सकारात्मक विचारवंत समर्थ रामदासस्वामी
संत ही महाराष्ट्राला मिळालेली देणगी आहे. यासर्व संतांनी अमूल्य अशी कामगिरी केली. त्यांनी काही निश्चित उद्दिष्ट आपले जीवन कार्य मानून समाजाची मशागत करण्याचे महत्वपूर्ण कार्य केले. अस्थिर समाजामध्ये स्थैर्य आणण्याचे, भरकटलेल्या समाजाला योग्य मार्ग दाखवण्याचे, त्यांना परमार्थमार्गाला लावून धर्माची शिकवण देण्याचे मौलिक कार्य या संतांनी केले. या संतप्रभावळीत समर्थ रामदासस्वामी आपल्या वैशिष्ट्यासह उठून दिसतात.
समर्थांचे एकूण ७४ वर्षाचे जीवन म्हणजे एक क्रांतीच होती. त्याकाळाचा विचार करता समर्थानी जे कार्य केले ते गौरवास्पद होते. अस्मानी सुलतानी संकटाला तोंड देणारी जनता अत्याचार सहन करून दुबळी बनली होती. सुलतानी संकट इतके प्रबळ होते की त्यांच्या अत्याचाराने देश पोखरून निघाला होता. सततची आक्रमणे, लुटालूट, जाळपोळ, स्त्रियांची विटंबना, देवळांचा विध्वंस धर्मांतर अशा प्रकारे छळ करून शत्रूने आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. अशा परिस्थितीत समर्थानी समाजामध्ये संघटन घडवून आणले. समाजावर जे भीतीचे सावट होते ते दूर करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. आपले कार्य करत असताना त्यांनी ज्ञानसत्ता, राजसत्ता, धर्मसत्ता आणि आत्मसत्ता या चार सत्ता दृढ केल्या. अनेक ठिकाणी आपले मठ स्थापन करून त्याठिकाणी एका महंतांची नेमणूक करून आपलं संप्रदायाचे जाळे सर्वत्र विणले. समाजामध्ये सकारात्मक विचारांची ऊर्जा निर्माण केली. त्यांनी आपले सारे आयुष्य वैयक्तिक सुखाकरता व्यतीत न करता लोकोध्दार आणि आत्मोद्धार यासाठी समर्पित केले. त्यांच्या संघटनात्मक कार्याइतकेच त्यांचे वाड्मयीन कर्तृत्व देखील तितकेच मोलाचे आहे. धर्मकारण, राजकारण, आणि समाजकारण करताना त्यांनी विपुल प्रमाणात वाड्मय निर्मिती केली. यामाध्यमातून त्यांनी दिलेली शिकवण जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करणारी आहे. त्यांच्या वाङमयातून त्यांचे सूक्ष्म निरीक्षण आणि सखोल चिंतन करण्याची त्यांची प्रवृत्ती याचे दर्शन घडते. त्यांच्या वाड्मयात त्यांनी कर्मवादाला अधिक प्राधान्य दिले आहे म्हणून त्यांना सकारात्मक विचारवंत म्हणावेसे वाटते.
समर्थ संप्रदायामध्ये श्रीमद दासबोध ग्रंथाचे स्थान अनन्य साधारण आहे. ७७५१ ओव्यांचा दासबोध २० दशकामध्ये गुंफला गेला आहे. या २० दशकातील २०० समासांमध्ये प्रपंच्यापासून ते ब्रह्मऐक्य साधण्यापर्यंतचे सर्व विषय हाताळले गेले आहेत. या ग्रंथामध्ये समर्थानी मानवी जीवन आनंदी करण्यासाठी अनेक जीवनमूल्ये आपल्या समोर छोट्या छोट्या सूत्रामधून व्यक्त केली आहेत. जगण्यावर भरभरून प्रेम करायला शिकवणारा हा ग्रंथ सृष्टीचा मनापासून आस्वाद घ्या पण आसक्त होऊ नका हा संदेश देतो. कारण आसक्ती ही सर्व दुःखाचे मूळ कारण आहे. विवेकाच्या आधारे मन ताब्यात ठेवून जीवनमार्ग आक्रमण केला तर निश्चितच सुखी व आनंदी जीवन जगता येऊ शकते हा विश्वास या ग्रंथातून मिळतो. कोणत्याही प्रकारचे नैराश्य दूर करणारा असा हा ग्रंथ.
