|| श्रीराम ||
समर्थांची नामस्मरण भक्ती
डॉ. माधवी संजय महाजन
भारतीय तत्वज्ञानात ‘ब्रह्म हेच अंतिम सत्य’ सांगितले गेले आहे. यामध्ये, मानव जन्म प्राप्त झाल्यानंतर परमेश्वर प्राप्ती हे मुख्य उद्दिष्ट साध्य करून जीवाने त्याच्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे असे संगितले आहे. मनुष्य जन्माचे सार्थक कसे करावे याविषयी प्राचीन ग्रंथांमधून तसेच संत वाड्मयामधून अचूक मार्गदर्शन केले आहे. चराचरामध्ये परमेश्वर भरून राहिला आहे हे सत्य मायेमध्ये गुरफाटलेल्या जीवाला असत्य वाटते. त्याला केवळ आपला देह, हे मायेनी अच्छादलेले जगत हेच सत्य वाटत रहाते. शाश्वत सोडून अशाश्वताच्या मागे धावणार्या या अज्ञानी जीवांना सर्व संतांनी अत्यंत कळकळीने उपदेश करून वारंवार सावध केले. हा उपदेश करताना त्यांनी आधी प्रचिती घेऊन मगच उपदेश केला. समाजाकडून त्यांना कितीही त्रास झाला तरी ‘बुडते हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हणउनि ॥’ अशी त्यांची वृत्ती असल्यामुळे त्यांना त्रास देणार्यांचे देखील कल्याण व्हावे यासाठी ते प्रयत्नशील राहिले. महाराष्ट्र अशा संत विभूतींनि समृद्ध आहे. या संत विभूतींमध्ये समर्थ रामदासस्वामींचे नाव आदराने घेतले जाते.
समर्थ रामदासस्वामींनी आपल्या प्रबोधनामधून, वाड्मयातून भौतिक जगात वावरतांना, उत्तम गुणांचा अंगीकार करून कसे यशस्वी जीवन जगावे याचे अचूक मार्गदर्शन केले. त्याचबरोबर आध्यात्मिक मार्गावर चालताना समृद्ध आणि संपन्न होण्यासाठी साधनेची अचूक दिशा देखील दाखविली. आध्यात्मिक मार्गावरील प्रगतीपथावरून वाटचाल करताना आपल्याला प्राप्त झालेल्या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे असे ते वारंवार सांगतात.
नरदेहीं आलियां येक | कांहीं करावें सार्थक |
जेणें पविजे परलोक | परम दुल्लभ जो || दास. २/४/५ ||
भगवंताचा शोध घेणे हे माणसाचे सर्वोत्तम ध्येय आहे. आपल्याला प्राप्त झालेल्या आयुष्यात काया, वाचा, मनाने भगवंताची मन:पूर्वक उपासना करावी आणि त्याला प्राप्त करून घ्यावे असे समर्थ सांगतात. नरदेह प्राप्त झाल्यानंतर जर आत्महित साधता आले नाही तर असे जीवन मृतवत समजावे असे अत्यंत परखडपणे त्यांनी सांगितले आहे. समर्थांनी आपल्या प्रबोधनातून केवळ एकांगी मार्गदर्शन केले नाही तर प्रत्येक विचार कृतीत आणायचा असेल तर त्यासाठी अचूक दिशा दाखवून साधकाचे तारू भरकटणार नाही याची काळजी घेतली आहे. भगवतप्राप्तीच्या या मार्गामध्ये त्याचे स्वरूप जाणून घेण्यासाठी साधूसंतांनी भक्तीचे महत्व सांगितले. समर्थ रामदास स्वामींनी आपल्या ग्रंथ संपदेमध्ये भक्ति निरुपणाला विशेष महत्व दिले.
