Wednesday, April 8, 2020

।। श्रीराम ।।

कार्यकर्ता हनुमंत   
डॉ सौ. माधवी महाजन 

 प्रभूरामचंद्र यांच्या चरित्रामध्ये हनुमंताचे स्थान अनन्य आहे. हनुमंताच्या अद्भुत चरित्राचे सर्वाना कायम आकर्षण वाटत आले आहे. शक्ती आणि भक्तीची ही देवता केवळ भारतातच नाही तर भारताबाहेर देखील लोकप्रिय आहे. त्याच्या चरित्रांतील अद्भुत प्रसंगाप्रमाणेच त्याचा भक्तिभाव उपासकांना अधिक मोहून टाकतो. अनेक गुणांची खाण असलेला हनुमंत रामायणाचा प्राण आहे. त्याच्या उपासनेने उपासकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो. शारीरिक तसेच मानसिक सामर्थ्य वाढवणारी हनुमंताची उपासना आज तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. खरें तर त्याच्याप्रमाणे बलवान, निर्भय, निष्ठावान होणे ही खरी त्याची उपासना आहे. अन्याया विरोधात दंड थोपटून उभे राहणारा, स्त्रियांविषयी आदर असणारा, सज्जनांसमोर नम्र तर दुर्जनांसाठी काळ ठरलेला हनुमंत उपासकासमोर अशा सामर्थ्याचा आदर्श ठेवतो. 

प्रभू रामचंद्रांनी धर्मस्थापनेसाठी वानरांच्या साहाय्याने जो पराक्रम गाजवला त्यामध्ये हनुमंताचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. रामायणामध्ये भगवती सीताच्या शोधकार्यात हनुमंताची सर्वात महत्वाची भूमिका आहे. समाजामध्ये काही सकारात्मक कार्य करावयाचे असेल तर ध्येयनिष्ठ, आपल्या ध्येयाशी अत्यंत प्रामाणिक, कार्यात सातत्य राखणारे, निष्ठावान, अशा अनेक गुणांनी युक्त कार्यकर्त्यांची आवश्यकता असते. सर्वगुण संपन्न अशा हनुमंताच्या चरित्रातून आदर्श कार्यकर्ता कसा असावा, त्याच्यामध्ये कोणते गुण असावेत याचे दर्शन घडते. रामायणातील किष्किंधाकांड जेव्हा चालू होते तेव्हा हनुमानाचे प्रथम दर्शन घडते. 

बुद्धिमान आणि अत्यंत मुत्सद्दी : : हनुमंत अत्यंत बुद्धिमान होता. सतत सुग्रीवाचे यश चिंतणारा हनुमंत अत्यंत चाणाक्ष आणि मुत्सद्दी होता. सुग्रीवाचा शोध घेत आलेले प्रभुरामचंद्र आणि लक्ष्मण यांना पाहून प्रथम सुग्रीव आणि सर्व वानर भयभीत झाले होते. कारण हे दोघे वालीचे हेर असावेत असा त्यांचा समज झाला होता. याठिकाणी आलेले हे दोघे नेमके कोण आहेत? त्यांचा याठिकाणी येण्यामागचा नेमका हेतू कोणता आहे? त्यांच्याकडून आपल्याला काही धोका नाही ना? हे त्या दोघांच्या न कळत जाणून घ्यायचे असेल तर अत्यंत विचारी आणि बुध्दीमान अशा व्यक्तीला पाठवणे गरजेचे होते. सुग्रीवाचा मारुतीवर सर्वात जास्त विश्वास होता. या कामासाठी त्याच्याशिवाय योग्य व्यक्ती कोणीही नाही हे सुग्रीव जाणून होता. त्यामुळे या कार्यासाठी मारुतीरायांची नेमणूक करण्यात आली. सुग्रीवाच्या सांगण्यावरून हनुमान श्रीरामांची भेट घेतात. आपल्या परिसरात आलेल्या या दोन व्यक्ती कोण याचा शोध घेताना ते एकदम त्या दोघां समोर उभे न राहता ते ज्या वृक्षाखाली बसले होते त्या वृक्षाच्या फांदीवर जाऊन बसले. जेणेकरून त्या जागेवरून त्यांचे नीट निरीक्षण करता येईल. हे दोघेही वालीचे हेर नाहीत हे जेव्हा हनुमंताच्या लक्षात आले तेव्हा एका ब्राम्हणाचा वेष धारण करून त्यांच्या समोर गेले. हनुमंत उत्तम वेषांतर करता येत होते तसेच  ब्रह्मदेवांच्या वराने त्याला कोणतेही रूप धारण करता येत होते. आपल्या गोड वाणीने आणि अत्यंत सावधपणाने त्याने त्यांची सर्व चौकशी केली. त्यांचा हेतू जाणून घेतला आणि नंतरच मूळ रुपात येऊन आपण सुग्रीवाचा दूत असल्याचे सांगितले. रामचंद्र आणि हनुमंत यांच्या प्रथम भेटीतच हनुमंताच्या बोलण्याचा प्रभूरामचंद्र यांच्या मनावर विलक्षण प्रभाव पडला . ते लक्ष्मणाला म्हणतात,
नानृग्वेदविनितस्य नायजुर्वेदधारिण: ।
नासामवेदविदुष: शक्यमेवं विभाषितुम ।। २८।।
नूनं व्याकरणं कृत्स्नमनेन बहुधा श्रुतम् ।।
बहु व्याहरताऽनेन न किंचिदपशब्दितम् ।। २९ ।। (वा.रा. किष्किंधा कांड सर्ग ३)
लक्ष्मणा अरे मी माझ्या जीवनात अनेक विद्वान पहिले पण असा विद्वान मी आजतागायत पहिला नाही. हा चार वेदांचा ज्ञाता आहे. व्याकरणाची त्याची बैठक एकदम पक्की आहे. नऊ व्याकरणांचा हा पंडित आहे. त्यामुळे इतके बोलला तरी व्याकरणाची एकही चूक त्याच्याकडून झालेली नाही प्रभुरामचंद्र हनुमंताला न मागता हे प्रमाणपत्र देतात. हनुमंत एक कुशल वक्ता असून त्यांची वाणी अत्यंत मधुर आहे. वक्तृत्वाचे सर्व गुण त्याच्यामध्ये भरले आहेत. बोलताना प्रत्येक मुद्दा त्याच्याकडून सविस्तर मांडला जातो. त्याच्याकडे बोलताना कोठेही पाल्हाळीकतेचा दोष नाही. तसेच मोजके बोलले तरी पुढच्याला कळणार नाही इतकेही कमी बोलत नाही. मुद्देसूद बोलताना सहजता आहे, काही आठवण्याचा प्रयत्न करावा लागत नाही. बोलताना सर्व हालचाली प्रमाणात करतो, हावभावांचा अतिरेक त्याच्याकडून होत नाही. आपल्या मधुर वाणीने शत्रूला देखील संमोहित करेल असे साक्षात भगवंतच त्याचे वर्णन करतात.  
   
