Saturday, March 28, 2020।। श्रीराम ।।


दैनंदिन जीवनात अध्यात्म

डॉ माधवी महाजन
madhavimahajan17@gmail.com        भारतीय संस्कृतीने आनंदी जीवन कसे जगावे याचा मूलमंत्र दिला आहे. या संस्कृतीमध्ये मानवी मनाचा, शाररिक आरोग्याचा, विश्वाचा, निसर्गाचा तसेच जगण्यासंबंधीच्या नियमांचा सर्वांगीण अभ्यास झाला आहे. अद्वैतला महत्व देऊन विश्वावर आपलेपणाने प्रेम करा अशी व्यापक विचारांची शिकवण भारतीय संस्कृतीने दिली. ऋषीमुनींनी शाश्वत सुखाची प्रचिती घेऊन तो आनंद सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी ते सतत कार्यरत राहिले. शाश्वत सुखाचा मार्ग वेदांनी मानवाला दाखवला. २१ व्या शतकात संत विभूतींनी हा मार्ग अधिक सोप्पा करून दाखविला. संतांचे विचार, त्यांचे साहित्य, एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरतात. विचारांना दिशा देणारे, मनाला वळण लावणारे, हे विचार उत्तम व्यक्तिमत्व साकारण्यास तसेच आनंदी जीवन जगण्यास निश्चितच प्रेरणादायी ठरतात.

     अध्यात्म म्हंटले की हा विचार आपल्यासाठी नाही असाच आपण समज करून घेतो. या गैरसमजातून अत्यंत मौलिक विचार सकारात्मक विचार देणाऱ्या या ग्रंथांपासून आपण दूर राहतो. आपल्या सोयी नुसार प्रत्येकजण आपल्या आयुष्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असला तरी त्यामध्ये स्वतःची सोय अधिक महत्वाची असते. आपणच आखलेल्या आपल्या दिनचर्येत आपण रममाण असतो. आपल्या या व्यस्त जीवनात कोणी ढवळाढवळ केलेली चालत नाही. या व्यस्त जीवनात अध्यात्म याविषयी कोणी बोलले तर ‘माझा यावर विश्वास नाही’ अशी पटकन प्रतिक्रिया दिली जाते. कारण अध्यात्म म्हणजे भोंदूगिरी, देव देव करायला लावणारे असा समज बहुतेक जणांचा झालेला असतो. परंतु केवळ परमेश्वर चिंतन म्हणजे अध्यात्म नव्हे. अध्यात्म म्हणजे विचारांमध्ये, वृत्तीमध्ये बदल. मनातील सकारात्मक विचार नकारात्मक विचारांवर मात करतो असे हे अध्यात्म. या विचारांच्या साहाय्याने स्वतःमध्ये बदल घडवून आपल्या आसपास असणाऱ्या व्यक्तीशी अधिक सख्य जोडून आनंद निर्माण करणे म्हणजे अध्यात्म. विचारांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारे अध्यात्म दैनंदिन जीवनात उपयोगी आहे.