समर्थांचा श्रीमद दासबोध हा ग्रंथ गुरुशिष्यांचा संवाद आहे आणि यामध्ये भक्तिमार्ग सविस्तर सांगितला आहे. या ग्रंथामध्ये समर्थांनी एक संपूर्ण दशक नवविधभक्तीसाठी वाहिला आहे. भक्तिमार्गावरून वाटचाल करताना भगवंताचे भजन कसे करावे, आपले चंचल मन त्यामध्ये कसे गुंतवावे याविषयीचे सुस्पष्ट मार्गदर्शन त्यांनी केले आहे. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये प्रल्हादाने आपल्या वडीलांना नवविधा भक्तीचे स्वरूप स्पष्ट करताना म्हटलेला श्लोक सर्वपरिचित आहे.
श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्।
अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्॥
या नवविधा भक्तीच्या माध्यमातून सर्वोत्तमाचा स्वीकार करून भगवंताशी एकरूप होण्याचे सूत्र सांगितले गेले आहे. उत्तम श्रवण केले तरच उत्तम कीर्तन घडणार आहे. उत्तमाचे स्मरण होणार आहे. उत्तम सत्संगात राहून सद्गुरूसेवा, अर्चन घडणार आहे. नम्रभाव अंगी येऊन वंदनभक्ती साधकाकडून आपोआप घडणार आहे. या सर्व भक्ती म्हणजे परमेश्वरकडे घेऊन जाणारे टप्पे आहेत. खर्या भक्तामध्ये या सर्व टप्प्यांचा अंतर्भाव झालेला आपल्याला पहायला मिळतो.
कलियुगामध्ये या नऊभक्तिमधील नामस्मरणभक्ती वर विशेष भर दिला गेला आहे. आपल्याला मिळालेल्या मनुष्य जन्माचे सार्थक करून घ्यायचे असेल तर आजच्या काळात नामस्मरणा इतके प्रभावी साधन दुसरे कुठलेच नाही असे सर्व संत विभूतींनी वारंवार सांगितले. सर्व सामान्य जीव हा वासनेत गुरफटून स्वतःचे हित साधण्यास असमर्थ ठरतो. अशा या जीवांच्या कल्याणासाठी सर्व रोगावर नामस्मरणाचे औषध देऊन लोकांना प्रपंच आणि परमार्थ सहज कसा साधावा यादृष्टीने समर्थांनी मार्गदर्शन केले.
नामसाधना ही सर्व धर्मामध्ये, पंथांमध्ये सांगितली गेली आहे. भगवद गीतेमध्ये यज्ञानां जपयज्ञो s स्मि | सर्व यज्ञांमध्ये जपयज्ञ सर्व श्रेष्ठ मानला आहे. नामसाधना ही अशी साधना आहे जी साधकाला जन्ममृत्युच्या चक्रातून सोडवते तसेच पापांचे डोंगर नष्ट करते. भगवंताशी जोडणारी अशी ही साधना सहज आणि सुलभ असल्याचे संतांनी सांगितले. सतत सुखाच्या शोधत असणार्या माणसांना कितीही प्रयत्न केले तरी सुखापेक्षा दु:खालाच अधिक सामोरे जावे लागते. संत म्हणतात, या सर्व दु:खांचे मूळ देहबुद्धी आहे. विषय वासना, विकार, अनिश्चित आयुष्यामुळे मनात निर्माण झालेली भीती, सतत वाटणारी काळजी, चिंता, ही सर्व देहबुद्धीची लक्षणे आहेत. ती दूर होण्यासाठी देहबुद्धी सोडून आत्मबुद्धी निर्माण होणे आवश्यक आहे. देहबुद्धी हे बद्धाचे लक्षण आहे ते जाऊन आत्मबुद्धी निर्माण होण्यासाठी नामस्मरण हे अत्यंत प्रभावी साधन होय.