प्रियमित्र : वानर श्रेष्ठामध्ये असामान्य स्थान असणारे हनुमंत आणि सुग्रीव यांची मैत्री अग्नी आणि वायू सारखी होती. 
सुग्रीवेण समं त्वस्य अद्वैधं छिद्रवर्जितम् ।
आबाल्यं सख्यमभवदनिलस्याग्निना यथा ।। ४० ।। (वा.रा. उत्तरकांड सारंग ३६)
“सुग्रीवा बरोबर त्याचे लहानपणापासूनच वायूचे अग्नीशी असावे असे सख्य असून त्यात दुजाभाव अथवा अंतर कधीही पडले नाही.” हनुमंत सतत सुग्रीवाच्या पाठीशी उभा राहून त्याला सर्व ठिकाणी सहकार्य करीत असे. वाली आणि सुग्रीव यांच्यातील वैरभावामध्ये सुग्रीवावर झालेला अन्याय लक्षात घेऊनच हनुमंताने सुग्रीवाच्या पाठीशी उभे राहिले आहेत. परंतु अत्यंत पराक्रमी असून देखील, स्वत:च्या सामर्थ्याचे विस्मरण झाल्याने वालीकडून होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करावा अशा प्रकारचा सल्लादेखील हनुमंत सुग्रीवाला देत नव्हता.

हनुमंतांची मुत्सद्दीगीरी अनेक प्रसंगातून पहावयास मिळते. श्रीराम आणि सुग्रीव या दोघांचे दु:ख एकच आहे हे लक्षात घेऊन दोघांमध्ये सख्य घडवून आणण्याचे काम मारुतीरायांनी केले. यामध्ये देखील त्यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो. त्यांना दोघांमध्ये मैत्रीचा करार करावयाचा नव्हता तर संस्कार करावयाचा होता. कारण करार मोडला जातो पण संस्कार कायम राहतो मोडला जात नाही. या मैत्रीच्या संस्कारातून त्याने सुग्रीवाचे परम कल्याण साधले. आपण ज्या संघटनेत आहोत त्यांच्याशी प्रामाणिक राहणे आणि त्यांच्या हिताचा विचार करणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. हनुमंताने सुग्रीवाच्या हिताचा विचार करून पर्यायी आपल्या संघटनेचे देखील कल्याणच साधले आहे.

    बुद्धिमंतां वरिष्ठम : हनुमंत ‘बुद्धिमंतां वरिष्ठम’ आहेत. वालीवधानंतर सुग्रीवाला आपल्या कर्तव्याचा विसर पडला होता. तेव्हा त्याने सचिव या नात्याने सुग्रीवाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देऊन सावध केले. भगवती सीतेच्या शोधकार्याला गती देण्याची सूचना यावेळी त्याने केली. हनुमंतांनी आपल्या गुणांनी हा अधिकार सहज प्राप्त करून घेतला होता. सचिव या नात्याने हनुमंताने सुग्रीवाला योग्य तोच सल्ला दिला. सुग्रीवाला अशा प्रकारे सूचना करण्याचा अधिकार केवळ हनुमंताचाच होता. त्याच्या गुणांनी त्याने तो प्राप्त करून घेतला होता. सुग्रीवाने देखील त्याच्या सल्ल्याचा आदर राखून कार्याची आखणी केली, सैन्याची जमवाजमव केली. परंतु हनुमंतांनी यापूर्वीच या कामाला प्रारंभ केला होता. वाली वधानंतर सुग्रीव राज्याचा उपभोग घेण्यात मग्न असताना हनुमंतांनी इतर लोकांशी संपर्क साधून सुग्रीवाच्या भगवती सीतेच्या शोधकार्यात मदत करण्याविषयी इतरांशी बोलणी करून ठेवली होती. प्रत्येक गोष्टीत सावधगिरी बाळगण्याची हनुमंताची ही वृत्ती प्रत्येक कार्यकर्त्याने लक्षात घेण्यासारखी आहे.

