||श्रीराम ||
समर्थ शिष्य उद्धव स्वामी
डॉ. सौ. माधवी महाजन
madhavimahajan17@gmail.com
महाराष्ट्रातील संतपरंपरेत समर्थ रामदास यांचे व्यक्तिमत्त्व अद्वितीय होते. बारा वर्षांचे पुरश्चरण आणि भारतभ्रमणातून त्यांनी आपल्या कार्याची दिशा निश्चित केली. जनजागृतीचे कार्य एकट्याचे नसल्याचे ओळखून त्यांनी योग्य तरुण शिष्यांची निवड केली, मारुती मंदिरांची स्थापना करून बलोपासनेचा प्रसार केला. देशभर मठ स्थापन करून त्यांनी सक्षम शिष्यांना महंत म्हणून नेमले आणि “महंते महंत करावे” या तत्त्वावर कार्याचा व्यापक विस्तार घडवून आणला. समर्थांच्या विचारांचा प्रचार करून जनजागृतीचे कार्य पार पाडत असताना या शिष्यांनी आपली परमार्थिक उंची कायम ठेवली. याशिवाय अत्यंत प्रभावी वाड्मय निर्माण करून आपल्या स्वतंत्र विचारांचा ठसा उमटवला आहे. विलक्षण तेजस्वी आणि समर्थ असे अनेक शिष्य समर्थांनी निर्माण केले. समर्थांचे कार्य व्यापक होते त्यामुळे त्यांचा शिष्यपरिवार देखील फार मोठा होता.
समर्थ जेव्हा शिष्य पारखून घेत तेव्हा ते लहान व चुणचुणीत मुलांना अधिक प्राधान्य देत. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना आपल्या कार्याच्या दृष्टीने तयार करीत. अशी तीक्ष्ण, सखोल बुद्धीची मुले समर्थांच्या कठोर परीक्षेतून तावूनसुलाखून बाहेर पडत आणि स्वतःला गुरुसेवेत वाहून घेत असत. समर्थांप्रमाणेच त्यांच्या शिष्यांनी देखील विपुल प्रमाणात वाड्मय निर्मिती केलेली दिसते. समर्थांचे हे शिष्य व त्यांची ग्रंथरचना हे समर्थ संप्रदायाचे एक वेगळेपण ठरते.
समर्थांच्या या शिष्य मंदियाळीमध्ये समर्थांचे लाडके आणि पहिले शिष्य उद्धव स्वामी यांचे चरित्र फारसे समोर येत नाही. उद्धव स्वामी हे रामदासांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जातात. समर्थांचे निस्सीम भक्त ही त्यांची खरी ओळख आहे. नाशिक पंचवटी पासून साधारण तीन मैलावर टाकळी येथे उद्धवस्वामींचा मठ आहे. येथून जवळच नंदिनी आणि गोदावरी नद्यांचा संगम आहे. याठिकाणीच समर्थांनी १२ वर्षे नदीच्या पत्रात उभे राहून पुरश्चरण केले.
समर्थ रामदास यांच्याविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की, त्यांनी सती जाणाऱ्या स्त्रीला “अष्टपुत्रा सौभाग्यवती भव” असा आशीर्वाद दिला. प्रसंग लक्षात येताच त्यांनी हा आशीर्वाद रामकृपेने फलित होईल असे सांगून मंत्रसामर्थ्याने त्या मृत व्यक्तीस जिवंत केले. पुढे त्या दांपत्याला दहा पुत्र झाले आणि त्यांचे आडनाव ‘दशपुत्रे’ पडले. या पुत्रांपैकी पहिला म्हणजे उद्धव स्वामी. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना समर्थांच्या चरणी अर्पण केले. समर्थांनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले. इथपासूनच समर्थ संप्रदायाची शिष्यपरंपरा सुरू झाली असे म्हणायला हरकत नाही.