सर्वसाधारणपणे भगवंताची भक्ति म्हणजे उपासतापास, व्रतवैकल्य, पोथी वाचन असाच आपला समज असतो. यामध्ये गैर काहीच नाही. आपण करत असलेल्या उपासतापास, व्रतवैकल्य, दान या साधनांच्या माध्यमातून चित्तशुद्धी होत असते. तर नामस्मरण या साधनेतून चित्तशुद्धी तर होतेच पण या साधनाच्या माध्यमातून साधकाच्या मनात प्रेमभाव निर्माण होतो. या नामसाधनेतून साधकाची देहबुद्धी नष्ट होते. वासनांचा क्षय होण्यासाठी तसेच मनावर विजय मिळवण्यासाठी नामस्मरणासारखे दुसरे प्रभावी साधन नाही. आत्मसाक्षात्कार होण्यासाठी नामस्मरणाच्या माध्यमातून सतत भगवंताच्या अनुसंधनात राहणे, या अनुसंधानामधून सतत त्याचे सूक्ष्म चिंतन करून त्याची अखंड जाणीव ठेवणे हे सर्वोत्तम साधन आहे. मी भगवंताचा आहे हे जाणणे म्हणजे अनुसंधान पण सर्वसामान्य मनुष्य विषयांच्या इतका आहारी जातो की मी विषयांचाच आहे हा त्याला भ्रम होतो. या भ्रमातून बाहेर येण्यासाठी अखंड नामजप हे साधन अतिशय प्रभावी ठरते.
नामस्मरण म्हणजे मनाने सतत परमेश्वराचे चिंतन करून ‘मी परमेश्वराचा आहे’ त्याच अखंड स्मरण ठेवणे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘माझे प्रत्येक कर्म भगवंताच्या इच्छेने, त्याच्याच सत्तेने आणि कृपेने घडत आहे, याची अखंड आठवण असणे म्हणजे नामस्मरण’. प्रपंचामध्ये राहून आपल्याला सतत परमेश्वराचा विसर पडतो हा विसर पडू नये म्हणून नामस्मरण साधना अत्यंत महत्त्वाची आहे.
नामस्मरण हे कर्म शारीरिक नसून अंत:करण पूर्वक केलेले कर्म आहे. नामस्मरण करताना अनेकदा जपाची माळ उपासनेचे साधन म्हणून घेतली जाते यामध्ये. यातील प्रत्येक मणी आपल्याला सतत परमेश्वराचे स्मरण करून देत असतो. हे स्मरण केवळ शरीराने नाही तर मनापासून करणे अपेक्षित आहे. नाम घेताना हातामध्ये जपाची माळ फिरते आणि मन इतरत्र फिरत आहे ही अवस्था उपयोगाची नाही. कबीरांचा दोहा सर्वांना परिचित आहे
माला तो कर में फिरे, जीभी फिरे मुख्य माहीं ।
मनवा तो चहुँ दिसि फिरै, यह तो सुमिरन नहीं ॥
बहुतांशी साधकांचे मन स्मरणीचा मेरूमणी हातात येईपर्यंत कल्पना आणि विचारांमध्ये गुरफटलेले असते. आणि परमेश्वरापासून लांबच राहते. अशा नामस्मरणात राम नाही. समर्थ म्हणतात,
मना कल्पना धीट सैराट धावे | तया मानवा देव कैसेनि पावे || १०४ ||
नामस्मरण करताना परमेश्वर भेटीची तळमळ लागणे अतिशय आवश्यक आहे. विषय सुखामध्ये रमणारे हे मन जर कल्पनेच्या मागेच धावत राहिले तर मनुष्याला परमेश्वर कसा भेटणार ? त्यासाठी या साधंनेमध्ये परमेश्वर भेटीचा ध्यास महत्त्वाचा आहे. आपले प्रत्येक कर्म करताना जे घडते आहे ते सर्व परमेश्वराच्या इच्छेने घडत आहे हे स्मरण सतत ठेवणे आणि आपली सर्व कर्म त्याला अर्पण करणे हे सर्वात अवघड वर्म या साधनेचे आहे. भगवंताचे नित्य स्मरण ठेवून केलेली कर्म देखील नामस्मरणच ठरू शकतात हे अनेक संतांनी सिद्ध करून दाखवले आहे. जसे सावता माळी म्हणतात,