सर्वसामान्य मनुष्य विषयलोलुप असतो. जीवन क्षणभंगुर आहे याची कल्पना असून देखील ते सुखकर होण्यासाठी सतत धडपडत असतो. सुखांच्या मागे धावत धावत सुखाचा शोध कधीच संपून जातो. केवळ धावणे आणि सुखसुविधा उपलब्ध करून घेणे या गोंधळात सतत कष्ट करत राहतो. भरपूर पैसा आणि अनेक सुखसोई असल्या तरीही तृप्ती पासून दूरच राहतो. सुखी जीवन जगण्याच्या धडपडीत अनेक ताण तणावांना नकळत सामोरे जात असतो. सतत वाढणाऱ्या गरजांमुळे फक्त असमाधानी जीवन जगतो. सुखाच्या मृगजळामागे धावत धावत मनःशांती हरवून बसतो.
समर्थ दासबोध ग्रंथामध्ये प्रपंच परमार्थाची सांगड घालत असताना सुखी, समाधानी जीवनाचे, मनःशांती प्राप्त करून घेण्याचे सोपे सूत्र समजावून देतात. समर्थांचा प्रपंच करण्याला विरोध नाही. उलट ते म्हणतात,
प्रपंच करावा नेमक । पाहावा परमार्थ विवेक ।
जेणे करीत उभय लोक । संतुष्ट होती ।।
प्रपंचात योग्य कर्म करून परमार्थ साधण्याची कला समर्थ शिकवतात. हा प्रपंच नेटका करताना नकारात्मक विचारणा मनात स्थान न देता सकारात्मक विचारावर भर देण्यास समर्थ सांगत. नेटका प्रपंच करत असताना परमार्थपण करणे गरजेचे आहे या समजुतीने सकाळी पूजापाठ किंवा नामस्मरण करतो. दासबोधाचा समास वाचतो. पण त्याचबरोबर दुसऱ्याची निंदा करणे, दुसऱ्याचे दोष काढणे , राग तिरस्कार करणे अशा नाकारात्म कृती देखील आपल्या कडून सहजपणे घडत असतात. त्यामुळे धड ना प्रपंच धड ना परमार्थ अशी अवस्था होते. या नकारात्मक विचारांचे उच्चाटन करून सकारात्मक विचारांच्या साहाय्याने ‘नॆटके’ आणि ‘नेमके’ आनंदी जीवन जगण्यासाठी समर्थ वाणीवर संयम ठेवण्यास प्रवृत्त करतात.
जगामध्ये जगमित्र । जिव्हेपाशी आहे सूत्र ।
लोकसंग्रहाच्या दृष्टीने समर्थानी वाणीचे महत्व वारंवार स्पष्ट केले आहे. आजच्या युगात देखील कामाच्या ठिकणी ‘टीमवर्क’ असते तेव्हा परस्परांच्या साहाय्याने कितीही अवघड काम यशस्वी होते. अशावेळी एकमेकांना समजून घेऊन कोणाचे मन न दुखावता काम करणे गरजेचे असते. आपली वाणी जर गोड असेल, दुसऱ्याला जाणून घेण्याची क्षमता असेल तर अशा व्यक्ती जीवनात यशाच्या शिखराच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतो. आपल्या बोलण्यातून अनेक मित्र जसे आपण जोडत असतो तसेच अनेक शत्रू देखील निर्माण होत असतात. म्हणूनच शब्द उच्चारताना माणसाने स्वतःवरून दुसऱ्याची परीक्षा करावी. दुसऱ्याचे कटू शब्द जसे आपले मन दुखावतात तसेच आपले कठोर शब्द दुसऱ्याचे मन दुखावतात याचे भान ठेवणे आवश्यक आहे,
कठीण शब्दे वाईट वाटते । हे तो प्रत्ययास येते ।
तर मग वाईट बोलावे ते । काय निमित्ते ।।
स्वतःवरून दुसऱ्याचे अंतःकरण कसे जाणावे याचे सोपे सूत्र यातुन आपल्या समोर समर्थ मांडतात. दुसऱ्याचे मन दुखावणे ही एक प्रकारची हिंसाच आहे. अशी मानसिक हिंसा आपल्या कडून घडू नये म्हणून समर्थ आपल्याला सावध करत आहेत.
