समर्थ शिष्यांची मांदियाळी
डॉ. सौ. माधवी महाजन
madhavimahajan17@gmail.com
महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. या संत मांदियाळीमध्ये समर्थ रामदासस्वामी यांचे व्यक्तिमत्व अद्वितीय होते. त्यांनी केलेले बारा वर्षाचे पुरश्चरण आणि बारा वर्षे केलेले भारतभ्रमण तसेच याकाळात केलेले सूक्ष्म निरीक्षण यातून त्यांनी आपले कार्य, कार्यक्षेत्र निश्चित केले. भोवतालच्या परिस्थितीचे अवलोकन केल्यानंतर आपल्याला जे जनजागृतीचे काम करायचे आहे ते एकट्याचे काम नाही हे लक्षात घेऊन त्यांनी अनेक माणसे जोडली. ही माणसे जोडताना देखील आपल्या कार्याला उपयुक्त अशाच तरुणांची त्यांनी निवड केली. मारुतीच्या मंदिरांची स्थापना केली, लोकांना बलोपासनेचे महत्त्व पटवून दिले. समर्थांनी केलेल्या अलौकिक कार्यात त्यांनी केवळ मंदिरांची स्थापना आणि देवांचा उत्सव एवढेच केले नाही तर संपूर्ण भारतभर आपले मठ स्थापन करून त्या त्या ठिकाणी योग्य त्या शिष्याची महंत म्हणून नेमणूक केली. ‘महंते महंत करावे’ अशी शिकवण शिष्यांना देऊन या शिष्यांचे आणि मठांचे जणू जाळेच त्यांनी देशभर पसरवले. समर्थांच्या कार्यात त्यांच्या शिष्यांचे योगदान देखील तितकेच महत्त्वाचे आहे. समर्थांनी ज्या विश्वासाने महंतांवर मठाचे अधिकार सोपविले होते त्या अधिकाराला शोभेल असेच भरीव कार्य प्रत्येकाने केलेले दिसून येते. समर्थांच्या शिकवणीचा समाजात प्रचार करून जनजागृतीचे कार्य पार पाडत असताना या शिष्यांनी आपली परमार्थिक उंची कायम ठेवली. याशिवाय अत्यंत प्रभावी वाड्मय निर्माण करून आपल्या स्वतंत्र विचारांचा ठसा उमटवला आहे. विलक्षण तेजस्वी आणि समर्थ असे अनेक शिष्य समर्थांनी निर्माण केले. समर्थांचे कार्य व्यापक होते त्यामुळे त्यांचा शिष्यपरिवार देखील फार मोठा होता.
समर्थ जेव्हा शिष्य पारखून घेत तेव्हा ते लहान व चुणचुणीत मुलांना अधिक प्राधान्य देत. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना आपल्या कार्याच्या दृष्टीने तयार करीत. अशी तीक्ष्ण, सखोल बुद्धीची मुले समर्थांच्या कठोर परीक्षेतून तावूनसुलाखून बाहेर पडत आणि स्वतःला गुरुसेवेत वाहून घेत असत. समर्थांची स्वतःची अशी ग्रंथ रचना उपलब्ध आहेच परंतु त्यांच्या शिष्यांनी देखील प्रचंड प्रमाणात वाड्मय निर्मिती केलेली दिसते. समर्थांचे हे शिष्य व त्यांची ग्रंथरचना हे समर्थ संप्रदायाचे एक वेगळेपण ठरते.