      जीवनामध्ये सतत सुखी राहण्यासाठी मनुष्य कार्यरत असतो. २१ व्या शतकात मानवाने आपले जीवन सुखी होण्यासाठी अनेक क्षेत्रात प्रगती केलेली दिसते. आपल्या देहाला कमीत कमी कष्ट देऊन जास्तीत जास्त सुख कसे प्राप्त करून घेता येईल या दृष्टीने तो सतत प्रयत्नशील असतो. या बाह्य सजावटीकडे लक्ष देताना आपले मन देखील सुदृढ असावे याकडे मात्र त्याचे दुर्लक्ष झालेले दिसते. भोगवादीवृत्ती आणि मानसिक विकासाकडे दुर्लक्ष यामुळेच परस्परांविषयी राग,द्वेष, हेवेदावे, मत्सर या असुरी संपत्तीचा अधिकाधिक विकास होताना आपण पाहतो. माणसाचे माणूसपण हरवणारे असे हे विकार आहेत. म्हणूनच काम, क्रोध, लोभ, मत्सर आणि मोह यापासून कोसो दूर राहण्यास सांगितले गेले आहे. जेथे काम आहे तेथे क्रोध हा स्वाभाविकपणे येतोच. व्यक्तीच्या मनामध्ये विषय तृप्तीच्या गोष्टीकडे धावणारे जे विचार येतात ते म्हणजे इच्छा, कामना. मग ही कामना शरीर भोगाविषयी असो अथवा कोणत्याही इंद्रियांची तृप्ती करण्याविषयीची असो. काम हा विकार आहे. जेव्हा शृंगारातील पावित्र्याची भावना संपुष्टात येते, एकात्म भाव जीवनाचा व्यापक विचार नष्ट होतो तेव्हा या विकारात विकृती निर्माण होते. या विकृतीतूनच लहान मुलींपासून वृद्ध स्त्रीयांपर्यंत अनेक जणींवर अत्याचार झाल्याचे वृत्त रोज आपल्या कानावर येते. तरुण पिढीवर याचा एव्हढा प्रभाव दिसतो की उघड्यावर होणारे मिलन यामध्ये त्यांना काहीच गैर वाटत नाही. लोकांना ना भय ना लज्जा यामुळे अनाथालयांची होणारी वाढ, अनेक रोग उदभवतात. या लोकांना जर कोणी विरोध केला तर यांच्या मधील क्रोध उफाळून येतो. यातूनच खुनाचे वाढते प्रमाण, एकतर्फी प्रेमाची अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात. विषय सेवनाने तृप्ती होते असा समज असणाऱ्यांसाठी महाभारतातील ययातीने उदाहरण पुरेसे आहे. ययातीला असे वाटते की आपले वृद्धपण कोणी घेतले तर आणखी काही काळ विषयांचे सेवन करता येईल. विषयांचे अधिक काळ सेवन केले तर आपोआपच तृप्ती प्राप्त होईल असे त्याला वाटते. त्याची ही इच्छा त्याच्या मुलाने पूर्ण केली. मुलाने त्याचे वार्धक्य घेणे परंतु मुलाचे तारुण्य घेऊनही त्याला तृप्ती मिळाली नाही. शेवटी तो जे म्हणाला ते अत्यंत महत्वाचे आहे, “कामनांचा उपभोग घेतल्याने कधीही तृप्ती होत नाही. उलट अग्नीत तूप टाकल्यावर अग्नी शांत न होता तो अधिकच भडकतो तसेच उपभोगाने कामनांची तृप्ती न होता त्या अधिकच प्रज्वलित होतात”.


      संत वाड्मय किंवा अध्यात्मशास्त्र विषयांपासून सतत दूर नेतात ते विषय खरंच एव्हढे वाईट आहेत का? खरेतर शब्द,स्पर्श,रूप,गंध आणि रस या पंचज्ञानेंद्रियांचे विषय आपण नित्य भोगत असतो म्हणजे विषयसेवन घडणारच आहे. पण संत याठिकाणी विषय त्याग सांगत नाहीत तर विषयासक्तीचा त्याग करायला सांगत आहेत. क्रोधाच्या आहारी न जाता मनानी त्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. कारण नसताना पुढच्या व्यक्ती कडून आपल्याला क्रोध यावा असे वर्तन घडले तरी माझी वैचारिक पात्रता, विचारांची स्थिरता मी गमावणार नाही हा विवेक जागृत ठेवून क्रोधावर विजय मिळवता येणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वाहन चालवताना या आणि अशा अनेक प्रसंगी क्रोधावर नियंत्रण ठेवता येणे आवश्यक आहे. या विकारांवर विजय मिळवणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील हिताचे आहे. कारण या सतत येणाऱ्या अनावश्यक रागामुळेच रक्तदाब, मधुमेह अशा अनेक आजारांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये मन अत्यंत अस्थिर आणि अस्वस्थ झालेले आहे.