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी |
मिरची आणि कोथिंबीर हीच माझी पंढरी
सावता माळी यांना आपले कर्म आणि कर्मस्थान दोन्ही पंढरीच वाटतात. त्यांचे प्रत्येक कर्म त्यांचा प्रत्येक श्वास त्यांनी परमेश्वराला अर्पण केला आहे. संत चोखामेळा यांनी देखील आपले सारे जीवन परमेश्वर चिंतनातच घालवले. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या अस्थीमधून विठ्ठल विठ्ठल असा नामाचा गजर ऐकू येत होता. जनाबाई सामान्य स्त्री प्रमाणे भांडण करते पण तिने थापलेल्या शेणाच्या गवर्यामधून विठ्ठलाचे नाम आपल्याला ऐकायला येत होते हे तिचे अनन्य भक्तीतून सकारलेले असामान्यत्व आहे. सर्व संत विभूतींनी आपल्या प्रत्येक कर्मामध्ये परमेश्वराचे चिंतन आणि स्मरण केलेले आहे. गोंदवलेकर महाराजांनी नामस्मरणाला अनुसंधान हा शब्द योजला आहे. परमेश्वराची जवळीक साधणारी ही साधना अत्यंत प्रभावी अशी साधना आहे. त्याला स्थळ काळाच बंधन नाही. समर्थ म्हणतात,
नित्य नेम प्रात:काळी | माध्यानकाळी सायंकाळी |
नामस्मरण सर्वकाळी | करीत जावे ||
ही नाम साधना अखंड घडली पाहिजे एक पळभरही त्याचं विस्मरण होऊ नये अगदी
चालतां बोलतां धंदा करितां | खाता जेवितां सुखी होता |
नाना उपभोग भोगिता | नाम विसरो नये ||
इतके ते अंगी भिनले पाहिजे. नामस्मरणामध्ये स्मरण अत्यंत महत्वाचे आहे. ‘स्मरण देवाचें करावें | अखंड नाम जपत जावें ||’ असं समर्थ नामस्मरण भक्तीच्या प्रारंभीच सांगतात. भगवंताशी एकरूप होण्यासाठी त्याचे अखंड स्मरण, चिंतन नामजपा मधूनच घडते. या साधनेमध्ये साधक पूर्ण शरणागत असतो. समर्थांनी आपल्या आराध्यची उपासना करताना स्मरण आणि चिंतन हे दोन शब्द योजले आहेत. मनाच्या श्लोकांमध्ये ‘प्रभाते मनी राम चिंतित जावा’ सांगून इथे रामाच्या गुणांचे चिंतन सांगितले आहे. उपासनामार्गामध्ये नैमित्तिक साधना महत्वाची आहे. पहाटे उठून परमात्म्याचे चिंतन ही सकारात्मक ऊर्जा दिवसभर आपल्यातील उत्साह टिकवून ठेवते. पहाटे सर्व वातावरण जसे शांत आणि प्रसन्न असते तसेच आपले मन देखील शांत आणि प्रसन्न असते. त्यामुळे या वातावरणातील भगवंताची चिंतन अधिक प्रभावी ठरते. ज्याच्या उत्तम गुणांचे चिंतन करून दिवसाला प्रारंभ करतो त्याचेच स्मरण दिवसभर साधकाला असणे अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे शून्य स्वतंत्र लिहिला तर त्या शून्याला काही किंमत नसते. त्याच्यापुढे आणखीन कितीही शून्य काढले तरी त्याला काहीच अर्थ नसतो. परंतु या शून्याच्या पाठीमागे जर एक आकडा काढला तर त्या शून्याची किंमत वाढते. हा आधीचा एक ही आपली पहाटेची साधन आहे. म्हणून केवळ उठता, बसता नाम न घेता प्रथम त्या मागची