    समयसूचकता : सुग्रीवाने दिलेला शब्द न पाळता भगवती सीतेच्या शोधकार्यामध्ये केलेली दिरंगाई प्रभुरामचंद्रांना आणि लक्ष्मणांना आवडली नव्हती. जेव्हा त्याचा जाब विचारायला लक्ष्मण अत्यंत क्रोधीत होऊन सुग्रीवाला भेटायला येतात तेव्हाची कठीण परिस्थिती हनुमंत अत्यंत हुशारीने सावरून घेतात. लक्ष्मणाच्या क्रोधाने भयभीत झालेल्या सुग्रीवाची हनुमंत समजूत घालतात. तसेच लक्ष्मणाचा राग शांत होईपर्यंत वालीच्या पत्नीने त्याचे स्वागत आणि विचारपूस करावी आणि त्याचा राग शांत झाल्यानंतर सुग्रीवाने त्यांना सामोरे जावे असा चतुर सल्ला हनुमंत सुग्रीवाला देतात. कारण इतर कोणापुढे कितीही पराक्रमी असणारे लक्ष्मण कोणत्याही परस्त्रीकडे कधीही नजर वर करून बघत नसें हे हनुमंत जाणून होते. समोर सुग्रीवाची पत्नी बघून अर्थातच लक्ष्मणाच्या क्रोधाची तीव्रता कमी झाली आणि मग सुग्रीव लक्ष्मणाच्या समोर आल्यावर पुढील बोलणी शांतपणे पार पडली. कोणता निर्णय कधी, कसा घ्यायचा याचे उत्तम ज्ञान हनुमंतांना आहे. याठिकाणी शक्तीपेक्षा युक्तीने वालीच्या पत्नीचा एखाद्या ढालीसारखा उपयोग करून घेतला आहे. कोणत्या परिस्थितीत कसे वागावे याचे उत्तम धोरण हनुमंताना होते. कोणतेही कार्य निर्विघ्न पार पाडण्यासाठी हे धोरण अत्यावश्यक आहे.  

    उत्तम संघटक : सीताशोधानाच्या कार्याला जेव्हा प्रारंभ झाला तेव्हा कामाचे नियोजन ठरले. त्यावेळी सुग्रीवाने सर्वांना प्रयत्नांसाठी एक महिन्याचा अवधी दिला होता. वाली पुत्र अंगद ज्या गटाचे नेतृत्व करीत होता त्यांच्या हातून  या कालावधीमध्ये हे कार्य पार पडले नाही. तेव्हा सुग्रीवाला घाबरून अंगद आणि त्याच्या गटातील सर्व वानरांनी प्राणत्याग करण्याचे ठरवले. कारण राजा सुग्रीव काम पूर्ण झाले नाही म्हणून आपल्या सर्वांचा वध करेल याचे त्यांना भय वाटत होते. या सर्व परिस्थितीत हनुमंत अत्यंत सावध होते. अशा परिस्थितीत फूट पडली तर सुग्रीवाला सोडून अनेक वानर अंगदाला सामील होतील हा धोका हनुमंताच्या लक्षात आला. अंगद एक असामान्य शक्ती असलेली व्यक्ती असल्याने त्याने सुग्रीवाच्याच सेनेत असणे महत्वाचे आहे हे ओळखून हनुमंताने अंगदाची समजूत घातली. प्रत्येकाचे सामर्थ्य जाणून घेण्याची तसेच त्याचा योग्य तो उपयोग करून घेण्याचे उत्तम कौशल्य हनुमंतांकडे होते. कोणती परिस्थिती कशी हाताळावी हे कसब हनुमंतांकडे असल्यामुळे अंगदाचे विचार बदलण्यास त्याला यश मिळाले. अंगदाचे मतपरिवर्तन करून सुग्रीवाच्या गटामध्ये त्याचा समावेश करून घेण्यात हनुमंताचे उत्तम संघटन कौशल्य दिसून येते.