       काम, क्रोधापेक्षा देखील विखारी आहे तो लोभ. सतत एखाद्या विषयाचा आनंद घेऊनही माणसाच्या मनातील लालसा कमी होत नाही. लोभ हा गरजेपोटी नसून वासनेपोटी जन्माला येतो. तृप्ती न होणे हाच लोभाचा स्वभाव आहे. माणसाला धनाची तीव्र वासना असते. कितीही धनप्राप्ती झाली तरीही यांच्या गरजा त्यामध्ये भागात नाहीत. म्हणून तो अधिक धनप्राप्ती करून घेण्याच्या मागे लागतो. धनप्राप्तीसाठी कुटुंबापासून दूर राहणे देखील तो स्वीकारतो. स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या सुखासाठी धनप्राप्तीला अधिक प्राधान्य दिले जाते. त्यामुळे सतत वाढणाऱ्या गरजा आणि त्याच्या पूर्ततेसाठी धनप्राप्तीच्या मागे धावणे या वर्तुळातून त्याची कधीच सुटका होत नाही. पुरेसे अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख गरजा भागल्या तरीही भोगवादाच्या पूर्ततेसाठी नवीन वस्तू घरात येतंच राहतात पण त्याचबरोबर जुन्या वस्तूंचा मोह काही सुटत नाही. सर्वकाही प्राप्त करून देखील माणसाला सतत अपुरेपणाची जाणीव होत राहते. त्यामुळे तो सतत अशांत आणि असमाधानीच राहतो. सतत स्वतःच्या प्रपंचाचे तसेच मी, माझे याचेच चिंतन लोभ वाढवतो. हा लोभ सतत क्षोभ वाढवतो, अतृप्तता वाढवतो आणि माणसाच्या दुःखाला कारण ठरतो. माणसाची प्रवृत्ती अशी असते की स्वतःच्या प्रपंचासाठी साठवता साठवता आपली मुले, नातवंडे यांच्यासाठी साठवून ठेवण्याची त्याची वृत्ती बळावत जाते. त्यामुळे आयुष्य संपत आले तरी देहाचे कष्ट सुटत नाहीत. नेमके कुठे थांबायचे हा विवेक अध्यात्म ग्रंथातुन उमगतो. धनाचा लोभ महाभयंकर आहे. परद्रव्याची अभिलाषा धरू नको हे सूत्र अध्यात्मिक ग्रंथात पहावयास मिळते. “ नको रे मन द्रव्य ते पुढिलांचे ” याठिकाणी परद्रव्याची अभिलाषा नकोच पण वडिलांच्या पैशाची देखील अपेक्षा नको हे अभिप्रेत आहे. या अपेक्षेतूनच निर्माण होणारे संघर्ष, नात्यांमध्ये निर्माण होणारी घुसमट यातून नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. सर्व गोष्टी विपुल प्रमाणात असून देखील मनःशांती नाही अशी अस्वस्था निर्माण होते. अशा परिस्थितीत अध्यात्माचे नेमके सूत्र समजलेल्याना मात्र मनःशांती प्राप्त होते. कारण या सर्वांवर मात करण्यासाठी चंचल मनावर विजय मिळवणे क्रमप्राप्त आहे याची त्यांना जाणीव असते आणि तशी त्यांची कृती देखील असते. आत्मपरीक्षण करून या सकारात्मक विचारांच्या आधारे स्वतःमध्ये जाणीवपूर्वक बदल घडवून आणाणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःमध्ये असणारे अवगुण हे गुणच वाटत असतात. पण त्याचवेळी इतरांमधील दोष मात्र पटकन लक्षात येतात. पण इतर माणसे कशी वागतात किंवा अशी का वागतात हा अध्यात्माचा विषय नसून मी कसा वागतो आणि मी कसा वागेन हा अध्यात्माचा विषय आहे नेमके हेच समजून घेणे आवश्यक आहे.

