार करावा आणि वनाचा त्याग करावा यासाठी मोठे चर्चासत्र याठिकाणी घडले. या चर्चासत्रात अनेक युक्तिवाद केले जातात परंतु या सर्वाला रामचंद्रांनी अत्यंत मुद्देसूद आणि शास्त्राला धरून असे खंडन केले. या प्रसंगातून श्रीरामचंद्रांचे उत्तम वाकपटूत्वाचे दर्शन घडते. 

श्रीरामांवर कोणी उपकार केले तर ते कायम त्याच्या ऋणात राहतात. भगवती सीतेच्या शोधकार्यात हनुमंताने जो पराक्रम केला, आपल्या जीवाची देखील पर्वा केली नाही त्या हनुमंताच्या गुणाचे भरभरून कौतुक करतात. पण स्वतः कोणाकरता काही केले तर त्याचा उल्लेख ते कधीच करत नाहीत. 

श्रीरामचंद्र अत्यंत दयाळू आहेत. कोणाविषयी त्यांच्या मनात राग नाही. सर्वाना क्षमा करण्याची त्यांची वृत्ती आहे. अनाक्रोशे क्षमा असे माउलींनी क्षमेचे वर्णन केले आहे. म्हणजे कोणाबद्दल कुठलाही राग नाही चरफड नाही सहजपणे आणि शांतपणे केलेली क्षमा. अयोध्येत परत आल्यानंतर श्रीराम प्रथम कैकयी मातेला भेटले आहेत. तसेच वनात भरत भेटीला आल्यानंतर त्याला श्रीरामांनी कैकयी ही  माझी माता आहे समजून काळजी घेण्याची आज्ञा दिली आहे. रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला बिभीषणाने नकार दिल्या नंतर श्रीरामाने त्याला सांगितले की, ‘‘मरणाबरोबर माणसाचे वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास, तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे.” शत्रू विषयी देखील असे उदात्त विचार असणारे असे प्रभू रामचंद्रांचे व्यक्तिमत्व होते.  

कोदंडधारी श्रीराम पराक्रम संपन्न, बलसंपन्न आहेत. अत्यंत बलवान असून देखील त्याचा त्यांना अहंकार नाही. शत्रूला कधीच क्षुद्र लेखत नाहीत. धर्मरक्षणासाठी, प्रजेवर होणारा अन्यायाविरुद्ध, साधुसंतांच्या रक्षणासाठी त्यांनी कोदंड हाती धरले आहे. पराक्रमी आहेत पण दुर्बलांवर कधी शास्त्र उगारत नाहीत. पराक्रम गाजवला तरी शत्रूवर अन्याय करत नाहीत. लुटालूट, जाळपोळ असे विध्वंसक प्रकार त्यांच्याकडून कधीच घडत नाहीत. क्रूरता हा दुर्गुण त्यांच्यामध्ये नाही.  

श्रीराम हे आदर्श शत्रू आहेत. रावणाच्या वधानंतर बिभीषणाला राज्य दिले. रावणाचा सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केला आहे. वाली वधानंतर देखील सुग्रीवाला राज्य दिले आणि वालीपुत्र अंगद याचा युवराज पदावर राज्याभिषेक केला. यामध्ये काका पुतण्यामध्ये सख्य राहील हा योग साधला आहे. 

पतितपावन श्रीराम पश्चाताप झालेल्या भक्तांना अभय देतात. महर्षी वाल्मिकी, अहल्या ही रामकथेतील पश्चाताप दग्ध व्यक्तिमत्व आहेत. ज्यांना आपण केलेल्या कृत्याचा मनापासून पश्चाताप झाला आणि असे पाप पुन्हा घडणार नाही असे वचन त्यांनी श्रीरामांना दिले. अशा शरणागतांना प्रभू रामचंद्रांनी मनापासून स्वीकारले. 

त्यांचा विशेष म्हणजे ते शरणागतांना अभय देतात. रावणाने अन्यायाने दुसऱ्याच्या पत्नीचे हरण केले आहे, धर्माला धरून त्याचे वर्तन नाही ही गोष्ट त्याचा भाऊ बिभीषण याला मान्य नाही. म्हणून श्रीरामांना तो शरण गेला आहे. शत्रूच्या गटातील शरणागताचा स्वीकार श्रीरामचंद्रांनी केला आहे. 