आपली साधनेची बैठक पक्की होणे आवश्यक आहे. तरच दिवसभर अखंड केलेल्या नामस्मरणाला काही प्राप्त अर्थ प्राप्त होतो. परंतु याचे महत्त्व न पटलेले आपण एकापुढे अनेक शून्य जोडत राहतो आणि या शून्य जोडलेल्या एका आकड्यातून किती अर्थप्राप्ती होते या मध्ये मन गुंतवतो. या एका पुढे कितीही शून्य लावली तरी सुद्धा या कमाईतून आपल्याला कधीही समाधान प्राप्त होत नाही. उलट लोभ आणि मोह यासारखे विकार जडत जातात. त्यामुळे या एक आकड्यापुढे साधनेचा हुकमी एक्का लावायचा आहे का एक या आकड्यापुढे अनेक शून्य लावून षडविकारांचा रोग मागे लावून घ्यायचा आहे हा विवेक आपल्या हाती आहे. अधिक अर्थप्राप्तीने मी सुखी होईन या मृगजळामागे धावता धावता जीव थकून गेला तरी त्याला थांबता येत नाही. सर्व सुखांची प्राप्ती झाली तरी अजून हवे ही त्याची लालसा कमी होत नाही. त्यामुळे मनःस्वास्थ्य हरवून बसलेला आणि दुःखाच्या महासागरात सुख शोधण्याची धडपड करत राहणारा हा जीव खऱ्या आनंदापासून कायम वंचितच राहतो. या सर्व धावपळीत त्याला भगवंताचे विस्मरण होते. या अज्ञानातून जीव मुक्त व्हावा त्याला खरे ज्ञान प्राप्त व्हावे, त्याची भौतिक व अध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी समर्थ नामाचे महत्व समजावून सांगतात.
समर्थांनी ‘हरे राम हा मंत्र सोपा जपा रे’ हे सांगून सर्वांना रामनामाचा मंत्र दिला. पण हे नाम समजून करावे हे महत्वाचे सूत्र सांगायला ते विसरले नाहीत. नामसाधनेमध्ये कर्म करताना मी कर्ता यापेक्षा राम कर्ता हा भाव महत्वाचा आहे. कर्म करताना त्यामध्ये खोटेपणा करणार्यांना समर्थ म्हणतात, ‘घडे कर्म खोटें बहू तो दगा रे |’. आपली कर्म पार पाडताना त्यामध्ये प्रामाणिकपणा असावा तसे केले नाही तर कर्म करताना केलेला खोटेपणा ही परमेश्वराशी केलेली प्रतारणा ठरते. नामजपाचे सर्वात महत्वाचे सूत्र म्हणजे या साधनेत अहंकारला दूर ठेवणे. मी करतो, माझ्या कष्टमुळे मी हे साम्राज्य उभे केले हा अहंभाव माणसाचा शत्रू आहे. वेदांतानुसार अहंभाव हा प्रपंचाचे आणि परमेश्वरा विषयीच्या अज्ञानाचे कारण आहे. हा अहंभाव नष्ट होण्यासाठी कर्माचे कर्तेपण भगवंताला द्यावे. नामजप करताना सर्वाचा कर्ता करविता राम आहे हा भाव माणसाच्या वृत्ती मध्ये आमुलाग्र बदल घडवून आणतो. यासाठीच अखंड नाम जपत जावे आणि खरे समाधान प्राप्त करून घ्यावे असे समर्थांची सांगणे आहे.
या भवसागरातून तरुन जायचं असेल तर ‘सोपे सुगम हे नाम राघवाचे सर्व काळ वाचे येऊ द्यावे’. हे नामच या भवसागरातून तुम्हाला तारुन देणार आहे असं सांगून समर्थ आपल्याला सतत सावध करतात. जो सतत हे नाम श्रद्धेने घेतो त्याचा निश्चित उद्धार होतो. ‘राम नाम वाणी त्या नाही जाचणी नामे बहु प्राणी उद्धरले’ असे सांगून समर्थ आपल्या मनात विश्वास निर्माण करतात.