माणसांची उत्तम पारख : हनुमंताच्या विद्वत्तेवर प्रभूरामचंन्द्रांचा गाढ विश्वास होता. रावणाचा भाऊ बिभीषण जेव्हा रामचंद्रांना शरण आला तेव्हा त्याला आपल्या गटात समावेश करून घ्यावा का नाही हा प्रश्न निर्माण झाला. सुग्रीवापासून सर्वांनी त्याचा स्वीकार करण्यास नकार दिला. परंतु हनुमंताना विचारल्यावर त्याने
एतावत् तु पुरस्कृत्य युज्यते तस्य संग्रह: ।। ६७ ।। (वा.रा. युद्धकांड सर्ग १७ )
‘त्याचा संग्रह करावा’ असे तत्काळ उत्तर दिले. बिभीषण जरी रावणाचा भाऊ असला तरी त्याच्यापेक्षा वेगळा आहे हे हनुमंत जाणून होते. कोणाचा संग्रह करायचा आणि कोणाचा नाही याविषयीची हनुमंताची पारख अचूक होती. अंगदाचा सुग्रीवाच्या गटामध्ये संग्रह केला तेव्हा देखील हनुमंताचे हेच कौशल्य दिसून येते. 

    लोकप्रिय : हनुमंताचे मन स्थिर आणि निष्पाप आहे. कोणत्याही विकारांना त्यांच्या मनात स्थान नाही. अत्यंत पराक्रमी असूनही अत्यंत नम्र, अत्यंत विद्वान असूनही निरहंकारी, सर्वांमध्ये मिळून मिसळून राहण्याची त्यांची वृत्ती यामुळेच हनुमंत सर्वांमध्ये प्रिय होते. त्याच्याकडे असणाऱ्या गुणांमुळेच, शौर्यामुळेच सुग्रीवाला तसेच प्रभुरामचंद्राना, सर्व वानरसेनेला भगवती सीतेच्या शोधकार्यात हनुमंतच महत्वाचे वाटतात.  त्याच्यावरील विश्वासामुळे श्रीरामांच्या मनात देखील कार्यसिद्धीविषयी शंका उरली नाही. या मोहिमेवर निघताना हनुमंतांनी जेव्हा ‘मी तुमचा दूत आहे हे आईला कळावे म्हणून एखादी वस्तू द्या’ सांगितल्या नंतर रामचंद्रांनी आपल्या कडील मुद्रिका त्याला काढून दिली. तसेच दोघांमध्ये घडलेला एक प्रसंग देखील सांगितला ज्यामुळे भगवतीला हनुमंत श्रीरामाकडूनच आल्याची खात्री पटली. भगवती सीतेचा आणि आपला परिचय नाही तेव्हा प्रथम भेटीत त्यांचा आपल्यावर विश्वास बसावा यासाठी हनुमंतांनी करायला निघण्यापूर्वीच घेतलेली दक्षता वाखाणण्याजोगी आहे. केवळ शोध घ्यायचा आणि परत यायचे ही भूमिका नाही तर कार्यास निघण्यापूर्वी अनेक शक्यतांचा विचार करून मग कार्याचा श्रीगणेशा करणारा हा हाडाचा कार्यकर्ता त्याच्या या गुणांमुळे सर्वाना प्रिय आहे.

    निर्भयता : भगवती सीतेचा शोध हे रामायणातील महान पर्व आहे. हे पर्व संपूर्णपणे हनुमंताशी निगडीत आहे. याठिकाणी त्याच्या सर्व गुणांची कसोटी लागते. त्यापैकी महत्वाचा अभयम्‌  म्हणजे भयाचा संपूर्ण अभाव हा दैवी संपत्ती मधील एक गुण हनुमंतांमध्ये पहावयास मिळतो. सीतामाईच्या शोधकार्यासाठी हनुमंताना लंकेत जावे लागले. रावणाच्या लंकेत पोहोचेपर्यंत वाटेत हनुमंताना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. या प्रत्येक अडचणींच्यावेळी प्रसंगावधान राखून हनुमंतांनी आपली सुटका करून घेतली. मगरीच्या रूपाने ‘सुरसा' हनुमंताला आपले भक्ष बनवू पाहत होती. तेव्हा ती जसा जबडा मोठा करत जाईल तसे हनुमंतांनी विशाल रूप धारण केले, पण आपल्या मुख्य ध्येय गाठण्याच्या दृष्टीने होणार अपव्यय टाळण्यासाठी अत्यंत चातुर्याने त्याने आंगठ्या एवढे रूप धरण करून तिच्या मुखातून स्व:ताची सुटका करून घेतली. जेव्हा बळ दाखवायचे तेव्हा विशाल रूप धारण केले परंतु जेव्हा बुद्धीचा वापर करावयाचा तेव्हा सूक्ष्म रूप धारण करून आपली संकटातून सुटका करून घेतली. आपल्याला त्रास देणाऱ्या सुरसेचा त्यांनी जसा आदर राखला तसाच मैनाक पर्वताचा देखील आदर राखला. समुद्रातून वर आलेल्या मैनाक पर्वताने त्याला विश्रांती घेण्यास सांगितले असता त्या विनंतीला नम्रतापूर्वक नकार देऊन हनुमंताने आपला पुढचा मार्ग आक्रमिला. सीतेचा शोध हेच ध्येय हनुमंताच्या डोळ्यासमोर होते. कोणतेही ध्येय प्राप्त करण्यासाठी त्यामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करून मारुतीराय पुढे गेले आहेत. कोणतेही ध्येय गाठायचे असेल तर त्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यावर अत्यंत हुषारीने तसेच संयमाने मात करून पुढे जावे हाच संदेश मारुतीरायांनी आपल्या कृतीतून दिला आहे.