* उद्धवस्वामी: समर्थांचे सर्वांत पहिले शिष्य उद्धवस्वामी. नाशिक पंचवटी पासून साधारण तीन मैलावर टाकळी येथे उद्धवस्वामींचा मठ आहे. येथून जवळच नंदिनी आणि गोदावरी नद्यांचा संगम आहे. याठिकाणीच समर्थांनी १२ वर्षे नदीच्या पत्रात उभे राहून पुरश्चरण केले. उद्धवस्वामींना लहानपणीच समर्थांजवळ राहून त्यांच्या अंगाखांद्यावर खेळण्याचे भाग्य लाभले होते. अत्यंत बुद्धिमान अशा उद्धवाचे समर्थांना विशेष कौतुक होते. वैराग्य ही उद्धवाला लाभलेली ईश्वरदत्त देणगी होती. समर्थ सहवासात भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या विषयीचे संस्कार लहान वयातच न कळत त्यांच्यावर घडले होते. समर्थांच्या मांडीवर बसून मौजीबंधन होण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. समर्थांचा पहिला शिष्य, समर्थ स्थापित टाकळीचा पहिला मारुती आणि पहिला मठ याचे वयाच्या आठव्या वर्षी मठाधिपती होण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. समर्थ भारत भ्रमणाला निघताना त्यांचा बारा वर्षाच्या तपश्चर्येचा आदर्श उद्धवा समोर ठेवून गेले होते. आपल्या सदगुरुं प्रमाणेच उद्धवाने बारा वर्षे गायत्री मंत्राचे पुरश्चरण केले व रामनामाचे तेरा कोटीचे अनुष्ठान केले. बारा वर्षानंतर जेव्हा त्याची भेट झाली तेव्हा त्यांनी बऱ्याच मंडळीना भक्तिमार्गाला लावले होते. वयाच्या पंच्याऐंशी वयापर्यंत समर्थांप्रमाणेच त्यांनी देखील लोकसंग्रहाचे आणि संघटनेचे महान कार्य केले. सारंगपूरमधील समर्थ संप्रदाय आणि प्रसाराचे कार्य उत्तम पार पडावे यासाठी उद्धव स्वामीना सारंगपूरचे मठाधिपती केले. समर्थांचे पुरुष शिष्यांपैकी दोन मठांचे अधिपत्य करण्याचा बहुमान फक्त उद्धवस्वामीनाच लाभला. एका प्रसंगात समर्थांनी त्यांचे नाव शिव असे ठेवले होते तेव्हा पासून लोक त्यांना शिवरावस्वामी असे म्हणू लागले.
उद्धवस्वामींचा व्यासंग दांडगा होता. समर्थांची प्रत्येक शिकवण त्यांच्या मनावर ठसली होती. बलोपासना, रामोपासना, उत्तम संघटन यासर्व गोष्टी उद्धवस्वामी मध्ये पाहावयास मिळतात. अनेक प्रसंगातून पराकोटीची गुरुनिष्ठा उद्धवस्वामीमध्ये पहावयास मिळते. समर्थांचा अखंड सहवास लाभल्यामुळे त्यांनी समर्थांचे चरित्र लिहिले असावे असा उल्लेख ग्रंथामधून सापडतो परंतु अजूनही ते उपलब्ध झालेले नाही. शिवाजीमहाराजांचे निर्वाण झाले तेव्हा त्यांनी त्यांच्यावर काही श्लोक लिहिलेले उपलब्ध झालेले आहे. परंतु त्यांची कविता फारशी आढळत नाही.
* कल्याणस्वामी: समर्थांच्या शिष्य परंपरेत कल्याणस्वामींचे स्थान पट्टशिष्यांचे होते. गुरुशिष्य परंपरेत कल्याणस्वामींचे नाव आदराने घेतले जाते. कल्याण म्हणजे गुरुनिष्ठा, गुरुसेवेची पराकाष्ठा. आपल्या सद्गुरूंशी, त्यांच्या विचारांशी एकरूप झालेला असा शिष्य विरळाच. उत्तम हस्ताक्षर, टापटीप, निरालासता, कर्तव्यतत्परता या गुणांनी समर्थांचे लक्ष वेधले गेले होते. त्यांचे मूळ नाव अंबाजी पुढे समर्थांनी त्याचे नाव कल्याण असे ठेवले. अंबाजी कसे लिहितो हे पाहण्यासाठी समर्थांनी एक सवयी म्हंटली आणि अंबाजीने ती तत्काळ लिहून दाखवली. त्यांची तीव्र स्मरणशक्तीचे समर्थांना कौतुक वाटले. समर्थांनी त्याची पारख करून अंबाजी तसेच त्यांचे बंधु दत्तात्रय यांचा समावेश संप्रदायामध्ये करून घेतला. सुंदर हस्ताक्षर असून देखील समर्थांनी त्यांना आपल्या झोळीतून उत्कृष्ट हस्ताक्षराचा कित्ता दिला. तो कित्त गिरवून कल्याणाने आपले हस्ताक्षर अधिक सुंदर केले.