समर्थ रामदास यांचे पुढे अनेक शिष्य झाले, पण त्यांच्या सान्निध्यात बालपण घालवण्याचे भाग्य उद्धव स्वामी यांनाच लाभले. त्यांच्या बुद्धिमत्तेचे समर्थांना विशेष कौतुक होते. समर्थांनी लेखन आणि वाचन यावर विशेष भर दिला. “दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे” हा त्यांचा दंडक होता. त्यामुळेच त्यांच्या शिष्यांनी दासबोध, अभंग आणि अनेक ग्रंथ सुंदर हस्ताक्षरात लिहून जतन केले. उद्धव स्वामींचे हस्ताक्षर अतिशय सुंदर होते. लेखन कसे असावे याविषयी समर्थांनी जे नियम सांगितले आहेत त्या चौकटीत बसणारे उद्धवाचे हस्ताक्षर होते. रोज एक पान तरी लिहावे हा उद्धव स्वामींचा गुण जरी मुलांनी उचलला तरी त्यांचे निश्चित कल्याण होईल.
लहानपणी उद्धव स्वामी यांना समर्थ रामदास गमतीने विचारत, “तू प्रपंची होणार का परमार्थिक?” आणि हा बालशिष्य निर्धाराने उत्तर देत असे “मी परमार्थिक होणार!”. वैराग्य ही जणू त्यांना लाभलेली ईश्वरदत्त देणगीच होती. समर्थांच्या सहवासात भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचे संस्कार त्यांच्या बालमनावर खोलवर रुजले. त्यांचे भाग्यही विलक्षण होते. समर्थांच्या मांडीवर बसून त्यांची मुंज झाली. समर्थ संप्रदायात हे अद्वितीय सौभाग्य केवळ दोघांनाच लाभले ते म्हणजे उद्धव स्वामी आणि राघवस्वामी.
मुंज झाल्यानंतर उद्धव स्वामी सतत समर्थ रामदास यांच्या सहवासात राहू लागले. ध्यानगुंफेत राहून त्यांनी जप, वाचन, लेखन आणि चिंतन यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. दुपारी ते समर्थांसोबत भिक्षेलाही जात असत. अल्पवयातच त्यांच्यात प्रकट झालेले वैराग्य पाहून सर्वांना आश्चर्य वाटे. जणू प्राचीन ऋषीपरंपरेचा वारसा घेऊनच ते जन्मले होते. कौटुंबिक मोह बाजूला ठेवून ज्ञानमार्ग स्वीकारण्याची जाणीव त्यांना लहानपणीच झाली होती. सुमारे वर्षभर त्यांनी ध्यानगुंफेत अशी साधना केली.
लहानपणापासून समर्थ रामदास यांच्या सहवासात राहिल्याने, ते तीर्थयात्रेला निघाले तेव्हा उद्धव स्वामी अत्यंत व्याकुळ झाले आणि त्यांच्यासोबत जाण्याचा हट्ट करू लागले. तेव्हा समर्थांनी त्यांना समजावले, “बारा वर्षे कठोर साधना करून मन स्थिर कर, आत्मज्ञान प्राप्त कर; त्यानंतर तू हवे तसे कार्य कर.” शके १५५५ (इ.स. १६३३) मध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी समर्थांनी स्वहस्ते गोमयाच्या मारुतीची मूर्ती स्थापन केली. हाच त्यांचा पहिला मारुती. टाकळी येथील मठाची जबाबदारी उद्धवांना देऊन त्यांना संप्रदायाची दीक्षा दिली. इथूनपुढे ते उद्धवस्वामी म्हणून प्रसिद्ध झाले.