श्रीरामचंद्रामध्ये उत्तम नेतृत्व गुण आहे. पुढच्या माणसांमधील गुणांचा विकास करतात. सुग्रीव अत्यंत भयभीत झाल्यामुळे त्याला स्वतःच्या सामर्थ्याचा विसर पडला. तेव्हा त्याच्यामधील गुण जागे करून त्याचा आत्मविश्वास श्रीरामांनी वाढवला आहे.  त्याचबरोबर ते उत्तम संघटक देखील आहेत. रावणावर चाल करून जाताना खूप मोठी सेना त्यांच्या बरोबर आहे. वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी युद्धासाठी जे सैन्य जमवले त्यामध्ये कोणी मोठे राजे नाहीत तर चौदा वर्षात जे आदिवासी, वंचित समाजातील सर्व सामान्य भेटले त्यांचे संघटन त्यांनी केले. गुह, सुग्रीव अशा अनेकांना घेऊन आपले सैन्य त्यांनी तयार केले.

भगवंताचा वनवास धर्मरक्षणार्थ, कर्तव्य पालनासाठी, वडिलांना दिलेले वाचन पूर्ण करण्यासाठी आहे. भगवंतांनी सुग्रीवाची बाजू घेतली कारण त्याच्यावर अन्याय झाला आहे. ज्याच्या पत्नीचे हरण झाले आहे, त्याची बाजू समजून न घेता बलपूर्वक ज्याला राज्यातून हाकलून दिले आहे अशा सुग्रीवाची बाजू त्यांनी घेतली आहे 

श्रीरामचंद्र एक आदर्श पुत्र, आदर्श बंधू, राज्यधर्माचे पालन करणारा, आदर्श राजा असे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. श्रीरामाने आईवडिलांच्या आज्ञांचे सदैव पालन केले. रामराज्यामध्ये जनहितार्थ या शब्दाला तेव्हाचे राजे प्रामाणिक होते. कुटुंबाला, स्वहिताला दुय्यम स्थान देऊन जनतेचे कल्याण हे महत्वाचे मानले जात होते. प्रजेने जेव्हा सीतेविषयी संशय व्यक्त केला तेव्हा स्वतःच्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता प्रजेसाठी, राजधर्माचे पालन करण्यासाठी आपल्या धर्मपत्नीचा त्यांनी त्याग केला. श्रीरामांनी धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या आहेत म्हणूनच मर्यादापुरुषोत्तम असा त्यांचा गौरव केला जातो. 

एकपत्नी, एकवचनी, एकबाणी अशा श्रीरामचंद्रांनी आपल्या वागण्या, बोलण्यातून, एक आदर्श निर्माण केला. नरदेहप्राप्ती नंतर आपल्यामधील दैवी गुणांच्या साहाय्याने मनुष्य कसे उच्च कोटीतील आदर्श जीवन जगू शकतो हे रामचंद्रांच्या चरित्रातून पाहायला मिळते. श्रीरामांमध्ये असणाऱ्या या गुणांचे चिंतन करून आपल्यामध्ये हे गुण बाणावेत असे रघुनाथाचा गुण  घ्यावा यामधून समर्थ सुचवत आहेत. समर्थानी दासबॊधामध्ये महंत लक्षणे स्पष्ट करताना श्रीरामांच्या गुणांचा आदर्श समोर ठेवला आहे. समर्थांचा महंत श्रीरामांप्रमाणेच समर्थ मनोबलाचा आणि अनेक लोकांचा आधार आहे. समर्थांच्या काळात धर्मरक्षणासाठी, दुर्जनांपासून सामान्यांचे रक्षण करण्यासाठी श्रीरामाच्या आदर्शाची गरज होती. समाजाची गरज ओळखून समर्थानी रामांचा पराक्रम त्याच बरोबर त्याच्यामध्ये असणाऱ्या अनेक सद्गुणांचे दर्शन आपल्या प्रबोधनातून घडवले आहे. आजच्या काळात देखील अन्यायाला विरोध करणाऱ्या या आवेशाची गरज आहे. भ्रष्टाचार, लाचलुचपत, स्त्रियांवर होणारे अत्याचार, यासर्वाला आळा घालण्यासाठी अशा रणकर्कश्य आवेशाची आणि सद्गुणांचा आदर्श तरुण पिढीसमोर असणे आवश्यक आहे. आपल्याला प्राप्त झालेल्या बळाचा वापर रावणासारखा दीनदुबळ्यांवर न करता अन्याया विरोधात त्याचा वापर करणे गरजेचे आहेत हे तरुणांच्या मनात रुजणे आवश्यक आहे. रामनामाचा जप करताना त्याच्या या गुणांचे चिंतन करून ते आत्मसात करणे हे समाजहिताच्या दृष्टीने उपयुक्त आहे. त्यांच्या गुणांचा गौरव करून त्या गुणांचे अनुकरण  करणे, त्याच्या वागण्या-सवरण्याचा आदर्श आपल्या आचरणातून व्यक्त करणे म्हणजेच त्याची खरी उपासना होय!

जय जय रघुवीर समर्थ 

No comments:

Post a Comment