रामनामाने उद्धार झालेल्या वाल्या कोळ्याचे चरित्र सर्वांनाच परिचित आहे. अत्यंत निष्ठुर असणाऱ्या अशा वाल्याने निष्ठेने आणि निग्रहाने श्रीरामाचा जप केला. स्वभाव धर्मानुसार सुरूवातीला मरा मरा म्हणणार्या वाल्या कोळ्याचा उच्चार नंतर राम राम असा झाला. त्याने केलेल्या दिव्य तपाने वाल्याकोळी महर्षी पदाला जाऊन पोहोचला. इतकेच नाही तर त्याच्या हातून सर्वांच्या मनाला भुरळ घालणारे प्रभू रामचंद्रांचे चरित्र लिहिलं गेलं.
नामाचा प्रभाव इतका आहे की दैत्य कुळात जन्माला आलेला प्रल्हाद या नामाने तरला. बालपणापासूनच भगवंताच्या भक्तीत रंगलेल्या या भक्त प्रल्हादाला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. दुर्दैव असे की त्याच्या पित्यानेच त्याला मारण्याचा निर्णय घेतला. परंतु नामस्मरणाच्या प्रभावामध्ये त्याने या सर्व संकटांना सहज तोंड दिले. प्रल्हादाप्रमाणेच परंतु अत्यंत पापी असा अजामेळ त्याचाही या नावाने उद्धार झाला. अजामेळ अत्यंत दूरवर्तनी असा ब्राह्मण होता. असे जरी असले तरीही कधीकाळी तो सदचारी विष्णू भक्त ब्राह्मण होता. परंतु संगतीने बिघडला होता. त्याचे सारे आयुष्य अनाचारात गेले. परंतु अंतकाळी त्यांनी जेव्हा ‘अरे नारायणा धाव’ असे आपल्या मुलाला उद्देशून म्हटले त्यावेळी अनाहूतपणे का होईना परमेश्वराचे नाव त्याच्या तोंडून निघाले. त्यामुळे त्याच्यावर आलेले मृत्यूचे संकट नाहीसे झाले. पूवीचे सदचाराचे संस्कार इतके मूळ धरून होते की त्यामुळे त्याच्या हाकेला विष्णुदूत धावून आले. अंतिम क्षणी पूर्वपुण्याई मुळे तो सर्व पापामधून मुक्त झाला आणि त्याला सद्गती मिळाली. अजामेळा प्रमाणेच आपल्या पिंजरातील पोपटाचे ‘राम’ हे नाव सतत उच्चारुन एका गणिकेचा उद्धार झाल्याची कथा पुराणात प्रसिद्ध आहे
या नामाचा महिमा प्रत्यक्ष प्रत्यक्ष शंकराला ही माहीत होता जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा त्यातून जे हलाहल निर्माण झाले तेव्हा शंकराने ते विष प्राशन केले त्यामुळे त्यांच्या शरीराचा दाह होऊ लागला म्हणून त्यांनी शितल अशा चंद्राला आपल्या मस्तकावर धारण केले तरी त्याचा उपयोग झाला नाही तेव्हा त्यांनी गंगेला आपल्या मस्तकावर धारण केले नागाला गळ्याभोवती गुंडाळले तरीही दहा कमी झाला नाही तेव्हा शेवटी त्यांनी रामनामाचा जप केला आणि त्याच्या प्रभावाने त्यांचा दाह शांत झाला हे राम नाम ते स्वतः आणि त्यांची पत्नी पार्वती ही सुद्धा आदराने जपते समर्थ मनाच्या श्लोकात म्हणतात जेणे जाळीला काम तो राम ध्यातो उमेसी अती आदरे गुण गातो बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे परी अंतरी नामविश्वास तेथे साक्षात भगवान शंकरांचाही श्रीराम नामाप्रती दृढ विश्वास आहे निजध्यास लागला शंकरा | शंकराला जणू त्याच्या नामाचा ध्यासच लागला. काशीला जाऊन जो देह ठेवतो त्याच्या कानात श्रीशंकर रामनाम सांगतात आणि तो मुक्त होतो असे सांगितले जाते
नामस्मरणातून भगवंताशी सख्य जोडले जाते. अत्यंत सहज आणि सुलभ वाटणारी अशी ही साधना असली तरी त्याचबरोबर आचार, विचार यांना देखील तितकेच महत्व आहे. कायिक, वाचिक, मानसिक स्तरावर भगवंताला प्रिय असेच वर्तन यामध्ये अपेक्षित आहे. एकीकडे जप करायचा आणि त्याच मुखाने इतरांची निंदा करायची हे कर्म नामजप साधनेला छेद देणारे आहे. या साधनेला नीतीची आणि सदचाराची जोड महत्त्वाची आहे. ईश्वराच्या समीप जाण्यासाठीच्या मार्गावर वृत्तीमध्ये होणारा सकारात्मक बदल निश्चितच साधकाच्या मार्गातील अडथळे दूर करणारा आहे. .