कल्याणस्वामीच्या चरित्रातील सर्व कथांमधून त्यांची सदगुरुंवरील पराकोटीची निष्ठा पहावयास मिळते. सदगुरुंवर त्यांचा इतका प्रगाढ विश्वास होता की स्वतःच्या जीवाची पर्वा करीत नसत असा हा शिष्योत्तम होता. ‘खंड नाही अखंड ध्यानी' अशी समर्थांबाबत त्यांची अवस्था होती. कल्याणस्वामी ‘दिसामाजी काही तरी लिहावे' या समर्थांच्या शिकवणी प्रमाणे नित्य लेखन करीत असत. त्यांचे वाड्मय विपुल प्रमाणात आहे. महावाक्य, पंचीकरण ग्रंथ, शुक आख्यान, ध्रुवाख्यान या त्यांच्या लिखाणातून त्यांची परमार्थिक तसेच अध्यात्मिक उंची लक्षात येते. समर्थांप्रमाणेच त्यांनी देखील नामसाधनेला खूप महत्व दिले. ‘राम नामाचे भांडार लुटा' असाच संदेश ते साधकांना देतात. कल्याणस्वामी लिखित अष्टपदी, सवाया, भूपाळ्या यामधून नामस्मरणाचे महात्म्य वर्णन केले आहे. तसेच त्यांनी रचलेल्या आरत्यांमधून त्यांच्या गुरूनिष्ठेचे उत्कट प्रतिबिंब पडलेले दिसते.
समर्थांनी सत्संग, सद्गुरू, भगवद चिंतनाचे महत्व स्पष्ट केले. स्वतःला आलेल्या प्रचीतीतूनच त्यांनी आपल्याला मार्ग दाखवला. कल्याणस्वामीनी देखील या सर्वांची अनुभूती घेऊन पुढील सांप्रदायिकानां मार्गदर्शन केले.समर्थांच्या पश्चात देखील कल्याणस्वामी समर्थांच्या शिकवणी प्रमाणे आयुष्य जगले. त्यांनी विपुल ग्रंथ रचना केली तसेच आपला शिष्य संप्रदाय देखील वाढवला. सदगुरुंशी एकरूप झालेल्या कल्याणस्वामीच्या गुरुनिष्ठेला इतिहासात तोड नाही.
* दिनकरस्वामी: समर्थांच्या प्रमुख शिष्यांपैकी ‘दिनकर' हे होत. दिनकरस्वामी समर्थांचे समकालीन शिष्य. समर्थांच्या शिष्य वर्गात दिनकरस्वामींची योग्यता फार मोठी आहे. लहानपणापासूनच दिनकरस्वामींचा ओढा परमार्थाकडे होता. त्यांची वृत्ती परोपकारी होती. त्यांची बुद्धी अत्यंत तेजस्वी होती. ते उत्तम वैदिक शास्त्री, पुराणिक, वैद्य होते. त्यांना असाधारण मंत्रशक्ती, धर्मशास्त्र विचार, तर्कभाषा तसेच फलज्योतिष, पत्रिका, लग्नसाधन यासर्व ज्योतिष विद्यांचे ज्ञान होते. याशिवाय परमार्थातहि नित्यानित्य विवेक, अखंड अध्यात्म निरुपण, अशा अनेक विषयात ते निष्णांत होते.