आजच्या धावपळीच्या आणि अती व्यस्त दिनक्रमामध्ये “ स्ट्रेस” या शब्दाला अतिशय महत्त्व आले आहे. हा ताण अनेक कारणामुळे वाढत असतो. अहंकार, अपयश, अस्थिरता, अविचार, अनारोग्य, अशांतता या ‘अ’ च्या बाराखडीतून ताण वाढत असतो. हा ताण कमी करण्यासाठी आणि जगामध्ये जगमित्र होण्यासाठी एकमेकींविषयी वाटणारा राग, द्वेष, मत्सर या दुर्गुणांचा त्याग होणे गरजेचे आहे. स्वतःच्या विकासासाठी सुदृढ आरोग्यासाठी आणि मनाच्या प्रसन्नतेसाठी समर्थ षड्रिपूंवर विजय मिळवण्यास सांगतात. या विकारांपैकी क्रोध हा माणसाचा प्रधान शत्रू आहे. मनावरचा ताण वाढवणारा हा विकार बळावतो कसा तर,
अभिमानें उठे मत्सर । मत्सरे ये तिरस्कार ।
पुढे क्रोधाचा विकर । प्रबळ बळे ।।
विचारशक्ती नष्ट करणारा असा हा क्रोध स्वतःबरोबर इतरांचा देखील नाश करतो. भगवद्गीतेत भगवंतांनी स्पष्टपणे सांगितले आहे, ’क्रोधामुळे भ्रम होतो, विवेक सुटतो, भ्रमामुळे तसेच अविवेकामुळे विस्मरण होते, विस्मरणामुळे निश्चयात्मक बुद्धी नष्ट होते आणि बुद्धिनाश झाला, विवेकाचा नाश झाला की सर्वस्वाचा नाश होतो’. काम, क्रोध, लोभ हे दोष नरकाची तीन द्वारे आहेत आणि आत्म्याचा नाश करणारी आहेत म्हणून त्याचा त्याग करावा. आजच्या २१व्या शतकामध्ये मानवाने आपले जीवन सुखी होण्यासाठी अनेक क्षेत्रांत प्रगती केली दिसते. आपल्या देहाला कमीत कमी कष्ट देऊन जास्ती जास्त सुख कसे प्राप्त करून घेत येईल या दृष्टीने तो सतत प्रयत्नशील असतो. या बाह्य सजावटीकडे लक्ष देताना आपले मन देखील सुदृढ असावे याकडे मात्र त्याचे दुर्लक्ष झालेले दिसते. भोगवादीवृत्ती आणि मानसिक विकासाकडे दुर्लक्ष यामुळेच परस्परांविषयी राग, द्वेष, हेवेदावे, मत्सर या असुरी संपत्तीचा अधिकाधिक विकास होताना दिसतो. माणसाचे माणूसपण हरवणाऱ्या या विकारांना माउलींनी ‘विषयदरीचे वाघ’ म्हणून संबोधले आहे.
जेथे काम आहे तेथे क्रोध हा स्वाभाविकपणे येतोच. व्यक्तीच्या मनामध्ये विषय तृप्तीच्या गोष्टीकडे धावणारे जे विचार येतात ते म्हणजे इच्छा, कामना. मग ही कामना शरीर भोगाविषयी असो अथवा कोणत्याही इंद्रियांची तृप्ती करण्याविषयी असो. काम हा विकार आहे. जेव्हा शृंगारातील पावित्र्याची भावना संपुष्टात येते तेव्हा या विकारामध्ये विकृती निर्माण होते. या विकृतीमधूनच लहान वयातील मुलीपासून ते वृद्ध स्त्रियांपर्यंत अनेक जणींवर अत्याचार झाल्याचे वृत्त आपल्या कानावर येते. तरुण पिढीवर याचा एवढा प्रभाव दिसतो की उघड्यावर होणारे मिलन यामध्ये त्यांना काहीच गैर वाटत नाही. लोकांना ना भय, ना लज्जा यामुळे अनाथालयांची वाढ, एड्स सारखे रोग उद्भवतात. विषय वासनांनी ग्रासलेल्या जीवाविषयी समर्थ म्हणतात, ‘अतीविषयी सर्वदा दैन्यवाणा’ अशा या काम विकाराने ग्रासलेल्या लोकांच्या कामात जर अडथळा आला तर त्याचा क्रोध बळावतो. यातूनच खूनाचे वाढते प्रमाण, एकतर्फी प्रेमाची अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात. काम, क्रोध हे असे विकार आहेत ज्यामुळे शत्रूत्वच निर्माण होऊ शकते. शरीराची आणि मनाची हानी करणाऱ्या विकारांवर विजय मिळवून आनंदी जीवन जगण्याची कलाच समर्थ आपल्याला शिकवित आहेत.