रामायणातील सुंदरकांड हे हनुमंताच्या लीलांनी भरलेले आहे. त्याच्या लीला, बुद्धिमत्ता, या सर्व गोष्टी वाल्मिकींना सुंदर वाटल्यामुळे याकांडाचे नाव सुंदरकांड ठेवले असावे . लंकेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हनुमंतानी  सुक्ष्म रूप धरण केले तरीही लंकेच्या नगरदेवतेने म्हणजेच लंकीनीने त्याला पकडले. यावरून लंकेची सुरक्षाव्यवस्था किती विचारपूर्वक केली होती याचा प्रत्यय येतो. मुंगीने जरी लंकेत प्रवेश केला तरी त्याची लगेच नोंद होते होती. लंकीनीने हनुमंताना जरी पकडले तरी त्यांनी तीचा वध करून निर्भयपणे लंकेत प्रवेश केला. अभयम या गुणाच्या जोरावरच हनुमंतांनी एकट्याने लंकेत प्रवेश करून त्याठिकाणी अतुलनीय पराक्रम गाजवला.

शुद्ध आणि निष्पाप मन  : हनुमंताचे मन स्थिर आणि निष्पाप आहे. कोणत्याही विकारांना यामध्ये स्थान नाही. भगवती सीतेचा शोध घेताना हा शोध हनुमंताना स्त्रीयांमध्येच घ्यावा लागणार होता. याविषयीचे हनुमंताचे चिंतन मुळातून पाहण्यासारखे आहे. मद्यधुंद होऊन अस्ताव्यस्त पडलेल्या स्त्रीयांमधून हनुमंत भगवतीचा शोध घेत होते. या शोधकार्यात धर्मभयाने क्षणभर त्यांचे मन शंकित झाले. परस्त्रियांकडे पाहणे योग्य नाही हा विचार त्यांच्या मनात आला तरी त्यांनी आपले चित्त आपल्या ध्येयावर केंद्रित केले. “या स्त्रियांना मी पहिले तरीही माझ्या मनात कोणताही विकार उत्पन्न झालेला नाही. सर्व इंद्रियांना शुभ आणि अशुभ अवस्थांना जाण्याची प्रेरणा देण्यास मनच कारणीभूत आहे. मात्र माझे मन किंचितही विचलित झालेले नाही”. मानवी मन चंचल आहे. एखादी गोष्ट मी करत नाही हे दुसर्यांना दाखवून देणे आणि मनानी मात्र सतत त्याच गोष्टीत रममाण असणे हे खरे पाप आहे हेच हनुमंत याठिकाणी स्पष्ट करतात. भगवंताच्या कामासाठी वाटेल त्याठिकाणी जावे लागले तरी माझे मन विकारहीनच असणार असा हनुमंताचा विश्वास होता. याप्रसंगी हनुमंताचे चिंतन आणि कृती यातून त्यांचे मन किती शुद्ध आणि निष्पाप आहे याचा प्रत्यय येतो.
श्रेष्ठ मानसशास्त्रज्ञ : बुद्धी, शक्ती, भक्ती, याबरोबर उत्तम वक्तृत्व, चातुर्य, सेवाभाव, नम्रता, ब्रह्मचर्य अशा अनेक गुणांनी युक्त असलेला हनुमंत बुद्धीमंतांमध्ये अग्रणी आहे. त्याच्या मधील समय सूचकता वाखाणण्याजोगी आहे. कोणत्या परिस्थितीत कसे वागावे याचे त्याला उत्तम ज्ञान आहे. हनुमंत श्रेष्ठ मानसतज्ञ आहेत.

भगवतीचा शोध घेत असताना जेव्हा सीतामाई राक्षसीणींच्या गराड्यात बसलेली त्यांना दिसते तेव्हा कोणताही उतावळेपणा न करता शांतपणाचे धोरण त्यांनी स्वीकारले. तिच्यासमोर लगेच न जाता झाडावर सूक्ष्मरूपाने बसून त्यांनी बरेच चिंतन केले. भगवतीची मानसिकता लक्षात घेऊन हनुमंत याठिकाणी प्रत्येक कृती विचारपूर्वक तसेच सावधपणे करीत होते. नुकताच रावण सीतेला धमक्या देऊन गेल्यानंतर तिचा विलाप हनुमंतांनी प्रत्यक्ष पाहिला. तिच्या घाबरलेल्या मनस्थितीत पटकन तिच्यासमोर जाणे हनुमंतांनी टाळले. कारण रावणच मायावी रूप धरण करून आपल्या समोर आला आहे असा तिचा समाज होऊन तिचा आपल्यावर विश्वास बसणार नाही आणि स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करायला निघालेल्या भगवतीला या विचारांपासून परावृत्त करण्यासाठी तसेच आपण रामाचे दूत आहोत यावर तिचा विश्वास बसण्यासाठी हनुमंतांनी विचारपूर्वक युक्तीचा वापर केला. कार्यसिद्धीसाठी कार्यकर्त्यामध्ये आवश्यक असणारा संयम याप्रसंगी हनुमंताच्या ठिकाणी पाहावयास मिळतो. 