समर्थांनी दिनकरस्वामींना नगरप्रांतातील तीसगावी मठ स्थापून दिला. त्यांचे अनेक शिष्यगण होते. त्यामध्ये निस्पृह, प्रपंची,राजे, महाराजे, अनेक मराठे जहागीरदार असे अनेक लहानथोर शिष्य होते. त्यांनी स्वतःचे समृद्ध वाड्मय निर्माण केले. अनेक अभंग, सवय, पदे, श्लोक इ.स्फुट रचना केली. याशिवाय त्यांनी ‘स्वानुभवदिनकर’ नावाचा प्रासादिक ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्यांनी स्वतःच्या अनुभवाचे परमार्थपर विचार ग्रंथित केले आहेत. तसेच वेदांत आणि भक्तिमार्ग याचे सुरेख वर्णन या ग्रंथात आले आहे. या विवेचनावरून दिनकरस्वामींची विद्वत्ता तर दिसून येतेच पण त्याच बरोबर प्रभू रामचंद्र आणि समर्थांविषयीची मनात असणारी अपार श्रद्धा याचे दर्शन घडते. दासबोध खालोखाल महत्वाचा मानला जाणारा हा ग्रंथ प्रापंचिकाबरोबर पामार्थिक व्यक्तींनाही तितकाच उपयोगी आहे. आपल्याला मिळालेला नरदेह ही एक सुवर्णसंधी आहे हे जाणून त्यांनी त्यानुसार सद्गुरूच्या आधारे आपला मार्ग आक्रमिला. भक्ती, ज्ञान, आणि वैराग्य हेच त्यांच्या वाड्मयामधील प्रमुख विषय आहेत. त्यांच्या वाड्मयावर समर्थांच्या विचारांची जरी छाप दिसत असली तरी त्यांचे स्वतंत्र कर्तृत्व दिसून येते.
* भीमस्वामी: भीमस्वामी हे तंजावरचे मठाधिपती होते. मूळचे शहापूरचे असणारे भीमस्वामी समर्थांनी उपदेश दिल्यामुळे ते तंजावरला गेले. भीमस्वामी प्रापंचिक होते. त्यांच्या आजीने समर्थांचा अनुग्रह घेतला असल्याने भीमस्वामीनां समर्थांचा सहवास लहानपणापासून लाभला होता. त्यांनी समर्थांचे लघुचरित्र लिहिले. या चरित्रलेखनामागे त्यांची विरही भक्ताची भूमिका आहे. आपले सद्गुरू परब्रह्मरूप पावलेले होते ही त्यांची भावना यामध्ये प्रकर्षाने जाणवते.
* बाळकराम: बाळकराम हे नाव फारसे परिचित नसलेले. व-हाडांत कारंजा मधील दोन रामदासी मठातील एक मठ बळकाराम यांच्या परंपरेतील आहे. समर्थांच्या उपदेशामुळे कारंजा येथे राहावयास येऊन त्यांनी मठस्थापना केली. यांचा मोठा ग्रंथ उपलब्ध नाही. परंतु त्यांनी लिहिलेली स्फुटप्रकरणे श्लोक, अभंग, आरत्या उपलब्ध आहेत. समर्थांनी बाळकराम यांना जो उपदेश केला होता तो त्यांनी ५४ श्लोकांत गोवला आहे. त्यांची कविता सहज सुलभ दिसते.
* मेरुस्वामी : समर्थांनी अनेक शिष्य निर्माण केले हीच परंपरा त्यांच्या शिष्यांनी देखील त्यांच्या पश्चात पुढे चालू ठेवली. समर्थांचे शिष्य अनंत मौनी यांचे शिष्य मेरुस्वामी. अनंत मौनींचा अनुग्रह मेरुस्वामीना मिळाला होता. त्यांनी विपुल प्रमाणात ग्रंथ रचना केली. यापैकी त्यांचा रामसोहळा हा ग्रंथ दासबोधापेक्षा मोठा आहे. त्यामध्ये षडदर्शनाचे सार आले असून गुरूने शिष्यास दिलेल्या उपदेशांचे टिपण पण दिसते. मेरुस्वामीचे भाषाप्रभुत्व आणि प्रसंगवर्णन करण्याचे प्रभुत्व याचा प्रत्यय त्यांच्या लेखनातून येतो.