मानवी मन कल्पनेमध्ये रमणारे आहे. कल्पनेमध्ये रमणारे मन अनेक संकल्प करीत असते पण त्याचबरोबर संकल्पाचे रचलेले मनोरे उध्वस्त करण्याचे सामर्थ्य देखील यामध्ये असते. मनाला ज्यामध्ये रमवावे त्यामध्ये ते रमते हा मनाचा महत्वाचा गुण आहे. यासाठीच मन सतत उत्तम, सकारात्मक विचारांमध्ये रमणे आवश्यक आहे. चंचल मनाला विवेकाने आवरून ते सतत स्थिर राहण्यासाठी हे मना तू सतत राघवाचे चिंतन कर असे समर्थांचे सांगणे आहे.
मन हे अशांतीचे मूळ आहे. सदैव अस्थिर असलेल्या मनाला जर सतत सकारात्मक विचारांमध्ये रमवायचे असेल तर समर्थ या अस्थिर मनाला श्रीरामांच्या संगतीत राहण्यास सांगतात. सतत भगवंतावर प्रेम करावे, त्याला प्रिय असेल असेच वर्तन करावे असा समर्थांचा आग्रह आहे. प्रेम करणे हा माणसाचा सहज स्वभाव आहे. पण हे प्रेम करताना त्यामध्ये हा माझा तो परका हा भेद नसावा. या संकुचित विचारसरणीने केवळ दुःखच पदरी पडते. यासाठी आधी वृत्तीमध्ये बदल करून हा आपपर भाव सोडणे आवश्यक आहे. सार काय असार काय याचा विवेकाने विचार करून आपले अंतःकरण राममय करण्याचा प्रयत्न करण्यास समर्थ सांगतात. जर स्वहित साधायचे असेल तर मना सज्जना हीत माझे करावे । रघूनायका दृढ चित्ती धरावे।। मनाला रामचिंतनात राहून कल्याण साधायला समर्थ सांगतात.
मनाला जसे वळण लावावे तसे वळण त्याला लागते. म्हणून मनाला सतत रामनाम घेण्याची सवय लावावी. परमेश्वर प्राप्तीचा आनंद संतांनी अनुभवला आहे. मन जर सतत भगवंतापाशी स्थिर झाले तर ते आनंदरूप होईल हे संतांचे प्रचीतीचे बोल आहेत. पण यासाठी मनाला भगवंताच्या ठिकाणी निवास करण्याचा सराव हवा. श्रीरामांवर नितांत श्रद्धा असणाऱ्या समर्थांनी त्रयोदशाक्षरी मंत्राचे पुरश्चरण केले आणि आपल्या शिष्यांना देखील हाच मंत्र दिला.
तुला सांगतो गूज हा बीजमंत्रू । जेणे निरसे थोर संसार शत्रू ।।
नव्हे मिथ्य हे बोलणे सत्य वाचा । जप अंतरी मंत्र तेराक्षराचा ।।
हा त्रयोदशाक्षरी मंत्र म्हणताना राम माझा स्वामी आहे, माझा रक्षणकर्ता आहे अशी साधकाची निष्ठा असणे आवश्यक आहे. सर्व दु:खातून मुक्त करणारा असा हा रामनामाचा जप आहे. रामनाम ही अशी अपार, अद्भुत शक्ती आहे की जीवनातील सर्व कष्टांचे निवारण त्याने होते. श्रीराम माझा रक्षणकर्ता आहे, सतत माझ्या हृदयात वास करत आहेत अशी समर्थांची नितांत श्रद्धा होती.