प्रभुरामचंद्रांनी दिलेली मुद्रिका स्वत:जवळ असून देखील एकंदर परिस्थितीचा विचार करून हनुमंतांनी झाडावर बसून श्रीरामांचा इतिहास सांगायला सुरवात केली. प्रभूंच्या जन्मापासून काय काय घडले हे गायला सुरवात केली. उत्तम वक्तृत्व लाभलेल्या हनुमंतांना भगवती सीतेची उत्सुकता वाढवण्यात यश आले. हे गीत गाणारा तसेच श्रीरामांच्या परिवाराला जवळून जाणणारा हा कोण आहे ही उस्तुकता भगवतीच्या मनात निर्माण झाल्यावर हनुमंत तिच्यासमोर उभे ठाकले आणि प्रभूनी दिलेली अंगठी दाखवून आपली ओळख पटवून दिली. भगवतीचे सांत्वन करून तिला धीर दिला. भगवती सीतेची आणि आपली भेट झाली यावर प्रभूंचा विश्वास बसावा यासाठी त्यांनी खूण म्हणून चूडामणी घेऊन एकांतातील एक प्रसंग जाणून घेतला आहे. हनुमंताचा विशेष हा की स्वतःचा परिचय देताना मी रामाचा दूत असा परिचय करून देतात. स्वतःच्या पराक्रमाचा उल्लेख कोठेही केलेला नाही. मी एकटा लंका पार करून आलो, अनेक संकटे एकट्याने कशी पार पडली अशा प्रकारच्या बढाया त्याने मारलेल्या नाहीत ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. मी या वानरसेनेतील सर्वात लहान वानर आहे असे त्याने सांगितल्या वर या वानरांना घेऊन श्रीराम या संकटाला कसे तोंड देणार अशी भगवतीच्या मनात शंका राहू नये म्हणून सूक्ष्म रूपात तिच्यासमोर आलेले हनुमंत विशाल रूप धारण करतात. यामागे आपले बळ दाखवणे किंवा तिला घाबरवणे हा उद्देश नसून आईच्या मनातील भीती जावी हा शुद्ध हेतू त्यामागे होता.  

स्वयंप्रज्ञ हनुमंत : हनुमंत सामर्थ्यसंपन्न व तेजस्वी आहेत. अत्यंत महापराक्रमी हनुमंताना आपल्या बळाच्या जोरावर आपण कोणतेही कार्य पार पडू शकतो हा आत्मविश्वास आहे.  सर्वात महत्वाचे म्हणजे जे कार्य आपल्यावर सोपवले आहे तेवढेच करणाऱ्यांपैकी हनुमंत नाहीत तर ते स्वयंप्रज्ञ आहेत. शंभर योजने दूर आल्यानंतर न थकता, कोणत्याही प्रकारचा आळस न करता, शत्रूचे बळ किती आहे याचा अंदाज घेण्यास हनुमंतांनी सुरवात केली. एकाच कार्यात जमतील तितकी अधिक कार्ये पार पाडावीत या विचाराने त्याने वनाचा विध्वंस करण्यास सुरवात केली. त्याला प्रतिकार करण्यास आलेल्या सर्व बलवान राक्षसांचा त्याने नाश केला. शेवटी रावणपुत्र इंद्रजीतने सोडलेल्या ब्रह्मास्त्राच्या पाशात हनुमंत स्वत:हून बद्ध झाले आहेत. कारण याठिकाणी रावणाची भेट होणे महत्वाचे होते. रावणाच्या दरबारात जाऊन अत्यंत निर्भीडपणे त्याने त्याला त्याची चूक दर्शवून दिली आहे. श्रीरामांच्या न कळत त्यांच्या पत्नीला चोरून आणणाऱ्या रावणाला त्याने हितकारक अशी वचने सांगितली आहेत. याशिवाय रावणाने आपली चूक सुधारावी आणि सीतेला सन्मानपूर्वक श्रीरामांकडे सुपूर्द करावे असा सल्ला देखील दिला. हनुमंत निती निपूण आहेत. त्याच कौशल्याच्या आधारे त्यांनी रावणाशी संभाषण केले आहे. रावणाला भर सभेमध्ये त्याच्या चुकीची जाणीव करून देताना प्रभू रामचन्द्रांच्या पराक्रमाचे वर्णन करायला हनुमंत विसरले नाहीत. त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्या विषयीचे भय सर्वांच्या मनामध्ये निर्माण झाले. त्याच्या वक्तव्याने रावणाने क्रोधित होऊन त्याचा वध करण्याची आज्ञा सेवकांना दिली. परंतु याठिकाणी रावणाचा भाऊ बिभीषण याने मध्यस्ती केली. राजदूताला मारणे राजनीतीला धरून नाही हे त्याने रावणाला समजावून सांगितले. शेवटी रावणाने हनुमंतांची शेपटी पेटवून देण्याचा आदेश दिला.