* गिरीधरस्वामी : समर्थ शिष्या वेणास्वामी यांच्या शिष्या बाईयाबाई यांचे शिष्य गिरीधर. हे समर्थांचे समकालीन नसले तरी त्यांना समर्थांचा सहवास थोडाफार लाभला होता. समर्थ वाड्मय सर्वसामान्यांना कळावे या हेतूने प्रेरित होऊन त्यांनी समर्थांच्या वाड्मयावर तसेच समर्थांचे उपास्य दैवत प्रभुरामचंद्र याविषयी विपुल प्रमाणात लेखन केले. त्यांनी लिहिलेला समर्थप्रताप या ग्रंथाला विशेष स्थान आहे. एखाद्या घटनेतील बारकावे मार्मिकपणे टिपून ती जिवंत स्वरुपात वर्णन करण्याचा त्यांचा हातखंडा होता. समर्थांचे मूर्ती वर्णन अत्यंत बारकाईने त्यांनी केले आहे. तसेच समर्थांचे जीवनकार्य, त्यांचे वाड्मय, त्यांचे देशाटन अशा अनेक घटनांचे बारकाईने वर्णन केले आहे. हा ग्रंथ म्हणजे गुरूविषयीच्या श्रद्धेचा भाग आहे.
गिरीधरस्वामीनी विपुल प्रमाणात वाड्मय निर्मिती केली. त्यांचे प्रकाशित आणि अप्रकाशित असे मिळून ४० ग्रंथ, स्फुट प्रकरणे, आरत्या इ. प्रचंड लेखन उपलब्ध आहे. या सर्वात समर्थप्रताप या ग्रंथाला मनाचे स्थान आहे. समर्थांचे जीवन कार्य यामध्ये त्यांनी रेखाटले आहे. त्यांच्या सहज सुलभ शैलीमुळे ते वाचनीय झाले आहे. समर्थ तसेच समर्थ संप्रदाय याविषयी अनेक अंगांनी लेखन करणाऱ्या गिरिधरांचे वाड्मयीन कार्य गौरवास्पद आहे.
* आत्मारामबुवा येकेहाळीकर हे कल्याणस्वामीचे प्रमुख शिष्य शिवराम यांनी आपले शिष्य रामचंद्र यांना समर्थ चरित्र सांगितले जे त्यांना कल्याणस्वामीनी सांगितले होते. रामचंद्र यांनी आपले शिष्य आत्माराम यांना हे चरित्र सांगितले. या माहितीच्या आधारे त्यांनी दासविश्रामधाम या प्रचंड ग्रंथाची निर्मिती केली. ज्याला श्री.देव यांनी संप्रदायाचा विश्वकोश या शब्दात गौरवले आहे. यामध्ये समर्थांचे समग्र चरिते पहावयास मिळते. हा ग्रंथ ओवीवृत्तात गद्यासारखा असून त्याचा एकंदर थाट रामदासी वाड्मयाला शोभेल असाच आहे. यामध्ये अनेक संत कवींची रचना पहावयास मिळते.
समर्थांनी आपला संप्रदाय निर्माण केला तो विशिष्ट हेतू समोर ठेवून निर्माण केला. त्यांना जी धर्मस्थापना करावयाची होती त्यासाठी समाजसुधारणा तितकीच महत्वाची होती. म्हणूनच त्यांनी बलोपासना मुलांमध्ये रुजवली त्याचा प्रचार याच मुलांच्या माध्यमातून केले. आपला उपदेश गावोगावी, लोकांच्या मनामनात याच शिष्यांच्या माध्यमातून पोहोचवला. आपल्या शिष्यांना भिक्षेची दीक्षा दिली. यामागे त्यांचे व्यापक विचार होता. भिक्षेच्या निमित्ताने लोकस्थितीचे जवळून अवलोकन करणे हा महत्वाचा उद्देश होता. भिक्षेच्या निमित्ताने सर्व शिष्य सर्वत्र निर्भयपणे वावरत असत. यानिमित्ताने समर्थांचे प्रखर विचार सर्वत्र पोहोचवणे सहज शक्य होत होते. समर्थांनी एका विशिष्ट वर्गातीलच शिष्य करून घेतले नाहीत. समर्थांच्या शिष्य वर्गात साधे गृहस्थाश्रमी होते, शिवाय महत्वाच्या