वयाच्या आठव्या वर्षी मठपती होण्याचं भाग्य उद्धवाला लाभल होत. उद्धवस्वामी सगळ्यांच्या श्रद्धेच आणि आदराचे स्थान झाले होते. बालवयातील त्यांचा निर्धार सगळ्यांच्या कौतुकाचा विषय झालं होता. आत्मारामबुवा यांनी दासविश्रामधाम मध्ये उद्धवाचे छान वर्णन केले आहे,
शहाणा सुंदर धीर उदार | काळाप्रवीणू गाईक चतुर |
सद्गुरू सेवणी हा तत्पर | प्रत्यक्ष ज्या सदा मारुती |
लाडका मोठा गुरुदेवाचा | निर्मल निश्चल भाव जयाचा |
आठव नसे ज्या प्रपंचाचा | सेवित राहिला सान्निधी||
या वर्णनावरुन त्याच्या लोभस व्यक्तिमत्वाची यथार्थ ओळख होते.
भारतभ्रमणाला निघताना समर्थांनी उद्धव स्वामीना टाकळी येथे पुरश्चरण करण्याची आज्ञा दिली. गुरूंच्या आदर्शाप्रमाणे उद्धवांनी बारा वर्षे गायत्री मंत्राचे पुरश्चरण व रामनामाचे तेरा कोटी जप पूर्ण केले. समर्थ परत येईपर्यंत ते टाकळी येथेच साधनेत मग्न राहिले. नंतर त्यांनी अनेकांना भक्तिमार्गाला लावले आणि समर्थांप्रमाणेच आयुष्यभर लोकसंग्रह व संघटनाचे महान कार्य केले.
उद्धव स्वामींच्या चरित्रात एका प्रसंग येतो, ते एकदा माहुली येथे वास्तव्याला असताना कृष्णा-वेण्णा संगमावर स्नान करून ते संध्या-जप करत बसले होते. तेव्हा एका अत्याचारी ठाणेदाराने त्यांना पकडून अंधाऱ्या कोठडीत बंद केले. दोन-तीन दिवस उपाशी ठेवून छळ करण्यात आला. उद्धव स्वामी मनोमन समर्थ रामदास यांना धावा करत होते. परळी येथे असलेल्या समर्थांना ही बातमी कळताच ते संतप्त होऊन माहुलीत आले. त्यांचे तेज आणि बळ बघून त्या प्रखर रूपाला घाबरून ठाणेदाराने माघार घेतली. समर्थांनी त्याला शिक्षा करून उद्धव स्वामींची सुटका केली.
या प्रसंगातून शक्तीशिवाय धर्म टिकत नाही हे समर्थ ध्यानात आणून देतात. साधकांनी केवळ भक्तीच नव्हे तर सामर्थ्यही वाढवावे. अन्याय करू नका, पण अन्याय सहनही करू नका, त्याला प्रत्युत्तर देण्याइतके सक्षम बना ही समर्थांची शिकवण होती. समर्थानी आपल्या सगळ्या मठातील तरुण साधकांनी रोज कमीत कमी ५०० तरी सूर्यनमस्कार घातले पाहिजेत हा दंडक यासाठीच घालून दिला होता. हिंदू समाज अत्यंत दुबळा झाला होता. दयेच्या आणि शांतीच्या नावाखाली सगळीकडे दौर्बल्याची उपासना चालू होती. अन्याया विरोधात निर्भयपणे उभे राहण्यासाठी समर्थानी आपल्या मठांमध्ये ही शक्तीची उपासना चालू केली आणि आपल्या शिष्यांच्या मार्फत ती समाजापर्यंत पोहोचवली. परमेश्वर संकटकाळी मदत करेल असं समजणं हा सुद्धा एक प्रकारचा मनाचा दुबळेपणाच आहे. या प्रसंगातून आपण केवळ बलवान असून उपयोगाच नाही तर योग्य वेळी अन्यायाला प्रतिकार करता आला पाहिजे हे समर्थ विचारांचे समर्थ सूत्र आपल्याला खूप मोठी शिकवण देऊन जाते.