राक्षसांनी हनुमंताला बांधल्यानंतर ते बंधन त्याने निमुटपणे सहन केले. या परिस्थितीत भांबावून न जाता हनुमंत विचार करीत होते. त्याने जेव्हा लंकेत प्रवेश केला तेव्हा रात्र असल्यामुळे अनेक गोष्टी त्यांच्या नजरेस पडल्या नव्हत्या. परंतु राक्षसांनी त्याला बंदी बनवून त्याची धिंड काढली तेव्हा दिवस असल्यामुळे सर्व नगरीचे निरीक्षण करणे त्याला सहज शक्य झाले. त्याठिकाणी हनुमंतांनी विचित्र विमाने पहिली, तटबंदी, कितीतरी भूभाग पहिले, चबुतरे, घरे, सडका, छोट्या गल्ल्या, घरांचे मध्यभाग हे सर्व त्यांनी अतिशय बारकाईने बघून ठेवले. सर्व नगरीचे नीट निरीक्षण झाल्यानंतरच हनुमंतांनी लंकावासियांना आपल्या शेपटीचा प्रताप दाखविला. ज्या शेपटीला राक्षसांनी आग लावली त्याच आगीने हनुमंतांनी लंकेतील घरे पेटवून दिली, राक्षसांना मारले. सर्व लंकापुरी आगीने वेढुन टाकली. हनुमंताच्या या पराक्रमामुळे त्याच्या विषयी सर्वांच्या मनात भय निर्माण झाले. लंकेमध्ये रावणाच्या सेनेचे पूर्ण खच्चीकरण करून भगवती सीतेच्या मनात विश्वास निर्माण करून लंकेतून हनुमंत परतले. सितामाईंची व्याकुळता वर्णन करून सर्व वानरसेनेस त्यांनी युद्धाला प्रवृत्त केले. हनुमंताचे लंकादहन हा केवळ विनोद निर्माण करणारा प्रसंग नसून चिंतनशील तसेच पराक्रमी हनुमंताचे दर्शन घडवणारा आहे.

अनुपम दूत :         प्रगल्भ: स्मृतिमान वाग्मी शस्त्रे शास्त्रेच निष्ठित: |
            अभ्यस्तकर्मा नृपतेर्दूतो भवितुमर्हति || अग्नि पु. अ. २४१.७ ||
   
“ निर्भीड वक्तृत्व, शुद्ध स्मरणशक्ती, वाक् चातुर्य, युद्धकौशल्य, शास्त्रांमध्ये पारंगतता आणि अनुभव संपन्नता हे गुण ज्या व्यक्तीच्या अंगी आहेत ती व्यक्ती राजदूत होण्यास योग्य होय.” असे श्रीरामांनी लक्ष्मणाला राजनीतीचा उपदेश करताना सांगितले आहे. श्रीराम हा नीतिमान राजा होता ज्याच्याकडे वरील सर्व गुणांनी युक्त असा हनुमंतासारखा दूत होता. लंकेमध्ये हनुमंत रामदूत म्हणून गेले होते. हनुमंताकडे निर्भीड वक्तृत्व होते. रावणाच्या दरबारात उभे राहून त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देण्याचे धाडस हनुमंतामध्ये होते. सदाचार प्रेमी हनुमंताने रावणाच्या दरबारामध्ये रावणाशी जे संभाषण केले त्यातून या रामदूताची प्रतिभा आणि निर्भीड वृत्ती याचे दर्शन घडते.

    हनुमंतांनी जेव्हा दरबारामध्ये रावणाशी संभाषण सुरु केले तेव्हा त्याची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु एकूणच रावणाची अहंकारी वृत्ती तसेच स्वत:ची चूक मान्य न करण्याची प्रवृत्ती लक्षात आल्यावर युद्ध अटळ आहे याची जाणीव हनुमंतांना झाली. त्यानंतर मात्र त्याने लंकेतील वास्तव्यात अत्यंत चाणाक्षपणे सर्व हालचाली केल्या. रावणाच्या दरबारात स्वत:ची ओळख करून देताना हनुमंत म्हणतात, “ प्रभूरामचंद्राच्या सेनेमाधला सर्वात कमी बळ असलेला असा मी एक वानर आहे. फक्त मला वेगाने पळता येते म्हणून याठिकाणी मला पाठवले आहे. त्याने हे जे वक्तव्य केले त्यामुळे लंकावासीयांच्या मनात श्रीरामचंद्र आणि त्यांच्या सेनेविषयी भय निर्माण झाले. त्याचप्रमाणे आत्तापर्यंत आयोध्येची कुलवधू रावणाने पळवून आणली आहे याचे सोयरसुतक नसणाऱ्या लंकावासीयांना रावणाची चूक हनुमंतांनी निदर्शनास आणून दिली. हनुमंताच्या या सर्व कृतीमुळे रावणाच्या सैन्यात दुफळी निर्माण झाली.