पदावर असलेले अनेक वतनदार व अधिकारी पुरुष होते. समर्थ संप्रदायाचे दुसरे वैशिष्ट्य हे की त्यांनी आपल्या संप्रदायात स्त्रियांचा समावेश केला. यामध्ये विवाहित स्त्रिया होत्या तसेच विधवा देखील होत्या. आक्कास्वामी, वेणाबाई, या व्यतिरिक्त द्वारकाबाई, गंगाबाई,अन्नपूर्णाबाई, अशा वीस स्त्री शिष्यांचा उल्लेख ‘समर्थप्रताप' ग्रंथात आढळतो. या शिष्यांना ग्रंथरचनेचा अधिकार समर्थांनी दिला होता. त्यांच्या संप्रदायात सर्वांना कीर्तनाचा अधिकार नसला तरी वेणास्वामीसारख्या शिष्या वेळप्रसंगी कीर्तनाला देखील उभ्या राहत. यावरून त्यांनी स्त्रियांना किती अधिकार प्राप्त करून दिला होता याचे दर्शन घडते. त्याकाळचा विचार करता स्त्रियांना त्यांनी देलेले स्थान, त्यांना प्राप्त करुन दिलेले अधिकार हे धाडसाचेच पाउल ठरते. या सर्व शिष्य आणि शिष्यांची विपुल ग्रंथ संपदा पहावयास मिळते.
समर्थांनी आपल्या संप्रदायाच्या लक्षणात राजकारणाचा राजरोसपणे समावेश केला होता. परंतु समर्थांच्या पश्चात त्यांच्या शिष्यांनी चतु:सुत्रातील राजकारणाकडे पूर्ण दुर्लक्ष करून हरिकथा निरुपणाला अधिक महत्व दिलेले दिसते. अत्यंत प्रासादिक तसेच सहज सुलभ भाषेमध्ये विपुल प्रमाणात वाड्मय निर्मिती, अनेक शिष्य निर्माण करून संप्रदाय वाढवणे, भिक्षामिसे लोकांतात राहणे, एकांतात राहून आपली पारमार्थिक उंची वाढवणे या सर्व बाबतीत समर्थ शिष्य अग्रेसर ठरलेले दिसतात. परंतु समर्थ हयात असताना संप्रदायाची वाढ जेव्हढ्या झपाट्याने आणि ज्यापद्धतीने झाली तशा प्रकारे पुढे वाढ झाली नाही. याला कारण समर्थांचे अद्वितीय कर्तृत्वशक्ती. त्यांच्या पश्चात मात्र त्यांच्या प्रमाणे अधिकारवाणीने व स्पष्टोक्तीने उपदेश करणारा कर्तुत्ववान मठाधिपती दुर्दैवाने निर्माण झाला नाही. समर्थांच्या पश्चात अनेक वर्ष संप्रदायाचे कार्य पुढे चालू राहिले तरी जो धडाका समर्थांचा होता तो राहिला नाही.
आजही समर्थ वाड्मय, त्यांचे प्रखर विचार आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे ठरतात. त्याचा योग्य उपयोग करून घेऊन त्याचा प्रचार आणि प्रसार करणे आपल्याला सहज शक्य आहे. समर्थांनी त्या काळात जे सर्वांगीण कार्य केले त्यामध्ये संघटन, एकात्मता यावर भर दिला ज्याची गरज आज देखील आहे. यत्न तो देव जाणावा ही समर्थांची उक्ती प्रयत्न करण्यास प्रवृत्त करते तसेच त्यांचे सकारात्मक विचार निश्चितच सकारात्मक कृती करण्यास प्रवृत्त करते. मनातील नैराश्य घालवणारे, आत्मविश्वास वाढवणारे समर्थांचे समर्थ विचार आजही आम्हाला मार्गदर्शक ठरतात. समर्थ आजही आपल्या विचारांच्या माध्यमातून आपल्यात राहून आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत. त्यासाठी सावधपणे, उघड्या डोळ्यांनी त्यांचा शोध घेतला पाहिजे, तरच त्याचा प्रत्यय येणार आहे.
जय जय रघुवीर समर्थ