उद्धवस्वामींचा टाकळी मठ गोदावरीच्या पूर्वेस आहे तर इंदूरबोधन याठिकाणीचा त्यांचा दूसरा मठ गोदावरीच्या पश्चिमेला आहे. मूळ मठाला सारंगपूरचा मठ असेही म्हणतात. उद्धव स्वामींच्या या दोन्ही मठाची परंपरा ब्रह्मचारी शिष्यांची आहे. याठिकाणी मठ स्थापन झाला त्याची एक कथा सांगितली जाते. जांबेहून समर्थ रामदास सारंगपूर येथे आले. त्या वेळी आंध्र प्रदेशात भीषण दुष्काळ पडला होता. पाण्यासाठी लोकांची परवड होत होती. सारंगपूर येथे एका सरोवरात साठ ब्राह्मण अनुष्ठान करत उभे होते. समर्थांचे शिष्य उद्धव यांनी चौकशी केली असता कळले की, स्थानिक यवन अधिकाऱ्याने पाऊस पडेपर्यंत त्यांना जबरदस्तीने अनुष्ठान करायला लावले होते.
समर्थांनी तत्काळ सरोवरा शेजारील डोंगरावर हनुमंताची मूर्ती तयार केली व ब्राह्मणांना महारुद्र अभिषेक करण्यास सांगितले. समर्थांच्या तेजाने प्रेरित होऊन त्यांनी श्रद्धेने अभिषेक केला आणि लगेचच मुसळधार पाऊस सुरू झाला. ब्राह्मणांची सुटका झाली. ही वार्ता ऐकून निजामाबादच्या सुलतानाने समर्थांना सन्मानाने बोलावले आणि मठासाठी जमीन दान दिली. समर्थांनी त्या जागेवर प्रभू रामचंद्रांचे मंदिर बांधले. सारंगपूरमधील समर्थ संप्रदाय आणि प्रसाराचे कार्य उत्तम पार पडावे यासाठी उद्धव स्वामीना सारंगपूरचे मठाधिपती केले. समर्थांचे पुरुष शिष्यांपैकी दोन मठांचे अधिपत्य करण्याचा बहुमान फक्त उद्धव स्वामीनाच लाभला.
एका प्रसंगात समर्थांनी त्यांचे नाव ‘शिव’ असे ठेवले होते. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी एक उत्तम घोडा समर्थ रामदास यांना परळी येथे भेट म्हणून पाठवला. घोडा पूर्ण साजसज्ज होता. तो पाहून समर्थ म्हणाले, “याला आधी मोकळं करा.” सेवकांनी घोड्यावरील सर्व साज आणि लगाम काढून टाकले. समर्थांनी त्याच्या पाठीवर उडी मारताच घोडा भरधाव सुटला. उद्धव स्वामी पाण्याचा तुंबा घेऊन सतत समर्थांच्या मागे धावत होते. काही वेळाने तहान लागल्यावर समर्थांनी पाणी मागितले. उद्धवांनी तत्काळ पाणी अर्पण केले. त्यांची ही गुरुनिष्ठा पाहून समर्थ प्रसन्न झाले आणि म्हणाले, “उद्धवा, तुझ्या या सेवेमुळे माझं शिवस्वरूप तृप्त झालं. तुला आयुष्यात कधीही पाण्याची कमतरता भासणार नाही.” त्या प्रसंगानंतर समर्थांनी उद्धवाला ‘शिव’ असे नाव दिले आणि ते पुढे शिवरामस्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले. इंदूर मठात सापडलेल्या उद्धवाच्या बहुतेक कवितेमध्ये शिव किंवा शिवराम हे कवी नाम पहायला मिळते. शके १५७९मध्ये हा प्रसंग घडला. या प्रसंगातून उद्धवाची गुरुनिष्ठा, गुरुप्रेम, याचे दर्शन घडते.