अवगुण सोडीत जाती । उत्तम गुण अभ्यासिता येती ।
कुविद्या सांडून सिकती । शहाणे विद्या ।।
हे दासबोधाचे प्रधान सूत्र आहे. स्वभावाला औषध नाही असे म्हणतात. परंतु प्रयत्नांच्या आधारे माणूस आपल्याला हवा तसा बदल घडवून आणू शकतो हा विश्वास समर्थ आपल्या मनामध्ये निर्माण करतात. अचूक प्रयत्नांच्या आधारे मनावर संयम ठेवून, सातत्याचे उत्तम गुण अभ्यासपूर्वक आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर हे परिवर्तन सहज शक्य आहे हे समर्थ याठिकाणी ठामपणे सांगत आहेत. मनाच्या श्लोकामध्ये व्यावहारिक कर्माला दिशा देताना समर्थ ‘सदा’, ‘सर्वदा’ या शब्दांचा वापर करतात. यामध्ये सातत्य आणि चिकाटी हे गुण समर्थांना अपेक्षित आहेत.
समर्थानी आपल्या कृतीतून, विचारांमधून प्रयत्नवादाचा पुरस्कार केला. यत्न तो देव जाणावा । यत्ने विण दरिद्रता । या बोधवाक्यातून समर्थ आपल्याला प्रयत्नांना देव मानण्याची शिकवण देत आहेत. कोणत्याही गोष्टीत यश मिळवण्यासाठी अचूक प्रयत्न आणि कष्ट करण्याची तयारी महत्वाची आहे.
कष्टेविण फळ नाही । कष्टेविण राज्य नाही ।
केल्याविण होत नाही । साध्य जनीं ।।
समर्थांच्या या उक्तीमधून मनाच्या संकल्प शक्तीचा प्रत्यय येतो. अचूक प्रयत्न, जिद्द आणि कष्ट केल्याशिवाय सुखाची प्राप्ती होत नाही. काही व्यक्ती अशा असतात की त्यांना आपल्या प्रतिष्ठेला शोभेल असेच काम करायला आवडते. त्यामुळे आयुष्यात आलेल्या अनेक संधी त्यांना गमवाव्या लागतात.
आधी कष्टाचे दुःख सोसीती । ते पुढे सुखाचे फळ भोगिती ।
आधी आळसे सुखावती । त्यास पुढे दुःख ।।
सातत्य, चिकाटी, दृढनिश्चय आणि ठाम विश्वास ही पुंजी जवळ असेल तर यश आपल्या पासून नक्कीच लांब नाही. पण प्रयत्नांची कास न धरता केवळ दैवावर हवाला ठेवून आळशीपणा केला तर मात्र अपयश पदरात पडते. शत्रू हे केवळ बाहेरच्या जगात असतात असे नाही तर ते आपल्या मनात देखील असतात. आळस हा असाच एक शत्रू आहे. या दुर्गुणांमुळे प्रयत्न करण्याची इच्छाच होत नाही. एवढेच नाही तर वेळेचा देखील उपयोग करून घेता येत नाही. आळस हे करंटेपणाचे लक्षण आहे म्हणूनच समर्थ त्याचा निषेध करतात. आपल्याला सर्वस्वी बुडविणाऱ्या आळसाचाच आळस करण्याची शिकवण समर्थ देतात.