       अध्यात्म शास्त्र म्हणजे निर्भेळ आनंद आहे. आनंदी जीवन जगण्याचे तंत्र या शास्त्रांच्या आधारे जाणून घेतले तर जीवनात निर्माण होणारे ताण तणाव याला आपण सहज तोंड देऊ शकतो. आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्या मनात तसेच आपल्या भोवती आनंदी वातावरण राहण्यासाठी काही गोष्टी आत्मसात करणे गरजेचे आहे. दुसऱ्याला दुखावणे, दुसऱ्याचा अपमान करणे, सतत कलह निर्माण होईल असे शब्द बोलणे, दुसऱ्याची चेष्टा करणे हे करंटे पणाची लक्षणे आहेत ज्याचा त्याग करणे हे आनंदी जीवनाचे सूत्रच आहे. आपल्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द इतरांना प्रसन्न करणारा असावा. याचा अर्थ फक्त इतरांची स्तुती किंवा मुह मे राम बगल मे छुरी असा नसून समोरच्या व्यक्तीचे अंतःकरण शांत करणारी वाणी असावी. समोर असताना वरवर गोड बोलून त्या व्यक्तीच्या पाठीमागे मते त्याची निंदा नालस्ती करणे हे करंटेपणाचे लक्षण आहे. तोंडावर चांगले बोलावे पण पाठीमागे देखील चांगले बोलण्याचा विवेक जागा ठेवते ते अध्यात्म.

      वेगाने बदलणारे शहरीकरण, जीवनशैली, कुटुंब पद्धती, प्रसार माध्यमांचा वाढता प्रभाव या सर्वांमुळे निर्माण होणारे ताणतणाव याला देखील सामोरे जावे लागत आहे. या सर्व परिस्थितीत अध्यात्म शास्त्राच्या आधारे मनःशांती प्राप्त करून घेता येते फक्त त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. या शास्त्रामध्ये उपासनेवर भर दिला आहे. परंतु उपासना म्हणजे देवपूजा, मंदिरात जाऊन देवदर्शन, पोथ्या वाचन, उपासतापास असाच अनेकांचा ग्रह झालेला दिसतो. अनेक उपवास करून नित्य कर्म करताना मात्र इतरांचा उपहास करताना अनेक जण दृष्टीस पडतात. अखंड सावध राहून जीवन जगणे ही देखील एक उपासनाच आहे. सकाळी पूजा पाठ करून, जपाची माळ ओढून दिवसभर अहंकाराने बरबटलेले आणि लोकनिंदे मध्ये रमलेले खरे अध्यात्म शास्त्र जाणत नाहीत असेच म्हणावे लागेल. नाकारात्मक गोष्टींचा त्याग याचा अर्थ अध्यात्म शास्त्र आपल्याला दुबळे बनवते असा नाही तर कोणत्या परिस्थितीत नेमके कसे वागावे हे धोरण यातून शिकता येते.

       आज काळ बदलला, मनुष्याचे राहणीमान बदलले, विज्ञान प्रगत झाले परंतु माणसांची वृत्ती मात्र तशीच राहिली. त्यामुळे प्रगतीच्या अत्युच्च शिखरावर असून देखील मनुष्य असमाधानीच राहिला. हे माझे आणि तुझे तेही माझेच अशी वृत्ती इतकी बळावली की हिंसाचार वाढला. प्राप्त झालेल्या बुद्धीच्या सामर्थ्याचा उपयोग दुसऱ्याच्या नाशासाठी करताना दिसू लागला. जगात घडणारे अतिरेकी हल्ले, बॉम्बस्फोट या घटनांतून या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. राग,द्वेष, मत्सर कोणत्या प्रकारची टोकाची हानी करू शकतो याचे आपल्याला प्रत्यंतर येते. आजच्या परिस्थितीत जर काही चांगले घडवायचे असेल तर सकारात्मक विचारानां दिशा देणारे तसेच मनःशांती प्राप्त करून देणारे अध्यात्म शास्त्र नेमकेपणाने समजून घेऊन आपल्या जीवनात उतरवणे ही काळाची गरज ठरत आहे.
जय जय रघुवीर समर्थ  


No comments:

Post a Comment