भगवंताच्या समीप जाण्याचे उपासना एक साधन आहे. उपासना म्हणजे अंतरंग शुद्धीचे बाह्य आचरण. मनापासून केलेल्या उपासनेतून अनेक फायदे होतात. उपासनेमुळे विकार नष्ट होतात. वृत्ती शांत होते. उत्तम स्पंदने निर्माण होतात. आचरण सुधारते ,शुद्ध होते. सत्वगुण वाढीस लागतो. सतत उत्तम विचारांच्या आघातांनी काम, क्रोध, या विकारांवर संयम येतो. कितीही उपभोग घेतला, हव्यास ठेवला, प्रसंगी क्रोध अनावर झाला तरी या सर्वाचा काही उपयोग नाही हे खूप काळ गेल्यानंतर अनुभवाने पटते. पण नित्य उपासनेने याची सतत जाणीव होत राहते. देहबुद्धी नष्ट होऊन भगवंता विषयी प्रेम वाढीस लागते. अशा अनेक सकारात्मक गोष्टी एका उपासनेच्या माध्यमातून घडतात म्हणून समर्थ मनाला सतत राघवाच्या संगतीत राहण्याचा आग्रह धरतात. त्याच्या शिवाय आयुष्यामध्ये व्यतीत केलेले क्षण म्हणजे स्वतःची हानी करून घेण्यासारखे आहे. समर्थ वारंवार श्रवण, चिंतन, मनन आणि निजिध्यास याचे महत्व स्पष्ट करतात. आपण ज्याचे चिंतन मनन करतो हे चित्तात खोलवर रुजते. म्हणून सतत भगवंताचे चिंतन मनन करून नामाच्या माध्यमातून नित्य त्याच्या समीप रहा हे समर्थांचे सांगणे आहे.
चित्तशुद्धी करून निःश्रेयसकडे वाटचाल करणे हे मानवी जीवनाचे ध्येय असावे. धर्म आणि सदाचाराचे पालन करून जीवनाचे अंतिम ध्येय जे मोक्ष ते प्राप्त करणे यातच मानवी जीवांची सफलता आहे. या उद्देश प्राप्तीसाठी समर्थांचा हा ग्रंथ पूर्णपणे सहाय्यक ठरतो. आजच्या काळात माणसांची ईश्वरावर श्रद्धा राहिलेली नाही. धर्माचे व्यापारीकरण झाले आहे. नकारात्मक विचारांच्या व्यक्ती कशा श्रेष्ठ आहेत हे पटवून देण्यात स्वारस्य वाटते आहे. चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगले म्हणण्यात आणि त्यावर चर्चा करण्यात लोकांना धन्यता वाटत आहे. अशा या परिस्थितीमध्ये कोणत्याही दैवताची पूजा, उपासना लोकांना अवास्तव आणि अस्वीकार्य वाटेल. वास्तविक या अध्यात्म शस्त्राने आपल्याला जी व्यापक शिकवण दिली त्यानुसार या विश्वाचा जो पसारा आहे त्या विश्वाचा मी एक घटक आहे आणि त्या विश्वाचे जे नियम आहेत त्याचे मी पालन करणे ही माझी जबाबदारी आहे. या विश्वाच्या निर्मात्याची जाणीव ठेवणे हे माझे कर्तव्य आहे याचे भान प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. नामाच्या या दिव्य नौकेत बसून आपण निश्चित आनंदमयी जीवन जगण्यात यशस्वी होऊ यात कोणतीच शंका नाही
नाम स्मरे निरंतर | तें जाणावें पुण्यशरीर |
माहां दोषांचे गिरिवर | रामनामें नासती ||
|| जय जय रघुवीर समर्थ ||