केल्याने होत आहे रे । आधी केलेची पाहिजे ।
यत्न तो देव जाणावा । अंतरी धरिला बरे ।।
असे विचारधन देऊन समर्थानी लोकांना प्रयत्नवादी बनविले.
समर्थांचा प्रत्येक विचार मनातील नैराश्य घालवून सतत सकारात्मक विचारांना पोषक ठरतो. मन सशक्त असेल, आत्मविश्वास प्रबळ असेल तर नैराश्याला थारा मिळत नाही. आत्मविश्वास यशाची गुरुकिल्ली आहे. व्यक्तिमत्व सुधारावयाचे असेल तर स्वतःवर, स्वतःच्या विचारांवर विश्वास असणे गरजेचे आहे.
सभा देखोन गळो नये । समयी उत्तर टळो नये ।
धि:करता चळो नये । धारिष्ट आपुले ।।
आत्मविश्वास वाढविणारा हा विचार नक्कीच प्रेरणा दायी आहे. वास्तविक आत्मविश्वास हा मानसिकतेवर अवलंबून असतो. म्हणजेच तो मनाचा गुणधर्म झाला. ज्याचे मन खंबीर असेल त्याचा आत्मविश्वास जास्त. मन खंबीर नसेल तर सध्या प्रसंगात देखील आत्मविश्वास डळमळीत होतो आणि नैराश्य येते. त्यामुळे विचार करण्याची क्षमता हरवून जाते. कामात येणारे अपयश, दुरावलेले नातेसंबंध , यामुळे आलेले नैराश्य त्या व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करते. यासाठीच मन खंबीर आणि स्थिर असणे आवश्यक असते. समर्थानी आपल्या विचारातून आत्मविश्वास जागा केला. आपल्या विचारातून अंतरंगातील सामर्थ्याला अधिक महत्व दिले.
समर्थानी वेळेचे महत्व पदोपदी समजावून दिले आहे. आपल्या आयुष्यातील एकही क्षण वाया जाऊ न देणे हे खरे भाग्याचे लक्षण आहे.
ऐक सदेवपणाचे लक्षण । रिकामा जाऊ नेदी येक क्षण ।
प्रपंचवेवसायाचे ज्ञान । बरे पाहे ।।
आपल्या आयुष्यात वेळेला अतिशय महत्व आहे. सामान्य माणसाने आपले जीवन यशस्वी पद्धतीने कसे जगावे याची रूपरेषा समर्थ आखून देतात. प्रातःकाळी उठून काही पाठांतर करावे, पाठांतर करून संध्या करावी, पितृतर्पण करावे, देवाची पूजा करावी, आणि यथासांग वैश्वदेव करावा. व्यवहारात वागताना प्रामाणिकपणा आणि सावधपणा बाळगावा. सर्वांशी गोड बोलावे, स्नेह जोडावा, जेवण झाल्यावर थोडे वाचन, चर्चा करावी एकांतात बसून निरनिराळ्या ग्रंथांचा अभ्यास करावा. ज्याला आपल्या आयुष्यात काही करावयाचे त्याने आपला वेळ सत्कार्णी लावावा असा आदर्श समर्थांनी आपल्या समोर ठेवला आहे." बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले " समर्थांनी स्वत: याच पध्द्तीने आपले आचरण ठेवले होते. आपल्या दिवसाचे योग्य ते नियोजन केल्याने अनावश्यक ताण टाळता येतो. त्यामुळे शरीराचे आणि मनाचे देखील आरोग्य उत्तम राहते. आजच्या वेगवान आयुष्यात वेळेचे नियोजन अत्यंत गरजेचे आहे. शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी कामा बरोबर वेळेत जेवण आणि पुरेशी झोप तितकीच महत्वाची आहे. मनाचे उत्तम आरोग्य आपल्याला खूप बळ देतो. त्यामुळे भोवताली असलेल्या कठीण परिस्थिती वर देखील सहज मात करता येते.