विलक्षण स्मरणशक्ती : हनुमंताकडे विलक्षण स्मरणशक्ती होती. अत्यंत बुद्धिमान असणाऱ्या हनुमंतांनी लंका दहनाच्यावेळी अत्यंत चाणाक्षपणे लंकानगरीचे निरीक्षण केले. लंकेहून परत आल्यानंतर त्या सर्वाचे इत्यंभूत वर्णन त्याने श्रीरामांजवळ केले. त्यामुळे श्रीरामांना युद्धापूर्वीच शत्रूसैन्याची संरक्षण व्यवस्था, राज्याची रचना, संरक्षक योजना,चोरमार्ग, सैन्याचे बळ यासर्वाची हनुमंताकडून सविस्तर माहिती मिळाली. त्यामुळे पुढील कार्याला सर्वजण लगेचच प्रवृत्त झाले आहेत. सेतू बांधण्यापूर्वी हनुमंतांनी श्रीरामांना लंकेचे किती दरवाजे आणि ते कुठे कुठे आहेत याची सविस्तर माहिती दिली. त्यामुळे पुढील कार्याची आखणी करणे सोप्पे गेले.  

शौर्य दाक्ष्यं बलं धैर्य प्राज्ञता नयसाधनम् ( वा. रा. ७.३५. ३.५ ) अशी प्रभुरामचंद्रांनी ज्याची प्रशंसा केली असा हा हनुमंत एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. अत्यंत बलसंपन्न हनुमंतांचा अतुलनीय पराक्रम वाल्मिकी रामायणात पहावयास मिळतो. प्रभू रामचंद्रांनी वानरसेनेच्या सहाय्याने समुद्रावर सेतू बांधून लंकेत प्रवेश केला. त्याठिकाणी राम-रावण सेनेत घनघोर युद्ध झाले. या युद्धात हनुमंतांनी अलौकिक कामगिरी केली. आपल्या बळाने अनेक राक्षसांचा संहार केला. सर्व सेनेने लंकेत प्रवेश करण्यापूर्वी हनुमंताने यापूर्वी येऊन जो पराक्रम केला होता त्यामुळे बरेचसे काम उरकले गेले होते. लंकेतील सर्व पूल त्याने तोडले होते, तटबंदी पाडून टाकली होती, तसेच असंख्य राक्षसांपैकी एक चतुर्थांश हिस्सा त्याने नष्ट केला होता. 
युध्दकाळामध्ये हनुमंताने जे रौद्ररूप धारण केले याचे आवेशपूर्ण वर्णन समर्थ रामदास्वामींनी आपल्या एका स्तोत्रात केले आहे. “अद्भुत आवेश कोपला रणकर्कशू | धर्मसंस्थापनेसाठी दास तो उठिला बळे ||” हनुमंताचा हा रणकर्कश्य आवेश धर्मस्थापनेसाठी आहे. भगवती सीता हे धर्माचे प्रतीक आणि या धर्मस्थापनेसाठी मारुतीरायाने रौद्रावतार धारण करून हा महाप्रलय घडवला आहे. समर्थांच्या काळी स्वधर्मस्थापनेसाठी या आवेशाची गरज होती. राष्ट्रांमध्ये हा आवेश निर्माण व्हावा म्हणून समर्थानी असे आवेशपूर्ण वाड्मय निर्माण केले. जेव्हा जेव्हा नकारात्मक विचारांची वावटळ उठेल तेव्हा तेव्हा हनुमंताच्या या रणकर्कश्य आवेशाची आवश्यकता आहे. 
प्रभूरामचंद्रांवर पूर्ण निष्ठा ठेवून लंकेमध्ये येऊन त्याने आपले कार्य पूर्ण केले. काही झाले तरी प्रभू मला तारून नेतील या दृढ विश्वासामुळेच हनुमंत निर्भयपणे आपले कार्य निर्विघ्नपणे पार पाडू शकले आहेत. श्रीरामांविषयी अनन्य भाव, श्रीरामांचा अखंड जप, याच बरोबर हनुमंत अखंड कार्यरत राहिले. भक्ती शक्तीचे प्रतीक असणारा हनुमंत निरंतर कर्मयोगी आहेत. अचूक प्रयत्न, स्वयं चिंतन, मनन करून घेतलेले योग्य आणि अचूक निर्णय यातून त्याची कार्यक्षमता लक्षात येते. प्रत्यक्ष युद्धप्रसंगी अनेक अडचणींचे प्रसंग आले तेव्हा मारुतीराया धावून आले आहेत. हनुमंताचा लंकेतील पराक्रम आणि सीता शोधन या कार्यात हनुमंताच्या बुद्धिमत्तेचे तसेच सामर्थ्याचे दर्शन घडते. हनुमंत रामचंद्रांसाठी प्राणार्पण करण्यास तयार असलेला अनन्य सेवक आहे. अनेक गुणांनी संपन्न असूनही त्याला सत्तेची हाव नाही, अधिकार गाजवण्याची त्याची वृत्ती नाही. सर्व प्रभावी गुण असताना देखील नम्र सेवक होऊन राहण्याची त्याची वृत्ती आहे. अत्यंत पराक्रमी आणि सत्वशील हनुमंतामध्ये असणाऱ्या गुणांचे चिंतन करून हे गुण अंगी बाणवण्याचा प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

No comments:

Post a Comment