उद्धव स्वामी हे अत्यंत विद्वान आणि समर्थांच्या शिकवणीने घडलेले शिष्य होते. एकदा समर्थ रामदास यांनी सर्वांसमोर अचानक त्यांच्या कीर्तनाची घोषणा केली. उद्धव स्वामींनी तुकाराम महाराजांचा शरण शरण हनुमंता | तुज आलो रामदूता | काय भक्तीच्या त्या वाटा | मज दावाव्या सूभटा || हा अभंग घेत भावपूर्ण कीर्तन सुरू केले. त्यांच्या भक्तीमय कीर्तनाने संपूर्ण वातावरण भारावून गेले. कीर्तनानंतर समर्थांनी पाहिले की उद्धवाच्या वस्त्राला शेंदूर लागला आहे. तेव्हा लक्षात आले की साक्षात मारुतीराया त्यांच्या कीर्तनाला झांज वाजवत साथ देत होते. हे पाहून समर्थ म्हणाले, “उद्धवा, यापुढे बसून कीर्तन कर. आज मारुतीरायाला तुझ्यासाठी उभं राहावं लागलं.” त्या दिवसापासून उद्धव मठाच्या परंपरेत बसून कीर्तन करण्याची प्रथा सुरू झाली.
बलोपासना, रामोपासना आणि संघटनकौशल्य यांचा सुंदर संगम उद्धव स्वामी यांच्यात दिसतो. समर्थ रामदास यांच्यासारखाच त्यांच्यातही उत्तम संघटकपणा होता. एकदा त्यांनी आपल्या सुमारे सातशे शिष्यांसह सज्जनगडावर जाऊन समर्थांचे दर्शन घेतले. आपल्या शिष्यांचा हा विशाल समूह पाहून समर्थांना अत्यानंद झाला आणि त्यांनी उद्धवांना कडकडून मिठी मारली. “महंते महंत करावे” या समर्थविचाराला उद्धवांनी प्रत्यक्ष कृतीत उतरवले. त्यांच्या ग्रंथसंपदा आणि व्यापक शिष्यपरंपरेमुळे समर्थ संप्रदायात त्यांचे स्थान अजरामर झाले.
उद्धवस्वामींची काव्यरचना श्लोक, पदे, प्रकरणे त्यांतील वर्णना वरून उद्धव स्वामींची रामदासांवर दृढ निष्ठा असल्याचे कळून येते. त्यांनी शिवराम या नावानेही काही रचना केल्या आहेत. आम्हीहि पाषाण श्रीनें कमावीलों । शिवराम जालों पावन चि॥ असे त्यांनी लिहून ठेवले आहे. उद्धवस्वामींनी रामदास स्वामींचे गद्य चरित्र लिहिले आहे, असे म्हणतात, ते जर सापडले तर अनेक वादांना पूर्णविराम मिळेल.
उद्धव स्वामींनी समर्थांच्या कार्याचा प्रसार करणारी पद्यरचना केली. त्यांच्या लेखनात समर्थ संप्रदायाची अद्वैतवादी विचारधारा, प्रखर भक्ती आणि स्वधर्मनिष्ठा याचे दर्शन घडते. त्यांची लेखनशैली साधी, बोधप्रद, आणि ओवीबद्ध आहे. त्यांनी राम-हनुमान यांची उपासना, तसेच दास्यभक्ताचा प्रसार करण्यावर अधिक भर दिला. त्यांच्या लेखनात आध्यात्मिक थोरवी व पारमार्थिक कार्य, या दोन्ही पैलूंचा समावेश झालेला दिसतो. परमार्था बरोबर व्यावहारिक जीवनात सामर्थ्यशाली कसे राहावे याचे मार्गदर्शन त्यांच्या साहित्यात घडते. त्यांची ओवीबद्ध रचना भक्ती भावाला अधिक दृढ करणारी आहे.