समर्थ नकारात्मक लक्षणांना म्हणजेच निंदा, द्वेष, याचा निषेध करतात. आपल्या प्रबोधनात सकारात्मक विचारावर त्यांनी अधिक भर दिला. सकारात्मक ऊर्जा आपले शाररिक, मानसिक आरोग्य उत्तम राखण्यास मदत करते. यासाठी काही सवयी जाणीवपूर्वक स्वतःला लावून घेणे गरजेचे असते. उत्तम सवयी देहाला लागाव्यात यासाठी समर्थ प्रोत्सहीत करतात,
सवे लावता सवे पडे । सवे पडता वस्तू आतुडे ।
नित्यानित्य विचारे घडे । समाधान ।।
मनुष्यामध्ये एक महत्वाचा दोष आहे की त्याला वाईट सवयी बाहेरून येऊन चिकटतात. पण कालांतराने त्याच अगदी चांगल्या आणि जवळच्या वाटतात. यासाठी अध्यात्म शास्त्रात संत्सगचे महत्व विषद केले आहे. उत्तम संगत, उत्तम सवयी,यासाठी लागणारे सातत्य, चिकाटी यावर समर्थ सतत भर देतात. सकारात्मकतेच्या माध्यमातून उत्तमोत्तमचा संग्रह करून जे जे उत्तम आहे ते प्राप्त करून घेण्यास समर्थ प्रवृत्त करतात.
आज काळ बदलला, युगे बदलली, मनुष्याचे राहणीमान बदलले, विज्ञान प्रगत झाले परंतु माणसाची वृत्ती मात्र तशीच राहीली. त्यामुळे प्रगतीच्या अत्युच्च शिखरावर पोहोचून देखील मनुष्य असमाधानीच राहीला. माझे ते माझे आणि तुझे तेही माझेच ही त्याची वृत्ती इतकी बळावली की हिंसाचार वाढला. मनुष्य आपल्याला प्राप्त झालेल्या या सामर्थ्याचा उपयोग दुस-याच्या नाशासाठी करताना दिसतो. जगात घडणारे अतिरेकी हल्ले, बॉम्बस्फ़ोट या घटनातून यागोष्टी प्रकर्षाने जाणवतात. राग, व्देष, मत्सर, कोणत्या प्रकारची टोकाची हानी करु शकतात याचे आपल्याला प्रत्यंतर येते. विकारांच्या आधीन गेलेला मानव अत्यंत अस्वस्थ, अस्थिर, असमाधानी आयुष्य व्यतित करत आहे. प्रगतीच्या शिखराकडे वाट्चाल करणारा मानव विचारांनी मात्र अप्रगतच राहीला असे वाटते. विचारांची व्यापकता त्याच्यामध्ये नसल्यामुळे समर्थांच्या उपासनेचा व्यापक अर्थ त्याच्या मनापर्यंत पोहोचु शकत नाही. उपासनेचा गजर करणारे समर्थ " विश्वावर आपलेपणाने प्रेम करा " ही उपासना शिकवितात. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी अंतरात्मा आहे. म्हणून कोणाचेही अंत:करण न दुखावणे ही उपासना सांगतात.
समाधानी, सशक्त, आनंदी जीवन जगण्यासाठी मनःशांती देणाऱ्या सकारात्मक विचारांची सांगत आज आवश्यक आहे. कुटुंबामधील हरवलेला संवाद, कुटुंबात असून देखील आलेले एकटेपण, बदललेली जीवनशैली, यासर्वांमुळे एक अस्थिरता कुटुंबामध्ये त्याचबरोबर समाजामध्ये आलेली आहे. आजच्या परिस्थितीत काही चांगले घडावयाचे असेल तर सकारात्मक विचारांना दिशा देणारे तसेच मन:शांती देणारे समर्थांचे वाड्मय नक्कीच मार्गदर्शक ठरणारे आहे. त्यांच्या ग्रंथातील समर्थ विचारानेच समाज सशक्त आणि समर्थ बनणार आहे. समर्थ आपल्यात राहूनच आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत. त्यासाठी सावधपणे, उघड्या डोळ्यांनी त्यांचा शोध घेतला पाहिजे, तरच त्याचा प्रत्यय येणार आहे.
धर्मस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार । झाले आहेत पुढे होणार । देणे ईश्वराचे ॥
जय जय रघुवीर समर्थ
No comments:
Post a Comment