उद्धवस्वामी शीघ्र कवी होते. समर्थ आपल्या शिष्यां सोबत बसले होते. माघ वाद्य नवमीला देह ठेवायचा असे त्यांनी ठरवले होते. आपला अंतकाळ जवळ आला आहे हे शिष्यांना लक्षात आहे का हे पहाण्यासाठी समर्थांनी एक श्लोक म्हंटला,
रघुकुळटिळकाचा वेध संनिध आला | तदुपरी भजनाने पाहिजे सांग केला ||
समर्थांनी हा श्लोक अर्ध्याच सोडला, तो उद्धवाने पूर्ण केला तो असा,
अनुदिना नवमी हे मानसी आठवावी | बहुत लगबगीने कार्य सिद्धि करावी ||
समर्थांनी उद्धवला शाब्बासकी दिली खरी पण उद्धव स्वामी मात्र समर्थ आपल्याला सोडून जाणार या विचाराने व्याकुळ झाले. जन्मापासून समर्थ सहवासात राहिलेले उद्धव स्वामी अतिशय अस्वस्थ झाले. पण मृत्यू कोणासाठी थांबत नाही. ठरल्याप्रमाणे समर्थांनी देह ठेवला. समर्थांचे पहिले शिष्य आणि समर्थांचा मानसपुत्र या नात्याने उद्धवस्वामींवर समर्थांच्या देहला अग्नि देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.
समर्थांच्या पश्चात सज्जनगड आणि चाफळ माठाची सारी सूत्र त्यांच्या हाती आली. समर्थ संप्रदायचे ते मुख्य मठपती बनले. समर्थांशिवाय सज्जनगडवर राहणे उद्धवस्वामीना अवघड झाले. त्याच वेळी दिवाकर गोसावी गडावर वास्तव्याला आले. तेव्हा सज्जनगड आणि चाफळ मतांची व्यवस्था दिवाकर गोसावी यांच्यावर सोपवून उद्धव स्वामी टाकळीच्या मठामध्ये येऊन राहिले. तिथे जवळ जवळ चौदा वर्ष उपवास आणि एकांतवास करून त्यांनी तपश्चर्या केली आणि संप्रदायाचे कार्य चालू ठेवले.
उद्धवस्वामींचे देहावसान शके १६३२मध्ये (इ.स.१७१०मध्ये) फाल्गुन पक्षातल्या शुद्ध प्रतिपदेला बुधवारी सूर्योदयाच्या वेळी झाले, असे इंदुरबोधन मठातील एका बाडात लिहिलेले आहे. एका समर्थ तपस्व्याचा अस्त झाला. उद्धवस्वामींची मुख्य समाधी टाकळीला आहे, आणि पूजेसाठी दुसरी समाधी इंदुरबोधन मठात बांधलेली आहे.
उद्धव स्वामी यांनी आपले संपूर्ण जीवन गुरुसेवा आणि समर्थ रामदास यांच्या कार्यप्रसारासाठी अर्पण केले. त्यांची गुरुनिष्ठा अनन्यसाधारण होती. गुरुआज्ञा हीच त्यांच्यासाठी सर्वोच्च मान्यता होती. समर्थांच्या प्रत्येक शब्दाला अंतिम सत्य मानत त्यांनी निस्वार्थ भावाने सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या. आपल्या सर्वस्वाचा त्याग करून त्यांनी स्वतःचे अस्तित्वच गुरुचरणी अर्पण केले. उद्धव स्वामी म्हणजे गुरुभक्ती, निष्ठा आणि समर्पण यांचे मूर्तिमंत प्रतीक होय. उद्धव स्वामींचे संपूर्ण जीवन हे गुरुभक्ती, निष्ठा आणि समर्पण यांचे जिवंत उदाहरण ठरते. उद्धव स्वामी म्हणजे गुरुभक्ती, निष्ठा आणि समर्पण यांचे मूर्तिमंत प्रतीक होते, याचा प्रत्यय त्यांच्या जीवनातून येतो.
जय जय रघुवीर समर्थ
No comments:
Post a Comment